अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- गोविंद नारायण माडगांवकर!

एकीकडे बाबा पदमनजी आणि विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्यातील वैचारिक द्वंद्व चालू होते, तर त्याच सुमारास या दोघांपेक्षा निराळे लेखन करणारे एक विद्वान होते, ते म्हणजे गोविंद नारायण माडगांवकर. त्यांचा जन्म गोव्यातील मडगांवचा. १८१५ सालातला. औषधांचे व्यापारी असलेल्या वडिलांबरोबर ते वयाच्या नवव्या वर्षी मुंबईला आले, आणि शेवटपर्यंत इथेच राहिले. मुंबईतील डॉ. वुइस्लन्च्या शाळेत त्यांनी तीस वर्षे अध्यापन केले. त्यांच्या या शिक्षकी पेशाचा प्रभाव त्यांनी केलेल्या एकूणच लेखनावर दिसून येतो. त्यांच्या अगदी सुरुवातीच्या लेखनातील ‘सत्यनिरूपण’ या शीर्षकाच्या निबंधातील हा उतारा पाहा –

MGIMS Wardha Bharti 2024
Wardha Jobs : महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत चार पदांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
IAS officer awanish sharan share mpsc examination preparation tip
“इतकंही कठीण नाही” UPSC क्रॅक करण्यासाठी नक्की किती वेळ अभ्यास करावा? खुद्द प्रसिद्ध IAS नं दिल्या टिप्स
Nagpur Woman Harassed and Intimidated by accused to not give testimony Against him
नागपुरात महिलेने न्यायालयात साक्ष देऊ नये म्हणून विनयभंग.. आरोपीने अश्लिल…
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत

‘‘अरेरे! ह्य़ाप्रमाणें शपथ वाहून जो मनुष्य लोभांध होऊन खोटी साक्ष देतो, त्याच्या मूर्खपणास पार नाहीं, असें समजावें. आपण बोलतों काय, आणि करतों काय! याचें ज्याला भान नाहीं, तो मनुष्य केवळ पशु असें समजावें. अरे खोटी साक्ष देणाऱ्या! पाहा तूं किती अनर्थ करतोस तो. जर तुझी साक्ष एखाद्या खुनाच्या मुकद्दम्यांत असली आणि खून करणारा तुझा आप्त किवा तुझी मूठ भरणारा असला, तर तुझ्या साक्षीवरून कदाचित् एखादा गरीब या जगांतून उठला जाईल आणि त्याची बायकोमुलें भिकेस लागतील मग ती जसजसीं दु:ख पावतील तसतसीं तुला तळतळाट देतील. जो दुष्ट मनुष्य खोटी साक्ष देऊन निरपराध्यास फाशांत पाडितो, तो केवळ अघोरपातकी; एखाद्या अपराध्यास शासन न होतां तो सुटला तर समयविशेषीं चालेल. परंतु निरपराध्यास विनाकारण दंड करविणें, हें रोमांच उभे रहावयाजोगें दुष्ट कर्म आहे. प्रसंगी लुटारू मनुष्याची गांठ पडली, तर पत्करेल; परंतु असल्या दुष्टाचें तोंड पाहूं नये; कारण लुटारू मनुष्य द्रव्यहरण करण्याच्या लोभानें मनांत आवेश आणून दुसऱ्याचा नाश करतो; पण खोटी साक्ष देणारा हांसत खेळत चौघांमध्यें न कळतां दुसऱ्याचा गळा कांपितो. कित्येक असेही आहेत कीं, एक दोन आण्यांच्या लोभामुळें देखील खोटी साक्ष देण्यास कबूल करितात.’’

