प्रफुल्ल शिलेदार
विंदा करंदीकरांनी आपल्या ज्ञानपीठ पुरस्कारातील रकमेचा मोठा भाग साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाला देऊन मराठीतील उत्तम भाषांतरित ग्रंथासाठी पुरस्काराची तरतूद केली. त्यातून २००७ सालापासून दरवर्षी विंदांच्या जन्मदिनी (२३ ऑगस्ट) ‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर उत्कृष्ट अनुवाद’ पुरस्कार जाहीर केला जातो. यानिमित्ताने मराठीतील भाषांतराच्या व्यवहारावर दृष्टिक्षेप. त्याचबरोबर मुबलक अनुवादित साहित्य मराठीत येत असले, तरी मराठी साहित्य जगाच्या पटलावर हवे तितके का पोहचत नाही, त्याचे चिंतन…
या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या ‘बंगलोर पोएट्री फेस्टिवल’मध्ये दोन दिवसांत केवळ कन्नड, मल्याळम, बंगाली नव्हे तर संथाली, बोडो, सुत्सा अशा सोळा भारतीय भाषांमधील कविता ऐकून कान सुखावले असतानाच, ‘आटागलाटा’ या पुस्तकांच्या दुकानात ‘हायफन’चा ताजा आणि मुहूर्ताचा अंक हाती पडला. अंक चाळत असतानाच बर्याच दिवसांपासून मनात सुरू असलेल्या विचारांना एक मूर्त रूप मिळाले असे वाटले. ‘हायफन’च्या संपादकीयात विवेक शानभाग यांनी आपली भूमिका मांडताना लिहिले आहे की, ‘‘आजच्या काळात भारतीय भाषांमधील थेट अनुवाद दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालले असताना आपल्या शेजारच्या भाषांमधील साहित्य वाचण्यासाठी इंग्रजी भाषा ही अपरिहार्य होत चालली आहे.’’जागतिक साहित्याच्या चर्चेत भारतीय साहित्याला हक्काची जागा मिळण्यासाठी भाषांच्या सीमा ओलांडून सगळ्यांपर्यंत पोहोचू शकेल आणि सहज दिसू शकेल अशी परिसंस्था तयार व्हावी या हेतूने हा उपक्रम त्यांनी सुरू केलाय. विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे या अंकात मराठी साहित्यावर विशेष विभाग केलाय. ‘हायफन’चा पुढील प्रवास संपूर्णपणे भारतीय साहित्याला वाहिलेले मुद्रित स्वरूपतील इंग्रजी षण्मासिक, इंग्रजीतील संकेतस्थळ आणि प्रकाशन गृह अशा मार्गाने होईल. अशाच प्रकारचा आणखी एक पुढाकार काही भारतीय कवींनी भारतीय कवितेला केंद्रस्थानी ठेवून ‘कविता इंडिया’ या नावाने घेतलाय. भारतीय कवितेला वाहिलेले एक त्रैमासिक ऑनलाइन नियतकालिक, भारतीय कवितेचा अभिलेखवजा संग्रह आणि वार्षिक मुद्रित ग्रंथ अशा प्रकारे हा उपक्रम चालेल. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यात बोलीभाषांसह भारतीय भाषांमधील कविता मूळ भाषेत आणि मूळ लिपित देऊन सोबत प्रत्येक कवितेचे इंग्रजी अनुवाद दिले जातील. शक्य तिथे दृक्-श्राव्य जोड दिलेली असेल. भारतीय कवितेचं एक विश्वासार्ह चित्र त्यातून जगापुढे उभे करण्याचा तो प्रयत्न असेल.
