– रणजित धर्मापुरीकर
प्रार्थना संपली, मुलं रांगेने वर्गात प्रवेश करत होती. पाचवी ‘अ’च्या वर्गावर आज पहिला तास गणिताचा होता. पाच मिनिटे झाली तरी गणिताचे महेश सर अजून वर्गात येण्याची चिन्हे दिसत नव्हती. मुलं वर्गात मस्ती करत होती. ग्रंथपाल सुभाष सर त्यांच्या ग्रंथालयाच्या खिडकीतून हा प्रकार पाहत होते. कालच महेश सरांनी सहज बोलताना सुभाष सरांना ते आज सुट्टीवर असल्याचं सांगितलं होतं. त्यांना आठवलं आणि ते ताबडतोब मुख्याध्यापकांच्या कक्षात गेले.
‘‘आज महेश सरांची रजा आहे, मी घेऊ का तो तास? मी मुलांना पुस्तक वाचनाचं महत्त्व. पुस्तकांचे प्रकार सांगतो.’’
मुख्याध्यापकांनी होकार देताच संतोष सर गडबडीनं ग्रंथालयात गेले. मोठे जाडजूड पाच-सहा ग्रंथ कपाटातून बाहेर काढले आणि वर्गावर गेले. गोंधळ घालणारी मुलं एकदम शांत झाली. आपापल्या जागेवर जाऊन बसली. पुष्कळ सारी जाड पुस्तकं घेऊन वर्गात कधीही न येणार्या सरांकडे पाहून मुलं गोंधळली. सुभाष सरांनी हातातली पुस्तके टेबलावर ठेवली आणि मुलांकडे नजर टाकली. सगळी मुलं एक स्वरात म्हणाली, ‘‘नमस्ते सर.’’
‘‘नमस्ते! आज महेश सर रजेवर आहेत म्हणून मी आज तुमचा तास घेणार आहे. तुम्ही कोणताही प्रश्न विचारा अगदी कोणताही! अभ्यासक्रमातला विचारा किंवा बाहेरचा… कोणताही प्रश्न विचारा.’’ मुलांना असं पूर्वी कोणीही आवाहन केलं नव्हतं. मुलं आश्चर्यानं एकमेकांकडे पाहू लागली. सर्व मुलांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू केला.
‘‘अरे थांबा! थांबा! मी तुम्हाला तुमच्या सर्व आणि कोणत्याही प्रश्नांची उत्तरे कशी देणार आहे ते तर समजून घ्या! या टेबलवर तुम्ही काय पाहत आहात?’’
सगळी मुलं ओरडून म्हणाली, ‘‘पुस्तकं!’’
‘‘ही साधी पुस्तकं नाहीत बरं का! हे आहेत संदर्भ ग्रंथ! संदर्भ ग्रंथ म्हणजे अशी पुस्तकं- ज्यात विशिष्ट विषयाची सखोल, अधिकृत माहिती जलद आणि सोयीस्करपणे शोधता येते, जी सलग वाचण्याऐवजी गरजेनुसार वाचली जातात. उदा. शब्दकोश, विश्वकोश, ज्ञानकोश आणि नकाशे. हे ग्रंथ एखाद्या संकल्पनेचा अभ्यास करण्यासाठी किंवा माहितीच्या पडताळणीसाठी उपयुक्त ठरतात.’’ सुभाष सर पुढे म्हणाले, ‘‘समजा, तुम्हाला एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर या शब्दकोशात शोधायचा. यामध्ये इंग्रजी शब्दांचा अर्थ मराठीत शोधता येतो. जर मराठी शब्दाला इंग्रजीत कोणता शब्द आहे हे शोधण्यासाठी हा शब्दकोश पाहा. असे विविध भाषेतील शब्दकोश असतात. एवढंच नाही तर ज्ञानाच्या विविध शाखेतील अद्ययावत आणि वस्तुनिष्ठ माहितीचे संकलन करणारा एक संदर्भ ग्रंथ असतो तो हा आहे,’’ सुभाष सर एका मोठ्या जाडजूड ग्रंथाकडे हात दाखवत म्हणाले. ‘‘याला विश्वकोश असे म्हणतात. यालाच इंग्रजीत एनसायक्लोपिडीया असे म्हणतात.
