जीवन तळेगावकर
अलीकडच्या काळात मराठी विनोदी लेखनाची परंपरा नव्या विषयांसह, नव्या भाषेसह पुढे नेण्याचे काम काही लेखक जोमाने करीत आहेत. डॉ. रवींद्र तांबोळी हे त्यातलेच एक. तांबोळींचा ‘अंगठा, लाईक आणि द्रोणाचार्य’ हा नवा लेखसंग्रह म्हणजे एकविसाव्या शतकातल्या मध्यमवर्गीय माणसाचे हसविणारे आत्मचरित्र म्हणावे लागेल. या संग्रहात एकूण सतरा दीर्घ लेख आहेत. त्यापैकी एका लेखात अचानक लक्ष्मीच्या निमित्ताने पैशाभोवती घुटमळणारा माणूस येतो. दुसर्‍यात देशाटनातून चातुर्य शोधणारा, पण प्रत्यक्षात पदप्राप्त पंडितांकडून दंडीत होणारा नोकरदार भेटतो. एकात तर फेसबुकच्या आभासी दुनियेत हरवलेला विनोदपंत आहे.

पुस्तकातील आरंभीच्या लेखात द्रोणाचार्यच स्वप्नात येऊन ‘अंगठा’ हा मोबाइल युगाचा शाप असल्याचे सांगतात. पुस्तकात कधी साहेबांचे कालानुरूप विचार ऐकताना शांत व्यवस्थेचे वस्त्रहरण होते. कधी कधी हृदय की मन यांचा गोंधळ उलगडतो. लेखकाकडून खंत संमेलनाच्या निमित्ताने साहित्य-व्यवहारावर कोरडे ओढले जातात. याच लेखकाच्या चांद्रिय गोंधळातून झोपेचे शास्त्र उलगडते. आणि भाऊसाहेबांचे पॉलिटिकल लॉन्चिंग करताना राजकारणाचे ढेकूण-पुराण लेखकाद्वारे मांडले जाते.

आजचा सामान्य माणूस. तो कधी पैशाने फसतो, कधी प्रवासाने, कधी फेसबुकने, कधी अंगठ्याने, कधी साहेबाने, कधी हृदयाने, कधी संमेलनाने, कधी चंद्राने आणि कधी राजकारणाने. लेखक त्या प्रत्येक फसवणुकीचे काव्य करतो. हे सुखद सारे लिहिताना लेखकाने जी शैली राखली आहे ती स्व-विडंबनातून विश्वदर्शनाची आहे.

ते स्वत:ला केंद्रस्थानी ठेवून जगावर भाष्य करतात. ‘आम्ही किंचित साहित्यिक’, ‘आम्हाला निमंत्रण येत नाही’, ‘आम्ही तुसडे म्हणून प्रसिद्ध’… असे म्हणत ते वाचकाच्या जवळ जातात. वाचकाला लेखकाचा राग येत नाही, कारण लेखक आधी स्वत:वरच हसतो. आत्मपर विनोद ही पु.लं.ची परंपरा आहे, पण इथे ती व्हॉट्सॲप, फेसबुक, यूट्यूबच्या काळात आली आहे.

या पुस्तकातील लेखांत प्रत्येक वाक्यात एक ठोसा आहे. ‘‘फेसबुक म्हणजे आद्य मुखग्रंथ’’, ‘‘अंगठा म्हणजे एकविसाव्या शतकातला एकलव्य’’, ‘‘गुटखाबंदीमुळे लोकसंख्या वाढली’’… अशी वाक्यं वाचकाच्या डोक्यात घर करतात.

तांबोळी हे केवळ किस्सेकथन करणारे लेखक नाहीत, ते शब्दांचे शिल्पकार आहेत. ‘राजपिशाच्च’, ‘सत्तासुर’, ‘लोभवशा’, ‘श्रेष्ठाळ’, ‘गूगलदिंडी’, ‘खंत-संमेलन’, ‘ढेकूण-सिद्धांत’… असे अनेक शब्द ते घडवतात. हे शब्द केवळ गंमत म्हणून येत नाहीत, तर व्यवस्थेचे अचूक वर्णन करतात. मराठी भाषेला नवे जोडशब्द देण्याचे काम हे पुस्तक करते.

‘साहेबांचे कालानुरूप विचार’ या लेखात पाच साहेब येतात. प्रत्येक जण लोकसंख्यावाढीवर आपला सिद्धांत मांडतो. कोणी गुटखाबंदीला जबाबदार धरतो, कोणी करोनाला, कोणी योगाला, कोणी विजेला. वाचकाला कळते की समस्या एक, पण कारणे सांगणारे अनेक. आणि उपाय कोणाकडेच नाही. हे आजच्या प्रशासनाचे, राजकारणाचे, समाजकारणाचे अचूक चित्रण आहे. नेमके सांगायचे झाल्यास हे सारे लिखाण काळाचा आरसा आहे.

प्रत्येक मराठी घरात, विशेषत: जिथे एक ‘रिकामटेकडा’ माणूस मोबाइल हाताळत बसला आहे, तिथे हे पुस्तक असायलाच हवे. कारण हे पुस्तक आरसा आह- ज्यात आपण स्वत:ला पाहतो आणि म्हणतो, ‘‘अरे, हा तर मीच!’’  ४

‘अंगठा, लाईक आणि द्रोणाचार्य’, डॉ. रवींद्र तांबोळी, पद्मगंधा प्रकाशन,

पाने- १७५, किंमत- ३०० रुपये.