डॉ. विनायक येवले
प्रकाशन व्यवसायात दहा वर्षांत आमूलाग्र बदल झाले. जे प्रस्थापित प्रकाशक बहुमतासाठी पूरक असे काम करत होते, ते बहुमत मिळाल्यावर बाजूला सरकले. परिणामी प्रकाशन व्यवहार विझल्यासारखा कमी कमी होत गेला. त्यात पोकळी निर्माण झाली. ती नव्या दमाच्या प्रकाशन संस्था आपापल्या वकुबानुसार भरून काढण्यास सज्ज झाल्या. त्यात नांदेडमधील ‘हस्ताक्षर प्रकाशन गृह’सुद्धा येते. ‘चाक’सारखे वैचारिक अनियतकालिक काढणार्‍या प्रकाशन संस्थेची गोष्ट…

प्रकाशन व्यवसायात अपघाताने आलो किंवा मजबुरी म्हणून आलो असे मी म्हणणार नाही. प्राध्यापकी हा माझा पहिला पर्याय होता, तर प्रकाशन हा माझ्या अगदी जवळचा दुसरा. प्रत्यक्षात २०१९ साली प्रकाशन सुरू केले असले तरी २०१४ सालापासूनच त्याची तयारी झालेली. त्या वर्षी माझा पहिला कवितासंग्रह ‘काव्याग्रह’ प्रकाशनाकडून प्रकाशित झाला आणि काव्याग्रहशी जोडला गेलो. पुस्तकांच्या आणि मासिकाच्या कामात सक्रिय सहभागी झालो. पाच वर्षे पुस्तकांच्या निर्मितीसंबंधाने तीच माझी उमेदवारी. वस्तुत: प्राध्यापकीसाठी आवश्यक असलेली पात्रता २०१२ सालीच अर्जित केली होती. पण गावातले राहते घर आणि ठिगळ दीड ठिगळ असलेली शेतजमीन विकली तरी संस्था मागणार्‍या ‘डोनेशन’चा डोंगर चढू शकणार नव्हतो. पुढे डोनेशन देऊन प्राध्यापकी पदरी पाडून घेण्याची मानसिकताही हळूहळू सरली. सहा वर्षे घड्याळी तासिका तत्त्वावर नांदेड विद्यापीठात एम. ए.च्या मुलांना शिकवले. सोबत कायमस्वरूपी नोकरीसाठी अर्जफाटेही केले. विषयज्ञान तपासणारे प्रश्न विचारण्याऐवजी परीक्षक मुलाखतीमध्ये कविता म्हणायला लावून कटवायचे. उमेदवार आधीच ठरत असल्याने अशा मुलाखतीच्या फार्सचाही उबग आला. प्राध्यापकीतला उत्साह कापरासारखा उडून गेला. २०१९ला माझे लग्न झाले. आम्ही दोघेही संभाजीनगरला राहायला गेलो. पण त्या वर्षी तिला कॉलेजने कायम केले नाही. परिणामी आम्हा दोघांची नोकरी गेलेली. नव्या शहरात मुद्रितशोधनाची कामे मिळणारच नव्हती, त्यामुळे पैसा नव्हता. प्रकाशन प्रत्यक्ष सुरू करण्याशिवाय पर्याय नव्हता. संभाजीनगरला पुस्तक निर्मितीसंदर्भातील लोकांशी माझा परिचय नव्हता. दुसरीकडे म्हणजे नांदेडला डीटीपी आणि पेज सेट करणारे लोक माझ्या परिचयाचे होते. मग जमेल तसे संभाजीनगरवरून नांदेडला आठवड्यातले शनिवार-रविवार असे दोन दिवस येऊन पुस्तकाची कामे करू लागलो. पहिले पुस्तक नाटककार राजकुमार तांगडे यांचे ‘शिवारगर्‍हाणं’ करायला घेतले. प्रकाशनात उडी तर घेतली, पण खिशात दमडीसुद्धा नव्हती. पुस्तकाला रेखाटने, मुखपृष्ठ, सेटिंग असा सगळा खर्च येणार होता. माझ्या प्रकाशनाचे पहिले पुस्तक म्हणून श्रीधर अंभोरे यांनी मुखपृष्ठ आणि आतील रेखाटने एकही रुपया न घेता करून दिली. शिवाय नयन बाराहाते यांनीसुद्धा सेटिंगसाठी एकही छदाम घेतला नाही. कवी दिनकर मनवर त्या वेळी नांदेडला राहायला होते. त्यांना माझी अडचण लक्षात आली म्हणून त्यांनी पहिले पुस्तक छापण्यासाठी घरी बोलवून मला पैसे देऊ केले. या तिघांमुळे प्रकाशन व्यवसायात पहिले पाऊल टाकू शकलो. पहिले पुस्तक प्रकाशित झाले, पण ते वाचकांपर्यंत पोहोचवता आले नाही. कारण करोनामुळे सर्वत्र टाळेबंदी लागलेली. पुढ्यात अनिश्चिततेची टांगती तलवार. आधार नसलेल्या नव्या शहरात करोनाकाळात जगणे मुष्कील होणार असा विचार करून नांदेड गाठले. पुढचे तीन महिने भय आणि संशयग्रस्त मन:स्थितीत गेले. प्रकाशनाचा बालमृत्यू होईल की काय अशी भावना वाढत चाललेली. संभाजीनगरला असतानाच एका भेटीदरम्यान रवींद्र इंगळे चावरेकर यांनी माझ्यासारख्या नवख्या प्रकाशकावर विश्वास ठेवून नऊ खंड प्रकाशनाकरिता देऊ केले. यातही दिनकर मनवर यांचा मौलिक वाटा होताच. प्रकाशनाच्या सुरुवातीलाच एवढे प्रचंड काम माझ्या हाताशी आले आणि प्रकाशक म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याची नामी संधीही! ती मी गमावली नाही. मागे काय घडले हे सगळे पुसून टाकून कामाला लागलो. पाचशे-सातशे टायटल काढलेले प्रकाशक माझ्या शहरात आहेत, पण जिल्ह्याच्या बाहेर त्या प्रकाशन संस्थांना फारसे कुणी ओळखत नाही. आपण आशय कोणता देतोय हा मुद्दा तर आहेच, आपण निर्मितीच्या अंगाने वाचकांना आकर्षित करतोय का, हे पाहणेही गरजेचे. ‘हस्ताक्षर प्रकाशन गृह’ हे नाव आणि सिंधू संस्कृतीमधील बैल प्रतिमा ही तशी परस्परविरोधी जाणारी असली तरी लोगोमध्ये बैल समजून उमजून घेतलाय. कारण माझी मुळे कृषी संस्कृतीमध्ये आहेत. शिवाय बैल ही प्रतिमा सर्जनशीलतेचे आणि श्रमाचे प्रतीक आहे. याच बैलप्रतिमेला भारतीय संविधानातही अंकित केले आहे.