अगदी अलीकडच्या या दोन्ही उपक्रमातून हे दिसून येते की, भारतीय साहित्याकरता मध्यस्त भाषेची जागा इंग्रजीने बेमालूमपणे पटकावली. ही मध्यस्ती केवळ देशाबाहेरील भाषांकरता नसून ती तेवढ्याच प्रकर्षाने देशी भाषांकरतादेखील आहे हे लक्षात घेणे गरजेचे. प्रत्येक भाषेत फार मोठे संचित दडलेय आणि सोबतच नवे लेखन होतेय. स्वातंत्र्यानंतरच्या काळात जी अपेक्षा हिंदीकडून ठेवली गेली होती आणि त्यातून हिंदीचा प्रचार-प्रसार ज्या जोमाने सुरू झाला; ती अपेक्षा नंतरच्या काळात पूर्ण झालेली दिसून येत नाही. दक्षिणेतल्या आणि पूर्वेकडच्या राज्यांनी हिंदी कधी स्वीकारली नाही. त्यांनी संपर्क भाषेचं स्थान इंग्रजी भाषेला दिलं. यामुळे या भागात इंग्रजीचा वावर वाढला, रुळला आणि रुजला. याची एक परिणती म्हणून तिथे अनेक लेखक इंग्रजीत किंवा दोन्ही भाषांमध्ये उत्तम लिहू लागले आणि तेम्सुला आओ किंवा के. सच्चिदानंदन यांच्यासारखे अनेक अस्सल देशी इंग्रजी लेखक तयार झाले. सोबतच या भाषांच्या परिसंस्थेत इंग्रजी जाणणारे चांगले अनुवादकही तयार झाले. याचाच परिणाम म्हणून या प्रांतातल्या स्थानिक लेखनाचे लगेच इंग्रजी अनुवाद होऊ लागले आणि ते साहित्य त्या भाषेच्या सीमा ओलांडून सहजगत्या पलीकडे पोहोचू लागले. याची दुसरी बाजू अशीही आहे की या भाषेतील लेखकांचे लगेच उत्तम अनुवाद होत असल्याने तिथल्या पेरूमल मुरुगन, बेन्यामीन यांच्यासारख्या देशी भाषेतील लेखकांना इंग्रजीत लिहिण्याची निकडही भासली नाही, ते आपल्या भाषेत लिहूनही आपल्या भाषेच्या सीमा ओलांडत राहिले.
मूळ लेखन आणि एकूण भाषा व्यवहार हा त्या त्या भाषेत सुदृढपणे व्हायला हवा यात दुमत नाही. लेखकाची नाळ आपल्या मातीशी जोडलेली असते, आपल्या भाषिक परंपरेचे संस्कार त्याच्यावर झालेले असतात. सोबतच इतर भाषांमधल्या साहित्याचे संस्कारही लेखक पचवत असतो. भारतीय लेखकाने आपल्या लेखनासाठी आपली मातृभाषा, इंग्रजी किंवा इतर कुठली भाषा निवडावी हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. मात्र भाषावार उत्तम आणि समर्थ अनुवादकांची फळी प्रत्येक भाषेत उभी राहणे अत्यंत गरजेचे आहे. मराठीपुरते बोलायचे झाल्यास मूळ लेखनव्यवहारासोबतच आपल्या भाषेतील अनुवादव्यवहारही तेवढाच महत्त्वाचा आहे याची जाणीव आपल्याला पुरेशी झालेली दिसत नाही.
आजच्या घडीला ‘मायमावशी’, ‘केल्याने भाषांतर’ या दोन अनुवादाला वाहिलेल्या मराठी नियतकालिकांत, तसेच काही वार्षिकांमध्ये गांभीर्याने अनुवाद होतो. उर्वरित भारंभार-वेगाने चालणार्या उद्योगी अनुवादांच्या पीकांबाबत न बोललेलेच बरे. अभिजात कलाकृती मराठीत वाचून आपल्याला किती समाधान मिळते? ‘युलिसीस’, ‘डब्लिनर्स’ या जेम्स जॉईसच्या कलाकृती अथवा अनेक महत्त्वाच्या ‘क्लासिक्स’ कादंबर्या आपल्याला मराठीत सापडणारच नाहीत. जपानी, दक्षिण अमेरिकी तसेच युरोपातील कित्येक परभाषिक समकालीन लेखकांना वाचण्यासाठी इंग्रजी अनुवादाखेरीज पर्याय नाही. आपल्याला त्यांची नावे महिती असतात. पण मराठीत त्यांची पुस्तके मिळणार नाहीत. याउलट हिंदीत तुम्हाला जगभरच्या भाषांतील अभिजात आणि समांतर कलाकृती अनुवादित झालेल्या दिसतील. (स्वैर किंवा भावानुवाद-रुपांतर नाही) विशेषत: दक्षिण भारतीय भाषांमध्ये कथात्मक आणि अकथनात्मक साहित्याचा अनुवाद करण्याबाबत पुढाकार घेतला जातो.