हा निबंध १८५१-५२च्या विलोबी बक्षिसासाठी लिहिला होता. त्याच्या आगेमागे त्यांची काही पुस्तके प्रकाशित झाली होती. त्यात ‘शूचिर्भूतपणा’ (१८४९), ‘ॠणनिषेधक बोध’ (१८५०), ‘हिंदू लोकांच्या रीति सुधारण्याविषयी बोध’ (१८५१), ‘सृष्टींतील चमत्कार’ (१८५३), ‘दारूपासून अनर्थ’ (१८५५) या पुस्तकांचा समावेश होतो. तत्कालीन विविध उपयुक्त विषयांवर त्यांनी वेळोवेळी लेखन केले आहे. लेखनाची ही प्रेरणा कशी निर्माण झाली, याविषयी त्यांच्या १८५६ साली प्रकाशित झालेल्या ‘उद्भिज्जन्य पदार्थ’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिले आहे,

‘‘इंग्रजी शिकायास लागल्यापासून मला तर महाराष्ट्र भाषेचा तिरस्कार येत असे, असीच बहुतेक लोकांची स्थिती झाली होती. एकादा प्राकृत ग्रंथ वाचावा किंवा हातांत धरावा म्हटलें म्हणजे वाईट वाटे. जेव्हां मी फ्रि चर्च विद्यालयांत गेलों तेव्हां डाक्तर विलसन व मयत रेवरेंड राबर्ट निसबिट यांची मराठी भाषेवर श्रद्धा आणि एतद्देशीय मुलांमध्यें ती भाषा शुद्ध येण्याविषयींची उत्कंठा व श्रम पाहून मला तिचा थोडा अभ्यास करण्याचें आवश्यक पडलें. पुढें सन १८४० त, दैवयोगाने अशी गोष्ट झाली कीं, डाक्तर लीथ हे कधीं कधीं ह्या शाळेंत येत असत त्यांणीं विद्यार्थ्यांस स्वभाषा चांगली आली असतां परभाषा शिकण्यास फार सुलभ पडतें, असें मनांत आणून मोठय़ा परोपकार बुद्धीने महाराष्ट्र भाषेंत बसल्या बैठकीस कोणाची मदत न घेतां, व दुसरे ग्रंथ अवलोकन न करितां, त्याच वेळीं योजलेल्या विषयावर जो निबंध लिहील, त्यास शंभर रुपये इनाम देऊं असें दर्शविलें. ह्य़ा त्यांच्या स्तुत्य कृत्यावरून शाळेंतील बहुतेक शिक्षकांची मनें स्वभाषेकडे वळलीं. त्यावेळीं मलाहि त्या गोष्टीचा निदिध्यास लागल्यावरून मीहि तिजवर बरेच परिश्रम केले. तेव्हांपासून मराठी भाषेची गोडी लागून, जें कांही अल्पस्वल्प सध्यां त्या भाषेचें ज्ञान मला झालें आहे, त्याचा मी सदरीं सांगितलेल्या तीनहि गृहस्थांचा ॠणी आहें.’’

पुढे १८५७ साली मराठी पाठय़पुस्तके तयार करण्यासाठी सरकारी शिक्षण खात्याने एक समिती नेमली. शिक्षणतज्ज्ञ म्हणून माडगांवकरांचा तिच्यात समावेश झाला. हे सर्व होत असताना मुंबईत एक महत्त्वाची गोष्ट घडत होती. ती म्हणजे- इथल्या काही इंग्रजी शिकलेल्या तरुणांनी १८४८ मध्ये ‘द स्टुडन्टस् लिटररी अ‍ॅण्ड सायंटिफिक सोसायटी’ या नावाची एक संस्था स्थापन केली. तिची ‘उपयुक्त ज्ञानप्रसारक सभा’ ही मराठी शाखा त्याच वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सुरू करण्यात आली. तिचे अध्यक्ष होते दादोबा पांडुरंग तर्खडकर. ही सभा दर पंधरवडय़ास गुरुवारी एल्फिन्स्टन विद्यालयात भरत असे. त्यात कोणी तरी सभासद शास्त्रीय विषयावर व्याख्यान देई किंवा निबंध वाचे व त्यावर वादविवाद होई. मात्र यात राजकारण व धर्म हे विषय वज्र्य होते. ते निबंध वा व्याख्याने या सभेने एप्रिल, १८५० मध्ये सुरू केलेल्या ‘ज्ञानप्रसारक’ मासिकात प्रसिद्ध होत. माडगांवकर हे या सभेचे ‘अ‍ॅक्टिव्ह’ सदस्य होते आणि या मासिकात त्यांनी कापूस, वस्त्र, अन्न यांपासून ते द्रोण, पत्रावळीपर्यंत अनेक विषयांवर लिहिले आहे. ज्ञानप्रसारकचे काम वाढत जावे व त्यामुळे लोकांमध्ये नवीन विद्यांचा प्रसार व्हावा, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. ते लिहितात-

