अनिल गोखले
एकदा काय झालं, दोन ढगांचं झालं भांडण. एक होता काळा ढग आणि एक पांढरा. दोघांची झाली जोरात टक्कर आणि तिथंच पडली ठिणगी. ती एवढी मोठी की दोघांना एकमेकांचा खूप राग आला. दोघे एकमेकांना सतत ढुशा मारू लागले. ते थांबेचनात. सर्व आकाश चमचम करू लागलं. काही केल्या यांचं भांडण थांबेना. आकाशात लखलखाट आणि धरतीवर चिवचिवाट अशी गत झाली.
या दोन्ही ढगांचं कडाक्याचं भांडण वार्याच्या लक्षात आलं आणि त्यानं आपल्या परीनं भांडण थांबवायचा प्रयत्न सुरू केला. पण त्यांची चकमक मात्र वाढतच राहिली. मग वार्यानं त्याचा वेग वाढवून दोन्ही ढगांमध्ये गारवा निर्माण केला. वार्याला वाटलं की गारव्यानं तरी भांडण थांबेल, पण कसलं काय, भांडण काही थांबलंच नाही. त्यांच्या एकमेकांच्या ढुशा चालूच राहिल्या आणि मग जोरात धो धो पाऊसच पडू लागला. वारासुद्धा इकडून तिकडे वाहू लागला, जसं की तो त्यांच्या भांडणाचा पंच होता. थोड्या वेळानं वाराही थांबून विचार करू लागला. वार्याला किती वेळ समजेच ना की, हे दोघे का भांडतायेत. तो दोघांना शांत होण्यासाठी समजूत घालू लागला. दोन्ही ढगांत काही समेट होईल का, असा विचार करू लागला, परंतु दोन्ही ढग गर्वानं सारखे एकमेकांसमोर गुरगुरतच होते. वार्याला एकदा वाटलं, एकदा सूर्याची मध्यस्थी करायला सांगावी, पण मग नकोच वाटलं, कारण सूर्य अजून तापट, त्यामुळे काही तरी वेगळंच भांडण वाढायचं. आणि तेच चंद्राचं काय की, तो कोणाच्या अध्यात ना मध्यात, आपला शांतच नेहमीसारखा, मग त्याला काय विचारायचं? परंतु वार्याच्या लक्षात आलं होतं की, दोन्ही ढगांना आपआपलं श्रेष्ठत्व सिद्ध करायचं होतं व ते गर्विष्ठ झाले होते.
काळा ढग म्हणे, त्याच्यामुळे पाऊस पडतो आणि सर्व सृष्टीला भरपूर पाणी मिळतं. पांढरा ढग बिनकामाचा आहे, त्यामुळे मीच सर्वश्रेष्ठ आहे.पांढरा ढग म्हणाला, त्याच्यामुळे सूर्यप्रकाश सर्वत्र पसरतो, त्यामुळे बाष्पीभवनाला मदत होते आणि त्यामुळे सर्व सृष्टी ताजीतवानी राहते, म्हणून मीच सर्वश्रेष्ठ आहे.वार्याला वाटलं की, दोघेही आपआपल्या जागी योग्यच आहेत, त्यामुळे दोघेही ढग सर्व सृष्टीसाठी महत्त्वाचे आहेत, म्हणून यांचं भांडण अजून काही परवडणारं नाही. काही केल्या दोन्ही हट्टी ढग एकमेकांचं ऐकेना आणि वार्यालाही जुमानेनात.
मग वार्यानंच लढवली शक्कल, तो सुसाट सुटला आणि काळ्या ढगाला जोरात ढकललं उत्तरेला आणि पांढर्या ढगाला जोरात ढकललं दक्षिणेला. मग झाला एक करार की, पावसाळ्यात काळ्या ढगानं पांढर्या ढगाजवळ यायचंच नाही आणि उन्हाळ्यात पांढर्या ढगानं काळ्या ढगाकडे जायचं नाही. म्हणजेच काय, की दोन्ही ढगांनी एकमेकांच्या जवळ यायचं नाही असा अलिखित करार झाला खरा. आणि अशा प्रकारे काळ्या आणि पांढर्या ढगांचं भांडण क्षमलं.
पण करार तो करार कसला, अजून दोन्ही ढग कुठेही आणि कसेही फिरतात, चकमक करतात, पण भांडत नाहीत. पावसाळ्यात मात्र दोन्ही ढगांना अधूनमधून चेव येतोच. म्हणून वाराही आता कधी कधी वादळी वाहतो आणि काळ्या आणि पांढर्या ढगांना भांडू नये म्हणून आठवण करून देत राहतो.
u oesgokhale@gmail.com