आपल्यापुढे दोन भारतीय भाषांमध्ये असलेली दरी ओलांडण्याचे फार कमी पर्याय उपलब्ध आहेत. एक तर दोन भाषांमध्ये थेट अनुवाद व्हायला हवेत. त्याकरता प्रत्येकच भाषेत विविध भाषा जाणणारे वेगवेगळे भाषाविशिष्ट अनुवादक हवेत. आजही मराठी भाषेत कानडी, गुजराती, हिंदी, इंग्रजी, बंगाली, कोकणी अशा मोजक्याच भाषांमध्ये अनुवाद करणारे भाषांतरकार काम करीत आहेत. मात्र तमिळ, ओडिया, बोडो किंवा पंजाबीत अनुवाद करणारे दुर्मीळच आहेत. आपल्या देशात इतरही अनेक भाषा बोलल्या जातात. गेल्या जनगणनेत तर भारतीय लोकांनी सुमारे एकोणीस हजारांहून अधिक मातृभाषांची नोंद करून ठेवलेली आहे. आठव्या शेड्युलच्या बाहेर असलेल्या तुळू, अहिराणी, भोजपुरी, गोंडी, हो, भिली, वागडी अशा अनेक भाषा बोलणारे लाखो लोक आहेत. मोठ्या आणि मान्यताप्राप्त असलेल्या भाषा आपल्या जिवंत झर्यांसारख्या असणार्या बोलींची पुरेशी काळजी घेताना दिसत नसल्यामुळे हे झरे आटण्याच्या मार्गावर आहेत. या भाषांपर्यंत इतर भाषिकांनी जाण्याचे कुठलेच मार्ग आज तरी दृष्टीपथात नाहीत त्यामुळे मर्यादित प्रमाणात का होईना, पण काही प्रयत्न सुरू झाले तरी ते महत्त्वाचेच असतील. भारतीय भाषानिहाय अनुवादकांची वानवा असल्याने इंग्रजी आणि काही प्रमाणात हिंदी अनुवादाकडे ओढा वाढला आहे. मात्र जबाबदारीने उत्तम अनुवाद करणार्यांची मोठी फळी तयार करण्याची कुठलीही व्यवस्था आपल्याकडे तयार केलेली नाही.
प्रत्येक भाषिक समूहाचे जग हे स्वायत्त असले तरीही स्थलांतरे, व्यापार, राजकीय-सांस्कृतिक कारणे अशा अनेक गोष्टींमुळे दोन भाषांमध्ये संवाद होणे अपरिहार्य असते. भाषांतरकार दोन भाषांमध्ये देवाणघेवाण घडवून आणून आपल्या भाषेला दुहेरी उपकृत करत असतात. भाषांतरामुळे एका अंगाने आपली भाषा अधिक सुदृढ होते, तर दुसर्या अंगाने आपल्या भाषेची भौगोलिक आणि सांस्कृतिक व्याप्ती वाढते. भाषांतराचा विचार हा फक्त भाषेच्या आणि संस्कृतीच्या अंगाने होत नाही, तर भाषांतराचे राजकीय आणि सामाजिक अंगदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. भाषा आणि सत्ता यांचा जवळचा संबंध असतो. सत्ता ही भाषेतून राबविली जाते. सत्तेला अधिक प्रभावशाली होण्यासाठी भाषा एखाद्या शस्त्रासारखी किंवा उपकरणासारखी वापरावी लागते. पुढे यातूनच भाषेचीही सत्ता तयार होते. ही सत्ता नकळतपणे कार्यरत असते. वेगवेगळ्या भाषांदरम्यान जे ताण निर्माण होत असतात, ते भाषिक सत्तेच्या असुंतलित आंतरसंबंधामुळे निर्माण झालेले असतात. लेखक-कवींना भाषेच्या या सत्तेशीही झुंजावं लागतं. लेखक भाषेचे स्थिरावू पाहणारे रूपबंध सातत्याने तोडत असतो आणि नवे घडवत असतो. एका प्रकारे तो भाषेची गतिकी सांभाळत असतो आणि अनुवादक दोन भाषांमधील तोल सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न आपल्या परीने करत असतो.
आंतरभारतीसारख्या काही स्वयंसेवी संस्था आणि काही विद्यापीठे अनुवादाबाबत काही व्यवस्था निर्माण व्हावी असा प्रयत्न करीत आहेत. शासकीय स्तरावर अनुवाद अकादमीबाबत अनेकदा हूल उठवण्यात येते मात्र प्रत्यक्षात काही घडलेले दिसत नाही. निवडक साहित्याचे इंग्रजी अनुवाद काही जाणकार अनुवादक स्वतंत्रपणे आपल्या विवेकबुद्धीने करत असतात त्यामुळे ते इंग्रजी वाचकांपर्यंत पोचते.
