व्यंगचित्रकला ही तुलनेने अलीकडच्या काळात उदयाला आलेली अत्यंत महत्त्वाची शाखा आहे. निव्वळ हसू आणणे हे या कलेचे एकमेव प्रयोजन नाही. ते हसू तर ही कला फुलवतेच, शिवाय जीवनाकडे खेळकरदृष्टीने पाहायला शिकवणारी, सत्याची आणखी एक बाजू लक्षात आणून देणारी ही एक अत्यंत प्रगल्भ कला आहे. चित्रकला आणि विनोदबुद्धी यांच्या साहाय्याने जीवनातले सामान्यांना न दिसलेले, जाणवलेले क्षण, गोष्टी, अंतर्विरोध, विसंगती, विविध पदर व्यंगचित्रकार सांगत असतो, दाखवत असतो. कथा, कविता, कादंबरी, गंभीर विषयांवरचे तत्त्वचिंतन करणारे लेख, नाटक या सार्या कलांच्या छटा या व्यंगचित्रकलेत पाहता येतात.
मराठी व्यंगचित्रकलेची नेमकी सुरुवात कधी झाली हे सांगता येत नसले तरी अंदाजे सन १८८०च्या सुमारास युरोपियन मासिकांच्या प्रभावामुळे ‘विनोदी चित्रे’ तत्कालीन देशी नियतकालिकांतून दिसू लागली. यात ‘हिंदूपंच’ या नियतकालिकाचे नाव अत्यंत महत्त्वाचे आहे. इंग्लंडमधील सुप्रसिद्ध ‘पंच’ साप्ताहिकाच्या प्रभावामुळे त्याकाळी भारतात अनेक देशी पंच प्रकाशित होत असत. त्यापैकीच एक म्हणजे मराठी ‘हिंदूपंच.’
हिंदूपंचप्रमाणेच त्याकाळी अनेक मराठी नियतकालिकांतून व्यंगचित्रे, रेखाचित्रे येत असत. परंतु त्यात सुसूत्रता, सातत्य किंवा अभ्यासपूर्ण मांडणी याचा पाया नव्हता. ती उणीव भरून काढली शंकरराव वासुदेवराव किर्लोस्कर (शंवाकि) यांनी. त्या अर्थाने त्यांनी मराठी व्यंगचित्रकलेचे बीज रोवले असे म्हटले तरी चालेल. कारण यामागे त्यांची बुद्धिमत्ता, विचार, अभ्यास, प्रयत्न आणि ध्येय हे सारे एकवटलेले होते. म्हणूनच त्यांना मराठी व्यंगचित्रकलेचे आद्य व्यंगचित्रकार असे म्हणणे रास्त राहील.

त्यानंतर मात्र खर्या अर्थाने व्यंगचित्रकलेचे हे बीज अंकुरले, त्याचे रोपटे झाले आणि पुढे शंभर वर्षांत त्याचे एका डेरेदार वृक्षात रूपांतर झाले. त्याला अर्थातच अनेक शाखा फुटल्या आणि या कलेचे एक वैभवी रूप मराठी रसिकांसमोर, वाचकांसमोर उभे राहिले.
‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या ग्रंथात प्रामुख्याने शंकरराव किर्लोस्कर यांच्यापासून म्हणजे अंदाजे शंभर वर्षांच्या व्यंगचित्रांच्या कलेच्या इतिहासाचा आढावा घेतला आहे. ही एक प्रकारे व्यंगचित्रकलेची सुसूत्र दृश्यात्मक नोंदवही आहे.
या ग्रंथात व्यंगचित्रकलेच्या अनेक शाखांचा समावेश तर आहेच, त्याचबरोबर मराठी व्यंगचित्रकलेत ज्यांनी मोलाची भर घातली अशा काही निवडक व्यंगचित्रकारांच्या कलेचे रसग्रहण आहे. त्यात प्रामुख्याने शं. वा. किर्लोस्कर, दीनानाथ दलाल, बाळासाहेब ठाकरे, वसंत सरवटे, श्याम जोशी, गवाणकर, प्रभाकर ठोकळ, विकास सबनीस इत्यादी अनेक व्यंगचित्रकारांचा समावेश आहे.
