scorecardresearch

हान्डेलच्या राष्ट्रीय ठेव्याची चित्तवेधक कहाणी!

पाश्चिामात्य जगतात प्रसिद्ध संगीतकारांच्याच घरांची अगणित संग्रहालयं केलेली आहेत.

मनोहर पारनेरकर  

पाश्चिामात्य जगतात प्रसिद्ध संगीतकारांच्याच घरांची अगणित संग्रहालयं केलेली आहेत. त्यातील अनेक संग्रहालयं केवळ ऑस्ट्रियामध्येच आहेत. त्यातील महत्त्वाची म्हणजे हायडन, मोझार्ट, बिथोव्हन आणि शुबर्ट यांची आहेत; पण या लेखासाठी मी ज्या घराचं संग्रहालय निवडलं आहे ते प्रसिद्ध जर्मन संगीतकार जॉर्ज फ्रेडेरिक हान्डेल (१६८५-१७५९) याचं आहे. हे घर संग्रहालय बर्लिन किंवा म्युनिच इथे असेल असा तुमचा ग्रह होणे स्वाभाविक आहे, पण आश्चर्याची आणि औपरोधिक गोष्ट अशी की, हे संग्रहालय लंडनच्या मेफेअर भागात आहे, याची ही सुरस, चमत्कारिक, पण अस्सल कहाणी.

हा लेख हान्डेल याच्या संगीताबद्दल नाही, कारण त्याचं संगीत हा फार मोठा विषय आहे. अतिशय चिडखोर, दुरुत्तरं करणारा हा जर्मन संगीतकार गेली जवळजवळ तीनशे वर्ष ब्रिटिश जनतेच्या गळय़ातला ताईत कसा बनून राहिला, लंडनमधल्या ‘हान्डेल हाऊस म्युझियम’ आणि त्याला जिथे पुरण्यात आलं त्या ‘वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे’ अशा दोन प्रसिद्ध स्मारकांवर त्याचं नाव कसं कोरलं गेलं, याबद्दल हा लेख आहे. हान्डेल हा जे. एस. बाख या जर्मन संगीतकाराच्या समकालीन होता. बारोक काल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळातील तीन महत्त्वाच्या संगीतकारांपैकी एक होता. बाख आणि इटालियन संगीतकार अंतोनियो व्हीवाल्डी (१६७८-१७४१) हे अन्य दोघे संगीतकार होते.

हान्डेलचा जन्म १६८५ मध्ये हॅल्ले (सॅक्सनी) येथे झाला. त्याच्या वडिलांची इच्छा जर सफल झाली असती तर तो वकील झाला असता; पण हान्डेलची विलक्षण सांगीतिक प्रतिभा त्याच्या लहानपणीच त्याच्या वडिलांच्या ध्यानात आली होती. आणि म्हणून संगीतात कारकीर्द करण्याची परवानगी- नाखुशीने का होईना, पण त्यांनी त्याला दिली. हान्डेलने प्रथम हॅम्बर्ग येथील एका ऑपेरा हाऊसमध्ये काम केलं. त्यानंतर इटली भाषेतील ऑपेरा अंगात भिनवून घेण्यासाठी म्हणून त्याने अनेक वर्ष इटलीमध्ये काढली. त्यानंतर त्याने १७१० साली लंडनला प्रथम भेट दिली. ज्या कारणासाठी अनेक जण लंडनकडे आकर्षित आणि स्थलांतरित होतात, त्याच कारणासाठी हान्डेलदेखील आकर्षित झाला होता- आणि ते म्हणजे तिथे उपलब्ध असणाऱ्या आर्थिक संधी. त्या काळातही लंडन एक श्रीमंत शहर होतं आणि जो हरहुन्नरी आहे, ज्याच्याकडे कौशल्य आणि प्रतिभा आहे अशा सर्वासाठी अगणित संधी तिथे उपलब्ध होत्या. त्यामुळे १७१७ पर्यंत तो तिथे कायमचा स्थायिक झाला यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. फेब्रुवारी १९२७ मध्ये त्याने  इंग्लंडचं नागरिकत्व मिळवलं आणि ही एक असामान्य घटना होती.

