भूतकाळात रमणे आणि रुतणे या प्रक्रिया निरनिराळ्या आहेत. वेळ दोन्हीमध्ये व्यतीत होतो; परंतु निष्पत्ती मात्र भिन्न-भिन्न! भूतकाळ पुसून टाकणे कठीणच. कारण आपल्या आजवरच्या जीवनप्रवासात गोळा केलेले धडे, बोध, ज्ञान, कौशल्य, विचार, धारणा, भावना आणि अनुभव हे आपली ओळख बनतात. आपण वर्तमानकाळ अनुभवतो तो या घटकांच्याच बळावर. प्रत्येक क्षण हा या पोतडीत नवनवीन गोष्टी भरत असतो व आपला भूतकाळ संपन्न करत असतो. ‘स्वत्वा’चा शोध सुरू झाला की आपण आपला भूतकाळ तपासू लागतो. आपण कोण व कसे होतो, आता कसे आहोत व आपल्याला कसे व्हायचे आहे, या सततच्या अवलोकनाबरोबर आपण सतत गतअनुभवांची कास धरत असतो. हे अनुभव महत्त्वाचे. कारण स्वत:चे स्वत:शीच तुलनात्मक विश्लेषण करण्यासाठी ते उपयुक्त ठरतात. जुन्या आठवणींमध्ये रमणे मनाला सकारात्मक भावविश्वात नेते. परंतु कटु आठवणी आणि अनुभवांचे सततचे स्मरण मानसिक आरोग्यास लाभदायक ठरणे कठीण. आपण या सकारात्मक व नकारात्मक आठवणींचा कसा अर्थ लावतो, यावर मानसिक स्वास्थ्य अवलंबून असते. सद्य:स्थितीतील आपली मानसिकता, मानसिक आरोग्याचे स्वरूप व आपले एकंदर व्यक्तिमत्त्व हे आपण भूतकाळात रमतो की रुततो, हे ठरवत असतात. यातून हे स्पष्ट होते की, भूतकाळाचा उल्लेख वारंवार होणे अनिवार्य आहे. किंबहुना, स्वाभाविक आणि गरजेचाही. हा उल्लेख आपण कशा रीतीने करतो, यावरून गतअनुभवांचा कोणत्या स्वरूपाचा अर्थ लावून आपण त्यांचा आपल्या जीवनकथेत समावेश केला आहे, हे समजते. सकारात्मक व नकारात्मक स्वरूपाच्या घटनांशी तादात्म्य प्रस्थापित केल्यास आपण नव्या नजरेने, तटस्थपणे त्यांच्याकडे पाहू शकतो. बालपणी व तारुण्यात आलेले अनुभव हे प्रौढ जीवनाचे अविभाज्य घटक बनतात. आपल्या व्यक्तिमत्त्वावर त्यांचा खोलवर व दूरगामी परिणाम होताना दिसतो. हे अनुभव व त्यांचा दर्जा यावर आपण भूतकाळ आनंदाने, तृप्ततेच्या भावनेने स्मरू की पश्चात्ताप आणि तिरस्काराच्या, हे ठरते. सशक्त अनुभव मानसिक आरोग्य जपतात, तर कटु आठवणी, झालेले अन्याय व शोषण आपल्याला स्वास्थ्य लाभण्यापासून मागे खेचत राहतात, मार्गक्रमण खुंटवतात व आनंद उपभोगण्यापासून वंचित ठेवतात. कटु अनुभवांचे सावट आपल्यापैकी बऱ्याच जणांना सतत ग्रासून ठेवते, जखडून ठेवते. त्यातून सुटका करून घेण्याचा पर्याय अवलंबण्याची इच्छा असूनही बऱ्याचदा तसे करता येत नाही, इतक्या तीव्र दबावतंत्राने हे अनुभव कार्यरत असतात. परंतु भूतकाळाच्या दलदलीत रुतून राहण्याने केवळ आपल्यालाच नव्हे, तर आपल्याशी संलग्न व आपल्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींवर व त्यांच्या मानसिकतेवरही याचा दुष्परिणाम होऊ शकतो. आपण कळत-नकळत नैराश्याच्या जाळ्यात अडकून पडू शकतो. सतत नकारात्मक प्रसंगांच्या रवंथामुळे त्यातून स्वत:ला मुक्त करण्याऐवजी आपण आणखीन आणखीन त्यात सापडतो. यादरम्यान वर्तमानात येणारे आनंदी क्षणही कधी कधी आपल्या ध्यानातून निसटतात. भविष्यकाळाच्या दिशेने कल्पकतेने मार्गक्रमण करण्यासाठी भूतकाळातील घटनांचा, अनुभवांचा अभ्यास महत्त्वाचा यात वाद नाही; परंतु ही सततची चिकित्सा व उल्लेख उपयुक्त ठरण्याऐवजी हानीकारकच ठरू शकतात. डिंकासारखे चिकटून राहिलेले हे अनुभव आपोआप गळून पडतील ही अपेक्षा बाळगणे निरुपयोगी ठरेल. आपल्यालाच प्रयत्नपूर्वक ते काढून टाकावे लागतील. अर्थात ते नाहीसे होतील असे नाही, परंतु त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन तरी बदलेल व आपण स्वत:ला नैराश्याचे बळी होण्यापासून काही प्रमाणात वाचवू शकू.

