मराठीमध्ये नव्याने कथालेखन करणार्‍या व कथा लेखनाच्या क्षेत्रात स्वत:चं स्थान हळूहळू निर्माण करणार्‍या मंगल कातकर यांचा ‘अनुबंध’ हा पहिलाच कथासंग्रह. विषय वैविध्य हे या कथासंग्रहाचे खास वैशिष्ट्य. सरोगसी मातृत्व, ब्रेकअप, विवाहबाह्य संबंध त्यामुळे कुटुंबात उभे राहणारे वादळ, डिस्टन्स रिलेशनशिप, घटस्फोट, मूल दत्तक घेणे, पौगंडावस्थेतील मुलांचे प्रेम संबंध निर्माण होणे यांसारख्या विषयांचे केंद्रस्थान त्यांच्या काही कथांमध्ये आहेत. लिंग बदल, अवयवदान, वीरमरणप्राप्त सैनिकाच्या पत्नीचा निर्धार यांसारख्या विषयांतील वैविध्यामुळे लेखिका किती जागरूकतेने आपल्या अवतीभवतीच्या सामाजिक घडामोडींकडे पाहते हे लक्षात येतं.

या कथासंग्रहातील बर्‍याच कथांमध्ये ्त्रिरया केंद्रस्थानी आहेत. ‘निर्णय’ कथेतली पत्रिका जुळत नाही म्हणून लग्न टाळून आपली फसवणूक करू पाहणार्‍या मुलाला विचारपूर्वक उत्तर देणारी तरुणी असो, की लग्नात फसवले तरी गरिबी आणि प्रतिकूलतेवर ही निर्धाराने, स्वाभिमानाने मात करणारी ‘दर्शन’ कथेतील स्त्री असो… आपल्या समोरील समस्यांना सर्व शक्तींनिशी त्याचवेळी सामोपचाराने सामोरे जाण्याचं त्यांचं धाडस वाचकांना भावून जातं.

या कथांमध्ये प्रसंग, परिस्थिती, पात्रांची प्रादेशिकता, व्यवसाय इत्यादीनुसार पात्रांच्या संवादाची भाषा असल्यामुळे पात्र खरी वाटतात. ‘भूमिपुत्र’सारख्या कथेमध्ये ग्रामीण भाषेचा पात्रसंवादांसाठी अतिशय चपखलपणे उपयोग केल्यामुळे ती पात्रे अस्सल मातीतील वाटतात. पात्रांच्या कृतींचे तपशीलवार वर्णन केल्यामुळे उदाहरणार्थ… तिने केसांचा क्लिप काढून केसांवरून हात फिरवला व क्लिप पुन्हा लावला, साडीचा पदर व्यवस्थित केला. घरात दिवे लावले व दरवाजा उघडला… (पार्टनर) पात्रं वाचकांच्या डोळ्यांसमोर सहज वावरू लागतात. निवेदन तृतीय पुरुषी साध्या, सोप्या भाषेत आहे. सरोगसी मातृत्व, घटस्फोट इत्यादी विषयांच्या अनुषंगाने योग्य त्या परिभाषेचा उदाहरणार्थ- क्रायो प्रिझर्वेशन, ग्रेडीव्होर्स इ. वापर लेखिकेने केल्यामुळे योग्य ते अनुभवविश्व जसेच्या तसे आपल्यासमोर उभे राहते.

काही कथांमधील स्त्रिया स्वतंत्र, उत्तम शिक्षण घेतलेल्या, नोकरी करणार्‍या आहेत… उदा. ‘किरण’, ‘प्रेमबंध’ यांसारख्या कथांमधील नायिका. काही कथांमधील नायिका ग्रामीण पार्श्वभूमी असणार्‍या गरिबीत, कष्टाने स्वत:चा कसाबसा गुजराण करीत आहेत. ‘दर्शन’, ‘भूमिपुत्र’, इ. ‘नाळबंद’ सारख्या कथेत तर धारावीच्या झोपडपट्टीतील कष्टकरी स्त्री आहे. लेखिकेने समाजाच्या या वेगवेगळ्या स्तरांतील, वर्गांतील स्त्रियांचे विचार विश्व, भावविश्व त्या- त्या कथाबीजाला केंद्रस्थानी ठेवून कधी सूचकपणे तर कधी नेमकेपणाने उलगडून दाखवले आहे.

कथानकामध्ये एखादी समस्या आणि तिची उकल करण्यासाठी योगायोगाने अगदी चपखल घटना- प्रसंगांची मालिका लेखिकेने जुळवून आणली आहे. आता पुढे काय होणार, ही वाचकांची उत्सुकता निर्माण होते आणि लेखिका त्या समस्येचे निराकरण करणार्‍या घटना- प्रसंगांची पेरणी करून वाचकांना प्रवाहिपणे, सलगपणे कथा वाचनाचा एकसंध अनुभव आपल्या कथा लेखनातून देते.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या जगामध्ये यंत्रमानव हळूहळू सहसंवेदना आणि भावना विकसित करू लागले तर काय घडेल हे ‘कम्पॅनियन’सारख्या कथेमधून लेखिकेने खुसखुशीतपणे दाखवून दिले आहे. ‘स्टन्टमॅन’सारखी कथा हलकीफुलकी, विनोदी आणि मिश्किलपणाचा जाता जाता अनुभव देऊन जाते.

आपल्या आयुष्यात निर्माण होणार्‍या समस्या कधी मानवनिर्मित कधी निसर्गनिर्मित तर कधी नियती निर्मित… त्यांच्यापुढे या कथांमधली पात्रे शरण जातात की त्यांच्यातील सत्व या संघर्षातून उजळवून टाकतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘अनुबंध’ या कथासंग्रहात छोट्या कथाबीजांमधून आटोपशीरपणे कथानके वाचकांच्या भेटीला येतात. अनावश्यक वर्णने, फापटपसारा टाळून अतिशय नेमकेपणाने, वेगाने कथानकांना सादर केल्यामुळे एका मागोमाग एक कथा आपण झरझर वाचू शकतो. या कथासंग्रहाचे मुखपृष्ठही चौकटीतून बाहेर पडणार्‍या स्त्रीच्या चित्रातून नव्या अनुभवांच्या दिशेने होणारी वाटचाल सुचवते. समर्पक मुखपृष्ठामुळे ‘अनुबंध’शी वाचकांचाही वाचनानुबंध चटकन जुळून येतो.

‘अनुबंध’, मंगल कातकर,

संधिकाल प्रकाशन,

पाने- १५७, किंमत-२०० रुपये

usujatarane31may@gmail.com