या ग्रंथात व्यंगचित्रकलेच्या बहुतेक सार्या शाखांची नोंद व्हावी अशी योजना आहे. उदाहरणार्थ, पूर्वी मासिकांतून आणि दिवाळी अंकांतून दिसणारी मुबलक हास्यचित्रे हे मराठी व्यंगचित्रकलेचे वैभव आहे. साठ-सत्तर वर्षांनंतरही ही व्यंगचित्रे आपल्याला आनंद देतात यातच सारे काही आले. सुरुवातीला मासिकांत असणारी संभाषणयुक्त हास्यचित्रे हळूहळू अधिक प्रगल्भ होत गेली. जीवनविषयक गंभीर आणि गमतीदार, भेदक आणि तत्त्वज्ञान सांगणारी भाष्ये करू लागली. पुढे तर अनेक मासिकांच्या मुखपृष्ठावर सन्मानाने, डौलाने झळकू लागली. साहजिकच मराठी वाचकांच्या चेहर्यावरची हास्यरेषा अधिक रुंद झाली. राजकीय व्यंगचित्र ही या कलेची दुसरी अत्यंत प्रभावी शाखा. महत्त्वाच्या राजकीय घटनांवर चित्रांच्या माध्यमातून भाष्य करणे, अर्कचित्रांचा प्रभावी वापर करून सामान्य जनमानसाला एखाद्या घटनेचे अधिक पदर समजावून सांगणे हे राजकीय व्यंगचित्रकलेचे काम. या क्षेत्रातही मराठी व्यंगचित्रकलेचे योगदान नावाजावे असे आहे. अनेक व्यंगचित्रकारांनी ४०-५० वर्षे राजकीय व्यंगचित्रे काढली. त्यांच्या कारकीर्दीचा मराठी माणसावर विलक्षण प्रभाव पडला.

दैनिकाच्या पहिल्या पानावरील पॉकेट कार्टूनमधूनही रोजच्या, आजूबाजूला घडणार्या सामाजिक-राजकीय घटनांवर खुमासदार भाष्य केले जाते. हा प्रकारही स्वातंत्र्यानंतर अनेक दैनिकांनी पत्रकारितेचा महत्त्वाचा भाग म्हणून स्वीकारला आणि वाचकांना रोजच्या रोज पॉकेट कार्टून बघण्याची सवय लागली.
अर्कचित्रकला ही व्यंगचित्रकलेची आणखीन एक महत्त्वाची शाखा. एखाद्या व्यक्तीचे त्याचे मूळ व्यक्तिमत्त्व, चेहरेपट्टी हरवू न देता, त्याच्या चेहर्याच्या काही विशिष्ट भागाचे, वेशभूषेचे, बसण्याच्या-उभे राहण्याच्या पद्धतीचे, लकबीचे अतिशयोक्त चित्रण करणे हे व्यंगचित्रकाराचे काम. याही बाबतीत अनेक मराठी व्यंगचित्रकारांची कामे आपल्याला या ग्रंथात पाहायला मिळतील. विशेष म्हणजे एकाच व्यक्तीचे अनेक व्यंगचित्रकारांनी काढलेले अर्कचित्र यात पाहायला मिळेल. म्हणजे व्यक्ती एकच असली तरी प्रत्येक व्यंगचित्रकाराला ती वेगवेगळ्या पद्धतीने दिसत असते हीच या कलेची गंमत आहे.
