सुचित्रा साठे: रमा चित्र काढण्यात गढून गेली होती. माणसांची चित्रं काढायला जमू लागल्यामुळे स्वारी खुशीत होती. आराध्यला झोपही येत नव्हती आणि अभ्यासही करायचा नव्हता. तो खेळण्यासाठी रमाची वाट बघत होता. तिच्या चित्राकडे बघत तो म्हणाला, ‘‘आजी, रमाच्या चित्रातली माणसं बघ. सगळी अधांतरी हवेत चालताहेत. असं असतं का कधी?’’
‘‘हो तर, जमिनीवरच आपण स्थिर उभे राहतो. किंबहुना आपल्याला फक्त जमिनीचाच म्हणजे पृथ्वीचाच आधार आहे. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात पृथ्वीस्तवन निरूपण या समासात पृथ्वीची स्तुती केली आहे.’’ -इति आजी. ‘‘आजी आपल्याकडे पृथ्वीचा गोल आहे तशीच आहे का गं पृथ्वी.’’ रमानं कागदावर गोल काढत विचारलं.
‘‘हो गं. समर्थ म्हणतात की, धन्य धन्य हे वसुमती। इचा महिमा सांगो किती। प्राणीमात्र तितुके राहाती। तिच्या आधारे।। सगळे मनुष्यप्राणी, पशू, पक्षी, जलचर तिच्या आधारानेच राहतात. ८४ लक्ष योनि आहेत. इतक्या विविध प्रकारचे जीव आहेत. काही अंडज म्हणजे घामातून जन्मलेले, पक्ष्यांसारखे, उवांसारखे, उद्बीज म्हणजे बीपासून जन्मलेल्या वनस्पती आणि जारज म्हणजे मानवासकट सर्व प्राणीसृष्टी.
कोणताही देव म्हणजे चांगली माणसं, दानव म्हणजे वाईट दुष्ट माणसं आणि तुमच्या-आमच्यासारखी सगळी माणसं पृथ्वीचाच आधार घेत असतात. याशिवाय काय काय दिसतं आजूबाजूला सांग बघू ओंकार,’’ चुळबुळ करत बसलेल्या ओंकारला आजीने बोलते केले. ‘‘घर बांधत असताना पाया खणतात ना तेव्हा पृथ्वीच्या पोटात असलेले लहानमोठे दगड, खडे, गोटे, वाळू आणि माती दिसते.
शिवाय वर असणार्या पर्वत, डोंगर, दर्या सगळ्यांना जमिनीचाच आधार असतो.’’ ओंकारची हुशारी आजीला जाणवली. ‘‘आणि माती किती वेगवेगळ्या रंगाची असते ना गं, बेळगावला मी लाल माती पाहिली. तर सातारा सांगलीकडे काळी माती होती. जयपूरला पिंक सिटी म्हणतात ना, तिकडची माती वेगळीच होती.’’ मातीत रमणार्या आराध्यने सांगितले.
‘‘नाना रंगांची मृत्तिका। नाना स्थळोस्थळी जे कां। वाळुके वाळू अनेका। मिळोन पृथ्वी।। असं समर्थांनी म्हटलेलं आहे. पृथ्वीवर झाडं आहेत झुडुपं आहेत, वृक्षवेल्ली आहेत रान आहे, दाट जंगलं आहेत. निसर्गनिर्मित रचना आहेत. शिवाय माणसांनी बांधलेल्या टोलेजंग इमारती किल्ले, गावं, शहरं, सगळं पृथ्वीच्या भक्कम आधारावर आहे. बरोबर ना रमा!’’ ‘‘आजी, समुद्र, तळी, विहिरी, नद्या हेपण पृथ्वीवरच आहे की गं.
आमच्या बाई म्हणतात, ‘जी भूमी गोल आहे, तिचा अभ्यास म्हणजे भूगोल.’ एकदम भारी व्याख्या आहे ना!’’ रमाने मनाने आवडत्या शाळेत पोहोचली होती. ‘‘आपण बोगद्यातून जातो म्हणजे, पृथ्वीच्या पोटात जातो ना गं आजी. मला खूप मजा वाटते.’’ अपूर्वनं छान ॲक्शन केली. ‘‘पृथ्वीच्या पोटात तर किती मौल्यवान गोष्टी दडलेल्या आहेत. नाना प्रकारची रत्ने, हिरे, परिस, अनेक प्रकारचे धातू आणि द्रव्ये आपल्याला तिच्यापासून मिळतात.