पूर्वापारची घडीवमडीव वाचकाभिरुची डोळ्यासमोर ठेवून पुस्तके छापणे हे हस्ताक्षर प्रकाशन गृहाच्या भूमिकेला मानवणारे नव्हते. कारण चलनी आशय विकण्यासाठी प्रकाशन व्यवसाय करायचाच नाही हे धोरण आम्ही समोर ठेवले होते. वास्तविक प्रकाशकांनी केवळ वाचकाभिरुचीला कुरवाळीत पुस्तके काढण्याची गोष्ट नव्हे, कालोचित अभिरुची घडवण्यासाठी पुस्तके छापण्याची भूमिकानिष्ठ बाब आहे. वर्तमान समाजभूमी साहित्य निर्मितीसाठी कधी नव्हे तेवढी अनुकूल असताना आणि सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील अनागोंदी आपल्या टिपेला पोहोचलेली असतानाच्या काळात, सांस्कृतिक चळवळीला पूरक ठरतील अशी पुस्तके प्रकाशित करणे नितांत गरजेचे आहे. परंतु चळवळ करणार्‍या लोकांकडे प्रकाशन यंत्रणाच नाही. विषमतेचे जग बदलले पाहिजे, शोषण बंद झाले पाहिजे असे चळवळीतल्या लोकांना वाटते, पण त्या आवाजाला ठाम असा मूलाधार देईल अशी प्रकाशन यंत्रणा नसल्यामुळे सर्वच प्रकारच्या चळवळींना पंगुत्व आलेले दिसते. चळवळीतल्या लोकांच्या हाताशी ‘प्रोटेस्ट’ ही ठाम यंत्रणा आहे. निषेध व्यक्त करण्यासाठी मोर्चा काढणे, आंदोलन करणे, उपोषणाला बसणे हे मार्ग त्यांच्या हक्काची आहेत. पण प्रकाशन व्यवसाय हा या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येते. चळवळीची पुस्तके ज्या प्रकाशन संस्था छापताहेत त्या फक्त पुस्तकातील आशय महत्त्वाचा मानून चालतात. पण आजच्या स्पर्धात्मक काळात फक्त आशय प्रधान मानून चालणे पुरेसे राहिलेले नाही. आशयाबरोबरच पुस्तकाचे संपादन, मांडणी, बाइंडिंग, कागद, फॉन्ट, कव्हर, कॅलिग्राफी, साइज, त्या त्या पुस्तकाच्या आशयाला अनुसरून, वाचकवर्गाचे वय लक्षात घेऊन पुस्तकाचे वजन या सगळ्या बाबी हाताशी धरूनच पुस्तके काढली तरच वाचक या पुस्तकांकडे आकर्षित होतील. आणि हाच सर्वांगीण विचार गाठीशी बांधून ‘हस्ताक्षर प्रकाशन गृह’ आपले मार्गक्रमण करत आहे. याशिवाय जे लेखक प्रस्थापित व्यवस्थेने नाकारले, प्राधान्यक्रमाचे शिक्के लावून ज्या लेखकांना रांगेतच खितपत ठेवले, ज्यांना हेतूपूर्वक परिघाबाहेर ढकलले अशा महत्त्वाच्या लेखकांची पुस्तके छापणे आपले सांस्कृतिक कर्तव्य मानले. रवींद्र इंगळे चावरेकर, जी. के. ऐनापुरे, श्रीधर तिळवे नाईक, संजय पवार, संतोष पद्माकर पवार, राजकुमार तांगडे, राकेश वानखेडे ही काही प्रातिनिधिक नावे सांगता येतील.