एखाद्या लेखाला, कथेला किंवा पुस्तकाला पूरक विनोदी रेखाटने म्हणजे इलस्ट्रेशन हाही व्यंगचित्रकलेचा एक महत्त्वाचा भागच आहे. त्याचीही थोडी उदाहरणे या ग्रंथामध्ये खास करून घेतली आहेत. दिवाळी अंकांतून, मासिकांतून, वृत्तपत्रांतून इतकेच नव्हे तर अनेक प्रवासवर्णने वगैरेंना पूरक म्हणून ही रेखाचित्रे वापरली जातात. मूळ लेखातील आशयाला बाधा न आणता त्याचे सौंदर्य अधिक वाढावे, लेखातील किंवा गोष्टीतील शब्दांवरून व्यक्तिरेखा चित्राच्या माध्यमातून दृश्यरूपात देणे हा या कलेचा हेतू. अनेक नामवंत लेखकांच्या बरोबरीने अशी इलस्ट्रेशन करणार्या व्यंगचित्रकारांची नावे घेतली जाऊ लागली, याचे श्रेय या कलावंतांचेच.
कॉमिक स्ट्रिप किंवा हास्यचित्रपट्टी हीसुद्धा या कलेचीच एक महत्त्वाची शाखा. जगभरातील अनेक देशांतील, अनेक भाषांतील शेकडो व्यंगचित्रकारांनी आयुष्यभर निव्वळ या कलेला वाहून घेतले आहे. यासाठी लागते ते म्हणजे काही व्यक्तिरेखा उभ्या करणे, वातावरणनिर्मिती आणि खुसखुशीत सर्वसामान्य वाचकाला झटकन कळेल असा विनोद. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे सातत्य. मराठी व्यंगचित्रकलेला अभिमान वाटेल अशा कॉमिक स्ट्रिपटे स्वतंत्र महत्त्व आहे.
व्यंगचित्रकलेच्या या सार्या शाखांची नोंद आणि मराठी व्यंगचित्रकारांच्या कामाची झलक या ग्रंथात घेण्याचा माझा प्रयत्न आहे. कारण कलेचा दस्तऐवज (डॉक्युमेंटेशन) असणे हा मानवी संस्कृतीतील एक महत्त्वाचा टप्पा असतो.

मराठी व्यंगचित्रकलेतील विविध शाखांतून आपल्या विविधांगी प्रतिभेचे दर्शन घडवणार्या व्यंगचित्रकारांची नोंद या ग्रंथात आहे. शंकरराव किर्लोस्कर यांनी व्यंगचित्रांद्वारे समाज सुधारणेचा घेतलेला ध्यास या ग्रंथात दिसेल. दीनानाथ दलाल यांच्या बहुविध प्रतिभेचा आविष्कार दिसेल. हरिश्चंद्र लचके यांनी हास्यचित्रकला लोकप्रिय केली. त्यातूनच पुढे मासिकांतून हास्यचित्रे काढणारी नवी पिढी तयार झाली. शि. द. फडणीस यांनी हास्यचित्र मुखपृष्ठावर येऊ शकते हे सिद्ध केले. वसंत सरवटे यांनी व्यंगचित्रांची रेषा तत्त्वज्ञानाच्या अंगानेही जाऊ शकते असा आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रत्यय दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी चाळीस वर्षे स्वत:चे साप्ताहिक चालवले. त्यांनी जोरकस, बळकट व्यंगचित्रे तर काढलीच, त्याशिवाय मराठीतल्या अनेक व्यंगचित्रकारांचे ते प्रेरणास्थान बनले. त्यांच्यातील चित्रकार, राजकीय स्पष्ट-निर्भीड भाष्य आणि हजरजबाबी विनोद बुद्धी या गोष्टी त्यांना राजकीय सत्तेपर्यंत घेऊन गेल्या. हा एक चमत्कारच म्हणावा लागेल.
चंद्रशेखर पत्की, ज्ञानेश सोनार, खलील खान इत्यादींनी घडीची चित्रे किंवा खिडकी चित्रे यावर अनेक वर्षे काम केले आहे. हे सर्व जण वाचकांमध्ये प्रिय आहेत. महत्त्वाचे म्हणजे हा प्रकार मराठीव्यतिरिक्त अन्य कुठे दिसत नाही.