काही परिघांवरचे, पण महत्त्वाचे मुद्देही आहेत. आपल्याकडे वाचनालयांची साखळी दिवसेंदिवस क्षीण होत चालली आहे. तेथील कर्मचार्यांना पुरेसे पगार नसतात. नव्या किंवा जुन्या पिढीने उत्सुकतेने तिथे जावे, पुस्तके घ्यावी आणि वाचावी असे वातावरण आपल्या वाचनालयांमध्ये कसे निर्माण होईल? काही अल्पकालीन प्रयत्न वगळता मराठी नियतकालिके कशीबशीच निघत आहेत. तगून राहण्याकरता त्यांच्यासाठी स्थायी स्वरुपाची कुठलीही योजना नाही. मराठी पुस्तकांची दुकाने हळूहळू अस्तंगत होत आहेत, मात्र प्रदर्शनांमध्ये, संमेलनांमध्ये पुस्तके मोठ्या प्रमाणात विकली जातात हे पाहिल्यास नेमके कुठे चुकत आहे ते लक्षात यायला हवे. पुस्तकांची दुकाने आता बहुभाषिक होणे गरजेचे आहे. तिथे फक्त चाळण्यासाठी आलेल्यांना आडकाठी न ठेवणे, तरुणांना रेंगाळू देणे, लहान मुलांना पुस्तके हाताळू देणे, प्रकाशने- वाचन-सादरीकरण अशा छोट्या-छोट्या कार्यक्रमाकरता पुरेशी अद्ययावत जागा उपलब्ध असणे, अशा गोष्टींमधून आर्थिकदृष्ट्या सक्षम पुस्तकांचे दुकान शक्य आहे. आपल्या भाषेत वाचक कमी झालेले नाहीत, मात्र येणार्या पिढीतील तरुण, नव्या वाचकांचे भाषिक स्थलांतर होत आहे, त्यामागची कारणे जाणून उपाय करणे गरजेचे आहे. लहानपणीच हातात योग्य ती मराठी पुस्तके पोहोचली तर यावरही काही उपाय दिसू शकेल. मराठी पालकांनी ‘तोत्तोचान’सोबतच ‘वाचू आनंदे’ मुलांच्या हातात दिले तर मराठीशी नाळ जुळणे सोपे होईल.
आज २३ ऑगस्ट हा विंदा करंदीकरांचा जन्मदिवस. विंदांनी २००३ मध्ये मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्कारातील मोठी रक्कम साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टकडे सुपूर्द करून त्या रकमेतून बाळशास्त्री जांभेकरांच्या नावे उत्कृष्ट अनुवादाकरता पुरस्कार सुरू करण्याची सूचना केली आणि एक चांगला पायंडा घालून दिला. त्रिचनापल्लीच्या तुरुंगात असताना १९३० साली साने गुरुजींनी आंतरभारतीचा विचार मांडला होता. दोन भाषांमध्ये सौहार्द निर्माण करण्यासाठी संस्थात्मक प्रयत्न करण्याची निकड त्यांना जाणवली होती. लोक आपल्या भाषेशिवाय इतर भाषांशीच नव्हे तर आपल्या निकटच्या बोलींशीदेखील फारसे परिचित नसतात याची त्यांना खंत वाटत असे. भारतासारख्या बहुभाषिक देशात माणसे जोडण्यासाठी प्रत्येकाने आपल्या भाषेव्यतिरिक्त किमान एक भाषा, त्या भाषेची परंपरा नीट जाणून घेतली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. आपल्या भाषिक विणीला राजकीय आणि धार्मिक कारणांनी हिसके बसत असताना दोन भाषांमध्ये मजबूत पूल बांधत राहणे आवश्यक आहे. साने गुरुजींच्या या आंतरभारतीच्या स्वप्नाला लवकरच शंभर वर्षे पूर्ण होतील. मात्र, ते दूरच राहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी अनेक अंगाने खूप प्रयत्न होणे गरजेचे आहे.
