छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्ताने शिवरायांची युद्धनीती आणि त्यासाठी वापरली गेलेली शस्त्रे यांना मानवंदना म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुरातत्त्व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या वतीने ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ प्रदर्शन हा उपक्रम अलीकडेच सुरू झाला. यानिमित्ताने इंग्लंडमधील व्हिक्टोरिया ॲण्ड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयातून आणलेली वाघनखे आणि राज्यातील शासकीय संग्रहालयांमध्ये संग्रही असलेल्या मराठा व समकालीन शस्त्रांचे प्रदर्शन सातारा, नागपूर, आणि कोल्हापूर या तीन शहरांमधून भरविले गेले. या प्रदर्शनांच्या शस्त्रसूचीचे (कोल्हापूर, नागपूर आणि सातारा आवृत्ती) तीन द्विभाषिक खंड अभ्यासक आणि वाचकांसाठी उपलब्ध झाले आहेत. या ग्रंथातील लेखाचा संपादित अंश….

मध्ययुगीन कालखंडात भारतातील प्रत्येक प्रांताने त्या त्या ठिकाणच्या भौगोलिक, राजकीय, नैसर्गिक परिस्थितीनुसार शस्त्रांच्या स्वतंत्र शैली निर्माण केल्या. दख्खनच्या भागातील मराठा शैलीची शस्त्रेही यास अपवाद नव्हती. सोळाव्या शतकामध्ये मराठा साम्राज्याचे राजकीय आधिपत्य नसले तरीही वेगवेगळ्या शाह्यंमध्ये असलेल्या मराठा सरदारांच्या दीर्घकालीन वास्तव्याने मराठा शस्त्र शैलीचा पाया काही अंशी का होईना तयार झाला.

‘मराठाकालीन शस्त्रे’ या श्रेणीमध्ये केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीमध्ये अथवा केवळ मराठा योद्ध्यांनी वापरलेली शस्त्रे अभिप्रेत नाहीत. मराठेशाहीचा संपूर्ण कालखंड अर्थात, सतरावे आणि अठरावे शतक या संज्ञेमध्ये अभिप्रेत आहे. सतराव्या शतकापासून मराठा साम्राज्याच्या भौगोलिक सीमांनी दख्खन प्रांत पार करून अटकेपार झेंडे रोवले. या वाढत्या राजकीय प्रभावाने साहजिकच मराठा शस्त्रशैलीचा भारतातील अन्य शस्त्रशैलींवर आणि इतर शस्त्रशैलींचा मराठा शस्त्रशैलीवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडू लागला. या कालखंडात सततच्या होणार्‍या युद्धांनी एखाद्या शस्त्रशैलीची प्रांतीय व्याप्ती ही सातत्याने बदलत असे तसेच शस्त्रशैलींमध्ये सरमिसळ होण्याचे प्रमाणही अधिक होते. मराठाकालीन शस्त्रे या कालखंडात भारताच्या विविध भागांमधील वेगवेगळ्या शस्त्रशैलीच्या शस्त्रांचा समावेश केला जाऊ शकतो.

मराठा शस्त्रशैलीवर प्राचीन दाक्षिणात्य शस्त्रांचा तसेच दख्खनेतील अनेक भूभाग दीर्घकाळ इस्लामी शाह्यंच्या आधिपत्याखाली राहिल्याने इस्लामी शस्त्रशैलीचाही मर्यादित प्रभाव दिसून येतो. मराठा शस्त्रशैली शस्त्रांची कमी उंची, साधे स्वरूप, प्रकारांमध्ये फारसे नसणारे वैविध्य, बहुतांशी सरळ असणारा आकार, चालवण्यास अवघड व कौशल्यपूर्ण, मोजके अथवा अजिबात नसणारे नक्षीकाम या वैशिष्ट्यांनी अधोरेखित करता येते.

मराठाकालीन तसेच मराठा शैलीच्या शस्त्रांमध्ये लहानात लहान चाकू-सुर्‍यांसारखी द्वंद्व शस्त्रे ते मोठ्यात मोठ्या बंदुकी, तोफांपर्यंत असे मोठे वैविध्य समाविष्ट आहे. मराठा शस्त्रशैलीमध्ये पट्ट्यासारखे वैशिष्ट्यपूर्ण मर्यादित लवचीक पात्याचे शस्त्र, लांब दोरीने फेकून परत घेता येणारा ‘ईटा’ भाला, ‘धोप’ प्रकारची सरळ पात्याची तलवार इत्यादी कौशल्यपूर्ण शस्त्रांचा समावेश होतो. ही शस्त्रे चालवण्यास अवघड असल्याने मध्ययुगात यांचा वापर मर्यादित योद्ध्यांपुरता राहिला. ही शस्त्रे सतराव्या शतकापासून मराठा शस्त्रशैलीची ओळख बनली.