अर्कचित्रकला हाही विलक्षण लोकप्रिय कलाप्रकार आहे. या ग्रंथात घेतलेली काही उदाहरणे सांगता येतील. प्रभाकर वाईरकर हे अनेक कलावंतांना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्या कार्यक्रमात जाऊन त्यांची समक्ष अर्कचित्रे काढतात आणि त्यावर त्यांची स्वाक्षरी घेतात. तर श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी याच अर्कचित्रकलेला अतिशय उत्तम व्यावसायिक स्वरूप दिले आहे. हेही काम अवघडच. या ग्रंथात निव्वळ अर्कचित्रे काढणार्या अनेकांचा समावेश मुद्दाम केला आहे. त्यात प्रभाकर भाटलेकर, भटू बागले, विजयराज बोधनकर, त जगताप, अतुल पुरंदरे यांच्यासारखे अनेक जुने-नवे व्यंगचित्रकार आहेत. त्यांच्यातील वैविध्य पाहून वाचकांना अतिशय आनंद होईल हे नक्की!
चारुहास पंडित गेली अनेक वर्षे सातत्याने ‘चिंटू’ ही कॉमिक स्ट्रिप चितारत आहेत. इतकी वर्षे दर्जा राखून असे काम करणे हे विलक्षण आव्हानात्मक आहे आणि देशभरात क्वचितच घडणारे आहे. चिंटू या व्यक्तिरेखेवर चित्रपट आणि ॲनिमेशनपट निघाले हेही मराठी माणसाला सुखावणारे आहे. संजय मिस्त्री आणि विकास सबनीस अनेक वर्षे दादरला नियमितपणे व्यंगचित्रांचे क्लास घेत होते. हे फार अवघड तरी आवश्यक असे काम त्यांनी केले. विवेक मेहेत्रे अनेक उपक्रम करतात. परंतु त्यांचे एक महत्त्वाचे काम म्हणजे त्यांनी ‘सिंडिकेशन’ या व्यवसायाला मराठीपण दिले. त्यांच्यामुळेच अनेक मराठी व्यंगचित्रकारांची कला अनेक भाषांतील वाचकांपर्यंत जाऊ लागली. हे एक मोठे, महत्त्वाचे आणि वेगळे काम आहे. मी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘व्यंगचित्र रसग्रहण कार्यशाळा’ घेतो. मुंबई, पुणे, नागपूर इत्यादी विद्यापीठात अशा कार्यशाळा आयोजित झाल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये व्यंगचित्रकलेविषयीची जाण वाढावी हा त्यामागे हेतू आहे आणि त्याला प्रतिसादही उत्तम आहे.
इलस्ट्रेशन म्हणजे रेखाचित्र किंवा बोधचित्र हा व्यंगचित्रकलेतील एक महत्त्वाचा भाग. मराठीतील गेल्या पिढीतील ख्यातनाम चित्रकार प्रभाशंकर कवडी यांची या ग्रंथातील चित्रे पाहताना अनेकांच्या जुन्या स्मृती जागृत होतील. राम वाईरकर यांनी रेखाटलेल्या आणि अजरामर केलेल्या भा. रा. भागवत यांच्या ‘फास्टर फेणे’ची नोंद घेणे आवश्यक होते. ती या ग्रंथात दिसेल. केवळ दिवाळी अंकांची नव्हे तर अनेक लेखकांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे आणि रेखाटने करणारे पुंडलिक वझे यांचीही कला आपल्याला आनंद देऊन जाईल.
