अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- लो. बाळ गंगाधर टिळक!

मागील लेखात आपण महादेव बल्लाळ नामजोशी यांच्या लेखनाविषयी जाणून घेतले. सुरुवातीला ‘किरण’ व नंतर ‘डेक्कन स्टार’ हे इंग्रजी वर्तमानपत्र त्यांनी सुरू केले. पुढे ते १८८१ साली विष्णुशास्त्री चिपळूणकर, गो. ग. आगरकर व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेल्या ‘केसरी’ व ‘मराठा’ या वर्तमानपत्रांशी जोडले गेले. यातील चिपळूणकरांच्या लेखनाची सुरुवात ‘निबंधमाला’तून झाली असली तरी टिळक व आगरकर ही जोडी मात्र ‘केसरी’ व ‘मराठा’मुळे सर्वपरिचित झाली. मराठीतून निघणाऱ्या ‘केसरी’च्या संपादकपदी सुरुवातीच्या काळात आगरकर होते. ‘केसरी’तून टिळकांचे कायदा व धर्मशास्त्रविषयक लेख प्रसिद्ध होत. अगदी सुरुवातीच्या काळात टिळकांनी लिहिलेल्या ‘दत्तकाची आवश्यकता’ या लेखातील हा उतारा पाहा –

Muslim League, Hindu Mahasabha, coalition government, pre independence alliance
मुस्लीम लीग आणि हिंदू महासभेने मिळून स्थापली होती प्रांतिक सरकारे… स्वातंत्र्यपूर्व काळातील आघाडीबद्दल इतिहास काय सांगतो?
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”
Who was Ramses II
विश्लेषण: गेल्या अनेक वर्षांपासूनचे कोडे आता उलगडणार? कोण होता रामसेस दुसरा? का आहे जगाला त्याचे आकर्षण?
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)

‘‘अर्थशास्त्राची किंवा इतिहासाची ज्यास अगदीं साधारण ओळख आहे, त्यास ही गोष्ट माहीत असेल, कीं अगदीं रानटीं स्थितींत द्रव्याचा संचय कोणीच करीत नसत. संचय केला असतां, तो आपल्याजवळ राहून आपणांस हवा तेव्हां उपयोगीं पडेल अशी त्या वेळेस कोणाचीही खात्री नव्हती. पुढें जसजशी लोकस्थिति सुधारून गांव, शहरें, देश वगैरे व्यवस्था होऊं लागली, तसतसा प्रत्येक मनुष्याचा स्वकष्टार्जित द्रव्यावरील हक्क लोकांनी कबूल केला, व तेव्हांपासून संचय करण्याची इच्छा बळावत चालली.. ज्या देशांत मालमिळकतीचें संरक्षण करण्याचे कायदे जरी अमलांत आहेत, तेथें ही इच्छा अगदीं कळसास गेली आहे. आपल्या जन्मापासून आपणास दुसऱ्या सामाजिक स्थितीच अनुभव नसल्यामुळें, सामाजिक नियमांमुळे आपणांस द्रव्यसंचय करतां येतो ही गोष्ट आपल्या सहज लक्षांत येत नाहीं. तथापि विचारांतीं ती खरी आहे असें लक्षांत आल्याखेरीज राहाणार नाहीं. चोरी, लबाडी, वगैरे अपराध जर लोकमतानें शिक्षेस पात्र नसते, तर हल्लीप्रमाणें द्रव्यसंचय करण्याची कोणी खटपट केली असती काय? द्रव्यसंचय हें सुखप्राप्तीचें एक साधन आहे. एऱ्हवीं त्यास स्वत: कांहीं किंमत नाहीं. हें मनांत आणिलें असतां विनाकारण द्रव्यसंचयाचा दुरुपयोग ‘परस्परभयानें’ बंद करण्याचा हक्क समाजास नाहीं, असें कसें म्हणतां येणार? द्रव्यसंचय करण्यास ज्याअर्थी समाजनियम कारण आहेत, त्याअर्थी कोणीही द्रव्यसंचय केला, तरी त्याचा व्यय चांगल्या कामाकडे करणें, हें त्याचें कर्तव्य आहे.’’

पुढे १८८४ मध्ये टिळक-आगरकरांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व पुढच्याच वर्षी फग्र्युसन महाविद्यालयही सुरू केले. तेथे टिळक गणित व संस्कृत शिकवीत, तर आगरकर तत्त्वज्ञान हा विषय. मात्र पुढील काळात या दोघांमध्ये राजकीय व सामाजिक सुधारणांमध्ये प्राधान्य कशास द्यायचे, यावरून वैचारिक मतभेद झाले. १८८६ मध्ये टिळकांनी ‘आधीं कोण? राजकीय कीं सामाजिक?’ या लेखातून भूमिका मांडली. त्यातील हा काही भाग-

