‘लोकरंग’मधील (२३ ऑगस्ट) प्रफुल्ल शिलेदार यांचा ‘भाषांतराचे रहाटगाडगे’ हा लेख वाचला. जगभरातील बहुसंख्य देश आपापल्या भाषेतील श्रेष्ठ वाङ्मय अन्य देशांत पोहोचविण्यासाठी पुढाकार घेत असल्याने, त्यांचे मुबलक अनुवादित साहित्य मराठीत येत असतं. आपण अनुवादाबाबत पूर्वीपासूनच उदासीन असल्याने मराठीतील साहित्य मात्र जगाच्या पटलावर येत नाही. ज्ञानोबांची ‘भावार्थदीपिका’ आणि तुकोबांची ‘गाथा’ हे उत्तम वाङ्मय जगभरात जाणे आवश्यक असता ते जात नाही, ही मराठी साहित्य क्षेत्राची शोकांतिकाच नव्हे का? आपले श्रेष्ठ दर्जाचे मराठी साहित्य जगभरातल्या वाचकांपर्यंत पोहोचावे असे मनोमन वाटत असेल तर महाराष्ट्र मराठी साहित्य मंडळाने व्यापक स्वरूपात ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
– बेन्जामिन केदारकर, विरार
उत्तम साहित्य अनुवादित व्हावे
‘लोकरंग’मधील (२३ ऑगस्ट) प्रफुल्ल शिलेदार यांचा ‘भाषांतराचे रहाटगाडगे’ हा लेख मराठी साहित्यातील भाषांतराच्या परिस्थितीकडे लक्ष वेधतो. इतर भाषांमधील चांगले साहित्य मराठीत भाषांतरित करण्याचे काम अजूनही पुरेशा प्रमाणात होत नाही. यामागे एक मोठे कारण म्हणजे भाषांतरासाठी ठोस व्यवस्था नसणे. काही देशांमध्ये भाषांतरासाठी सरकारी मदत, अनुदाने आणि स्वतंत्र संस्था आहेत. मराठीत मात्र हे काम अजूनही प्रामुख्याने काही व्यक्तींच्या आवडी आणि प्रयत्नांवर चालते. दुसरी अडचण म्हणजे अनेक भाषांमधून थेट मराठीत भाषांतर करणारे लोक कमी आहेत. त्यामुळे इतर भारतीय भाषांमधील साहित्यही अनेकदा इंग्रजीच्या माध्यमातून मराठीत येते. यात मूळ भाषेतील काही बारकावे हरवू शकतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी तरुण भाषांतरकारांना प्रशिक्षण आणि योग्य मोबदला मिळायला हवा. भाषांतरासाठी स्वतंत्र संस्था, अनुदाने आणि चांगल्या योजना सुरू झाल्या पाहिजेत. वाचकांमध्येही भाषांतरित पुस्तकांविषयी आवड निर्माण करणे गरजेचे आहे. साने गुरुजींचे ‘आंतरभारती’चे स्वप्न भाषांमधून माणसांना आणि संस्कृतींना जोडण्याचे होते. आज त्या विचाराची पुन्हा गरज आहे. चांगल्या भाषांतरातून मराठी जगाशी आणि भारतातील इतर भाषांशी अधिक जवळून जोडली जाऊ शकते.
– फ्रँक मिरांडा, उमराळे (वसई)
महत्त्वाच्या विषयावर चिंतन
‘लोकरंग’मधील (२३ ऑगस्ट) प्रफुल्ल शिलेदार लिखित ‘भाषांतराचे रहाटगाडगे’ या लेखात त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या विषयाला हात घातलेला आहे. मुळात आपल्या समाजात पुस्तक विकत घेऊन वाचावे ही संकल्पनाच रुजलेली नाही. लेखक अत्यंत परिश्रमपूर्वक पुस्तक लिहितो, त्यामागे त्याची एकमेव मूलभूत इच्छा असते, ती म्हणजे ते वाचकांपर्यंत पोहोचावे आणि वाचकांनी ते वाचावे. प्राथमिक स्तरावर पुस्तक लिहिल्यानंतर ते किमान वाचकांपर्यंत तरी पोहोचले पाहिजे याकरिता आपल्याकडे काही भरघोस प्रमाणावर प्रयत्न लेखक किंवा प्रकाशकांकडून झालेले माझ्या तरी पाहण्यात नाहीत. उदाहरणार्थ, परदेशात जेव्हा एखादे पुस्तक प्रकाशित होते तेव्हा लेखकाच्या सहीची फर्स्ट एडिशन मिळवण्यासाठी रांगा लागतात आणि मग फर्स्ट एडिशन हातोहात खपली, बुक बेस्ट सेलर ठरले वगैरे प्रचार एवढ्या जोरदार प्रमाणावर केला जातो की वाचक दुसर्या एडिशनसाठी ॲडव्हान्स बुकिंग वगैरे करतात. याचाच एक पैलू म्हणजे त्या पुस्तकाच्या भाषांतरासाठी मग आपोआपच जागतिक स्तरावर मागणी केली जाते. आपल्याकउे प्रमोशनचे हे फंडे अंगीकारलेले आजपर्यंत तरी आढळून आलेले नाहीत. पुस्तक परीक्षण, पुस्तकांच्या दुकानांत प्रदर्शन, कुठे तरी त्यावर एखादे प्रचारकी व्याख्यान वगैरे हे सारं जुनं झालं. अलीकडे समाजमाध्यमांवर पॉडकास्ट वगैरे प्रकार सुरू झालेत तरीही आजही पुस्तकाचा प्रचार हा मुख्यत्वे करून वृत्तपत्रीय पुस्तक परीक्षणापुरताच मर्यादित राहिलेला आहे.