हान्डेलमुळे इंग्लिश संगीताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. त्याची सांगीतिक प्रतिभा, प्रसन्न व्यक्तिमत्त्व, उद्योगी स्वभाव, त्याची महत्त्वाकांक्षा आणि सर्व प्रकारच्या इंग्लिश श्रोत्यांची मर्जी संपादन करून घेण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न या सर्व गोष्टींमुळे त्याला नेत्रदीपक यश मिळालं. अगदी पहिल्या दिवसापासून हान्डेलने खानदानी लोकांसाठी इटालियन ऑपेरा लिहिले, त्याचप्रमाणे चर्च, सामान्य श्रोते आणि शाही कुटुंबांसाठी इंग्लिश ऑपेरादेखील लिहिले.

हान्डेलची कारकीर्द बहरण्यासाठी जर्मनीमध्ये जन्मलेल्या किंग जॉर्ज (पहिले) यांचा हातभार लागला का? याचं उत्तर- हो आणि नाही! या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी माझं एक निरीक्षण लक्षात घ्या : ब्रिटिश राजेशाहीला जर्मन वंशाची दीर्घ परंपरा आहे. थोडय़ाशा अतिशयोक्तीनं आणि काहीशा उपरोधानं तिला जर्मन असंच म्हटलं जातं. जवळजवळ दोनशे वर्ष चाललेलं हे प्रेम प्रकरण पहिल्या महायुद्धामुळे (१९१४-१९१८) उद्ध्वस्त झालं. याची सुरुवात किंग जॉर्ज (पहिले)- (१६६०-१७२७)  यांच्यापासून झाली असं म्हणता येईल. हान्डेलने राजघराण्याच्या अनेक समारंभांसाठी संगीत लिहिलं; पण राजासाठी खास करून लिहिलेलं ‘वॉटर म्युझिक’ आणि ‘रॉयल फायर वर्क्‍स’साठी लिहिलेलं संगीत राजाला विशेषत: आवडलं होतं; पण हान्डेलला मिळालेलं स्थान हे केवळ राजाश्रयामुळे नव्हतं, तर त्याने सामान्य ब्रिटिश जनतेच्या मनात मिळवलेला मान यामुळे होतं. आणि ही एक अविश्वसनीय तरीही संपूर्ण खरी गोष्ट : जर्मनीमध्ये असताना हान्डेल जॉर्ज यांच्याकडे नोकरीला होता. त्या वेळी जॉर्ज हा हॅनोव्हरचा स्वामी होता. त्या वेळी हान्डेल अनधिकृतपणे इंग्लंडमध्ये राहिल्याने त्याने त्यांच्या सेवेच्या शर्तीचा भंग केला होता; पण सुदैवाने नवीन राजाने हान्डेलच्या या गैरवर्तनाकडे कानाडोळा केला आणि त्याला राजाश्रय देणं चालूच ठेवलं. हान्डेल ज्या घरात एके काळी राहत होता त्या घरात आता त्याचं संग्रहालय केलं आहे.

