सत्ता बहुतांश लोकांना प्रिय असते. अर्थात कुणी हे मान्य करो वा न करो. परंतु सारं काही आपलं धोरण व इच्छेनुसार घडवून आणण्याची, त्यासाठी तशी  परिस्थिती निर्माण करण्याची आणि प्रसंगी इतरांना नमवण्याची, नियंत्रणात ठेवण्याची क्षमता स्वत:जवळ असणं, हे क्वचितच कुणी नाकारेल. अशी इच्छा व परिस्थिती तसंच व्यक्तिमत्त्वाची साथ असता उदयास येतात ते हुकूमशहा! ‘हुकूमशहा’ हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर  येतात ते कुख्यात अत्याचारी, शोषणकर्ते, निर्दयी, निलाजरे, सत्तेची हाव बाळगणारे, इतरांची मनं, अधिकार, स्वातंत्र्य, इच्छा, महत्त्वाकांक्षा यांना वेठीस धरणारे लोक. हिटलर व मुसोलिनीच्या मानसिकतेचे अनेक हुकूमशहा आपल्या आजूबाजूस वावरताना दिसतात. घरीदारी त्यांचा दबदबा असतो. कौटुंबिक, व्यावसायिक, खासगी, औपचारिक नात्यांतले हुकूमशहा ते हेच!

हुकूमशहाच्या मानसिकतेवर  सखोल अभ्यास व संशोधन केलेले डॉ. फयली मोघद्दम यांच्या मते, हुकूमशहांना काही विशिष्ट व्यक्तिमत्त्व पैलूंची जोड असते हे जरी खरे असले तरी हुकूमशहा म्हणून प्रस्थापित व्हायला त्यांना एक ‘spring-board momentl’ लागते. हुकूमशहाच्या मानसिकतेचा अभ्यास करताना नेमक्या कोणत्या परिस्थितीमुळे वा कारणांमुळे त्या व्यक्तीने उसळी मारली, फायदा करून घेतला याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. बहुतांश लोकांमध्ये हुकूमशहासदृश मानसिकता दडलेली असतेच. ज्यांना ही ‘spring-board moment’  मिळते, ते लोकशाही चिरडतात आणि हुकूमशाहीचे पाय घट्ट रोवतात. उदा. १९३३ मध्ये घडलेला जर्मनीतील रिचस्टॅगमधील प्रसंग. त्याचा फायदा घेऊन हिटलर अधिराज्य गाजवण्याची पहिली पायरी चढला. आपल्या दैनंदिन व्यवहारांतही या ‘spring-board moment’च्या  प्रतीक्षेत असणारे, काही तर ती न मिळूनही आपल्या शोषणकारी व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर हुकूमशहा बनतात.