पश्चात्ताप ही एक नकारात्मक भावनास्थिती म्हणायला हरकत नाही; परंतु त्याचा योग्य त्या कार्यपद्धतीनुसार वापर केला गेला तर भविष्याची वाटचाल सुलभ होऊ शकते व सकारात्मक बदल घडू शकतात. गतघटनांसाठी स्वत:ला जबाबदार धरून, सर्व दोष केवळ स्वत:कडे घेऊन किंवा कधी स्वत: नामानिराळे राहून केवळ इतरांना व परिस्थितीला दोष देत झालेल्या नुकसानीबद्दल सतत विचार करत राहणे व जे घडले ते नसते घडले तर किती बरे झाले असते, असे म्हणत सतत ‘जर-तर’च्या विश्वात राहून आपण आपली वाटचाल अधिक कठीण बनवून टाकतो.

Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता

आपण ही पश्चात्तापाची भावना उपयुक्त बनवू शकतो. आपल्या निर्णयांवर फेरविचार करण्यासाठी, नव्याने निराळी कार्यपद्धती अवलंबण्यासाठी व नावीन्यपूर्ण वाटचाल आखण्यासाठी याची उपयुक्तता निश्चितपणे होऊ शकते. परंतु आपण या संधी स्वत:ला उपलब्ध करून द्यायला हव्यात. त्या न केल्यास पश्चात्तापाची नकारात्मक भावना आपली तीव्रता जाणवून देईल व आपल्या वर्तमानातील निवडींवर त्याचा परिणाम होऊन भविष्यातील मार्गक्रमणही प्रभावित होईल. हा रवंथ नकारात्मक स्वरूपाचा होऊन तो ताण आपल्याला ग्रासून टाकेल व त्याचा शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होईल. भूतकाळाप्रति तिरस्कार व संताप हेही बऱ्याचदा आपल्या सद्य: जीवनप्रवासात आपले स्थान दर्शवून देते. इतर लोक आपल्याशी कसे वागले, त्यांचे वागणे किती आपमतलबी, उद्धट व अन्यायकारक होते, याबद्दल सतत उजळणी करून आपण आपल्या रागाच्या पातळीवर अंक वाढवत असतो. त्यांनी आपल्यासाठी काय करणे अपेक्षित होते, पण ते केले नाही किंवा पुरेसे केले नाही, या विचारात आपण कुठेतरी स्वत:ची सोडवणूक मात्र करून घेताना दिसतो. या बाबी सतत उद्धृत करत असताना आपली ही भाबडी आशा असते की, आपली बाजू सतत मांडल्यास आपल्याला पूर्वी न मिळालेला न्याय यायोगे आता तरी मिळेल! स्वत:च्या भूमिका बरोबरच कशा होत्या व आपण नेहमी परिस्थितीमुळे ग्रासलेले होतो, निर्बल होते, असहाय होतो याचे चर्वितचर्वण सतत करत राहिल्यास कुठेतरी आपण स्वत:वरची जबाबदारी टाळतो. जीवनकथा आपल्या बाजूने वळवण्याच्या अट्टहासात आपण इतरांना दोष देत नकळतपणे त्यांच्यापासून दुरावतो व सत्यापासूनही. भूतकाळात घडलेली प्रत्येक गोष्ट आपल्या लक्षात राहणे कठीण. ही अडचण लक्षात घेता बऱ्याचदा कथन पूर्णस्वरूप करण्यासाठी आपण कल्पिलेले चित्र रंगवतो. त्यात सत्याचा अभावही कधी कधी दिसून येतो. परंतु आपण त्या कथनाच्या मजकुरासंदर्भात इतक्या ठाम समजुतीत असतो, की याची शहानिशाही आपण करत नाही आणि संताप, पश्चात्ताप आणि असहायतेच्या चक्रात अडकून राहतो.