करोनानंतर अनेक सुस्थापित आणि संपन्न यंत्रणांना अनपेक्षित धक्के बसले. करोनाचा मराठी प्रकाशन व्यवहारावर परिणाम झाला असला तरी त्यातून काही नवे पर्यायही निर्माण झाले. पुस्तक विक्री आणि वितरणाबाबत मात्र काही सकारात्मक बाबी घडल्या. अनेक होतकरू मुलांनी पुस्तक वितरणात शिरकाव केला आणि चांगला जमही बसवला. या विक्री व वितरणाचे माध्यम होते फेसबुक, व्हॉट्सॲप. या नव्या ऑनलाइन यंत्रणेमुळे प्रकाशन व्यवसाय काही अंशी का होईना पारदर्शी झाला. आर्थिक परताव्याला गती मिळाली. हस्ताक्षर प्रकाशन गृहानेसुद्धा करोनानंतरच आपली नाममुद्रा ठळक केली. पारंपरिक विक्री व वितरण व्यवस्थेबाबत आम्ही आरंभीपासूनच अनुकूल नव्हतो. कारण मुळातच भांडवलाचा प्रश्न होता. वर्ष-दोन वर्षे आर्थिक परताव्याअभावी तगून राहणे अशक्य होते. हस्ताक्षरने पूर्णत: पारंपरिक वितरण व्यवस्था नाकारली असेही नाही. ज्या वितरकांनी समोरून स्वत: विक्रीसाठी पुस्तके मागितली अशांना दिली. स्वत: मात्र वितरकांना पुस्तके विक्रीसंदर्भात संपर्क केला नाही. आजही आम्ही कुठल्याही वितरकाला भेटत नाही. आरंभी ज्या थोड्या फार वितरकांना पुस्तके दिली होती त्यांचे अनुभव फारसे चांगले नव्हते. नाशिकच्या एका पुस्तक विक्रेत्याने चक्क पैसे बुडवले, काही अजूनही पैशांसाठी त्रास देतात. मुंबईचा एक जण पैसे मागितले की अरेरावीवर येतो. मेहनतीचे देऊन भिकार्‍यागत हात पसरवायचे हे वाईटच. त्यामुळे आजही पपायरस (कल्याण), गोमटेश (परभणी) अशी मोजकी नावे सोडली तर इतरांना पुस्तके देण्याचे धाडस होत नाही. मुळात पुस्तकांची दुकाने थाटून बसलेले वितरक लबाड आहेत. बिलाचे रिमाइंडर दिले की पुढून एकच उत्तर येते, ‘अजून पुस्तके विकलीच नाहीत हो. तशीच पडून आहेत.’ आपण काही पुण्या, मुंबईतल्या त्याच्या दुकानात जाऊन पुस्तके विकली किंवा नाही याची शहानिशा करू शकत नाही. आलेले उत्तर पडत्या फळाची आज्ञा मानून महिनोन्महिने फक्त वाट पाहायची हे काही मनाला पटणारे नव्हते. परवडणारेही नव्हते. त्यामुळे शक्य तेवढे स्वत:च ऑनलाइन विकायचे, वाचकांनाच जास्तीची सूट द्यायची हे धोरण स्वीकारले.