थोडक्यात इतिहास…
लहान मुलांसाठी-तरुणांसाठी हितोपदेश सांगणारी पुस्तके १८५०पासून भाषांतर होत होती. अर्नो बेरकँ ( अ१ल्लं४ि इी१०४्रल्ल) यांच्या मूळ फ्रेंच ग्रंथावरून इंग्रजीत अवतरलेल्या ‘द लुकिंग ग्लास फॉर द माईंड’ ग्रंथाचा ‘बाळमित्र’ नावाने १८५७ च्या बर्याच आधी अनुवाद झालेला. त्याच्या तीन आवृत्त्या मराठीत त्या काळात झालेल्या. स्वातंत्र्यपूर्व काळापासून इंग्रजीबरोबर बंगाली भाषेतील कथा-कादंबर्यांचे मुबलक अनुवाद झाले. स्वांतंत्र्योत्तर काळात हिंदी पट्ट्यातील लेखकांची पुस्तके येऊ लागली. ‘नॅशनल बुक ट्रस्ट’तर्फे राज्याराज्यांतील कथांचे अनुवाद व्हायला लागले. ‘युसिस’तर्फे चांगल्या अमेरिकी साहित्याचे भाषांतर पाडगावकर, खानोलकर,
श्री. ना. पेंडसे, दुर्गा भागवत, कमला फडके आणि त्या काळातील महत्त्वाच्या साहित्यिकांनी केले. साठ-सत्तरच्या दशकांत ‘लोलिता’, ‘मोबी डिक’ यांसारख्या अभिजात कलाकृतींपासून ‘ॲलिस इन वण्डरलॅण्ड’, ‘सायको’, ‘टारझन’, ‘शेरलॉक होम्स’, ‘जेम्स बॉण्ड मालिका’ या बेस्ट सेलर्स पुस्तकांचे मराठीत अनुवाद झाले. ते पुढे फक्त वाचनालयांनी जतन केले. वाचकांनी थोड्याच अनुवादांना गाजवले. नव्वदीनंतर तातडीने अनुवाद भरपूर होतायत. बुकर-पुलित्झर पारितोषिकप्राप्त पुस्तकेदेखील. पण लक्षात खूपच कमी राहतात.
मराठीचे भले होईल काय?
आपल्या भाषेतील श्रेष्ठ वाङ्मय जगभरातील भाषांमध्ये पोहोचवण्यासाठी जगातील अनेक देश पुढाकार घेत असतात. ज्येष्ठ हिंदी साहित्यिक विष्णू खरे यांनी फिनिश राष्ट्रीय महाकाव्य ‘कालेवाला’चा अनुवाद फिनलंडमध्ये राहून आणि ‘कालेविपोएग’ या एस्टोनियन महाकाव्याचा हिंदी अनुवाद एस्टोनियामध्ये त्या देशाच्या निवासवृत्तीअंतर्गत काही महिने राहून केला. आपल्याच देशातील उदाहरण घ्यायचे झाल्यास, तामिळनाडू सरकार श्रेष्ठ तामिळ साहित्याच्या अनुवादाकरता अनुदान देऊन प्रयत्न करीत असते. आपल्याला जर तुकोबांची गाथा आणि ज्ञानोबांची भावार्थदीपिका जगभरातल्या भाषांमध्ये जावी असे वाटत असेल, श्रेष्ठ अथवा चांगले ताजे मराठी लेखन जगभरातल्या वाचकांपर्यंत पोहोचावे असे वाटत असेल तर व्यापक दृष्टीने ठोस पावले उचलावी लागतील. शासकीय पातळीवर केवळ एखाद्या संमेलनावर कोट्यवधी रुपये उधळून मराठी भाषेचे काहीही भले होणार नाही.
पूर्वापारची उदासीनता…
अनुवाद किंवा भाषांतर यांविषयी पूर्वापारपासून आपण उदासीन राहिलोत. जगभरातील साहित्य आपल्यापर्यंत झिरपले, तरी आपल्या भाषेतले साहित्य इतरत्र पोहोचविण्याची अनास्था प्रकर्षाने जाणवते. गेल्या दोन दशकांतच काय, त्या आधीच्या दशकांत तरी मराठी पुस्तकांनी आंतरराष्ट्रीय साहित्यविश्वात चमकण्याची कामगिरी कितपत केली, हा प्रश्न चांगली उत्तरे आपल्याला देत नाही. बरे फक्त मराठी इतर भाषेत पोहोचवण्याच्या दृष्टीनेच आपण सजग नाही, तर देशातील इतर भाषिक साहित्य आणि लेखकांविषयी आपल्याला फारशी माहिती नसते. इंग्रजीतून अनुवाद होऊन जगभर गाजल्यानंतर ते आपल्याला माहिती होतात. कित्येक दशके मराठीत अनुवादाचे ‘स्वैर’, ‘रुपांतर’, ‘भावानुवाद’, ‘संक्षिप्त’ असले प्रकार स्वीकारले गेले. अजूनही त्यात खंड पडलेला नाही. नोकरीतील निवृत्तीनंतर साहित्यसाधनेत स्वत:ला वाहून घेण्याचे ठरविणार्या हौशा-नवशांमुळे ग्रंथांचा सदोष अनुवाद आपल्याकडे पाहायला मिळतो. यातून मूळ कलाकृतीविषयी आस्था निर्माण व्हावे, असे काही घडत नाही.