‘‘ज्यांची गृहस्थिति सुधारली नाहीं त्यांची राजकीय स्थिति सुधारावयाची नाही असें ज्यांचें म्हणणें आहे त्यांचा असा भाव आहे काय की अमुक प्रकारची देशांतील लोकांची गृहस्थिति असली म्हणजे अमुक प्रकारची संतोष मानण्यासारखी राजकीय सुधारणा व्हावयाचीच नाहीं, किंवा अमुक प्रकारच्या गृहस्थितींत लोकांचें पाऊल राजकीय कामांत पुढें पडायाचेंच नाहीं असा जर त्यांचा भाव असेल तर तो मोठय़ा चुकीचा आहे. कारण एक तर गृहसुधारणा आणि राजकीय सुधारणा यांचें फारकत कोठें होतें हें दाखविणें अत्यंत दुरापास्त आहे. कोळ्याच्या जाळ्याप्रमाणें यांच्या पदरांची एकांतएक इतकी गुंतागुंत होऊन गेलेली आहे कीं, दिसण्यांत जरी ते दोन प्रकारचे धागे दिसतात तरी उलगडायालाच बसलें तर त्यांच्यांतील भेद दाखविण्याची मुष्कील पडेल.. तारतम्यदृष्टीनें पाहिलें असतां ज्या मार्गानें कार्यशकटाच्या चक्रांस कमींत कमी घर्षण होईल अशानें तो नेण्यांत मनुष्याचा फायदा आहे, हें कोणीही कबूल करील. ज्या रस्त्यावर खाचखळगे नाहींत, ज्यावरील मुरूम दाबून बसविलेला आहे, ज्यानें प्रवास केला असतां भामटय़ांची भीति नाहीं व जो नेहमींच्या रहदारीचा आहे, अशानें जाणें अत्यंत श्रेयस्कर आहे. हिंदुस्थानासारख्या महाद्वीपतुल्य देशांत सामाजिक सुधारणा लवकर घडून आणणें अत्यंत दुरापास्त आहे; व पूर्वीची स्थिति आज असती तर राजकीय सुधारणाही सामाजिक सुधारणेपेक्षां अधिक सुलभ झाली नसती.. आमच्या देशांतील सुधारकांस दोन अवघड किल्ले सर करावयाचे आहेत; एक राजकीय स्वातंत्र्याचा व दुसरा सामाजिक स्वातंत्र्याचा.. आणखी एक लक्षांत ठेवण्याजोगीं गोष्ट अशी आहे कीं राजकीय प्रकरणीं वादांत तर्काचें बरेंच प्राबल्य चालतें; सामाजिक किंवा धार्मिक वादांत तो अगदीं कुंठित होतो. पहिल्या वादांत बुद्धिवर प्रहार होत असतात; दुसऱ्या वादांत मनोविकार दुखविले जातात. बुद्धि अथवा विचारशक्ति मनोविकारांहून अधिक शांत व कमी दुराग्रही असल्यामुळें तिला तत्त्वाचा बोध लवकर होतो व तो एकदां झाला म्हणजे तदनुसार वर्तन करण्यास मनुष्यमात्र फारसा कचरत नाहीं. मनोविकारांची तशी गोष्ट नाहीं. वादानें ते अधिकच चेकळतात व अगदीं अंध होऊन जातात. यासाठीं होतां होईल तों त्यांना कोणीही डिंवचूं नये. त्यांना जागच्या जागीं थंडे होऊं द्यावे. त्यांच्यांतलीं गर्मी नाहींशीं झाली कीं ते नि:शक्त होऊन अखेरीस कापराप्रमाणें उडून जातात. त्यांचा नाश लवकर करावयाचा असेल तर त्यांना सुशिक्षणाचा किडा लावावा. म्हणजे थोडय़ा वर्षांत त्यांचें पीठ होऊन त्यांचा इमला ढांसळतो.’’

पुढील काळातील टिळकांचा राजकीय प्रवास सर्वज्ञात आहेच. पुढे १९०१ मध्ये त्यांनी एकोणिसाव्या शतकातील पुढारीवर्गाचे विवेचन करणारा एक निबंध वाचला. त्यातील हा काही भाग-