आजघडीला पुस्तक विक्री आणि वितरणाची पारंपरिक व्यवस्था ही टाकाऊ झालेली आहे. पारंपरिक व्यवस्थेत पुस्तक विक्रीचे स्वरूप खूपच त्रासदायक होऊन बसले आहे. वितरकांनी आर्थिक बाबतीतली विश्वासार्हता गमावलेली आहे. सतत विशिष्ट प्रकाशन संस्थेच्या पुस्तकांनाच दर्शनी भागात ठेवणार. त्याच्याच पुस्तकांची जाहिरात करणार, बेस्ट सेलर म्हणून तीच पुस्तकं मिरवणार, पन्नास टक्के, साठ टक्के सवलतीने पुस्तके मागणार. आम्ही देऊ तेव्हाच पैसे घ्यायचे, असे अनेक मुद्दे सांगता येतील. ती टाकाऊ होण्याला सर्वथा वितरकच जबाबदार आहेत असे माझे तरी स्पष्ट मत आहे. इतरांचे मत वेगळे असू शकेल.

पूर्वी दादर, गिरगाव, चर्चगेट ही ठिकाणे पुस्तक विक्रीची प्रमुख केंद्रे होती. पण आजघडीला तिथली सगळी दुकाने बंद पडली किंवा बंद पडण्याच्या पातळीवर पोहोचलीत. ही प्रचलित पुस्तक विक्रीची व्यवस्था संपली हे एका अर्थी बरेच झाले. कारण तिथे विशिष्ट प्रकाशकांची, विशिष्ट लेखकांचीच पुस्तके विकली जात होती. इतरांना तिथे जागाच नव्हती. मग अशी एकसुरी, विशिष्टांची तळी उचलणारी वितरण व्यवस्था बंद पडली म्हणून त्याची खंत बाळगण्याचे कारण नाही. उलट नव्या साधनांनी आणि नव्या माध्यमांनी आपला मार्ग प्रशस्त करणे कधीही उपयुक्त ठरेल.

