आदले । आत्ताचे : नातेगुंत्याची उकल..

‘सावित्री’मुळे पुढे चर्चेत राहिलेल्या रेगे यांच्या या कादंबरीला तत्कालीन समाजाने फारसे स्वीकारल्याचे दिसत नाही.

marathi novel matruka
पु.शि. रेगे यांची शेवटची कादंबरी ‘मातृका’

किरण येले

पु.शि. रेगे यांची शेवटची कादंबरी ‘मातृका’ ही काळापुढलं लेखन होती. आपल्यापेक्षा वयानं मोठय़ा असलेल्या व्यक्तीवरचं प्रेम हा तिचा संघर्षबिन्दू आहे; पण तो अत्यंत नीरवतेने येतो. शरीर, मन आणि प्रेम या गुंत्याची उकल या कादंबरीत तरलतेने आणि बौद्धिक पातळीवर केली आहे. ‘सावित्री’मुळे पुढे चर्चेत राहिलेल्या रेगे यांच्या या कादंबरीला तत्कालीन समाजाने फारसे स्वीकारल्याचे दिसत नाही.

‘सृजन’ वा ‘creativity’ या घासून गुळगुळीत झालेल्या शब्दाचा अर्थ आपल्याकडे ‘जे दिसतं ते लिहिणं म्हणजे सृजन’ असा घेतला जातो. त्यामुळेच ‘जो लिहितो तो सृजनशील लेखक वा कवी’ असाही गैरसमज रूढ झाला आहे; पण जे दिसतं त्यातनं  मनातलं काही दाखवण्याचं काम मराठी साहित्यात ज्या लेखकांनी केलं त्यातलं महत्त्वाचं नाव म्हणजे पु. शि. रेगे.

सृजन म्हणजे जन्म देणं. इथे साहित्याला जन्म देणं अभिप्रेत नाही. कोणतीही कला संपल्यावर जर श्रोते वाचकाच्या मनात नव्यानं जन्म घेत असेल, अस्वस्थ करत असेल, विचार करायला भाग पाडत असेल तर ते ‘सृजन.’ असे सृजनाविष्कार चिरकाल टिकतात आणि इतर आविष्कार तात्पुरतं मनोरंजन करून विरून जातात.  रेगे यांची ‘मातृका’ ही कादंबरी या कसोटीवर आजही खरी उतरते.  १९७८ प्रकाशन वर्ष असलेल्या कादंबरीमधील काळ १९१९ च्या आसपासचा आहे. १९१० ते १९७८ हा पु. शि. रेगे यांचा जीवनकाळ. ‘मातृका’ ही त्यांची शेवटची कादंबरी. या कादंबरीचा पट पहिल्या महायुद्धापासून ते पुढे दांडीयात्रा, गोलमेज परिषद आणि पुढे या कालावधीत घडतो. कादंबरीची सुरुवातच होते, ‘मी पाचेक वर्षांचा असेन.’ या वाक्याने.