हे अठराव्या शतकातील जॉर्जियन पद्धतीचं घर आहे. या घरात हान्डेल त्याच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १७५९ सालापर्यंत सलग ३६ वर्ष राहिला होता. ‘हान्डेल हाऊस ट्रस्ट’ या संस्थेनं या घराचं २००१ साली संग्रहालयात रूपांतर केलं. लंडनमधील अतिशय महागडय़ा आणि उच्चभ्रू अशा मेफेयर भागात हे घर आहे. फॅशनेबल ब्रॉड स्ट्रीट, क्लॅरीज हॉटेल, ग्रॉसव्हेनॉर स्क्वेअर आणि अमेरिकन एम्बसी यांसारख्या वास्तू या घराच्या जवळ आहेत. शहरातील चकचकीत, उच्चभ्रू अशा भागात हे स्मारक आहे.  या घराचा रंग, त्यातील पडदे, खुच्र्याची कव्हर्स, गाद्या, उशा, पांघरुणं इत्यादी सर्व गोष्टी जॉर्जियन पद्धतीची ठेवून या संग्रहालयाचे प्रशासक, क्युरेटर आणि पुनस्र्थापना करणाऱ्या सर्वानी मिळून अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. या संग्रहालयाला भेट देणारे त्या घरातील सर्व खोल्या फिरून पाहू शकतात. The Water Muzik  (१७१७), Muzik for Royal Fire Works (१७४९) आणि त्यांचं अजरामर Oratorio Messiah (१७४१) या सर्व रचना त्यांनी कुठे निर्माण केल्या हे बघायला मिळतं. Messiah ही (Oratorio ही एकल आवाजासाठी, कोरस आणि ऑर्केस्ट्रासाठी धार्मिक विषयांचं कथन आणि चिंतनपर मजकूर असलेली विस्तृत रचना असते.) इथे हान्डेलचे शयनकक्ष, काही चित्रिपट्र आणि त्याच्या आणि मित्रांच्या संस्मरणीय वस्तू बघायला मिळतात. हान्डेलने त्याच्या भिंती अनेक कलाकृतींनी सजवल्या असणार. न्यूयॉर्कमधील ‘फ्रिक आर्ट रेफरन्स लायब्ररी’ इथे १७६० सालच्या विक्रीचा कॅटलॉग आहे, त्यात या संगीतकाराच्या मालकीच्या ८० चित्रांची नोंद आहे. त्याने रेम्ब्रॉंची दोन चित्रं आपल्या मित्राला भेट दिली होती. राणी एलिझाबेथ कक आणि राज्य वस्तुसंग्रहालय यांनी ही चित्रं या संग्रहालयाला कर्जाऊ दिली आहेत.

लंडनमधील उच्चभ्रू वस्तीतील हे जॉर्जियन घर हान्डेल संग्रहालयात परिवर्तित व्हायच्या खूप आधीपासून यात्रेकरूंचे लोंढेच्या लोंढे आपल्या आवडत्या दैवताचं दर्शन व्हावं म्हणून या घरात येऊन धडकत असत. त्या दैवताचं नाव होतं जिमी हेंड्रिक्स (१९४२-१९७०)- एक सार्वकालिक महान रॉक स्टार आणि एक महान रॉक गिटारवादक. या घराबाहेर असलेल्या निळय़ा रंगातील दोन पाटय़ा या दोन महान कलाकारांना श्रद्धांजली वाहतात. हे दोघेही याच घरात राहिले होते, पण वेगवेगळय़ा काळांत. मधे दोन शतकांचं अंतर होतं. २३ आणि २५ ब्रूक स्ट्रीट हा त्यांचा पत्ता होता. कधीकाळी या दोन वेगवेगळय़ा इमारती होत्या, पण आता त्या एक होऊनही बराच काळ लोटला आहे. फारच थोडा काळ त्यांनी या वास्तूत व्यतीत केला. या अमेरिकन रॉक स्टारबद्दल अमाप फुटकळ, क्षुल्लक गोष्टी लिहिलेल्या उपलब्ध आहेत; पण त्यातली एक मला खूपच मनोरंजक वाटली, ती मी इथे वाचकांसाठी देत आहे. हेंड्रिक्सला या इमारतीत हान्डेल राहत होता याबद्दल आधी काहीच कल्पना नव्हती; पण जेव्हा त्याला हे कळलं तेव्हा त्याला त्याची भुरळ पडली आणि त्याने ताबडतोब हान्डेलच्या अनेक रेकॉर्डस खरेदी केल्या. त्यात प्रसिद्ध Messiah आणि The Water Muzik यांचाही समावेश होता.

