scorecardresearch

स्त्री-भावजीवनाचे अंधारे कंगोरे

जागतिकीकरणाचा प्रभाव या शेण गोळा करणाऱ्या मुलींवर किती दाट आहे याचं उत्कट प्रतिबिंब या कवितांमधून जाणवते.

‘शेणाला गेलेल्या पोरी’ हा चंद्रशेखर कांबळे यांच्या कवितासंग्रहात स्त्री- भावजीवनाचे विविध कंगोरे उलगडून दाखविणाऱ्या कविताच प्रामुख्याने आहेत.

या कवितांमधील शेणी या पोरींच्या जगण्याचं प्रतीक आहेत. पोरींचे आयुष्य हे जळत्या शेणींप्रमाणेच दाहक असते, हा दाहक जीवनानुभव कवीने या कवितांमधून समर्पकपणे मांडला आहे, जो वाचकालाही थिजवून जातो.

‘पोर जपूनच चालते, कधीतरी चुकते

कळत नाहीत तिला रानाचे आजार

हिरव्यागार मोहापायी

मग पोरीचा होतो बाजार’

अर्थात तरीही या अन्यायग्रस्त मुली परिस्थितीला शरण न जाता ठामपणे पाय रोवून उभ्या राहतात. त्यांचं दु:ख त्या निमूटपणे गिळतात.

‘जन्मत:च आमचे गर्भ फेकले जातात

बहिष्कृत उकिरडय़ावर

याची ना कोणाला खंत

ना कोणाला पश्चात्ताप’

गावगाडय़ाशी आणि तिथल्या लोकसंस्कृतीशी तन-मनाने एकरूप झालेल्या पोरींच्या जगण्यातून गावगाडय़ामधील प्रथा आणि परंपरा  कवितेतून उलगडत जातात. जागतिकीकरणाचा प्रभाव या शेण गोळा करणाऱ्या मुलींवर किती दाट आहे याचं उत्कट प्रतिबिंब या कवितांमधून जाणवते. शेणाशी संबंधित म्हणी, वाक्प्रचार यांचा समर्पक वापर या कवितांमधून कवी करतो आणि या मुलींच्या दाहक आयुष्याचा पट मांडतो. एक वेगळेच जीवन या कवितांमधून कवीने मांडले आहे.

‘शेणाला गेलेल्या पोरी’- चंद्रशेखर कांबळे, दर्या प्रकाशन, पाने- ११२, किंमत- १५० रुपये.

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi book review shenala gelelya pori by chandrashekhar kamble zws