marathi books bajar author nanda khare zws 70 | Loksatta

मूल्यहीन अर्थव्यवहारांविषयीचं मुक्त चिंतन’

अर्थव्यवहारांच्या अजस्र गुंत्यात आपल्या भविष्याचे दुवे आहेत. हा गुंता सोडवण्यासाठी उघडय़ा डोळय़ांनी बाजाराला अवश्य भेट द्यायला हवी.

मूल्यहीन अर्थव्यवहारांविषयीचं मुक्त चिंतन’
 ‘बाजार’, – नंदा खरे,

सुकल्प कारंजेकर 

२००८ साल नेमके काय आणि कशामुळे घडले (किंवा बिघडले) याचे उत्तर नंदा खरे यांच्या ‘बाजार’ पुस्तकातून मिळते. पण तो या पुस्तकाचा एक छोटासा भाग आहे. पुस्तकाचा विषय आहे आपल्या आजूबाजूला चालू असलेल्या आर्थिक व्यवहारांचा गुंता सोडवणे आणि अशा व्यवहारांतील वेगवेगळय़ा पैलूंवर प्रकाश टाकणे. बाजारमध्ये सगळय़ा आर्थिक व्यवहारांची गोष्ट येते. फुटपाथवर बसलेल्या आजीबाईंकडून १२-१५ रुपयांची मेथी, पालकची जुडी विकत घेण्याच्या व्यवहारापासून ते भारताने हजारो कोटी खर्च करून फ्रान्समधील ‘दसॉ’ कंपनीकडून विकत घेतलेल्या राफेल विमानांच्या खरेदीसारख्या व्यवहारांपर्यंत. यात सेवांची आणि मानवी कौशल्यांच्या व्यवहारांचीही गोष्ट आली. जत्रेमध्ये हातात आकडे घेऊन फिरत ५-१० रुपयांत कान कोरून देण्याची सेवा पुरवणाऱ्या माणसांपासून ते स्विस बँकेचे सॉफ्टवेअर सांभाळण्यासाठी शेकडो दशलक्ष डॉलर्सचे करार केलेल्या मल्टिनॅशनल कंपन्यांपर्यंत. आय.आय.टी./ आय.आय.एम.च्या कॅम्पस इंटरवूमध्ये कोटय़वधी रुपयांचे पॅकेज मिळालेल्या जगज्जेत्या मुलांपासून ते शहरातील एखाद्या मोठय़ा चौकात दिवसा ३००-५०० रुपयांची मजुरी मिळेल या आशेने उभे राहणाऱ्या घोळक्यांपर्यंत. हे पुस्तक आठवडी बाजार ते अ‍ॅमेझॉन आणि मिलिटरी-इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स ( Military Industrial Complex) पर्यंत सगळय़ांना सहज आपल्या कवेत घेते.

‘बाजार’मध्ये अर्थव्यवहारांचा अनौपचारिक इतिहास आहे आणि त्यामागील तत्त्वचिंतनही आहे. या व्यवहारांची पाळेमुळे मालकीहक्काच्या संकल्पनेत सापडतात. हजारो वर्षांपूर्वी माणसाचे पूर्वज जेव्हा शिकार-संकलन ( hunter gatherer) करणाऱ्या टोळय़ांच्या अवस्थेत होते तेव्हा वस्तू, प्राणी किंवा जमीन यावरील मालकीहक्काची संकल्पना विकसित झाली नव्हती. सुमारे बारा-चौदा हजार वर्षांपूर्वी माणसाला शेतीचा शोध लागला, प्राण्यांना पाळणे सुरू झाले. त्याबरोबर मालकीहक्काची कल्पना विकसित होत गेली. धान्य खाण्याचा ‘हक्क’ शेती करणाऱ्याचा होता, लोकरीवर हक्क मेंढपाळाचा होता. त्याबरोबर विकसित झाली ती वस्तुविनिमयाची ( barter) संकल्पना. वस्तूंची देवाणघेवाण घडू लागली, श्रमविभाजन घडू लागले. एकीकडे शेतकरी- पशुपालक, तर दुसरीकडे इतर कौशल्य येणारे सुतार, कुंभार, लोहार इत्यादी. अशा व्यवहारांतून आणि श्रमविभाजनातून उपजली ती बलुतेदारी व्यवस्था. या व्यवहारांबरोबर मालकीहक्काच्या गोष्टींच्या रक्षणाची देखील गरज पडू लागली. कारण साठवलेले धान्य किंवा गुरे कोणी लुटून नेण्याची शक्यता असायची. या मालकीहक्काच्या गोष्टींच्या रक्षणासाठी आले ते ‘बाहुबली’. या रक्षकांमध्ये ‘शासकांच्या’ संकल्पनेचे मूळ सापडते. यातून हळूहळू रयत-शासक, राजा-प्रजा संबंध विकसित झाले. शासक आले तसे करांची गरजही पडू लागली. मुद्रा, पैसे घडवले गेले. व्यापार वाढला त्याबरोबर न्याय्य, अन्याय्य व्यवहारांच्या कल्पनाही आल्या. भांडवलवाद आला आणि त्याबरोबर ‘आदर्श बाजार’ कसा असावा याचे चिंतनही आले. अ‍ॅडम स्मिथ आला, कार्ल मार्क्‍स आला, जॉन मेनार्ड केन्सही आला. एकीकडे ‘‘बाजार कधीच चुकत नाही. बाजारात कुठलाही हस्तक्षेप करू नये’’ असे म्हणणारे अर्थशास्त्री आले तर दुसरीकडे अर्निबध बाजारातून मंदी, बेरोजगारी घडू शकते असे सावध करणारे अर्थशास्त्रीही आले. अशा वेगवेगळय़ा विचारप्रवाहांचा परिचय पुस्तकातून घडतो. भारतातील गरिबीच्या प्रश्नावर ऊहापोह करणाऱ्या निळकंठ रथ, वि. म. दांडेकरांच्या अभ्यासाचा संदर्भ येतो. आणि वाढत्या विषमतेच्या प्रश्नावर ऊहापोह करणाऱ्या थॉमस पिकेटी या फ्रेंच अर्थशास्त्राच्या विचारांचाही संदर्भ येतो.