दगडी कोळसा सोने आणि तेल हेपण तिच्यापासून मिळतं. नाना रत्ने हिरे परीस। नाना धातु द्रव्यांश। गुप्त प्रगट कराव्यास। ‘‘आजी आपण शेतात गेलो होतो हुरडापार्टीला, ते शेतातलं पीक जमिनीतूनच उगवतं ना’’ हुरडापार्टी आठवून आराध्यचे डोळे लकाकले. ‘‘नाना वल्ली नाना पिके। देसोदेसी अनेके। पाहो जाता सारिख्या सारिखे। येक ही नाही।। नाना वल्ली बीजांची खाणी ते हे विशाल धरणी। अभिनव कर्त्यांची करणी। होऊन गेली।। आपण बी मातीत पेरतो. मूठभर पेरलं तर पोतंभर देते ती आपल्याला.
शिवाय फळं, नाना रंगाची फुलं एकाच मातीतून निर्माण होतात. आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न ती बिनबोभाट सोडवते. शी, काय माती आहे, असं कुरकुरल्यावर त्या पृथ्वीमातेला काय वाटत असेल सांगा बघू.’’ आजीने खरं सांगितल्यामुळे सगळे मूग गिळून बसले. ‘‘म्हणूनच आपण तिला मातेसारखा मान देतो, बरोबर ना!’’ आराध्यने विषय समजून घेऊन सांगितले.
‘‘हो ना, पण आपण काय करतो तर – जाळिती पोळिती कुदळिती। नांगरिती उकरिती खणती। मलमूत्र तिजवरी करिती। आणि वमन ।। शिवाय नासके, कुजके जर्जर। पृथ्वीविण कैची थार। देह्यात काळी शरीर। तिजवंरी पडे।। मृत्यूनंतर जेव्हा शरीर जाळलं जातं तेव्हा ती राख पृथ्वीतच मिसळते. उकरणं, जाळणं, कुदळा, थुंकणं याबरोबरच बेसुमार प्लॅस्टिकचा वापर करून तर त्या पृथ्वीला आपण भरपूर त्रास देतो, पण ती क्षमाशील आहे.
जशास तसे न वागता आपलं जगणं ती सुसह्य करते. बहुरला हे वसुंधरा। ऐसा पदार्थ कैचा दुसरा। अफाट पडिले सैरावैरा। जिकडे तिकडे।। म्हणूनच तिला बहुरला वसुधरा म्हणतात.’’ ‘‘आजी तिची दुसरी नावं कोणती गं’’ अपूर्वला ‘सोन्या’, ‘गुंड्या’ म्हणत असल्यामुळे जास्त नावं असण्यातली गंमत माहिती होती. ‘‘अमरकोशात पृथ्वीची वसुमती, वसुधा, वसुंधरा, अवनी, क्षमा, मेदिनी, मही अशी नावं आहेत.
पृथ्वी सात द्विपांमध्ये विभागली गेली आहे. नऊ खंडे मिळून सगळी पृथ्वी आहे. तिच्या स्थैर्य देण्याच्या गुणाचा उपयोग करून ज्यावेळी आपला आधार तुटतो, गंभीर परिस्थिती निर्माण होते, किंवा अघटित काही घडते त्यावेळी पायाखालची जमीन सरकली असे आपण म्हणतो. जेव्हा एखादी व्यक्ती स्थितप्रज्ञ असते, यशाने किंवा धनलाभाने हुरळून जात नाही तेव्हा तिचे पाय जमिनीवर आहेत असे म्हटले जाते.
पृथ्वीच्या गुणांमुळेच सकाळी उठल्याबरोबर जमिनीवर पाऊल टाकताना ‘समुद्रवसने देवी पर्वतस्तमंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श श्रमस्व मे’ म्हणून आपण कृतज्ञता व्यक्त करतो. वसुधरा दिन साजरा करतो. पृथ्वी कडक, घट्ट, भक्कम, जड, आधार देणारी असते. पृथ्वीसारखे जे पदार्थ असतात त्यांच्यामध्ये पृथ्वित्व आहे असे म्हणतात. आपल्या शरीराला पाय आधारभूत असतात.
म्हणून पायात पृथ्वित्व आहे, असे म्हणतात. बाकीच्या तत्त्वांची ओळख पुन्हा कधीतरी, आजीने माहितीपट आवरता घेतल्यामुळे सगळे खूश झाले.
‘‘आजी, आम्ही पृथ्वीशी म्हणजे मातीत खेळायला जातो,’’ आजी आज रागावणार नाही हे माहीत असल्यामुळे मुलांनी संधी साधली आणि सगळे धूम पळत सुटले.