अधिकार हा अशा मानसिकतेच्या मुळाशी असतो. नात्यातील तथाकथित हुद्दय़ाने काहींना अधिकार मिळतात. त्याबरोबरच जबाबदाऱ्याही! असे सत्ता-सदृश अधिकार मिळालेल्या वा सक्तीने मिळवलेल्या व्यक्ती इतरांच्या भावनांचा केवळ अपमानच करत नाहीत, तर मुळात त्या समजून घेण्यातच अक्षम ठरतात. त्यांना महत्त्वाची असते स्वत:ची मानसिकता आणि भावना. त्यांनी आपल्या निर्णयांचं श्रेष्ठत्व  इतकं गृहीत धरलेलं असतं, की इतरांचं भलं हे त्यांचं ऐकण्यात, मान्य करण्यातच कसं आहे, यावर ते ठाम असतात. इतरांच्या विचार, भावना व कृतींवर नियंत्रण ठेवणं, हेच त्यांचं ईप्सित असतं. ‘I’ specialist यात मोडतात. दुसऱ्या व्यक्तीच्या आवडीनिवडी, मतं, इच्छा कशा अयोग्य आहेत, हे ते गृहीतच धरतात. नियंत्रणाचा केंद्रबिंदू आपल्याकडे राहावा यासाठी हे हुकूमशहा  इतरांवर अत्याचार, सक्ती, शारीरिक- शाब्दिक- भावनिक- लैंगिक- आर्थिक छळ व शोषण  करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. घरात भिंतींना कोणता रंग द्यायचा, सण कसा साजरा करायचा, घरात स्वयंपाक काय व कशा रीतीने बनवायचा, कुटुंबीयांनी कोणता पेहेराव करायचा, घरात कुणाचं येणं-जाणं असावं, कुणाशी संबंध ठेवायचे; कुणाशी नाही, मुलांनी कोणतं शिक्षण घ्यावं, काय करिअर निवडावं, यासारख्या प्रत्येक गोष्टींत हे रिंगमास्टर हंटर फिरवीत असतात आणि त्यांचे गुलाम त्यांच्या तालावर (मार वाचवायला) नाचत असतात. अशा हुकूमशहांबद्दल  क्वचितच कुणी सच्च्या आत्मीयतेने विचार करतात. त्यांच्या धाकाने आणि निषेध नोंदवल्यास संभाव्य परिणामांना तोंड देण्यास स्वत:स अक्षम मानल्याने लोक त्यांच्या आदेशानुसार वागतात. काही हुकूमशहा उघड आपले रूप दर्शवतात, तर काही चारचौघांत चांगुलपणाचा मुखवटा धारण करून वावरतात. त्यांचे खरे रूप  त्यांच्या निकटच्या पीडितांनाच माहीत असते. सतत इतरांचा अपमान करणारी, त्यांना कमी लेखणारी, दुसऱ्याला सतत अपराधीपणाच्या भावनेत ढकलणारी, स्वत्व दडपणारा, धमकावणारी,  कोणत्याही चुकीसाठी, मतभिन्नतेसाठी कडक शासन करणारी, व्यसनाची सक्ती करणारी, अवाजवी नियंत्रण ठेवणारी, इतरांची पीडा, दु:ख, कोंडी व असहायतेने आनंद होणारी व्यक्ती म्हणजे हुकूमशहा.

शोषण  ही अतिशय गंभीर बाब होय.  शोषणाच्या तीव्रतेने आणि नियमिततेने बऱ्याचदा आपण असहाय आहोत, अडकलो आहोत, अक्षम आहोत, त्यामुळे इतरांचे आपल्यावरील नियंत्रण आपल्याच हिताचे व गरजेचे आहे, हे गृहीत धरण्याची चूक आपण करतो. सर्वार्थिक व जबाबदार स्वातंत्र्य हा मानवाधिकार आहे. या मूलभूत अधिकारावर घाला घालणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी. या प्रक्रियेत आपल्यासाठी सुरक्षाकवच तयार करण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ, वकील, आर्थिक सल्लागार, पोलीस, न्यायव्यवस्था यांचा आधार व मार्गदर्शन उपयुक्त ठरतं.

या बाबी लक्षात घेऊन आपल्या नात्यातील साथीदार (कुटुंबात, ऑफिसमध्ये, इ.) या पठडीतला आहे आणि आपण एका हानीकारक, आत्मोन्नती रोखणाऱ्या नात्यात सापडलो आहोत असं आपल्याला वाटत असेल तर प्रथम आपले सुरक्षाकवच निर्माण करावयास सुरुवात करावी. विलंब टाळावा. संबंधित तसंच कुटुंबातील विश्वसनीय व्यक्तीच्या कानावर ही गोष्ट घालावी. त्यांची आपल्याला कधीही मदत लागू शकते; आणि तशी ती लागल्यास त्वरित उपलब्ध होईल याची तरतूद करून ठेवावी. लोक काय म्हणतील म्हणून शोषण सहन करू नये. मोकळेपणाने, धैर्याने ही गोष्ट समोर आणावी. कुणी सांगावं, कदाचित आपण कोंडी फोडल्याने  इतरही पीडित  या जाचातून मुक्त होतील. आपल्या बंडामुळे नात्यात होणाऱ्या बदलाचा कयास लावावा; कोणत्या गोष्टी बदलतील, कोणत्या नव्या जबाबदाऱ्या येऊन पडतील, एकंदर आयुष्य कसे बदलेल, या विचारांनी ग्रासून, भीती वाटून खच्ची होण्यापेक्षा स्वत:ला उभे करण्यास पुरेसा वेळ देऊन योग्य ती योजना आखावी आणि विचारपूर्वक, विश्वासू व्यक्तीच्या आधारे ती कृतीत आणावी. हा लढा देताना तहान-भूक, शरीर व मन:स्वास्थ्य, निद्रा यांकडे दुर्लक्ष होतं. पण त्याकडे योग्य ते लक्ष पुरवावं.

