मराठी साहित्याच्या समृद्ध प्रवाहात ललित साहित्याचा प्रवाह चांगलाच सशक्त आणि बहुपेडी आहे. मात्र या ललित साहित्याची वर्गवारी जर आपण वाचकांच्या वयोगटानुसार करायला गेलो तर मात्र हा सशक्त प्रवाह काही काही ठिकाणी अगदीच कमकुवत-क्षीण असल्याचं लक्षात येतं. म्हणजे नेमकेपणानं सांगायचं तर बालसाहित्याचे दालन ज्यात वयोगट ५ ते १२ पर्यंतच्या वाचकांसाठी भरपूर आणि दर्जेदार साहित्य उपलब्ध आहे, त्या तुलनेनं कुमार गटासाठी मात्र पुरेसे पर्याय उपलब्ध नाहीत असंच (खेदानं) म्हणावं लागेल. आज जेव्हा मराठी भाषेवरील अतिक्रमणे, मराठी माध्यमातील शिक्षण आणि मराठी वाचनाच्या सवयीत झालेली घसरण याविषयी चिंतेच्या सुरात चर्चा होत असताना तर ही उणीव अधिकच टोचते. कुमार वयोगट अर्थात ‘टीन एजर्स’ हा असा वयोगट आहे जो भविष्यातील प्रौढ वाचक (आणि लेखकही!) वयोगटाचा पाया आहे. जर या वयात मुला-मुलींची नाळ मातृभाषेतील साहित्याशी जुळली गेली नाही तर मग नंतरच्या वयात ते साहित्याबरोबरच आपल्या मातृभाषेपासूनही दुरावण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच आज मराठीची पीछेहाट होत असताना, आजच्या काळातल्या टीन एजर्ससाठी त्यांच्याच जगातल्या गोष्टी घेऊन आलेल्या ‘इयरफोन्स’ या गणेश मतकरींच्या कथासंग्रहाचं महत्त्व अर्थातच विशेष आहे.

गणेश मतकरी हे नाव मराठी वाचकांच्या परिचयाचं आहे ते वेगवेगळ्या संदर्भांमध्ये. जागतिक आणि भारतीय सिनेमाचे अभ्यासक म्हणून मतकरींनी लिहिलेली पुस्तके जशी सिनेप्रेमी वाचकांना माहिती आहेत त्याचप्रमाणे आजच्या काळातील महानगरातील माणसांच्या आणि वातावरणातल्या काहीशा गुंतागुंतीच्या, जराशी गूढाची सावली पडलेल्या वेधक कथा लिहिणारे कथाकार म्हणून मतकरींनी स्वत:चा वाचकवर्ग तयार केला आहे. अशा लेखकाने खास कुमार गटासाठी लिहिलेल्या कथा अर्थात केवळ रंजक नाहीत तर या वयोगटातील मुला-मुलींच्या मानसिकतेचं नेमकं चित्र उभं करणार्‍या आहेत.

वय वर्षं बारा-तेरा ते सतरा-अठरा हे वय तसं आडनिडंच असतं. म्हणजे या वयात बालवयाची वेस तर ओलांडलेली असते, पण तारुण्याची शीव गाठलेली नसते. साहजिकच या वयातल्या मुला-मुलींचं भावविश्व, त्यांच्या कल्पनेतील फॅंटसी, त्यांच्या वर्तुळातलं गॉसिप आणि गप्पा हे एकाच वेळी जरासं बालिश आणि किंचित प्रौढ याचं अनोखं मिश्रण असणं स्वाभाविकच असतं. वर्गातल्या- शाळेतल्या- सोसायटीतल्या मित्र-मैत्रिणी, घरातलं वातावरण, अवतीभोवती घडणार्‍या गोष्टी आणि त्यात आता नवीन माध्यमांची, गॅजेट्सची पडलेली भर यामुळे कुमार वयोगटातल्या मुला-मुलींचं जग ज्या मनोवेधक छटांनी सजलेलं, नटलेलं क्वचित कुरूपही झालेलं असतं, त्याचं अतिशय मनोवेधक दर्शन इयरफोन्समधील कथा वाचताना घडतं. त्यामुळे तुम्ही जरी प्रौढ वयाचे असाल तरीही या गोष्टी वाचताना त्यात नक्की रंगून जाता.