‘‘आमच्या लोकांचा स्वभाव खुशामती आणि कृपण होऊन गेला आहे, त्याजवर त्याणीं कांही लक्ष द्यावें. कोणी त्यांस रानटी, बेसमजुती, अज्ञानी व मनुष्याच्या योग्यतेस चढणारे नव्हत अशीं अनेक दूषणें देतात, तरी तीं आम्ही सर्व निमुटपणे ऐकून घेतों; परंतु आपल्या बुद्धीचा व्यय करून नवीन शोध करणें व यांत्रिक विद्येमध्ये आपली मति चालवून लोकांस चमत्कार दाखवून जो रानटीपणाचा आळ आम्हांवर आला आहे, तो दूर करण्याच्या खटपटींत कोणीच पडत नाही. शें-दोनशें रुपयांचा रोजगार मिळाला आणि आपलें काम झालें म्हणजे झालें. मग ते रानटी म्हणोत, किंवा काफ्री म्हणोत, त्याविषयी त्यांना कांहीं दु:ख नाही. आम्हांला बुद्धि आहे, ज्ञान आहे, शक्ति आहे आणि संपत्तीहि आहे, परंतु त्यांचा बराबर व्यय करितां येत नाहीं; त्यामुळें आमचा स्वभाव अति आर्जवी होऊन गेला आहे. आम्हांस असें वाटतें कीं, दुसऱ्याची खुशामत करणें हेंत आमच्या सुखाचें साधन. हा स्वभाव आमचे लोक सोडून देतील आणि विद्येच्या मागें लागतील, तेव्हांच ते राजमान्य व खरे सुखी होतील.’’

माडगांवकरांचे ज्ञानप्रसारक सभेचे हे काम चालले होतेच, परंतु त्यांचे नाव आजही घेतले जाते ते शेवटच्या काळात त्यांनी लिहिलेल्या ‘मुंबईचे वर्णन’ या पुस्तकामुळे. मुंबईवरील ‘ऑल टाइम क्लासिक’ म्हणावे असे हे पुस्तक आहे. इंदुप्रकाश छापखान्याने ते १८६३ मध्ये प्रकाशित केले. त्याच्या प्रस्तावनेत ते या पुस्तकाबद्दल लिहितात,

‘‘आपल्या देशाचा इतिहास लिहिण्याचा उद्योग करावा असा मनोरथ होता, परंतु भरतखंडाचा इतिहास लिहिणें म्हटलें म्हणजे त्यांतील बहुतेक देश फिरून पाहिले पाहिजेत व त्या विषयावर अनेक ग्रंथकारांनी वर्णनें लिहिलीं आहेत, तीं साद्यंत वाचून पाहिलीं पाहिजेत. हें सिद्धीस जाण्यास बुद्धि, द्रव्य, शरीरसंपत्ति हीं अनुकूल असलीं पाहिजेत. ज्यापाशीं ह्य़ा साधनांची न्यूनता आहे, त्या गृहस्थाच्या हातून एकादें लोकोत्तर कृत्य सिद्धीस जाणें दुर्लभ. असें असतां कदाचित् उपहासास्पद होईल, म्हणून मुळींच अशा कृत्यास हात घातला नाहीं. ‘अंथरूण पाहून पाय पसरावे’ असें वडिलांचें वाक्य आहे, आणि आम्हांसारिख्या प्राकृत जनास ह्य़ा वाक्याचा अनुरोधानेच वागलें पाहिजे. दुधाची तहात ताकाने भागवावी असा दृढ निश्चय करून हें कृत्य हातीं धरिलें आहे..