मराठाकालीन शस्त्रांच्या संदर्भ अभ्यासातील प्रमुख अडचण म्हणजे विस्तृत स्रोतांची कमतरता होय. इसवी सन सोळाव्या ते अठराव्या शतकातील समकालीन साधनांमध्ये (पत्रे, बखरी, दरबारी कागदपत्रे, काव्ये, ग्रंथ इत्यादी) ‘शस्त्र’विषयाला समर्पित अशा नोंदी आढळून येत नाहीत. कागदपत्रांमध्ये प्रसंगानुरूप वेळोवेळी शस्त्रे आणि संबंधित घटकांच्या तुटक नोंदी भारताच्या विविध भागांमध्ये आढळून येतात. शस्त्रांची माहिती देणारे काही समकालीन ग्रंथ अस्तित्वात असले तरीही त्यांचे प्रमाण भाषांमध्ये अद्याप अनुवाद न झाल्याने त्यांमधील माहिती अप्रकाशित आहे.

याच विषयातील दुसरी अडचण म्हणजे लिखित साधनांमध्ये शस्त्रांची उपलब्ध नसणारी वर्णने होय. मध्ययुगीन कालखंडातील बहुतेक कागदपत्रांमध्ये शस्त्रास्त्रांच्या नावांचे केवळ उल्लेख आढळून येतात. सदर शस्त्रांची वर्णने, त्यांच्या अधिक नोंदी लिखित स्वरूपात नसल्याने उपलब्ध शस्त्रांची पडताळणी करून अभ्यास करणे कष्टप्रद ठरते. सोळाव्या ते अठराव्या शतकातील मराठा साधनांमधील काही नोंदी मराठा शस्त्रांच्या तसेच मध्ययुगीन भारतीय शस्त्रांच्या अभ्यासाच्या दृष्टीने रोचक आहेत.

रघुनाथ पंडित यांनी छत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या वेळेस लिहिलेल्या (इसवी सन १६७४) ‘राज्यव्यवहारकोश’ ग्रंथामध्ये ‘शस्त्रवर्ग’ नावाचे तत्कालीन शस्त्रास्त्रांच्या पर्यायी नावांसाठी लिहिलेले स्वतंत्र प्रकरण आहे. शस्त्र-अस्त्र विषयावरील समकालीन साधनांमध्ये बहुतांशी वेळेस केवळ त्रोटक उल्लेख मिळत असताना राज्यव्यवहारकोशासारखी साधने महत्त्वपूर्ण ठरतात.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने लिहिलेल्या कवी परमानंद कृत ‘शिवभारत’ ग्रंथामध्ये महाराजांनी तलवारीने अफजलखानाला मारल्याचा उल्लेख आहे. शिवभारत ग्रंथ वाघनखांचा उल्लेख करत नाही. उत्तरकालीन असलेल्या सभासद आणि चिटणीस बखर यांमध्ये मात्र वाघनखांचा उल्लेख आहे. शिवभारत समकालीन आणि महाराजांच्या आज्ञेने लिहिले गेलेले असल्याने ऐतिहासिक साधन म्हणून ते अधिक विश्वसनीय आहे.

भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे यांच्या १९६१ साली प्रकाशित झालेल्या एका त्रैमासिकामध्ये इसवी सन १७०५मध्ये लक्ष्मेश्वर देसाई यांच्या दफ्तरातील एका पत्राचे लिप्यंतर करून संपादन केले आहे. सदर पत्रामध्ये वेगवेगळ्या सैनिकांना वापरायला दिलेल्या शस्त्रांची यादी दिलेली आहे. यामध्ये गुर्दा (गुर्ज गदा), फिरंगु (फिरंग तलवार), कठारी (कट्यार) यांसारख्या शस्त्रांसोबतच जमदाडू, चिंन्या, कोवि, बाकु अशाही काही शस्त्रांचा उल्लेख आहे. या शस्त्रांची वर्णने उपलब्ध नसल्याने त्यांच्या नेमक्या स्वरूपाचा अंदाज करणे कठीण आहे.