इयरफोन्स संग्रहातील सातही कथा या आजच्या काळातल्या, मुंबईसारख्या महानगरातील (उच्च?) मध्यमवर्गीय घरांमध्ये घडतात. सोसायटीत राहणार्‍या, स्कूल बसमधून शाळेत जाणार्‍या, आई-बाबांकडून पॉकेटमनी मिळणार्‍या, मोबाइल आणि कॉम्प्युटर वापरणार्‍या मुलामुलींच्या या गोष्टी आहेत. या मुलांचा सामाजिक-आर्थिक अवकाश, जीवनशैली दाखवतानाच लेखक या मुलांच्या मानसिक आंदोलनांकडे, परिस्थितीने दिलेल्या समंजस शहाणपणाकडे, स्वभावातील नैसर्गिक खोडकरपणाकडे आणि बालवयाच्या कोशातून बाहेर पडताना कराव्या लागणार्‍या ‘स्ट्रगल’कडे वाचकांचं लक्ष सहजपणे वेधतो. ‘खोटी गोष्ट’मधल्या जास्त वेळ गोष्टीचं पुस्तक वाचायला मिळावं म्हणून बाबांशी नकळतपणे खोटं बोलणार्‍या चौथीतल्या मुलाची (याचं नाव लेखक सांगत नाही, पण म्हणून गोष्टीची रंगत कमी होत नाही!) नंतरची अस्वस्थता आणि पुढे दोन वर्षांनी सहावीत गेल्यानंतर ती अस्वस्थता कमी करणारी घटना याचा पट लेखकाने असा काही चितारला आहे की एखाद्या महाकाव्याच्या नायकाला पडलेला नैतिक प्रश्न ही या गोष्टीतल्या मुलाला पडलेल्या प्रश्नापुढे फिका पडावा. ‘रिझल्ट’ या गोष्टीतल्या रोहितच्या आयुष्यात निर्माण झालेली सिच्युएशन कदाचित अनेकांनी आपापल्या शालेय वयात अनुभवलेली असूच शकते, म्हणजे परीक्षेला टाइम टेबल नीट न बघता भलत्याच विषयाचा अभ्यास करून जायचं आणि मग आता या पेपरात हमखास नापास होणार याचंच टेन्शन घ्यायचं. पण यापुढे जे घडतं म्हणजे गोष्टीतल्या रोहितच्या डोक्यात आणि त्याच्या आयुष्यात प्रत्यक्षातही त्यातून उभं राहणारं नाट्य लेखकानं अगदी स्वाभाविकपणे जिवंत केलं आहे. गोष्ट एका आनंदी वळणावर संपताना रोहितच्या डोक्यात निर्माण झालेला प्रश्न रोहितला जसा मोठा करतो, तसाच त्या गोष्टीलाही एका उंचीवर नेऊन ठेवतो.

या संग्रहातील ‘प्लॅन’ आणि ‘इयरफोन्स’ या कथा गणेश मतकरींच्या प्रौढांसाठी (म्हणजे मोठ्या वयोगटासाठी!) लिहिलेल्या कथांशी नातं सांगणार्‍या आहेत. मात्र या गोष्टी शाळेतल्या मुलांच्या असल्याने त्यातील चतुराई, कॅलक्युलेटेड रिस्क, एखाद्या सिच्युएशनवर मात करण्याची पद्धत, समोरच्याच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्याला गुंगवण्याची पद्धत हे सगळं कुठंही मोठ्यांचं, मोठ्या माणसांच्या शैलीतलं नाही तर त्या वयोगटातल्या मुलांना साजेसं आहे. या संग्रहातली ‘वटवाघूळ’ ही कथा मात्र बाकीच्या कथांपेक्षा अगदीच वेगळी आहे. या गोष्टीतल्या रोहनची कल्पनाशक्ती आणि त्याच्या मित्रांचा खट्याळपणा यामुळे एकाच वेळी जरा गूढ आणि जरा गमतीदार अनुभव समोर येतो. ‘नीरूचा फोन’ ही गोष्ट शाळेच्या पिकनिकला ताईचा आयफोन घेऊन गेलेल्या आणि तो हरवलेल्या नीरूची आहे, पण लेखक चतुराईने, हळुवारपणे ताई व तिचा मित्र यांना कथेत जागा करून देतो, त्यामुळे मग त्या कथेला एक नवाच रंग मिळतो.

ज्या आडनिड्या वयाच्या मुलांच्या या कथा आहेत त्या मुलांचं विश्व उभं करताना त्यातले बारकावे लेखकाने फार नजाकतीने दाखवले आहेत. इयरफोनमधील मुलाला ‘किल्ला वाटणारी मिल’, बाबांच्या आकस्मिक निधनानंतर आईला सतत वाटणार्‍या काळजीचा विचार करणारा रोहित, बाबांनी जॉब सोडलाय म्हणून शाळेच्या वन डे पिकनिकला न जाणारा चिक्या, मोठ्या रिसेसमध्ये पुस्तकं वाचत बसणारा श्याम अशा व्यक्तिरेखा लेखकाने प्रभावीपणे चितारल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कथा कुमारवयातल्या मुला-मुलींसाठी लिहिलेल्या आहेत, पण त्या साचेबद्ध ‘बोधकथा’ नाहीत. या कथांमधून सार, बोध, सारांश काढायची गरज नाही. उपदेशाचा सूर न लावताही गोष्टीतल्या व्यक्तिरेखांच्या वागण्यातून, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीतून आणि त्यांच्या सवयींमधून इनडायरेक्ट पद्धतीने लेखक जे सांगतो ते अधिक परिणामकारक ठरणारं असतं. ज्या ‘वयम्’मधून यातील बहुसंख्य कथा प्रसिद्ध झाल्या होत्या, त्याच मासिकाच्या संपादिका शुभदा चौकर यांनी पुस्तकाच्या ब्लर्बवर ‘या कथा आजच्या समाजाला या मुलांच्या विलक्षण विश्वाकडे बघण्याचा जरा समंजस दृष्टिकोन देतील’ असं म्हटलं आहे ते अगदी यथार्थ आहे. गणेश मतकरींसारखा आजचा आघाडीचा कथाकार कुमार वयोगटासाठी त्यांना आपल्या वाटतील अशा कथा लिहितो आहे ही एकूणच मराठीच्या भविष्यासाठी आशादायक गोष्ट आहे. गणेश मतकरींनी या पद्धतीच्या कथा सातत्याने लिहून नव्या पिढीला मराठी साहित्याशी जोडण्याचं काम सुरू ठेवावं. त्यात वाचकांचं आणि मराठी साहित्याचं असं दोघांचं भलं आहे.

इयरफोन्स, गणेश मतकरी,

रोहन प्रकाशन,

पाने- १६०, किंमत- १६० रुपये.

makarandvj@gmail.com