मराठी ललित गद्याची परंपरा ही केवळ अनुभवकथनाची नसून ती माणसाच्या अंतर्मनाचा, अस्तित्वाचा आणि विश्वाशी असलेल्या त्याच्या नात्याचा शोध घेणारी आहे. त्या परंपरेतील प्रतिध्वनी ऐकवत, पण स्वत:चा स्वतंत्र स्वर जपत प्रशांत वसंत डिंगणकर यांचा ‘मनबाधा’ हा ललित लेखसंग्रह वाचकांसमोर येतो. आजच्या वेगवान, माहितीप्रधान आणि क्षणभंगुर काळात अंतर्मुख होण्याचे माणूस हरवत चाललाय. अशा काळात हे पुस्तक वाचकाला थांबायला भाग पाडते. स्वत:शी संवाद साधायला शिकवते. म्हणूनच हा लेखसंग्रह केवळ वाचण्याचा विषय नाही; तो अनुभवण्याचा, मनात मुरवण्याचा आणि पुन:पुन्हा उलगडत नेण्याचा प्रवास आहे.

या पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहे ‘राधा’. पण ही राधा पुराणातील, भक्तिकाव्यातील किंवा कृष्णप्रेमात विरघळून गेलेली राधा नाही. ती मानवी मनाच्या अतिसूक्ष्म स्तरावर दडलेली एक अदृश्य जाणीव आहे. प्रत्येकाच्या अस्तित्वात असलेली, पण प्रत्येकाला न सापडणारी… लेखक स्वत:च्या मनाच्या प्रदेशातून चालत या राधेचा शोध घेतो; आणि त्या शोधात वाचक नकळत स्वत:चाच शोध घेऊ लागतो. संग्रहातील पहिले पाच लेख पंचमहाभूतांवर आधारित आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या तत्त्वांकडे लेखक केवळ निसर्गाच्या घटकांप्रमाणे पाहत नाही; तर मानवी भावविश्वाच्या प्रतीकांप्रमाणे पाहतो.

पंचमहाभूतांमध्ये विखुरलेल्या राधेचा शोध घेताना त्याचे लेखन वेगळ्याच आध्यात्मिक उंचीवर पोहोचते. ‘तेज’ या लेखात मृत्यूचा स्वीकार आहे; पण तो निराशेचा नाही. चितेच्या ज्वाळांतही जीवनाची अखंडता शोधणारा हा लेखक अग्नीमध्ये राधेचे अस्तित्व अनुभवतो. ‘पृथ्वी’मध्ये तो मातीतून जन्मणार्‍या जीवनाचा अर्थ सांगतो. प्रत्येक पंचतत्त्वातून तो अस्तित्वाचा एक नवीन अर्थ उलगडतो. त्यामुळे हे लेख निसर्गवर्णन राहत नाहीत; ते मानवी आत्म्याचा आरसा बनतात.

या शोधात सर्वात मोठे अडथळे म्हणजे मानवी मनातील षड्रिपू. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर यांचे विश्लेषण करताना लेखक उपदेशक बनत नाही. तो स्वत:च त्या प्रवासाचा सहप्रवासी राहतो. त्यामुळे त्याचे विचार वाचकावर लादले जात नाहीत; ते वाचकाच्या मनात शांतपणे रुजतात.
डिंगणकर यांच्या लेखनाचे सर्वांत मोठे सामर्थ्य म्हणजे त्यांची प्रतिमासृष्टी. साध्या अनुभवांना ते विलक्षण ता्त्विवक अर्थ देतात. ‘‘मायेचा झरा गायीच्या आणि आईच्या दुधात जन्म घेतो’’ यांसारखी वाक्ये केवळ सुंदर नाहीत; ती माणसाच्या सांस्कृतिक स्मृतीला स्पर्श करणारी आहेत. अशा असंख्य ओळी या पुस्तकात सापडतात आणि वाचन संपल्यानंतरही दीर्घकाळ मनात रेंगाळत राहतात.

या संग्रहात अधूनमधून येणार्‍या कविता हा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण पैलू आहे. गद्याच्या प्रवाहात या कविता विरामचिन्हांसारख्या येतात. त्या वाचकाला श्वास घेण्याची जागा देतात; पण त्याच वेळी लेखातील भावार्थ अधिक गहिरा करून पुढील प्रवासासाठी तयारही करतात. पुस्तकातील रेखाचित्रेही शब्दांचीच विस्तारलेली रूपे वाटतात. त्यामुळे हे पुस्तक केवळ वाचले जात नाही; ते पाहिले, अनुभवले आणि अंतर्मनात साठवले जाते.
भाषेच्या पातळीवर पाहिले तर लेखकाने अनेक ठिकाणी प्रदीर्घ, काव्यमय वाक्यरचना वापरली आहे. त्यामुळे हे लेखन एका बैठकीत संपवण्यासारखे नाही. प्रत्येक लेखानंतर थांबावे लागते. विचार करावा लागतो. पुन्हा मागे वळून काही परिच्छेद वाचावे लागतात.

हीच या लेखनाची ताकद आहे; आणि कदाचित काही वाचकांसाठी ते आव्हानही आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे ते वाचकाला कोणतेही अंतिम उत्तर देत नाही. उलट अनेक प्रश्न देऊन जाते. राधा नेमकी कोण? कृष्ण म्हणजे काय? आत्मा, प्रेम, विरह, निसर्ग, मृत्यू आणि अध्यात्म यांचा परस्परसंबंध कोणता? या प्रश्नांची उत्तरे लेखक देत नाही; ती शोधण्याची जबाबदारी तो वाचकावर सोपवतो. आजच्या काळात तत्काळ अर्थ सांगणारे साहित्य मोठ्या प्रमाणात लिहिले जात आहे. त्या तुलनेत राधेचा शोध हा संयम मागणारा, अंतर्मुख करणारा आणि वाचकाच्या संवेदनांवर विश्वास ठेवणारा लेखसंग्रह आहे. हे लेखन जेवढे मनात मुरत जाते, तेवढे त्याचे नवे अर्थ उमलत जातात.

लेखकाने शब्दांनी एक गोफ विणला आहे. त्या गोफात राधा आहे, कृष्ण आहे, पंचमहाभूते आहेत, अध्यात्म आहे, वेदना आहे, विरह आहे; पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्या गोफाच्या मध्यभागी माणसाचे मन आहे. त्या मनाचे सौंदर्य, त्यातील गुंतागुंत आणि त्यातील चिरंतन शोधयात्रा शब्दांत पकडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. म्हणूनच हा संग्रह केवळ ललित लेखांचा नाही; तर मनाशी संवाद साधणार्‍या साहित्याचा एक संवेदनशील दस्तऐवज ठरतो.
‘मनबाधा’, प्रशांत वसंत डिंगणकर, स्वामीराज प्रकाशन, पाने- ९६, किंमत- २५० रुपये.
yaminidalvi8@gmail.com