मराठाकालीन शस्त्रांमधील एक अत्यंत रोचक तरीही दुर्लक्षित पैलू म्हणजे ‘बाण’ होय. हे ‘बाण’ म्हणजे धनुष्यासोबत वापरण्याचे साधे बाण नसून, अग्निबाण प्रकारचे असत- ज्यांमध्ये आत बारूद भरलेली असे. धातूचे हे लांब बाण लक्ष्यावर आपटल्यावर त्यांचा स्फोट होत असे. टिपू सुलतानाच्या कारकीर्दीमध्ये या प्रकारच्या अस्त्रांना प्रसिद्धी मिळाली असली तरीही या बाणांचा वापर मराठाकालीन युद्धांमध्येही होत असल्याचे पुरावे समकालीन पत्रांमधून आढळून येतात. त्याचबरोबर सतराव्या शतकाच्या अखेरीस इंग्रजांच्या कंपनी स्कूलने काढलेल्या काही समकालीन चित्रांमध्ये मराठा योद्धे हे अग्निबाणासोबत दाखवलेले आहेत. यातील एक चित्र सध्या व्हिक्टोरिया ॲण्ड अलबर्ट म्युझियमच्या संग्रही आहे.

या संदर्भातील एक पत्र इसवी सन १७२७ सालचे आहे. २६ मे १७२७ ला छत्रपती शाहू महाराजांनी नागपूरकर भोसल्यांकडून पत्राद्वारे काही सामग्री मागवली, ज्यामध्ये ७० दारूचे बाण मिळाल्याची नोंद आहे. दुसर्‍या एका समकालीन पत्रामध्ये १७५४ मधील मराठा-निजाम युद्धाचा वृत्तांत आहे. या पत्रामध्ये ‘बाणांचे काही चोथवे सापडले’ अशी नोंद केलेली आहे. ‘चोथवे’ म्हणजे ज्यामध्ये बारूद भरलेली नाही अशा दारूच्या बाणांचे नळकांडे असत. ऐतिहासिक शब्दकोशामध्ये अशा चोवीस अग्निबाणांच्या जुडग्याला ‘कैची’ म्हणत असेही नमूद केले आहे. मराठाकालीन अग्निबाण या विषयाच्या प्रचलित समजुतींवर अधिक ससंदर्भ संशोधन होण्याची आवश्यकता आहे.

समकालीन लिखित साधनांबरोबर मध्ययुगीन भारतातील लघुचित्रे व अन्य चित्रे हेही मराठाकालीन शस्त्रांच्या अभ्यासाचा महत्त्वपूर्ण स्रोत आहेत. सोळाव्या ते अठराव्या शतकातील अनेक चित्रे हे तत्कालीन शस्त्रांच्या स्वरूप, वापर, नक्षीकाम आदी पैलूंबद्दल महत्त्वाचे चित्रित संदर्भ देतात. अठराव्या शतकापासून इंग्रजांनी काढलेल्या कंपनी स्कूलच्या चित्रांमधील सशस्त्र मराठा योद्धे हे समकालीन शस्त्रांच्या चित्रणाचे महत्त्वाचे स्रोत आहेत.

मराठाकालीन शस्त्रांची केवळ युद्धभूमीवरच नव्हे समकालीन सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक स्तरांवरही समांतर व्यवस्था निर्माण झाली होती. उदाहरणार्थ, किल्ले, राजवाडे, हवेल्या यांमध्ये युद्धाची शस्त्रे, सामग्री जेथे साठवली जाई अशा जागांसाठी स्वतंत्र व्यवस्था असे. यांना ‘जिरात्खाना’, ‘शिलेखाना’, किंवा ‘शस्त्रागार’ म्हटले जाई. या शस्त्रांची देखरेख करण्यासाठी, त्यांचे व्यवहार सांभाळण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमलेले असत- ज्यांना ‘हवालदार’, ‘शस्त्राधिकारी’ म्हटले जाई. विविध प्रकारची शस्त्रे घडवणारे, त्यांची देखभाल करणारे निरनिराळे समाज सोळाव्या ते अठराव्या शतकातील भारतामध्ये अस्तित्वात होते.