हे करण्याचे कारण स्वाभाविक आहे. आपल्या नकारात्मक भावनांशी तादात्म्य प्रस्थापित करण्याची पद्धती आपल्याला बऱ्याचदा अवगत नसते किंवा अवगत असल्यास ती ऐनवेळी विस्मरणात जाते. परंतु भूतकाळाशी तादात्म्य प्रस्थापित करणे अनिवार्य आहे. शिक्षा व इजा यातून मुक्तता मिळावी यासाठी व प्रेम आणि विश्वासाच्या बळावर नातेसंबंध बळकट करावे.

त्याकरता प्रथम भूतकाळ हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे, याचा स्वीकार महत्त्वाचा. त्यात बदल करणे आता कठीण; परंतु त्याकडे बदललेल्या नजरेने पाहणे मात्र शक्य आहे. प्रत्येक वेळी मनात तिरस्काराची भावना येऊन सवयीचे नकारात्मक विचारचक्र सुरू झाल्यास त्यात तात्त्विक विचाराचा समावेश करून रवंथ टाळावा. ही प्रक्रिया आपण स्वत:च्या मनोबलासाठी राबवीत आहोत हे समजून घेऊन चिकाटीने वागावे. ‘भूतकाळावर मात’ हे विचार व वर्तन दोन्ही प्रक्रियांचे काम आहे. वस्तुस्थिती आणि कपोलकल्पित घटनांचे विभागणी करून, घडलेल्या गोष्टीची सक्रिय जबाबदारी स्वीकारून पुढे वाटचाल करणे योग्य ठरेल.

दु:ख इतरांबरोबर वाटल्याने कमी होते, हे जरी काही प्रमाणात खरे असले तरीही प्रत्येकासमोर आपल्या जीवनप्रवासातील अन्यायकारक घटनांचा आलेख मांडणे अयोग्य ठरेल. आपण मग त्याच विचारांत सतत राहू, रुतू व आपली वाटचाल थांबेल. डबक्यातली मानसिकता ही वाहत्या झऱ्यापेक्षा भिन्न असते, हे निश्चित. डबक्याचे स्थैर्य जितके महत्त्वाचे, तितकीच वाहत्या झऱ्याची ऊर्जाही. या दोन्हींचा समतोल आपण आपल्या मानसिकतेत राखण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करावा. गतायुष्यातील चुकांकडे अपराधीपणाने पाहण्यापेक्षा बोधात्मक दृष्टिकोनातून पाहावे. आपण आज जे विचार करतो, भावना अनुभवतो व वर्तन अवलंबतो, हा उद्याचा भूतकाळ म्हणवला जाईल. त्यामुळे प्रत्येक क्षण कसोटीचा आहे. या कसोटीमध्ये तात्त्विक विचारशस्त्रांबरोबर उतरावे, व्यक्तिमत्त्व विकास व त्याबरोबरीने कौटुंबिक व सामाजिक प्रगती हा हेतू ठेवून भूतकाळाकडे पाहावे. घडल्या गोष्टींचा योग्य अर्थ लावून त्याचा वर्तमानावर सकारात्मक प्रभाव पाडण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे भूतकाळात रुतण्यापेक्षा रमलेलेच लाखमोलाचे- असे अनुभवता यावे यासाठी प्रत्येक क्षण सजगतेने जगावा. निदान त्या हेतूने प्रयत्न तरी करावेत. गतजीवनाप्रति क्षमाशीलतेची भावना बाळगणे- स्वत: व इतरांप्रति- हेही लाभदायक ठरते. गतकाळात घाव सहन केलेले असल्यास कटुताविरहित क्षमाशीलता आत्मसात करणे निश्चितच कठीण. परंतु राग, द्वेष व अशा स्वरूपाच्या नकारात्मक भावनेनेही मानसिक स्वास्थ्यात भर पडताना दिसत नाही. आपली जीवनकथा स्वत:ला नव्याने कथन करणे, इतकी वर्षे एखाद्या हरलेल्या योद्धय़ाच्या भूमिकेतून पाहिलेली कथा प्रयत्नार्थी व्यक्ती म्हणून पाहणे, यानेही आपला भूतकाळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पालटू शकतो.

प्रत्येक काळाचे आपापले माहात्म्य असते. आयुष्य सरते तसतसे आपले आत्मज्ञान वाढीस लागते व गतघटनांकडे पाहण्याची आपली दृष्टीही! यासाठी गरज आहे, ती प्रत्येक क्षण पूर्णरूपाने, सजगतेने, अर्थपूर्ण तसेच डोळसपणे जगण्याची अभिलाषा बाळगण्याची व ती प्रत्यक्ष आपल्या वर्तनात उतरविण्याची!

ketki.gadre@yahoo.com

(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)