आपण नक्की कुठे?
‘इंटरनॅशन बुकर’ पारितोषिक मिळाल्यानंतर हिंदी लेखिका गीतांजली श्री, कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांचे कथनात्मक साहित्य जागतिक पटलावर आले. त्यामुळे गेल्या चार-पाच वर्षांत प्रादेशिक लेखकांची पुस्तके इंग्रजीत अधिकाधिक भाषांतरीत होतायत. बडे प्रकाशक नव्याने समकाळातील भाषिक कलाकृतींचा माग घेतायत. आदराने नाव घेतल्या जाणार्या जी. ए. कुलकर्णी, भालचंद्र नेमाडे, विलास सारंग, किरण नगरकर, दया पवार यांच्या पुस्तकांचे इंग्रजी अनुवाद झालेत. पण या कलाकृती आंतरराष्ट्रीय पातळीवर जितक्या पोहोचायला हव्या, तितक्या जाऊ शकल्या नाहीत. समकाळातील साहित्य तातडीने आपण आंतरराष्ट्रीय बाजारात नेऊ शकलो, त्यासाठी अनुवादाची चांगली यंत्रणा उभारू शकलो तरच मराठी साहित्य खर्या अर्थाने ‘ग्लोबल’ होईल.
इतरांनी काय केले?
इंग्रजीचा सेतू शोधणे ही नंतरची बाब. गुणवत्तेचा माग ही पहिली पायरी. फ्रान्समध्ये हयातभर आपल्या भाषेत लिहिणारा मार्सेल प्रूस्त इंग्रजीतील अनुवादानंतर जगभर पोहोचला. पण त्याच्या लेखनाची महत्ता ओळखणार्यांनी त्याला फ्रान्सपुरता मर्यादित ठेवला नाही. जपानी लेखक हारुकी मुराकामी हा तिथे इंग्रजीतील अभिजात कादंबर्यांचा अनुवादक म्हणून ओळखला जातो. इतर जगाला मात्र तो त्याच्या कादंबर्यांसाठीच माहीत. १९८०-९० च्या दशकात ‘कोडांशा इंटरनॅशनल’ या तिथल्या प्रकाशन संस्थेने मुराकामीला आंतराष्ट्रीय पातळीवर वाचक मिळवून देण्यासाठी दशकभर कसे काम केले, यावर एक ग्रंथ उपलब्ध आहे. दक्षिण कोरियाने आपले साहित्य इंग्रजीत जावे यासाठी शासकीय पातळीवर यंत्रणा उभारली. तिच्या २० वर्षांच्या मेहनतीची फळे स्पष्ट दिसतायत. अनेक देशांत आंतरभाषिक कार्य करणार्या संस्था ‘ट्रान्सलेशन लॅब’ आयोजित करतात. यात देशातील किंवा देशाबाहेरील अनुवादक आणि लेखक एकत्र येऊन मजकूर निर्दोष होण्यासाठी, तसेच तो नेमका आणि परिपूर्ण होण्यासाठी चर्चा करून अंतिम खर्डा तयार करतात.
वर्षभरातील निवडक पाच…
मराठीत वर्षभरात आलेल्या उत्तम अनुवादित पुस्तकास २००७ सालापासून ‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर उत्कृष्ट अनुवाद’ पुरस्काराने गौरविले जाते. ‘आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र आणि साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या पुढाकाराने या उपक्रमात गांभीर्याने पुस्तकांची निवड होते. यंदा पहिल्यांदाच या पुरस्कारासाठी निवडलेल्या पुस्तकांची लघुयादी महिनाभरापूर्वी जाहीर करण्यात आली. यांतील पुरस्कार विजेते पुस्तक आज (२३ ऑगस्ट) ठरेल.
shiledarprafull@gmail.com