शस्त्रे बनवणार्‍या कारागिरांना ‘असलासाज’ म्हटले जाई. ढाली बनवणार्‍यांना ‘धब्धर’, शस्त्रांना धार लावणार्‍या व्यक्तींना ‘शिकलगार’ म्हटले जाई. धनुष्य बनवणारे ‘कमानगार’, शस्त्रांची म्याने बनवणारे ‘म्यानगार’, शस्त्रांना पाणी चढवणारे ‘जौहरदार’ असे शस्त्रांशी संबंधित अनेक समाज मध्ययुगीन भारतात अस्तित्वात होते. या प्रत्येक समाजाच्या स्वतंत्र शस्त्रपरंपरा असून त्यांचे रोचक सांस्कृतिक वैविध्य या कालखंडात आपल्याला बघायला मिळते.

मध्ययुगीन कालखंडात काही साधी शस्त्रे लोहारांकडूनही बनवून घेतली जात. दगडी कोरण्या, छिन्नी, चपरास, हरणाची शिंगे, म्हशीच्या शिंगात बसवलेला कुरुंदाचा दगड, सहाण, भाता, ओपनी, लोखंडी साचे, आगीची भट्टी अशा विविध साधनांचा वापर शस्त्रे घडवण्यासाठी केला जात असे. शस्त्रांची निर्मिती आणि शस्त्रांचा व्यापार हा मराठाकालीन शस्त्रव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक होता. सोळाव्या ते अठराव्या शतकातील भारतातील अनेक गावे, प्रांत हे उत्कृष्ट शस्त्रनिर्मितीसाठी प्रसिद्ध होते. उत्तर भारतातील दिल्ली आणि आग्रा शहरे शस्त्रांच्या चकाकी व सफाईदारपणासाठी, अलवारमधील शस्त्रे तीक्ष्ण व धारदारपणासाठी, जयपूर व सिरोहीमधील शस्त्रे उत्तम धातूंसाठी प्रसिद्ध होती. जुनागढ व भूज प्रांतातील शस्त्रे चांदीच्या मुठींसाठी, लखनऊमधील शस्त्रे गुंतागुंतीच्या नक्षीकामासाठी, काश्मीरमधील शस्त्रे उत्कृष्ट मिनाकारी नक्षीकामासाठी प्रसिद्ध होती.

ईशान्य भारतातील लखीमपूर, दिसपूर, दिब्रूगढ हे प्रांत शस्त्रांसाठी वापरल्या जाणार्‍या बांबूंची निर्यात करण्यात अग्रेसर होते. दक्षिण भारतामध्ये श्रीरंगपट्टण, निर्मल, कुन्नासमुद्रम्, यनगंदल, औरंगाबाद, खम्माम आदि प्रांत शस्त्रांच्या विशेषत: तोफा व अस्त्रे यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध होती. मराठाकालीन शस्त्रांवर कोफ्तगरी, बिदरी, मिनाकारी, दमास्कस अशा विविध प्रकारचे उच्च प्रतीचे नक्षीकामही केले जात असे. या नक्षीकामासाठी सोने, चांदी, विविध मौल्यवान रत्ने, धातू यांचा वापर केला जात असे.

मध्ययुगीन कालखंडात देशांतर्गत शस्त्रव्यापाराबरोबरच आंतरराष्ट्रीय शस्त्रांचा व्यापारही आर्थिक उलाढालीतील मोठा घटक असल्याचे आढळून येते. डच, फ्रें च, पोर्तुगीज, इंग्रज व अन्य युरोपीय व्यापार्‍यांकडून मराठा, राजपूत, मुघल व अन्य राजघराण्यांनीही मोठ्या प्रमाणात बंदुकी, तोफा, तलवारींची पाती खरेदी केल्याचे उल्लेख सापडतात. इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स यांसारख्या देशांसोबतच इराण, इराक, मोरोक्को, तुर्कस्तान, सौदी अरेबिया या देशांसोबतही भारतातून मोठ्या प्रमाणात शस्त्रांची आयात-निर्यात होत असे.

मराठाकालीन शस्त्रांमध्ये अनेक शस्त्रांची पाती विदेशी बनावटीची असल्याचे दिसून येते. मध्ययुगीन भारताचा शस्त्रव्यापार यावर अद्याप अपेक्षित संदर्भांसह संशोधन झालेले नाही.