आपल्या या बंडाची कुणकुण लागताच हुकूमशहा बेचैन होण्याची शक्यता असते. आपलं नियंत्रण राखण्यासाठी एका क्षणी ते अचानकपणे आदर्श, प्रेमळ वागू लागतात. आपण या मुखवटय़ाला भुलतो. काही दिवस सुरळीत जातात. आपण आपला लढा आणि छळ  विसरतो. त्यास माफ करतो. क्वचित हुकूमशहांचे असे सकारात्मक परिवर्तन होत असेलही; परंतु बऱ्याचदा आपले बंड मोडीत काढण्यासाठी स्थिरस्थावर  होण्याची वाट पाहत हे हुकूमशहा तात्पुरतं असं खोटं वागतात. मुखवटा धारण करतात. आणि एकदा का आपण गाफील झालो, अनवधानाने वागू लागलो, की ते पूर्ववत वागू लागतात. मग आपल्या नशिबी येतो तो केवळ  पश्चात्ताप. त्यामुळे परिस्थितीचे योग्य अवलोकन आणि हुकूमशहाच्या मानसिकतेचा सूक्ष्म अभ्यास आपल्याला या चुकीपासून वाचवू शकतो. अशा व्यक्तीच्या बाबतीत ‘लोक बदलतात, वाईट वागणे सोडतात, जरा वेळ द्यावा, त्याचे/तिचे बालपण तणावयुक्त, शोषित होते म्हणून तो/ती अशी वागतो/ वागते. तेव्हा समजून घे, शेवटी सगळं चांगलंच होईल..’ अशी आपली समजूत काढणारी विधानं आपल्या कानावर पडू शकतात. त्यावर किती विश्वास ठेवायचा, हे प्रत्येकाने स्वानुभवावरून ठरवावं.  कारण त्याने जर आपली आत्मोन्नती, स्वातंत्र्य, स्वत्व लयास जात असेल तर आपण नेमकं काय मिळवलं, हा प्रश्न आपल्याला पुढे भेडसावेल.

अशा नात्यातून स्वत:ची सुटका करून घेणे किंवा नात्याचे स्वरूप बदलण्याची प्रक्रिया ही सखोल, दीर्घकाळ चालणारी व त्यामुळेच जपून, विचारपूर्वक करावी लागते. यातील संभाव्य अपयशाने प्रयत्न सोडून देण्याऐवजी ते एक आव्हान आहे असे मानून मार्गक्रमण सुरू ठेवावे. अखंड आशावाद बाळगावा. हुकूमशहासुद्धा अपूर्णतेने, भीतीने ग्रस्त असतात. हुकूमत गाजवायला अनुयायी/ गुलाम हवेत. आणि तेच नाहीसे केले तर ते रोब गाजवणार कुणावर?

स्वसंरक्षण हा आपला अधिकार व जबाबदारीही. आयुष्यात ‘जगा व जगू द्या’ हे तत्त्व महत्त्वाचं. आणि या सरळमार्गी जगण्यात अडथळे आणणाऱ्यांपासून स्वत:ची सुटका करून घेणंही निकडीचंच. हो ना?!

डॉ. केतकी गद्रे

ketki.gadre@yahoo.com (लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)