scorecardresearch

गालिबची बनारसवरची मसनवी

चिराग-ए-दैर’ ही मसनवी गालिबने फारसी या त्याच्या आवडत्या काव्यभाषेत लिहिली आहे.

सुनंदा भोसेकर  sunandabhosekar@gmail.com

‘चिराग-ए-दैर’ म्हणजे देवळातला दिवा किंवा देवळाचा दिवा. ‘चिराग-ए-दैर’ ही मिर्झा गालिबने बनारस शहराविषयी लिहिलेली मसनवी. या मसनवीत ‘पृथ्वीवरचा स्वर्ग’ असलेल्या बनारसला म्हणजेच काशी या पवित्र नगरीला गालिबने विविध विशेषणांनी गौरविले आहे. मसनवी हा फारसी काव्यप्रकार आहे. यात एखादा प्रसंग किंवा कथा कवितेतून सांगितली जाते. मालिका कविता किंवा आपल्याकडे गाथा म्हणतात तसा काव्यप्रकार. ही कविता बहुतेक वेळा दीर्घकविता असते. ‘चिराग-ए-दैर’ ही मसनवी गालिबने फारसी या त्याच्या आवडत्या काव्यभाषेत लिहिली आहे.

या मसनवीचा हिंदी अनुवाद दिल्ली विद्यापीठाचे माजी उर्दू विभागप्रमुख डॉ. सादिक यांनी केला आहे. डॉ सादिक यांनी म्हटले आहे की, ‘बनारसविषयी लिहिण्याची फारसी साहित्यात परंपराच आहे आणि गालिब यांनी या परंपरेचा विस्तार केला आहे. या मसनवीमधल्या शेरांची संख्या १०८ आहे.’ गालिब यांनी जाणीवपूर्वक या शेरांची संख्या १०८ ठेवली, असा डॉ. सादिक यांचा दावा आहे, कारण या देशात १०८ हा आकडा पवित्र मानला जातो.

या हिंदी अनुवादावरून ‘चिराग-ए-दैर’चा मराठी अनुवाद ‘दिवा देवळाचा’ या नावाने निशिकांत ठकार यांनी केला आहे. ‘दिवा देवळाचा’च्या प्रस्तावनेत ठकार यांनी म्हटले आहे की, ‘गालिब यांच्या फारसी भाषेतील एका कृतीचा परिचय करून द्यावा एवढाच उद्देश या अनुवादाचा नाही, तर गालिबवर जो भारतीय संस्कृतीचा संस्कार झाला आणि त्यातून त्याला सर्वसमावेशक, समन्वयात्मक विश्वदृष्टी प्राप्त झाली; त्याचे महत्त्व सद्य:कालात अधोरेखित व्हावे, हा आहे.’

निशिकांत ठकार हे हिंदी व मराठी या दोन्ही दिशांनी अनुवाद करतात. त्यांनी अरुण कोलटकर, ना. धों. महानोर, शरणकुमार लिंबाळे, श्याम मनोहर, बाबा भांड असे मराठीतले महत्त्वाचे लेखक-कवी हिंदीत नेले, तसेच हिंदीतले विनोदकुमार शुक्ल, कृष्णा सोबती, चंद्रशेखर कम्बार, ओ. व्ही. एन. कुरूप, भानू भारती, नाग बोडस हे अन्यभाषिक लेखक-कवी मराठीत आणले. अनुवादासाठी कलाकृती निवडण्यामागे त्यांची स्वत:ची मूल्यजाणीव दिसून येते. ‘भाषांतर प्रसंग’ हा अनुवाद प्रक्रियेवरचा त्यांचा ग्रंथ अभ्यासकांसाठी मोलाचा आहे.

गालिबच्या पूर्वजांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवेत असताना गाजवलेल्या पराक्रमाबद्दल गालिबला कंपनीकडून पेन्शन मिळत होती. अनेक वारसांमध्ये विभागली गेल्यामुळे ही रक्कम तुटपुंजी होती. या पेन्शनच्या संदर्भात कंपनीच्या मुख्यालयात आपला दावा पेश करण्याकरता गालिब ऑगस्ट १८२८ मध्ये कोलकात्याला गेला होता. १८२८ मध्येच परतीच्या प्रवासात तीनेक महिने तो बनारसला राहिला असावा. ईस्ट इंडिया कंपनीबरोबरच्या वाटाघाटी असफल झाल्यामुळे आणि अलाहाबादला काही अप्रिय प्रसंग घडल्यामुळे बनारसला पोहोचताना गालिबची मन:स्थिती कुंद होती. आपल्या मित्रांच्या आठवणीतून आपण बहिष्कृत झालो आहोत असे त्याला वाटत होते. तब्येतही बिघडली होती.    