मला सर्वात जास्त आनंद झाला जेव्हा मी शंकरराव किर्लोस्कर यांच्याबरोबर अगदी सुरुवातीला काम केलेल्या दोन व्यंगचित्रकारांना शोधून काढले. त्यातील एक आहेत दत्तोबा दळवी- कोल्हापूरचे. ते किर्लोस्कर यांचे वर्गमित्र. त्यांची काही जुनी व्यंगचित्रे त्यांचे नातू अजेय दळवी यांच्याकडून मला मिळाली. त्याचबरोबर स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात किर्लोस्कर यांच्यासोबत काम केलेले र. बा. केळकर यांचीही काही दुर्मीळ व्यंगचित्रे त्यांचे चिरंजीव प्र. र. केळकर यांनी या ग्रंथासाठी दिली. सुदैवाने काही वर्षांपूर्वी खुद्द र. बा. केळकर यांची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली होती. आणखी एका विस्मृतीत गेलेल्या पुण्यातील शिवाजी कांबळे यांची व्यंगचित्रे त्यांचे भाऊ प्रमोद कांबळे यांनी उपलब्ध करून दिली. ती पाहून वाचकच नव्हे तर व्यंगचित्रकारही थक्क होतील इतका त्यांचा दर्जा उत्तम आहे. ख्यातनाम चित्रकार मुळगावकर यांनी काही विनोदी कथांसाठी केलेली रेखाटने या ग्रंथात पाहायला मिळणे हेही एक विलक्षण आकर्षण आहे. आश्चर्य वाटावे असे एक दुर्मीळ व्यंगचित्र या ग्रंथात आहे. जपानवर झालेल्या अणुबॉम्बच्या हल्ल्यानंतर एका तरुण मराठी व्यंगचित्रकाराने काढलेले व्यंगचित्र त्यावेळेच्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये पहिल्या पानावर प्रकाशित झाले. हरिश्चंद्र लचके यांचे हे व्यंगचित्र प्रथमच मराठी वाचकांना पाहायला मिळेल. स्वत: व्यंगचित्रकार नसलेले मात्र या कलेचे सामर्थ्य जाणणारे, त्याविषयी विस्तृत लेखन करणारे मधुकर धर्मापुरीकर आणि शशिकांत सावंत यांचेही मनोगत मुद्दाम या ग्रंथामध्ये घेतलेले आहे.
व्यंगचित्रकलेच्या स्पर्धा जगभर विविध देशांत नियमित आयोजित केल्या जातात. अशा या स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा अनुभव जुन्या पिढीतील व्यंगचित्रकार सुरेश सावंत आणि नव्या पिढीतील विश्वास सूर्यवंशी यांनी कथन केला आहे.
शंभर वर्षांपूर्वी रुजलेल्या या कला प्रकाराची रेषा आता नवी पिढी पुढे नेत आहे ते वाचकांना दिसेलच. नव्या पिढीची सर्जनशीलता आणि समज उत्तम आहे हे वाचकांना जाणवेलच. ‘इंडिया टुडे’साठी काम करणारे सिद्धांत जुमडे, ‘मार्मिक’चे चित्रकार गौरव सर्जेराव, हास्यचित्रकलेमध्ये वेगळा विचार करणारे शौनक संवत्सर आणि असीम कुलकर्णी, समाजमाध्यमांवर चमक दाखवणारे रवी राणे, व्यंगचित्रकलेचा अभ्यास असणारे विवेक प्रभुकेळुसकर, गिनेस बुकमध्ये नाव येणारे सुहास पालीमकर आणि इतर अनेक व्यंगचित्रकार या ग्रंथात पाहायला मिळतील. हे आणि इतर अनेक तरुण, युवक व्यंगचित्रकार हे मराठी व्यंगचित्रकलेचे भविष्य आणि आशास्थान आहे.
या अपूर्व ग्रंथाला प्रस्तावना लिहिण्यासाठी शतायुषी व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचा ‘पेपर ते आयपॅड’ हा लेख मिळणे हे या ग्रंथाचे केवळ भाग्यच! मराठी व्यंगचित्रकलेची इतकी प्रदीर्घ वाटचाल प्रत्यक्ष पाहण्याचे आणि त्यात सर्जनशीलतेने सामील होण्याचा विलक्षण अनुभव त्यांच्या गाठी आहे. व्यंगचित्रकलेचे रूप कसे कसे पालटत गेले यांचा एकप्रकारे रोचक इतिहास वाचकांना विलक्षण आनंद देऊन जाईल.
देशात अशा प्रकारचा, व्यंगचित्रकलेचा शतकभराचा आढावा घेणारा ग्रंथ कोणत्याही भाषेत असेल असे वाटत नाही. त्यादृष्टीने हा महत्त्वाचा ग्रंथ आहे. मराठी वाचक या अपूर्व ग्रंथाचे अभूतपूर्व स्वागत करतील याची मला खात्री आहे.
