‘चां’गलं, ‘च’विष्ट, ‘चा’रित्र्यवान, ‘च’पळ, ‘च’पखल, ‘चौ’कस यांसारखे शब्द चित्तास आनंदित, प्रसन्न करतात; तसेच ‘चढा’ओढ, ‘चिं’ता, ‘चो’री, ‘चू’क यांसारखे शब्द मनावर विपरीत परिणाम करतात. म्हणजेच, शब्दाची सुरुवात ‘च’ या अक्षराने होत असली तरी कोणती अक्षरे शब्द पुरा करतात यावर त्यांचा परिणाम अवलंबून असतो. परंतु हा ‘च’ जर शब्दांच्या शेवटी आपले ठाण मांडून बसला, तर आधीच्या अक्षरांवर आपली मक्तेदारी गाजवतो. म्हणजे साधारणत: आणि वरकरणी साधे -सरळ दिसणारे हे बिचारे शब्द हा ‘च’ मागे लागताच गोंधळून जातात आणि पर्यायाने त्या शब्दाचा आशय आणि अर्थही. थोडक्यात, ही ‘च’ची बाधा म्हणजे एखाद्या मताचा, भूमिकेचा, दृष्टिकोनाचा अतिआग्रह, त्याला साजेसा केलेला ‘आचार’ आणि या दोन्हींमध्ये हेलकावे खाणाऱ्या आणि वेळप्रसंगी या दोन्हींमुळे प्रभावित होणाऱ्या, तर कधी दोन्हींवर प्रभाव टाकणाऱ्या ‘भावना’. आपल्या विचारांची संख्या निश्चित सांगणे कठीण, परंतु त्यांचा वेग भन्नाट असतो, हे आपण सर्वानी अनुभवलेले असेल. कधी कधी हा वेग आपल्याला जाणवत जरी नसला, तरीही आपले विचार त्यांची वाटचाल सुरू ठेवतात. कळत- नकळत आपल्या भावविश्वावर आणि आचारांवर ते छाप पाडत असतात. प्रत्येकाचा एक विचार-धारणा संचय असतो. आपल्या आगम ज्ञानातून आणि जीवन जगताना गोळा केलेल्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनुभवांनी तो संचय आकारास येतो. काळाबरोबर आणि अनुभवांआधारे हे विचार, या धारणा पक्क्या होत जातात आणि रिंगमास्टरसारख्या आपली तालीम घेत राहतात. आपण या तालमीत तरबेज होतो आणि जाणते-अजाणतेपणे या धारणांशी एकनिष्ठ राहून प्रत्येक वर्तन तसे आखतो. त्यामुळे या संचयाचे आणि त्यातील धारणांचे स्वरूप पोषक, उन्नतीधार्जिणे, वस्तुस्थितीनिष्ठ असणे गरजेचे आहे. आपले ‘विचार’ आपल्या भावनांची आणि वर्तनाची दिशा आणि दशा ठरवतात. या धारणेवर आधारित मानसशास्त्रीय संशोधन आणि निरीक्षणाद्वारे भाष्य करणाऱ्या प्रा. अॅरॉन बेक आणि डॉ. अल्बर्ट एलिस यांचे योगदान अमूल्य आहे. आपले ‘विचार’ आपल्याला पुढे ढकलतात किंवा मागे खेचतात. केवळ विचारच नव्हे, तर त्या विचारांची व्यापकता, त्यांतील आग्रहाची तीव्रता आणि दिशा आपल्या वर्तनास कारणीभूत ठरतात. आणि हे सर्व भावनांनाही आपल्याबरोबर थिरकवत राहतात. विचार आणि धारणांनी गच्च भरलेल्या संचयातच आग्रही भूमिका दडलेल्या असतात. नैतिकता जपणे, सुयोग्य प्रमाणात शिस्त पाळणे, कायद्याचे काटेकोरपणे पालन करणे यांसाठी हे ‘सक्ती’चे विचार आवश्यक आहेत. त्यांना आपण ‘नियम’ असे म्हणतो. ते अतिशय महत्त्वाचे आणि अनिवार्यच; पण आपल्या रोजच्या जीवनात, ‘स्व’त्त्वाप्रति, नातेसंबंधांमध्ये, तसेच व्यावहारिक जीवनातही आपण स्वत:ला असे बरेच ‘shoulds’ आणि ‘musts’ म्हणजेच ‘च’ जोडून ठेवतो. उदा. हे केलेच पाहिजे, लहानांनी असे वागलेच पाहिजे यांसारखी सक्ती. डॉ. एलिस यांच्या मते, हे अतिआग्रह आपण आपल्या दैनंदिन वर्तनात राबवले, तर आपला विचार-धारणा संचय तर्कहीन भासू लागतो व त्यामुळे आपल्या भावना आणि परिणामी आचारही. ‘मी प्रत्येक गोष्ट नीट‘च’ केली