सामर्थ्यांनुरूप देशकल्याणार्थ कांहीं करावें असें लक्षांत आणून हें मुंबईचें वर्णन लिहिलें आहे. यांत स्थलवर्णन, राज्यव्यवस्था, लोकस्थिती, इत्यादि मुंबईतील प्रकार जो दृष्टीस पडतो, तो स्वत: पाहून व ग्रंथांतरीं जें जें त्या नामांकित शहराविषयीं सांपडतें, त्यांतील मजकूर घेतला आहे. मुंबईची पूर्वीची कशी स्थिति होती, व सद्य: कशी आहे, हा जेवढा मजकूर साध्य झाला तेवढा ह्य़ामध्यें केवळ प्राकृत भाषेंत लिहिला आहे. शब्दचातुर्याकडे व वाक्यसौंदर्याकडे तादृश लक्ष दिल्याशिवाय केवळ बालबोध भाषेचाच क्रम अनुलक्षून ही रचना केली आहे..’’

या प्रस्तावनेत त्यांनी मराठी भाषेविषयीही चिंतन केले आहे. ते लिहितात-

‘‘..मराठी भाषा म्हणजे केवळ क्षुद्र आहे असें कोणी मानूं नये. मराठी भाषा संस्कृत भाषेच्या योग्यतेस देखील देईल. ती विद्वान् लोकांनी मात्र वहिवाटींत आणिली पाहिजे. ह्य़ा भाषेंत अनेक शास्त्रीय विषयांवर ग्रंथ रचून तींत अनेक शब्दांची योजना केली पाहिजे. संस्कृत, युनानी, हिब्रु, लातीन, अरबी, फारशी इत्यादि भाषा विद्वज्जनांनी सुधारल्या, म्हणूनच एवढय़ा योग्यतेस चढल्या. आमच्या कल्पना उष्टय़ा, आमचे विचार परतंत्र, आमची बुद्धि जड, आमची ग्रंथरचना पोरकट, आम्ही दुसऱ्याने संपादन केलेल्या विद्याधनावर फिशारी भोगणारे किंवा उच्छिष्टभोगी, असे जे आम्हांस युरोपियन लोक दोष देतात, त्यांपासून आम्हांस व आमच्या पुढील संततीस तरी आमचे अर्वाचीन ज्ञाते मुक्त करतील, अशी खातरी बाळगून हा ग्रंथ रचिला आहे.. एक विद्वान असें म्हणतो : अनेक भाषा शिकाव्या, आणि मनुष्याने विद्वान व्हावें तें कशासाठीं? स्वभाषेंत अनेक भाषांतील शब्द व कल्पना मिसळून तीस उत्तम प्रतीच्या भाषेची योग्यता आणावी, नाहींतर अनेक भाषा शिकून व विद्वान होऊन लोकांस तादृश लाभ होत नाही. व्यास, वाल्मिक, पाणिनि इत्यादि अमर झाले, ते एक स्वभाषा सुधारल्यावाचून.. दुसरें. ज्ञानेश्वर, वामन, मुक्तेश्वर, तुकाराम, मोरोपंत, रामदास, मुकुंदराज, श्रीधर, सोपानदेव, एकनाथ इत्यादि प्राकृत कवींनी मनावर घेऊन पद्यरचनेंत हजारों ग्रंथ रचले, तेव्हांपासून मराठी भाषा थोडीसी उदयास आली, आणि ती भाषा कांहीं उपयोगी आहे असें लोक मानूं लागले. व आर्या, श्लोक, अभंग, दिंडय़ा, ओव्या इत्यादि वाचण्याची लोकांस गोडी लागली. हे त्यांणीं श्रम केले नसते, तर मराठी भाषा केव्हांच विलयास गेली असती. गद्यरचनेंत शास्त्रीय विषयांवर ग्रंथ झाले नाहींत, ह्य़ामुळें ती शास्त्री व पंडितजनांस मान्य झाली नाही. परंतु हें लक्षांत धरावें कीं, जी भाषा काव्यरचनेस योग्य झाली, ती हलकट असें कोण म्हणेल.’’