इथे जरा थांबून पुस्तकाच्या शैलीबद्दल सांगितले पाहिजे. या पुस्तकाचा आवाका फार व्यापक आहे. पण हे रूक्ष, अकॅडमिक भाषेत लिहिलेले, सामान्य लोकांना अर्थशास्त्रातील संज्ञांच्या गुंत्यात अडकवणारे पुस्तक नाही. यात कविता आहेत, गाणी आहेत, कथा आणि किस्से आहेत. बाजारपेठेचा इतिहास सांगणाऱ्या भागात ‘आ जाओ. आ जाओ. बाजार है भय्या आ जाओ’ अशी साद घालणारा जावेद अख्तर भेटतो. मंदीचा इतिहास जिथे दिला आहे त्या भागात १८०० सालच्या दरम्यान आलेल्या मंदीवर ‘शहरे आशोब’ नावाची करुण कविता लिहिलेला नजीर अकबराबादी भेटतो. मध्यम वर्गाच्या ढासळत्या मूल्यव्यवस्थेच्या संदर्भातील लिखाणाच्या पार्श्वभूमीवर ‘‘.. and how many times can a man turn his head And pretend that he just doesn’ t see?’’ असा गाण्यातून प्रश्न विचारणारा बॉब डिलनही

(Bob Dylan) भेटतो. यात आर्थिक व्यवहारांची अमानुष बाजू दाखवणाऱ्या भागात इन्साईड जॉब या माहितीपटाचा आणि बिलियन्स या मालिकेचा संदर्भ येतो. वंचित वर्गाचे प्रश्न मांडणाऱ्या चिंतनात ‘ग्रेप्स ऑफ रॉथ’ ही भेटते. अ‍ॅडम स्मिथच्या आदर्श बाजारपेठेतून मैलो दूर आलेल्या प्रत्यक्षातील बाजारपेठेचे किस्से येतात. यात जमेची बाजू अशी की, नंदा खरेंना एक-गिऱ्हाईकी ( monopsony) बाजारपेठेचा प्रत्यक्ष दीर्घ अनुभव आहे. आयुष्याची ३४ वर्षे नंदा खरेंनी सरकारसाठी धरणे आणि पूल बांधण्यात घालवली. त्यांचे अनुभवांतून कल्पनेतल्या आणि प्रत्यक्षातल्या बाजारपेठेतील फरक अधोरेखित होतात. आणि या सगळय़ा अनौपचारिक कथनाचा गाभा आहे तो मानवी मूल्यांबद्दलच्या चिंतनाचा.

आर्थिक व्यवहारांमध्ये वरकरणी रुपये, डॉलर्स, पाऊन्डस्, युरो किंवा क्रिप्टो चलनाची देवाणघेवाण होत असली तरी या देवाणघेवाणीतून मानवी संस्कृतीचे खरे प्रतििबब पुढे येते. यात उदरनिर्वाहासाठी वर्षांनुवर्षे नावडते काम करणाऱ्या लोकांची गोष्ट येते. शेअर मार्केटमध्ये स्पेक्युलेट करणाऱ्या (ऊर्फ जुगार खेळणाऱ्या) लोकांची गोष्ट येते. लबाडी करून अब्जावधी कमावून कर वाचवण्यासाठी पनामासारख्या ठिकाणी खाते उघडणाऱ्या माणसांचीही गोष्ट येते. त्यातून काही प्रश्नांचा ऊहापोह केला जातो. अर्निबध स्वातंत्र्य जास्त महत्त्वाचे की समता? कुठली कररचना न्याय्य ठरेल – करांचा पाया वाढवणारी ( widening the tax base) की उत्पन्नानुसार कर वाढवणारी

( Progressive Tax- Structure)? आर्थिक विषमता आणि मंदीच्या प्रश्नांसाठी काय करावे लागेल? तंत्रज्ञानामुळे येणाऱ्या बेरोजगारीला तोंड देण्यासाठी काय करावे?.. या व अशा अनेक प्रश्नांवर चिंतन पुस्तकात येते.

अवकाशात गाडी सोडणाऱ्या इलॉन मस्कचे कौतुक होताना फुटपाथवर कोणी चपला-बूट पॉलिश करायला येईल का याची वाट पाहणाऱ्या फाटक्या कपडय़ातील माणसाचाही विचार करायला हे पुस्तक भाग पाडते. अर्थव्यवहारांच्या अजस्र गुंत्यात आपल्या भविष्याचे दुवे आहेत. हा गुंता सोडवण्यासाठी उघडय़ा डोळय़ांनी बाजाराला अवश्य भेट द्यायला हवी.

 ‘बाजार’, – नंदा खरे,

मनोविकास प्रकाशन

पाने – २०४,  किंमत – २५० रुपये

sukalp.karanjekar@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 01:01 IST
Next Story
एका समृद्धीचा दरवळ!