पाहिजे, प्रत्येक वेळी आणि प्रत्येक बाबतीत ‘यश’ मिळवले‘च’ पाहिजे. या बाबतीत माझ्या जवळच्या व्यक्तींचा स्वीकार किंवा कौतुक मिळवले‘च’ पाहिजे. तसे न झाल्यास मी एक अयशस्वी/ कुचकामी मनुष्य ठरेन’; ‘इतरांनी मला नेहमी‘च’ न्यायीपणाने, आस्थेने, आदराने वागवले‘च’ पाहिजे’; ‘मला सरळ-सोपे-मौजेचे जीवन लाभले‘च’ पाहिजे, नाहीतर माझ्या जगण्यात काही आनंद नाही’.. यांसारख्या धारणांचा आग्रह आपल्याला तर्कापासून दूर लोटतो. या धारणांनी केलेल्या भावनिक ऊहापोहामागील मुख्य कारण म्हणजे ‘मी’ आणि ‘इतरांनी’ कसे असावे, वागावे, भासावे याबद्दलचे आग्रह. स्वत: किंवा इतर लोक या आग्रही साच्यात बसले नाही की, एक प्रकारची अस्वस्थता, तक्रार करण्याची सवय आणि बेबनाव निर्माण होतो. जगाला केवळ काळे - पांढरे या साच्यात पाहण्याकडे कल, सुतावरून स्वर्ग गाठण्याची किंवा आभाळाला सुईएवढे समजण्याची वैचारिक चूक, चटकन निष्कर्षांस उतरण्याची घाई, सकारात्मक बाबींकडे दुर्लक्ष करून नकारात्मक गोष्टींवर भर देण्याची मानसिकता तयार होऊ लागते. अशावेळी प्रत्येक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष घटना किंवा इतरांची मतं - भूमिका - कृती स्वत:शी जोडून घेऊन ‘बिचारा मी’ या mode मध्ये शिरण्याचा व रागाचा शिकार होण्याची शक्यताही असते. एक उदाहरण पाहू या - राजन हा ‘च’ची बाधा झालेला एक पीडित. त्याचे विचार काहीसे असे - अमुक शिक्षणच घेतले पाहिजे; अमुक नोकरी किंवा व्यवसाय करणे म्हणजेच केवळ यशस्वी करिअर; एखाद्याने ‘अ’च केले पाहिजे/ करायला हवे होते, ‘ब’ नाहीच करता कामा, ‘ब’ केले ते चुकलेच; मी असे वागायला हवे/ तसे नकोच.. यांसारख्या जर-तरच्या समीकरणात अडकलेला हा इसम, आयुष्य असे‘च’ असले पाहिजे किंवा तसे नसले‘च’ पाहिजे असा आग्रह कवटाळून बसलेला, तो आपल्यातलाच एक. राजनच्या या ‘च’च्या पैंतऱ्यामुळे त्याला छोटय़ाशा गोष्टीतही तडजोड करणे कठीण जाते. आपल्या धारणेत एखादी गोष्ट बसली नाही की तो तक्रार करू लागतो, ती बदलण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. यात अपयश आले की, त्याला विलक्षण नैराश्य येते; त्याच्या आप्तेष्टांना- सहकाऱ्यांना त्याच्या संगतीत कैदेत असल्यासारखे आणि कायम कवायत करत असल्यासारखे वाटते. त्यामुळे हलकेफुलके क्षण आणि लोकांची मने राजनपासून कायम दुरावलेले आणि राजन सतत दुर्मुखलेला! धारणा संचयातील या आग्रहांच्या- ‘च’च्या - जाळ्यातून कशी सुटका करावी हे पाहू या. त्यासाठी प्रथम हे समजून घेऊ की, इच्छा आणि अतिआग्रह यात तात्त्विक फरक आहे. म्हणजे ‘एखादी गोष्ट घडावी, ही माझी तीव्र इच्छा आहे’, हे म्हणणे ‘एखादी गोष्ट झालीच पाहिजे, नाहीतर सगळे फोल आहे’ याहून भिन्न आहे. आपली स्वप्नं, ध्येयं, नैतिक मूल्यं, शिस्त यांच्याप्रति आपण आग्रही असावे, हे योग्य. परंतु आपल्या इतर धारणांप्रति अतिआग्रह धरून स्वत:ला झेपेनाशी सक्ती करणे किंवा हवे तसे न घडल्यास भावनिकरीत्या कोलमडून जाण्याइतपत त्यांची कास धरणे, यावर आपण येथे चर्चा करत आहोत. आपल्या स्वत:बद्दल, इतरांबद्दल आणि परिस्थितीच्या ‘असण्याबद्दल’ हे आग्रह जेव्हा मनापासून बाळगलेल्या इच्छांचे स्वरूप धारण करतात, तेव्हा हे वर्तन अधिक स्वागतार्थ आणि वस्तुस्थितीनिष्ठ ठरते. आपण स्वत: आचार-विचार-भावना या चक्रात परिणामकारक शब्द वापरताना, शेवटी ‘च’ लावताना दक्ष राहू या. तसे आढळताच फेरविचार करू या. उदा. ‘तू माझी ओळख करून द्यायला‘च’ हवी होतीस.’ हे रागाने म्हणण्याऐवजी, ‘तू माझी ओळख करून द्यावीस, ही माझी मनापासून इच्छा होती’ असे म्हणण्याच्या प्रयत्नात असावे. लक्षपूर्वक पाहिले, तर या दोन्ही वाक्यांमध्ये ‘काय हवे आहे’ हे कळते, परंतु शब्द आणि त्यांचा बाज यातील नियंत्रणाचे प्रमाण भिन्न आहे. पहिल्या वाक्याने समोरच्या व्यक्तीसही चीड येऊ शकते आणि आपली मागणी-स्वरूपात केलेली इच्छा, ही त्यांना सक्ती वाटून, ते त्याचा स्वीकार करणे टाळतात. म्हणजे सुसंवाद मुळात घडतच नाही. याउलट दुसऱ्या वाक्यात, आपली इच्छा स्पष्ट आणि सौम्यपणे मांडल्यामुळे, ते समोरच्या व्यक्तीला विचार करण्यास प्रोत्साहित करते आणि गरज भासल्यास वर्तनात बदल करण्याची मानसिकताही तयार करते. यावरून आपण ठरवावे की, आपण कोणता बाज निवडायचा आहे. आपण अतिआग्रह अभिवादनात बदलले, त्यांची तीव्रता अवाजवीरीत्या वाढवली नाही, प्राधान्याचे स्वरूप दिले, तर त्याचा योग्य तो आणि योग्य तितका परिणाम दिसून येईल. प्रत्येकच वेळी ‘च’ हा अडथळा निर्माण करेल असे नाही. म्हणजे ‘च’ ही इच्छा असणे स्वागतार्ह, परंतु प्रत्येक वेळी त्याचे ‘मागणी’त रूपांतर करण्याने कामे अपुरी राहतील. क्वचित प्रसंगी त्यांचा समावेश गरजेचाही आहे, हे निश्चित. पण त्यांच्या सवयीच्या वापराने ती आपली वर्तनशैली बनणार नाही ना, याकडे लक्ष द्यावे. कारण त्यांचा अतिप्रमाणात प्रादुर्भाव हा आपल्याला परिस्थिती स्वीकारण्यापेक्षा, परिस्थिती आपल्या आग्रही धारणा-मागण्यांच्या हिशेबाने वळवण्यास अधिक प्रवृत्त करेल. ‘मी माझ्या आयुष्यात काय घडतं, याशी निगडित आहे आणि त्याची जबाबदारी स्वीकारतो. इतरांनी कसे वागावे- असावे आणि एकंदर परिस्थितीने काय स्वरूप धारण करावे, यावर मी माझ्या ‘च’ने नियंत्रण आणणे टाळेन. इतरांना ठरवू दे, त्यांना काय हवे- नको ते. मी त्याबद्दल त्यांच्यावर माझ्या धारणा-संचयाची सक्ती करू शकत नाही.’ - ही मानसिकता सवयीने आणि सरावाने आपली जीवनशैली बनू शकते. बौद्धिक व मानसिक ओझे हलके होण्याचा अनुभव येतो आणि आयुष्याकडे सक्तीच्या नियमांच्या चष्म्यातून पाहण्यापेक्षा, मला काय आवडते वा आवडत नाही आणि माझी काय इच्छा आहे, या दृष्टीने पाहता येण्यास मदत होते. केवळ या विचारांचे वाचन/ स्वीकार पुरेसा नाही. जास्तीतजास्त प्रमाणात आणि परिस्थितीत ही भूमिका अंगी बाणवल्यास, त्याचा पोषक परिणाम दिसून येईल. आता इतके वाचल्यावर तुम्ही हे पटवून घेतले‘च’ पाहिजे आणि असे‘च’ वागले पाहिजे, हा मी अतिआग्रह धरण्यापेक्षा, ‘इतके वाचल्यावर, त्याचा तुम्ही मोकळ्या मनाने विचार करून, योग्य तो लाभ घ्यावा, अवलंबावा ही माझी मनापासून इच्छा आहे,’ हे म्हणणे योग्य ठरेल, नाही का? डॉ. केतकी गद्रे - ketki.gadre@yahoo.com (लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)