‘‘सन १८३७ पासून सन  १८७४ पर्यंत म्हणजे सुमारें ३७ वर्षांत नवीन पुढाऱ्यांच्या दोन किंवा तीन पिढय़ा महाराष्ट्रांत झाल्या असें दिसून येतें. अगदीं पहिली पिढी म्हणजे कै. गोपाळराव देशमुख यांच्या समकालीन किंवा पूर्वीच्या मंडळींची होय. त्यानंतरची पिढी म्हणजे, कै. कृष्णशास्त्री चिपळूणकर व केरूनाना छत्रे यांच्या वेळच्या मंडळीची. आणि तिसरी पिढी कै. कुंटे व रानडे यांच्या वेळची होय. कुंटे व रानडे या दोघांचाही पुण्यास अभ्यास झाला नव्हता; तथापि, त्यांनीं आपल्या आयुष्याचीं बरींच वर्षे येथें घालविलीं असल्यामुळें तत्कालीन पिढीचा उल्लेख त्यांच्याच नांवानें केला आहे. या तिन्ही पिढय़ांपूर्वी विश्रामबागपाठशाळेंतील कै. मोरशास्त्री साठे, त्र्यंबकशास्त्री शाळिग्राम वगैरे मंडळीकडे पुण्यांतील समाजाचें कांहीं वर्षे पुढारीपण होतें. पण ही मंडळी इंग्रजी शिकली नसल्यामुळें त्यांच्या कालाचा सध्यां विचार करण्याची जरूरी नाहीं.. वर सांगितलेल्या तीन पिढय़ांपैकीं पहिल्या पिढींतील लोकांस शाळेमध्यें जीं दहा पांच इंग्रजी पुस्तकें शिकवित असत, त्यापलीकडे विद्येचा विशेषसा संस्कार झाल्याचें आढळून येत नाहीं. त्यांच्यापैकीं कै. गोपाळराव हरि यांनींच काय तो थोडा बहुत विद्याव्यासंग शेवटपर्यंत कायम ठेविला होता. पण बाकी बहुतेक चुटपुटत्या ज्ञानाचेच अधिकारी होते. इंग्रजी राज्यांत या मंडळीस नवीन मिळालेल्या अधिकारानें हे बेपर्वा झालेले होते हें वर सांगितलेंच आहे. पण याखेरीज यांच्या अद्वातद्वा विचार-आचाराच समाजावर व विशेषेंकरून पुढारी कुटुंबांच्या गृहस्थितीवर फारच वाईट परिणाम झालेला होता. सौम्य पण शिस्तवार गृहशिक्षणाचा व गृहस्थितीचा लहानपणीं मुलांच्या मनावर किती परिणाम होत असतो हें मीं येथें सांगावयास पाहिजे असें नाहीं; किंबहुना ज्या देशांतील पुढारी कुटुंबांची गृहव्यवस्था बिघडलेली असते त्यांत चांगले पुरुष निपजणें कठीण आहे असें म्हटलें तरी चालेल. अशा दृष्टीनें पाहिलें म्हणजे इंग्रजीशिक्षणपद्धतीचा आमच्या समाजावर पहिला वाईट परिणाम म्हटला म्हणजे, त्यामुळें झालेली आमच्या पुढाऱ्यांच्या मनाची अव्यवस्थित वृत्ति, आणि सदर वृत्तीच्यायोगें बिघडलेली गृहव्यवस्था हा होय. पहिल्या पिढींतील लोकांस लहानपणीं तरी एक प्रकारचें जुन्या तऱ्हेचें गृहशिक्षण मिळालेलें होतें. पण दुसऱ्या व तिसऱ्या पिढींत त्याचाही लोप झालेला होता.. अशा प्रकारच्या बिघडलेल्या वातावरणांत धर्मनिष्ठा, नीतिधैर्य किंवा सदाचरण यांचें बीजारोपण नवीन पिढीच्या मनांत कितपत होणें शक्य आहे याचा विचार करण्याचें काम मी आपणांकडेसच सोपवितों.. विद्या, नीतिमत्ता, धर्मनिष्ठा, व्यवस्थित आचरण आणि गृहस्थिति यांचा एकमेकांशीं जो नित्य संबंध असावा लागतो, व जो असल्याखेरीज राष्ट्रांतील विद्वान् लोक पुढारीपणा घेऊन जोरानें राष्ट्राचा उत्कर्ष करण्यास पात्र होत नाहींत, तो संबंधच इंग्रजी शिक्षणानें पहिल्यानें तोडून टाकला, ही मोठय़ा दु:खाची गोष्ट होय. नीति दृष्टय़ा याचा काय परिणाम झाला हें वर सांगितलेंच आहे; पण त्याखेरीज इतर बाबतींतही अशा प्रकारच्या एकपक्षी शिक्षणापासून दुसरे अनेक वाईट परिणाम झाले. पाश्चिमात्य इंग्रजी विद्येनें दिपून जाऊन पहिल्या पिढीचे डोळे फिरले. आणि आपल्या देशांतील सर्व कांहीं गोष्टी त्यांस वाईट दिसूं लागल्या असें म्हणण्याचा परिपाठ आहे. पण यांतील खरें बीज काय हें पाहिलें असतां मीं सांगितलेल्या गोष्टीकडेच वळावें लागतें.’’

टिळकांचे ‘केसरी’तील लेखन हे तात्कालिक विषयांसंबंधी असले तरी त्यात सार्वकालिक महत्त्वाचे ठरणारे विचार आहेत. रोखठोक भाषा व ठाम भूमिका हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्टय़. त्यांच्या निबंधांचे मराठीच्या घडणीत मोलाचे योगदान आहे. ‘केसरी’तील त्यांच्या लेखांचे चार खंड उपलब्ध आहेत, ते वाचायलाच हवेत.

प्रसाद हावळे prasad.havale@expressindia.com