विजय पटकन म्हणाला, ‘‘हो सर, माझ्या बाबाला जुन्या हिंदी गाण्यांची फार सखोल माहिती आहे, त्यांचे मित्र त्यांना हिंदी गाण्यांचा चालता-बोलता एनसायक्लोपिडीया म्हणतात.’’
सुभाष सर दुसर्या जाडजूड मोठ्या आकाराचा ग्रंथ दोन्ही हातांनी उचलत म्हणाले, ‘‘हा ग्रंथ आहे ज्ञानकोश. ज्ञानकोश म्हणजे सर्व विषयावरील किंवा विशिष्ट विषयावरील ज्ञानाचा संग्रह असलेला एक संदर्भ ग्रंथ आहे. ज्यात माहिती संक्षिप्त, वस्तुनिष्ठ, सोप्या व समजेल अशा पद्धतीने वर्णक्रमानुसार मांडलेली असते. हा एक किंवा अनेक खंडात, म्हणजे तुम्ही जशी एक वही भरल्यानंतर दुसरी वही करता तसे हा ग्रंथ अनेक खंडात असतो. जो वाचकांना किंवा संशोधकांना विविध विषयांवर, प्रसिद्ध व्यक्तींवर, भौगोलिक स्थान, संकल्पनांबद्दल मूलभूत आणि सखोल माहिती देतो. समजा तुम्हाला क्रिकेट या खेळाची माहिती किंवा इतिहास जाणून घ्यावयाचा असेल तर स्पोर्ट्स विषयावरच्या ज्ञानकोशात तुम्हाला ते सहज मिळेल. हा ग्रंथ प्रकार ठरावीक काळाने अद्ययावत केला जातो. नकाशे हा प्रकार तर तुम्हाला माहीतच आहे. आपल्या शाळेच्या प्रत्येक वर्गात जगाचा, भारताचा, महाराष्ट्राचा आणि आपल्या शहराचा नकाशा लावलेला तर तुम्ही रोजच पाहत असता.’’
प्रत्येक संदर्भ ग्रंथांची माहिती सुभाष सर देत होते. मुलं माहिती ऐकण्यात दंग होती. सुभाष सर पुढे सांगत होते, ‘‘मुलांनो, प्रत्येक व्यक्ती विश्वातील सर्व ज्ञान शाखेचा अभ्यास करू शकत नाहीत. तसे शक्यही नाही. पण प्रत्येक ज्ञान शाखेची माहिती करून घ्यायचा अधिकार सर्वांना आहे. गरज पडेल तशी माहिती करून घेण्यासाठी हे संदर्भ ग्रंथ सर्वांना उपयोगी येतात, म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला म्हणालो की, जगातील कोणताही प्रश्न विचारा मी उत्तर देतो, ते याच संदर्भ ग्रंथाद्वारे देणार होतो.’’
अमितने हात वर केला व म्हणाला, ‘‘सर, आता ही सर्व माहिती गूगलवर सहजच मिळते तर मग या संदर्भ ग्रंथांचे काय काम?’’
सुभाष सर म्हणाले, ‘‘अरे, पूर्वी जेव्हा संगणक, इंटरनेट नव्हते तेव्हा या संदर्भ ग्रंथाचा वापर गरजू वाचक, संशोधक, संपादक, वार्ताहर करायचे. त्यामुळे आपण असे म्हणू या, हे संदर्भ ग्रंथ गूगलची मोठी भावंडं आहेत. आजही या प्रकारच्या ग्रंथांची निर्मिती प्रकाशक करत आहेत. कारण गूगलवर माहितीचा शोध घेणे आणि अचूक माहिती शोधणे वेळखाऊ तर आहेच, पण मिळालेल्या माहितीच्या विश्वासार्हतेचा प्रश्न राहतोच. क्षेत्रीय भाषेतील सर्वच माहिती इंटरनेटवर उपलब्ध नाही, शिवाय आपल्या देशात संगणक आणि इंटरनेटचे जाळे सर्वत्र नाही. तसेच भारतीय लोकांच्या सर्व स्तरांवर माहिती-तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता नाही. म्हणून आजही या संदर्भ ग्रंथांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुलांनो, आता या पुढे तुम्हाला कोणत्या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर ग्रंथालयात या.’’ असे म्हटल्यावर मुलांनीही मोठ्याने ‘‘हो’’ असा प्रतिसाद दिला.
dranjit29@gmail.com