‘मातृका’ हा हिंदू धर्मातील सात देवींचा एक समूह आहे. ब्रह्मणि (ब्रह्मापासून), वैष्णवी (विष्णूपासून), माहेश्वरी (शिवापासून), कौमारी (कार्तिकेयापासून), इंद्राणि (इंद्रापासून), वराही (वराह अवतारापासून), चामुंडा (देवींपासून) ही सात आदिशक्तीची रूपं आहेत. नरसिंही हे आठवं रूप मानलं जातं. वेरूळच्या लेण्यांमध्ये आपल्याला सप्तमातृकांची शिल्पे पाहायला मिळतात. मातृकामधील मूळ शब्द माता असा आहे. ‘मातृका’ कादंबरीतील नायकाच्या आयुष्यात आई, आजी, थोरली काकू, कस्तुर, जायू, नीला देसाई, सालेहा आणि रमाकाकी अशा आठ स्त्रिया येतात. या आठही स्त्रिया त्याला काही न काही शिकवतात आणि आठवणी देतात. ही कादंबरी म्हणजे पाचव्या वर्षांपासून ते उमजते होण्याच्या वयापर्यंतचा प्रवास आहे. हा प्रवास शरीरासोबतच मनाने कळते होण्याचा प्रवास आहे. हे कळतेपण प्रेमाच्या बाबतीतलं आहे. आपल्यापेक्षा वयानं मोठय़ा असलेल्या व्यक्तीवरचं प्रेम हा या कादंबरीचा संघर्षबिन्दू आहे; पण तो अत्यंत नीरवतेने येतो. श्याम आणि रमाकाकीचा सामाजिक आणि मानसिक पातळीवर काही संघर्ष चालू आहे हे लक्षात येता येता कादंबरी संपते. लक्षात येतं की श्याम आणि रमाकाकीने एकमेकांना विचारलेले प्रश्न, लिहिलेल्या कथा, एकाने लिहिलेली कथा दुसऱ्याने पूर्ण करण्याचा प्रसंग, रमाकाकीने नायकाला जायू, नीला देसाई आणि सलेहावरून चिडवणे हे सारे मानसिक पातळीवर चाललेला संघर्ष आहे. हे नातं नेमकं काय आहे हे समजून घेण्याचा तो प्रयत्न आहे आणि सगळय़ा नात्यात एक माता आहे. तिची माया आहे- जे नायकाला हवं आहे अगदी लहानपणापासून. श्याम एका ठिकाणी म्हणतो की, माई तर जन्मदात्री आई. मुले थोडी मोठी झाली की तिची संगत त्यांना क्वचितच लाभायची. ती असायची सदा आणखी एका लहान मुलाच्या तयारीत किवा तैनातीत. हेच कारण आहे की, आईच्या प्रेमाची नायकाच्या मनात असोशी आहे. त्यामुळे आयुष्यात आलेल्या प्रत्येक स्त्रीमध्ये नायक ‘आई’ शोधत राहतो. या प्रवासात त्याच्या आयुष्यात येणारी ‘मातृका’ त्याला काही न काही शिकवून जाते.

कादंबरीच्या पाचव्याच परिच्छेदात नायक म्हणतो, रात्री थोरल्या काकीच्या शेजारी झोपायला मला आवडायचे. झोपताना ती चोळी काढून उशाला ठेवायची आणि मग मला तिच्या कुशीत सबंधच्या सबंध काकीच गावायची. स्तन हे मुलाच्या भरणपोषणाचे माध्यम आहे आणि त्यामुळेच दिवसभर समोर असूनही न गावणारी काकी रात्री चोळी काढून ठेवल्यावर गावते असे नायक म्हणतो यात ‘मातृका’ आहे. पुढे एका प्रसंगात आजीकडून त्याला एक मोठी गोष्ट शिकायला मिळते आणि ते या कादंबरीचे गेय आहे. या कादंबरीचा शेवट या प्रसंगास समांतर ठेवून पाहिल्यास शेवटी रमाकाकी आणि नायक श्याम यात घडणाऱ्या ‘मातृका’ पातळीवरील शरीरबंधाची उकल होते. नायक म्हणतो, हरेश्वरच्या देवळात आजी एखाद्या सोमवारी तांदळाची वाटी आणि नारळ घेऊन जायची. मग तिच्यासोबत हजर असतील ती मुले जायची. देवळातून ती बाहेर येईपर्यंत आम्ही मुले काही तरी खेळायचो. त्या दिवशी आमचा खेळ चालू होता, नकलांचा. मलाही कसे कळेना भलतेच अवसान आले. मी बाजूच्या पारावर चढलो आणि घराच्या मागच्या परसात शू करायला जाताना आजी पाण्याची तपेली कशी घेऊन जाते आणि शू करून झाल्यावर फतक फतक पाणी कसे मारून घेते, हे दाखवू लागलो. इतक्यात ‘शाम्या’ अशी आजीची हाक ऐकू येते आणि मुले पळतात. श्यामला वाटतं घरी आजी रागवेल; पण काही घडत नाही आणि आजीनं ते ऐकलं नसावं म्हणून श्याम नििश्चत होतो. मग एक दिवस घरी फक्त आजी आणि नायक असताना आजी विचारते, ‘‘त्या दिवशी देवळाच्या भायर काय रे, चालला होता तुझा?’’ मग निऱ्या सोडत स्वत:च्या शरीराकडे बोट करत विचारते, ‘‘ह्या काय असा?’’ श्याम म्हणतो, ‘‘आज्जीचा आंग.’’  तर आजी म्हणते, ‘‘भांडा नाय का आपण घाशीत? तसाच ह्या पण एक भांडाच.’’ नायक म्हणतो, ‘‘आजी, हे अगदी तुझ्या तोंडासारख दिसत नाय?’’ तर आजी म्हणते, ‘‘तोंडच ताय. ह्या वरचा घेऊचा आणि ह्या देऊचा.’’  शरीराचं हे निरागस विज्ञान पुढे वाचताना आपण एखादं वैश्विक सत्य कळल्यावर कुणी उजळून गेल्यासारखे होतो. पुढे नायक आजीला विचारतो, ‘‘मी याची पापी घेऊ तू माझी घेतेस तशी?’’ आजी म्हणते, ‘‘घेऊन टाक.. आता झाला ना पुता तुझा समाधान . खेळ जा भायर .. मी पडतय.’’