मात्र, बनारसमध्ये प्रवेश केल्यानंतर ही स्थिती पालटली. आपले मित्र मौलवी मोहम्मद अली खान यांना लिहिलेल्या पत्रात तो लिहितो, ‘जेव्हा मी बनारसमध्ये प्रवेश केला, त्या दिवशी पूर्वेकडून एक जीव वाचवणारा, स्वर्गासारखा वारा वाहत होता; ज्याने माझ्या शरीरात ऊब निर्माण झाली आणि माझ्या हृदयात चैतन्य निर्माण झाले. त्या वाऱ्याच्या करिष्माई प्रभावाने माझे शरीर विजयाच्या ध्वजासारखे उंचावले. थंड वाऱ्याच्या लाटांनी माझ्या शरीरातला अशक्तपणा दूर केला.’

‘चिराग-ए-दैर’चे सुरुवातीचे शेर तक्रार, गाऱ्हाणे, नाराजी व्यक्त करणारे आहेत. आपले मित्र आपल्यापासून दुरावले आहेत, त्यांना आपली आठवण नाही याची त्यात खंत आहे. दिल्ली शहराचा विरह आहे. नशिबाने आपल्याला दिल्लीबाहेर काढले याचे दु:ख आहे. पुढे ही भावना बदलते. जहानाबाद (दिल्ली) नाही, तरी सारा जहान आबाद आहे आणि इथल्याच एखाद्या वृक्षावर मी घरटे बांधीन असा सूर त्यातून उमटतो. काशी नावाच्या ‘उत्फुल्ल फुलांनी लदबदलेल्या उपवनावर’ गालिबचे मन बसले आणि ‘बहुबहारीचा बरवा बहर’ आला. कवित्वाला दिव्यत्वाचा स्पर्श झाला. जन्म-मरणाच्या चक्रावर विश्वास असणारे या नगरीचे स्तुतीपाठच गातील, काशीत ज्यांना मृत्यू येईल त्यांना मोक्ष मिळेल, आत्म्याला शांती लाभेल, ते देहपणातून मुक्त होतील अशा काशीविषयीच्या पारंपरिक भावनाही गालिब व्यक्त करतो. बनारसच्या उद्यानांचे, सुगंधी वाऱ्याचे, विविध ऋतूंमध्ये खुलणाऱ्या शहराच्या रूपाचे वर्णन तर यात आहेच; पण गंगेत स्नान करणाऱ्या, हातात फुलांची तबके घेऊन मंद गतीने चालणाऱ्या बनारस-निवासिनी, रूपविलासिनी कवीच्या नजरेतून कशा निसटणार? त्या गंगेत स्नानाला उतरल्या की तळाच्या शिंपल्यातल्या मोत्यांचे पाणी पाणी होते. स्वत: काशीनगरीही या रूपगर्वितांपेक्षा कमी नाही. ‘काशीनगरी भासते आहे/ रूपगर्विता/ नवयौवना, चारूचंचला/ प्रात:काळी अन् तिन्ही सांजेला/ तिच्या हातात आरसा गंगेचा असतो/  शृंगार साधना करावयाला..’

आणखी एक शेर आहे- ‘पाण्यात पडलेले/ प्रतिबिंब आपुले/ बनारस नगरीने/ ओठंगून बघितले/ आणि त्याच क्षणी/ उपमेयच जणू उपमान होऊन गेले..’ या नगरीला त्याने ‘दुनिया के दिल का नुक्ता’, ‘हिंदूंचा काबा’ असेही म्हटले आहे.