या पुस्तकात माडगांवकरांनी केलेले तत्कालीन मुंबईचे वर्णन मुळातून वाचण्यासारखे आहे. त्यातील हा एक उतारा पाहा –

‘‘भरतखंडांत मोठमोठालीं नामांकित शहरें पुष्कळ आहेत; परंतु मुंबई शहरासारखें लहान असून टुमदार व अनेक चमत्कारिक विषयांनीं भरलेलें, कोठें आढळत नाहीं असें बहुतेक सांगतात. आणि ही गोष्ट वास्तविक आहे कीं, ह्य़ा शहरासारखें भरगच्च व नोकदार शहर कोठें विरळा. ह्य़ाचा थाट व ऐश्वर्य पाहूनच कित्येक आपला स्वदेश सोडून एथचे वतनदार झाले आहेत; आणि मुबंईत लोकांची इतकी दाटी होण्याचें बहुतकरून हेंच एक कारण असावें. काय हो सांगावे! सहज रस्त्यांतून जावें तर टोलेजंग वाडे, विस्तीर्ण इमारती, रमणीय बंगले व बागबगीचे पाहूनच मन चकित होऊन जातें.. ‘छप्पन्न भाषा आणि अठरा पगड जात’ अशी एक प्राकृत जनाची म्हण आहे. परंतु मुंबईत सांप्रत किती भाषा चालू आहेत व किती जाति आहेत ह्य़ाचा कांहींच थांग लागत नाहीं. एक मराठी भाषाच तीस चाळीस तऱ्हेची आहे. यावरून दुसऱ्या भाषांचें अनुमान करून पाहूं. हिंदु, यांमध्यें सुमारें शेंदीडशें भेद आहेत- मारवाडी, मुलतानी, भाटय़े, वाणी, जोशी, ब्राह्मण (सुमारें पंचवीस-तीस प्रकारचे ब्राह्मण एथें आढळतात), कांसार, सुतार, जिनगर, लोहार, भंडारी, भोपी, सोनार, शेणवी (ह्य़ांत आठ-दहा प्रकार आहेत), पाताणे परभु, कायस्थ परभु, धुरू परभु, उग्र परभु, शिंपी, खत्री, कांतारी, झारे, पांचकळशे, शेटय़े, लवाणे, कुंभार, लिंगायत, गवळी, घांटी, मांग, ह्मार, चांभार, हजाम, तेली, माळी, कोळी, धोबी, कामाठी, तैलंगी, कानडी, कोंगाडी, घडशी, पुरभय्ये, बंगाली, पंजाबी इत्यादि. आणखी ह्य़ा प्रत्येक जातींत जे क्षुल्लक अंतर्भेद असतात, त्यांचा तर कोणासच अंत लागत नाहीं. आतां दुसऱ्या जाती पाहा- पारशी, मुसलमान, मोंगल, यहुदी, इस्राएल, बोरी, खोजे, मेमण, आरब, कंधारी, अशी अठरा पगड जात आहे. या शिवाय, इंग्रज, पोर्टुगीझ्, फ्रेंच, युगानी, वलंदेजी, तुर्क, जर्मन्, अर्मानी, चिनी इत्यादि टोपीवाले चहूंकडे दृष्टीस पडतच आहेत. ह्य़ा अनेक जातींच्या लोकांचे चित्र विचित्र पोशाक पाहून मनुष्याची कर्मणूक होती इतकेंच नाहीं; परंतु मनांत अनेक विचार उत्पन्न होतात..’’

माडगांवकरांचे सारेच लेखन हे असे चौकसबुद्धी आणि बहुश्रुतपणाने समृद्ध असे आहे. ते आवर्जून वाचायलाच हवे.

संकलन : प्रसाद हावळे prasad.havale@expressindia.com