पु. शि. रेग्यांच्या ‘सावित्री’ कादंबरीपेक्षा त्यांची ‘मातृका’ कादंबरी मला आवडते.  ‘सावित्री’ कादंबरीमध्ये आपल्याला मोर हवा असेल तर आपणच मोर व्हायचं हे सांगितलं; पण ‘मातृका’ कादंबरीत जागोजागी प्रेम, शरीर आणि मन यांविषयी जे चिंतन येतं ते वाचताना आपल्या मनात सर्जन सुरू होतं. पुढे काका नाना यांचे लग्न होऊन आठ-दहा वर्षांनी मोठी रमाकाकी घरात येते आणि त्या दोघांत मैत्रीचं नातं जुळतं. श्याम वाचायला कथा- कादंबऱ्या आणून देऊ लागतो. त्याला जायू आवडते हे कळल्यावर रमाकाकी खटय़ाळपणे त्याला चिडवू लागते. नानांच्या चळवळीत असण्याने रमाकाकी आणि माईच्या नव्या मुलात असण्याने एकटा पडलेला श्याम दोघे मित्र होतात. पुढे ‘रिलेटिव्हिटी ऑफ लव्ह’ म्हणजे ‘प्रेमाची सान्वयता’ समजावताना श्याम, रमाकाकीला एक आकृती काढून सांगतो की समजा ‘र’ आणि ‘स’ हे दोन बिन्दू आहेत. त्यांचा एकमेकांशी परिचय झाला की त्यातून वर्तुळलहरी निघतात ज्या एकमेकांपर्यंत पोहोचतात, कधी एकमेकांना छेदून एकरूप होतात. या वेळी रमाकाकू विचारते, ‘हे सारे ठीक आहे, पण या िबदूला ‘र’ आणि ‘स’ हेच नाव का दिलंस?’ नेणिवेत आपण प्रेम शोधत असतो हे सांगणारे अनेक प्रसंग पुढे घडत जातात, तेही नकळत. पुढे श्याम इराणला कामानिमित्त जातो आणि तिथून त्यांचा जो पत्रव्यवहार होतो आणि त्या पत्रात रमा आणि श्याम एक जी कथा रचतात ती मुळात वाचण्यासारखी आहे. ती कथा आणि त्या कथेचे अन्वयार्थ जागेच्या नियमामुळे मनात असूनही इथे देता येत नाही; पण ती वाचल्यास त्याचे वेगवेगळे अन्वयार्थ निघू लागतील हे नक्की.

पुढे नाना निवर्तल्यावर श्याम रमाकाकीला इराणला घेऊन जातो आणि त्यांच्या मागे इथे चर्चा सुरू होतात; परंतु अजूनही त्या दोघांतले नाते ‘मातृका’ हेच आहे. श्यामच्या मनातले सालेहाविषयीचे आकर्षण रमाकाकीला जाणवते आहे तर सालेहाला श्यामच्या मनातले रमाकाकीविषयीचे आकर्षण जाणवते आहे. लग्न झाल्यावर गर्भार असताना सालेहा विचारते, ‘‘ती बहीण आहे असं खोटं का सांगितलंस? ती तुझी आंटी आहे.’’ यावर श्याम म्हणतो, ‘‘ती लहानपणापासून खूपच काही झाली आहे माझी, अगदी आईपासून.’’ मग सालेहा आपल्या गर्भार पोटावर हात ठेवत म्हणते, ‘‘तू आता इथे आहेस. माझ्या पोटात.’’