हान्डेलला वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे दफन करण्यात आलं. त्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या हान्डेलने त्याच्या मृत्यूमध्येही एक प्रकारचा इतिहास घडवला. परदेशातून येऊन इथे स्थायिक झालेल्या संगीतकारांमधील वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे दफन केला गेलेला तो कदाचित एकमेव संगीतकार असावा. (असा सन्मान मिळालेला दुसरा संगीतकार म्हणजे हेन्री पर्सेल (१६५९-१६९५) हा होय, पण तो पक्का ब्रिटिश होता.) हान्डेलच्या अंत्ययात्रेला सुमारे ३००० लोक होते. सुमारे १११ वर्षांनंतर सुप्रसिद्ध इंग्लिश लेखक चार्ल्स डिकन्स यांचं दफन त्याच्या शेजारीच केलं गेलं. हा लेख संपवताना जरा एक विनोदी किस्सा. हान्डेल जरी जर्मन होता तरी त्याची विनोदबुद्धी पक्की इंग्लिश होती. मृत्यूपूर्वी काही वर्ष त्याला अंधत्व आलं होतं. त्याची विनोदबुद्धी मात्र शाबूत होती, त्याचा हा नमुना. दृष्टी गेल्यानंतर तो एकदा त्याचाच Concerto ऑर्गनवर वाजवत होता. सॅम्युएल शार्प नावाचा त्याचा एक सर्जन मित्र होता. तो त्याला म्हणाला, ‘‘तुझ्याबरोबर जॉन स्टॅनले याने वाजवलं पाहिजे.’’ जॉन स्टॅनले हा त्या काळातला एक उत्कृष्ट पियानोवादक होता, पण तो अंध होता. त्यावर हान्डेल हसू आवरत म्हणाला, ‘‘तू धर्मग्रंथांचं वाचन केलेलं दिसत नाहीये. त्यात स्पष्ट लिहिलंय, जर एक अंध व्यक्ती दुसऱ्या अंध व्यक्तीला मार्ग दाखवत असेल तर दोघेही खड्डय़ात पडतात.’’

सप्टेंबर २०११ साली मला लंडनमधील हान्डेल हाऊस म्युझियमला भेट देण्याची संधी मिळाली होती. माझ्या सांस्कृतिक जीवनातील ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटना होती. या भेटीदरम्यान घडलेल्या तीन गोष्टी मला वाचकांना सांगाव्याशा वाटतात. एक – मी ज्या खोलीत माझ्या मुलीकडून माझा फोटो काढला होता, (त्यात माझ्या बाजूला १९ व्या शतकातील हार्पसिकॉर्ड हे वाद्य होतं.) त्याच खोलीत हांडेलने त्याच्या सुप्रसिद्ध मसायाची रचना केली. तिथल्या गाइडने ही माहिती जेव्हा मला दिली तेव्हा मी भोवळ येऊन पडायचाच बाकी होतो. दोन – सुमारे अर्धा तास माझा एका मध्यमवयीन स्त्रीबरोबर सुखसंवाद घडला. ती कदाचित संग्रहालयाची डेप्युटी क्युरेटर असावी. तिच्याकडे  बारोक संगीतातील एम.फिल ही ऑक्सफर्ड विद्यापीठाची पदवी होती आणि लंडनमधील काही प्रतिष्ठित ऑर्केस्ट्रामधल्या कॉयरग्रुपमध्ये ती गात असे. आणि तीन – का कुणास ठाऊक, पण एका तरुण मुलीला- बहुधा ती गाइड असावी – मी मलेशियन ख्रिश्चन आहे असं वाटलं. 

एक मित्रत्वाचा सल्ला – तुम्ही जर संगीतप्रेमी असाल तर यूटय़ूबवर जा. तिथे The Choir of King’s college Cambridge sings Handel’s Messiah oratorio पाहा. ते संगीत आणि त्यातलं वातावरण तुम्हाला नक्कीच आवडेल.   

शब्दांकन : आनंद थत्ते samdhun12@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Manohar parnerkar fascinating story handel national deposit westerners live ysh

ताज्या बातम्या