– ॲड. एम. आर. सबनीस, मुंबई</strong>
अनुवादकांना सवलत द्यावी
‘लोकरंग’मधील (२३ ऑगस्ट) प्रफुल्ल शिलेदार यांचा ‘भाषांतराचे रहाटगाडगे’ हा लेख वाचला. ३० सप्टेंबर या अनुवाद दिनानिमित्ताने महाराष्ट्र सरकारने अनुवादकांना पुरस्कार देण्यास सुरुवात करावी. अनुवादाच्या माध्यमांतून भाषा नुसत्या जवळ येत नाहीत तर प्रांतांची संस्कृती समृद्ध करतात. भारतात अनेक भाषा आहेत त्यांच्या साहित्यांचा अनुवाद फक्त इंग्रजीत न होता थेट आपापसात व्हायला हवा. डॉ. उमा कुळकर्णी यांनी कन्नड लेखकांची ओळख मराठी वाचकांना करून दिली होती, तशी ओळख आपल्या लेखकांची अनुवाद माध्यमांतून व्हायला हवी. हल्ली प्रसिद्ध पुस्तकांचे अनुवादक कोण हेही बघितले जाते. कधी कधी अनुवादित पुस्तके ही जणू काही त्यांनीच लिहिली आहेत असे उत्कृष्ट भाषांतर केलेले असते. काही सुमार अनुवादक चांगल्या साहित्याची वाट लावणारेही असतात. दर्जेदार मराठी साहित्य जगभरात पोहोचवायचे असेल तर अनुवादकांना प्रकाशकांनी सवलत देऊन प्रोत्साहन द्यायला हवे. तसेच सरकारने आर्थिक साहाय्य देऊन संतांचे साहित्य सगळ्या भाषांत अनुवादित करून जगभर प्रसिद्ध केले पाहिजे.
– श्रीनिवास स. डोंगरे, दादर, मुंबई
मुलांना प्रोत्साहन देणारं सदर
‘लोकरंग’मधील (२३ ऑगस्ट) ‘बालमैफल’ मध्ये श्रीनिवास बाळकृष्ण यांचा ‘तुला वाटेल ते काढ’ या सदरातील ‘जुना सीव्ही नवी नोकरी’ हा लेख अतिशय सुंदर आहे. त्यातला ‘कलाकाराची खरी कमाल सुंदर वस्तू बनवण्यात नाही, तर जगाने ज्याला ‘संपलं’ म्हटलं त्यात अजून काही बाकी आहे, असं शोधून काढण्यात आहे’ हा विचार तर प्रचंड सकारात्मक आहे. हे सदर मी नेहमी आवर्जून वाचते. त्यांची भाषा सोपी आणि प्रवाही असल्यामुळे ते मुलांशी संवाद साधतायत असं वाटतं. विशिष्ट चौकटी बाहेरचा विचार करणं, वेगवेगळ्या शक्यता आजमावून पाहणं, प्रयोग करणं हे सगळंच, विशेषत: मुलांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असतं. या वयात त्यांना असा मोकळा विचार करण्याची शक्यता दाखवल्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व घडण्यात नक्कीच मदत होऊ शकते. या सदरातले विचार वेगळे आहेत, सर्वसामान्यपणे पालक, शिक्षक यांना कदाचित या विचारांना सामोरं जाणं कठीण जाऊ शकतं हे लक्षात घेऊन या सदरात शिक्षक आणि पालकांसाठी जो छोटासा विचार लेखक देतात त्यामुळे त्यांनाही लेखातल्या नव्या विचाराला कसं सामोरं जायचं याची एक दिशा मिळते.
नवनवीन गोष्टी करण्यासाठी मुलांना प्रोत्साहन देणं, आपणही ते करून पाहणं, नव्या विचारांकडे मोकळेपणानं बघणं, ते आत्मसात करणं आणि आपले अनुभव लेखकांशी शेअर करणं हा वाचक म्हणून आपला सहभाग असायला हवा असं वाटतं!
– अंजली कुलकर्णी शेवडे, ठाणे</strong>