‘मातृका’ कादंबरी संपते तेव्हा नात्यातला संभ्रम संपलेला असतो. तो प्रसंग रेगे यांनी ज्या नजाकतीने लिहिला आहे त्यास दाद द्यावी लागेल. रमाकाकी श्यामला विचारते, ‘‘आता तुला तेवीस वर्षे झालीत. तू लग्न का करत नाहीस?’’ यावर निवेदक लिहितो, मी म्हणालो, ‘‘लग्न खरंच हवे का? तू इथे माझ्याजवळ एकटी असतेस म्हणून लोक तिथे काही बोलतच असतात. म्हणत मी उठलो. ती ‘श्याम’ असे काही म्हणणार होती, पण मी तिला बोलूच दिले नाही. तिने डोळे मिटून घेतले. कॉफी तशीच विरजून गेली. तसेच शेजारी शेजारी पडून होतो आम्ही काहीच न बोलता.’’ यानंतर दोघांत संवाद होतो पहिल्या भेटीचा आणि स्त्री-पुरुष मनातल्या गोष्टी लपवण्याचा. तो त्रोटक संवाद वाचकाला उजळून टाकतो.

कादंबरीचा विषय रमाकाकी आणि श्यामचे नाते नाही तर स्त्री-पुरुष नाते आणि प्रेम हा आहे आणि तेही वयानं मोठय़ा असलेल्या आपल्याच काकीच्या प्रेमाचा विषय आहे. प्रेम नेमके काय आहे हे शोधताना अनेक ठिकाणी काही महत्त्वाचे वाक्य, उतारे या कादंबरीत येतात. जेकिंसचं लेखन वाचताना रमाकाकी म्हणते, आता यातली नदीचीच कविता पाहा. हा इथे नदीपलीकडे जाण्याचा विचार का करतो? तर समोर नदी आहे म्हणून. नसती तर अलीकडे-पलीकडे एकच झालं असतं का, म्हणून याला संभ्रम. हा संवाद प्रेम, शरीर आणि नायक याचे संदर्भ लावून वाचलं की काही नवं उलगडल्याचा भास होतो. कादंबरीत अनेक ठिकाणी असे उतारे येतात. एका ठिकाणी रमाकाकी म्हणते, ‘लपलेले असे काहीच नसते, आपणच आपल्याला लपवीत असतो.’ कादंबरीत काही कथा, कविता, गोष्टीही येतात ज्या पुन्हा वाचकाला विचारप्रवणशील करतात. लिओनार्द फ्रँकच्या कादंबरीची गोष्ट येते. बाणाच्या गोष्टीचा उल्लेख येतो, भागवत पुराण येतं, संस्कृत श्लोक येतात, कथा येतात. या सगळय़ाच्या केंद्रस्थानी मात्र असतं ते प्रेम काय हे समजून घेणं. 

ऐंशीच्या दशकातली कादंबरी असली तरी काळ स्वातंत्र्यपूर्व आहे. यातले संदर्भ खरे वाटावेत इतपत ठळक आहेत. त्या काळात या विषयावर लिहिणं म्हणजे तत्कालीन साहित्यचौकटीला छेद देण्याचा प्रकार आहे. कशासाठी लिहावं? या प्रश्नाचं उत्तर अनेक लेखक वेगवेगळय़ा प्रकारे देतील; पण काय लिहावं? याचं उत्तर काळ देतो. वर्तमानातील अस्पर्श आणि झाकलेली बाजू जो लेखक निडरपणे समोर आणतो ते लेखनकाळ जपतो आणि वर्तमानातील अस्पर्श झाकलेली बाजू दाखवण्यासाठीच लिहावं हे काळ सांगतो. कबीर, तुकाराम, मंटो, बी. रघुनाथ, तेंडुलकर, यांनी त्यांच्या त्यांच्या काळात हे केलं म्हणून ते अजून टिकून आहेत. शरीर, मन आणि प्रेम या गुंत्याची उकल ‘मातृका’ कादंबरीत तरलतेने, बौद्धिक पातळीवर केली आहे.  पु. शि. रेग्यांच्या ‘तू हवीस यात न पाप’ यांसारख्या कविताही तत्कालीन चौकट मोडणाऱ्या कविता होत्या म्हणूनच पु. शि. रेगे यांचं नाव पुढेही काळ त्याच्या माथ्यावर मिरवत राहील.  ‘मातृका’ कादंबरी ‘सावित्री’पुढे मला नेहमीच उजवी वाटली; पण तरीही ‘सावित्री’ चर्चेत का राहिली याचा विचार करताना वाटतं की, ‘मातृका’मधलं काकी आणि पुतण्याचं प्रेम तत्कालीन समाजाला स्वीकारता आलं नाही. म्हणून या ‘मातृका’ला ‘सावित्री’इतकंही स्थान मिळालं नाही.

kiran.yele@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 01:07 IST
Next Story
जगण्यातील असमानतेची व्यथा
Exit mobile version