मराठाकालीन शस्त्रांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा यादेखील या काळातील शस्त्रांचा महत्त्वपूर्ण पैलू आहेत. यातील पहिला महत्त्वाचा सांस्कृतिक व धार्मिक पैलू म्हणजे ‘शस्त्रपूजन’ होय. मध्ययुगीन कालखंडात मुख्यत्वे उत्तर व मध्यभारतात अस्तित्वात असणारी आणखी एक शस्त्रपरंपरा म्हणजे ‘खंडा विवाह’ पद्धती होय. या विवाहामध्ये प्रत्यक्ष नवरा मुलगा न येता त्याची तलवार पाठवली जाई. वधू त्या तलवारीला माळ घालून मुलाशी अप्रत्यक्षरित्या विवाह करत असे. या राणीला ‘खांडाराणी’ म्हटले जाई. अशा पद्धतीने खंडा विवाह केलेल्या स्त्रियांना पतीच्या निधनापश्चात सती जाण्याची सक्ती नसे. ही पद्धत प्रामुख्याने उत्तर भारतातातील राजपूत योद्ध्यांमध्ये तसेच काही प्रमाणात मराठा योद्ध्यांमध्येही प्रचलित असल्याचे पुरावे सापडतात. इंदूरचे राजे महाराज मल्हारराव होळकर यांना ‘हरकुंवरबाई’ नावाच्या खांडाराणी असल्याचे उल्लेख आढळून येतात.

मध्ययुगीन भारताच्या प्रत्येक प्रांतामध्ये शस्त्रविद्या शिकवणार्‍या स्वतंत्र युद्धकला अस्तित्वात होत्या. गावागावांमधील आखाड्यांमध्ये या शस्त्रविद्येचे प्रशिक्षण दिले जात असे. महाराष्ट्रातील ‘मर्दानी खेळ’, पंजाबमधील ‘गदका’, केरळमधील ‘कलरिपयट्टू’, मणिपूरमधील ‘थांग-ता’ या मध्ययुगीन भारतातील प्रसिद्ध युद्धकला होत्या. त्या काळात संपूर्ण भारतात १२ हून अधिक स्वतंत्र युद्ध व शस्त्रकला अस्तित्वात होत्या ज्यातील आजही अनेक कला त्या-त्या प्रांतांमध्ये प्रचलित आहेत.

शस्त्रविद्यांच्या आखाड्यांमध्ये लाठी-काठी, विविध प्रकारची शस्त्रे, मल्लविद्या, व्यायामशास्त्र इत्यादी सर्व बाबींचे प्रशिक्षण दिले जाई. धनुर्विद्येच्या प्रशिक्षणाला व सरावाला ‘चाँदमारी’ व सरावाच्या मैदानाला ‘कब्क मैदान’ म्हटले जाई. धनुर्विद्येचा सराव समोर लाकडी/ पेंढा भरलेले निशाण लावून किंवा निशाण्याच्या जागी भोपळे लावून केला जाई. १८५७ साली झालेल्या स्वातंत्र्याच्या पहिल्या उठावानंतर इंग्रजांनी भारतामध्ये शस्त्रे बाळगण्यावर व शस्त्रप्रशिक्षण देण्यावर बंदी आणली. या बंदीमुळे भारताच्या समृद्ध युद्धकला परंपरेला कायमची खीळ बसली. शस्त्रबंदीच्या कायद्यानंतर लयास गेलेली पारंपरिक भारतीय युद्धकला आजही ऊर्जितावस्था प्राप्त करू शकलेली नाही. मध्ययुगीन काळातील अनेक लघुचित्रांमध्ये तसेच कंपनी स्कूलच्या चित्रांमध्येही पारंपरिक भारतीय शस्त्रविद्येची चित्रणे दिसून येतात.

भारतीय शस्त्रे या विषयावर मुळातच फारसे संशोधन झालेले नसल्याने त्यातील उपघटक, उपांगे आजही मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित आहेत. मराठाकालीन शस्त्रे व मराठा शैलीची शस्त्रे हा व्यापक तसेच विविधांगी पैलू असणारा संशोधन विषय आहे. या विषयावरील संशोधनासाठी आवश्यक साधने ही विखुरलेल्या व तुटक स्वरूपात आहेत. ही सर्व साधने एकत्र करून त्यातून तत्कालीन शस्त्रास्त्रांच्या स्वरूप-वापराचे योग्य निष्कर्ष काढणे हे आव्हानात्मक काम आहे. संशोधनातील सातत्याने नजीक भविष्यात वरीलप्रमाणे इतरही अनेक महत्त्वपूर्ण पैलू प्रकाशित करता येतील अशी आशा आहे.

‘शिवशस्त्रशौर्यगाथा’,
लेखक : गिरिजा दुधाट, तेजस मदन गर्गे, किंमत- (सातारा, नागपूर आवृत्ती : २०० रुपये, कोल्हापूर आवृत्ती- २७५ रुपये)