बनारस शहराचे गुणगान करताना एका पत्रात गालिब म्हणतो की, ही नगरी इतकी सुंदर आहे की, एखाद्या परक्या माणसालाही आपली दु:खं विसरायला लावते. हातात जपमाळ घेऊन, कपाळी टिळा लावून, जानवं घालून गंगेच्या किनारी बसावे आणि अपराधांची धूळ धुतली जात नाही तोपर्यंत सारं आयुष्य इथेच घालवावं, किंवा पाण्याच्या थेंबाप्रमाणे नदीत विलीन होऊन जावं. ‘चिराग-ए-दैर’मध्ये गालिबने एक गोष्टही सांगितली आहे. बनारस शहरात गालिबला एक फकीर भेटला. गालिबने त्याला विचारले की, ‘या दुनियेत कल्पांताची वेळ आल्याप्रमाणे भाऊबंदकी माजली आहे, मुलगा बापाच्या जीवावर उठला आहे आणि बाप मुलाच्या. दुनियेतून नैतिकता आणि धार्मिकता नाहीशा झाल्या आहेत. दया, माया, क्षमा, शांती दिसत नाहीत.. तरीही अजून कयामत का येत नाही?’ फकीर त्याला उत्तर देतो की, ‘केवळ काशी नगरीमुळेच कयामत येत नाही. अखिल विश्वामधली ही अतिरमणीय नगरी नष्ट व्हावी हे त्या परमेश्वराला स्वत:लाच मंजूर नाही.’

बनारस शहरात असा जीव गुंतला असतानाच त्याला आपल्यावर अवलंबून असलेल्या आप्तेष्टांची आणि जबाबदाऱ्यांची आठवण येते. घरी परतण्याविषयीचे पत्र मिळते. तो स्वत:लाच बजावतो की, जगभर कुठेही फिरलास तरी बनारसमध्ये तुला जो उन्नत मार्ग सापडला आहे त्याला कधीही विसरू नकोस. आळस झटकून आपदांना न घाबरता तोंड दे. क्षणभर थांबू नकोस. चालत राहा. निर्धाराने स्वतंत्र हो. या मसनवीचा शेवटचा शेर आहे- ‘इल्ला’ शब्दाचा अर्थ आहे / ‘वेगळा’/ ‘ला’ शब्दाचा अर्थ आहे/ ‘नाही’/.. त्याच्याहून वेगळा कोणी नाही/ त्या परमेशाचा नामघोष कर/ आणि त्यावेगळे जे काही/ त्या सगळ्याचा/ त्याग कर//

बनारसचे वर्णन करता करताच गालिब स्वत: जिथे सर्व धर्म आणि श्रद्धा विलीन होतात अशा एका धर्मविरहित आध्यात्मिक उंचीवर येऊन ठेपला आहे. त्याला तो दूरच्या देवळातला दिवा दिसतो.

अनुवाद करताना निशिकांत ठकार यांनी या मसनवीमधल्या शेरांचा अनुवाद मुक्तछंदात केला आहे. गालिबच्या संपृक्त कवितेचा अनुवाद ही सोपी गोष्ट नाही. कवितेच्या बाह्यरूपापेक्षा तिचा आशय पोहोचवणे महत्त्वाचे वाटले असे त्यांनी म्हटले आहे. हा अनुवाद सुघड झाला आहे. संग्रहाची निर्मितीही सुबक आहे.

ठकारांनी म्हटल्याप्रमाणे ‘चिराग-ए-दैर’मधून व्यक्त होणारी ‘सर्वसमावेशक, समन्वयात्मक विश्वदृष्टी’ अधोरेखित होणे जरुरीचे आहेच; पण त्याचबरोबर बनारस शहराचीही पुन:ओळख प्रस्थापित करणे जरुरीचे आहे. ते शतकानुशतके भारतात प्रचलित असलेल्या गंगाजमनी संस्कृतीचे प्रतििबब आहे. बदललेल्या सामाजिक, राजकीय पर्यावरणात या शहराची बहुसांस्कृतिक, बहुधार्मिक ओळख अधोरेखित करणे जरुरीचे आहे. ते हिंदूंच्या एकाच दैवताचे मंदिर असलेले शहर नाही, तर एक सुफियाना मिज़ाज असलेले शहर आहे.

‘दिवा देवळाचा’- मिर्झा गालिब, अनुवाद : निशिकांत ठकार, लोकवाङ्मय गृह, पृष्ठे : १२२, किंमत : २२५ रुपये.

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi books review diva devalacha by mirza galibs zws