मुळात मराठी वाचकांची अभिरुची अजूनही पुण्या-मुंबईतली प्रकाशक लॉबीच नियंत्रित करत आहे हे आम्ही कधी समजून घेणार आहोत? जगभरातले कुठलेही पुस्तक आता वाचकाला घरपोच मिळते. या घरपोच सेवेमुळे हा संघर्ष पराकोटीचा वाढलेला दिसतो. त्यामुळे आजच्या प्रकाशकांना आशय चांगला देणे अनिवार्य तर आहेच, शिवाय पुस्तकांची गुणवत्ता जपणे, पुस्तकांच्या जाहिरातीच्या प्रमाणाचे भान ठेवणे, स्वतंत्र वितरण व्यवस्था विकसित करणे, व्हिडीओ जाहिरातींचा मार्ग अनुसरून वितरणाला गती देणे, वाचकांची विश्वासार्हता जपण्याला अधिक प्राधान्य देणे, या बाबीच प्रकाशन व्यवसायाला अधिक सक्षम बनवतील.

सांस्कृतिकदृष्ट्या मागास आणि भौगोलिकदृष्ट्या केंद्रापासून अतिदूर असलेल्या नांदेडसारख्या ठिकाणावरून हस्ताक्षर प्रकाशन गृहाने आपला प्रवास सुरू केला. जेव्हा अशा ठिकाणावरून महानगरातल्या वाचकांचे लक्ष वेधायचे असते तेव्हा पुस्तकांची गुणवत्ता अनिवार्य होऊन बसते. या बाबी लक्षात घेऊनच हस्ताक्षरची पुस्तक निर्मिती होते. प्रकाशन विश्वामध्ये जे नवे वातावरण आले आहे, त्या वातावरणाला अधिकाधिक आत्मसात करण्याचा आमचा प्रयत्न असतो.

माझ्यासारखे बेरोजगार प्रकाशनात येऊन आपल्या जगण्याला अर्थ देत असतील तर त्यात गैर काही नाही. ज्याला पुस्तकनिर्मितीतले काहीएक कळते किंवा जे लोक प्रकाशन व्यवसायाला घेऊन गंभीर आहेत अशा लोकांनी प्रकाशन व्यवसायात यायला हरकत नाही. पण निव्वळ अर्थकारण हा एकच हेतू त्यामागे असेल तर मात्र गणिते चुकू शकतात. प्रकाशन व्यवसायात येण्यासाठी पूर्वअट ही आवड असणे ही आहे. पुस्तकांवर अलोट प्रेम असणेही गरजेचेच आहे. प्रकाशक म्हणून तुम्ही कोणती भूमिका घेऊन येता आणि कोणती बाजू तुम्ही लढवणार आहात यावरही तुमचे भवितव्य ठरू शकते.

हस्ताक्षर प्रकाशन गृहाला पाच वर्षे मनमेंदूमध्ये मुरवत ठेवले होते. आर्थिक नफ्यातोट्याचा विचार थोडा बाजूलाच ठेवला. सुरुवातीला सगळे बारकावे समजून घेतले, त्यानुसार स्वत:वर काम केले. योग्य वेळेची वाट पाहिली. करोनाने थोडे विरजण टाकले असले तरी ते पुढे सगळेच सावरले. कुठल्याही व्यवसायासाठी संयम हा घटक अतिमहत्त्वाचा. तो माझ्यात उपजतच आहे. प्रकाशन व्यवसाय प्रत्यक्ष सुरू केला तेव्हा अनेकांनी नांदेडसारख्या शहरात प्रकाशनाला भवितव्य नाही असे सांगितले होते. पुण्यात जाण्याविषयीचे सल्ले दिले. पण मला माझे शहर न सोडता गुणवत्तापूर्ण कामाच्या बळावर हस्ताक्षर प्रकाशन गृह नावारूपाला आणायचे होते. कुठलाही कर्जफाटा न करता तो प्रवास पूर्ण झालाय. हस्ताक्षर प्रकाशन गृहाला आर्थिक फायद्या-तोट्याच्या गणितांपलीकडे जाऊन सांस्कृतिक व्यवहार करायचाय, आपल्या वारशाची चिंचोळी का होईना पाऊलवाट मागे ठेवून जायचीय.

ubookwindow24@gmail.com