अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे कळावे आणि आपण आज या वळणाच्या कोणत्या टप्प्यावर आहोत, याबद्दलचे प्रश्न सुजाण वाचकांना पडावेत याकरता हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- हरि केशवजी पाठारे !

इ.स. १८३६ मध्ये दादोबा पांडुरंग तर्खडकरांचे ‘महाराष्ट्र भाषेचे व्याकरण’ आले. त्याच्या आगेमागे दोन महत्त्वाची पुस्तके रचली गेली. त्यातील एक होते ‘सिद्धपदार्थविज्ञानशास्त्रविषयक संवाद’ (१८३३), तर दुसरे म्हणजे ‘रसायनशास्त्रविषयक संवाद’ (१८३७). ही दोन्ही पुस्तके म्हणजे मिसेस मार्सेट या इंग्रज लेखिकेच्या अनुक्रमे ‘कॉन्व्हर्सेशन्स ऑन नॅचरल फिलॉसॉफी’ व ‘कॉन्व्हर्सेशन्स ऑन केमिस्ट्री’ या पुस्तकांची भाषांतरे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीने जे शास्त्रविषयक व शालोपयोगी ग्रंथ प्रसिद्ध केले, त्यातली ही पुस्तकं. ती केली होती हरि केशवजी पाठारे यांनी. या पुस्तकांनी त्यांना भाषांतरकर्ते म्हणून लोकप्रियता मिळवून दिली. पुढे १८३८ साली त्यांनी ‘हिस्टरी ऑफ इंग्लंड’ या ग्रंथाचे ‘इंग्लंडचा वृत्तांत’ हे, तर १८४१ साली जॉन बन्यन या इंग्रज लेखकाच्या ‘द पिल्ग्रिम्स प्रोग्रेस’ या ग्रंथाचे ‘यात्रिकक्रमण’ हे भाषांतर प्रसिद्ध केले. त्यातले ‘यात्रिकक्रमण’ हे फारच गाजले. हेही पुस्तक संवादरूपात आहे. त्यातील हा उतारा-

sanjay raut on yogi adityanath
योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून संजय राऊतांचे टीकास्र; म्हणाले, “योगींनी यूपीतच थांबावं, तिथे…”
jalgaon bjp marathi news, eknath khadse marathi news
“एकनाथ खडसे भाजपमध्ये येतील, तेव्हा…”, गिरीश महाजन यांचे सूचक वक्तव्य
Ashok Chavan
“जो मै बोलता हूँ, वो मै..”, जाहीर सभेत अशोक चव्हाणांचा ‘रावडी’ अंदाज
What Devendra Fadnavis Said?
“आमचं स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केलं, मी त्यांचे आभार मानतो”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत

‘‘नंतर मी पहातो तों तें उभयतां बाजार सोडून पुढें चालले नाहींत इतक्यांत पुढें एक गृहस्थ चालला होता त्यांची गांठ पडली. त्यांचें नांव कृत्रिमहेतुक. त्यास यांनी विचारलें, कां महाराज आपला गांव कोण, आणि आपण किती दूर चालला? त्याजवरून त्यानें उत्तर दिल्हें कीं मी मधुरवाणीपुराहून आलों आणि दिव्यपुरास जात आहे. याप्रकारें तो बोलला, परंतु त्यानें आपलें नांव सांगितलें नाहीं. ख्रिस्ती पुसतो, अहो आपण मधुरवाणीपुराहून आलां काय? त्या पुरांत कोणी चांगला गृहस्थ राहतो काय? कृत्रिमहेतुकानें उत्तर केलें, होय राहतोसा वाटतो.

ख्रिस्ती – बरें, महाराज आपलें नांव काय?

कृत्रिमहेतुक – तुमची आमची ओळख नाहीं. आपण या मार्गानें जात असला तर मी आपल्या समागमें येईन, आपण जर जात नसला तर मग एकटेंच जाणें प्राप्त.

ख्रिस्ती – म्यां असें ऐकिलें आहे कीं, मधुरवाणीपूर मोठें मातबर शहर आहे.

कृत्रिमहेतुक – होय, मोठें मातबर आहे, व माझीं तेथें मोठीं मोठीं मातबर सोयरीं आहेत.

ख्रिस्ती – आपलीं तेथें कोण कोण मातबर सोयरीं आहेत?

कृत्रिमहेतुक – माझीं तेथें बहुधा सर्व गांवभर सोयरीं आहेत; त्यांतून कित्येकांची नांवें सांगतों. बहुमतराव, कार्यसाधकराव, मधुरवाणीराव; या मधुरवाणीरावजींच्या नांवावरून आमच्या नगराचें नांव मधुरवाणी असें पडलें; सरळदर्शकजी, द्विमार्गचरजी, उत्तमानुत्तमसमजी, हे ही आमच्या गांवीं आहेत. द्विमुखजी, हे आमच्या गांवाचे धर्मोपदेष्टे आणि आमच्या आईच्या बंधुवर्गातील आहेत. आम्ही आलिकडेस कुलीन झालों, आमचा पणजा तर वल्हीं मारणाराच होता. तो पुढें पाही, आणि मागें जाई, व त्याच धंद्यानें मला इतकी संपत्ति मिळाली.

..नंतर ख्रिस्ती कांहींसा एकीकडेस होऊन आपल्या आशावान सोबत्यास बोलतो. अहो हा गृहस्थ तर मला मधुरवाणीपुरांतील कृत्रिमहेतुक दिसतो; आणि हा जर तोच गृहस्थ असला तर एथें जे सोदे आहेत त्यांमध्यें यापेक्षां कोणी मोठा सोदा नाहीं. आशावान उत्तर देतो, तो कोण आहे, हें त्यास पुसावें; मला वाटतें त्यानें आपलें नांव सांगायास लाजू नये. त्याजवरून ख्रिस्ती त्याच्याजवळ जाऊन म्हणतो, आपल्या बोलण्यावरून तर आपण असें दाखवितां कीं, आपणांस जगांतील सर्व लोकांपेक्षा कांहीं विशेष कळतें, पण मी जें अटकळेनें सांगतो तें नीट असावें. अहो, मधुरवाणीपुरांतील कृत्रिमहेतुक हें आपलें नांव नाहीं काय?

कृत्रिमहेतुक – तें माझें वास्तविक नांव नाहीं, तें आडनांव ठेविलें आहे. असो, तें निंदेचें नांव म्या सहन करून उगेंच असावें. पूर्वी जे उत्तम गृहस्थ होऊन गेले, त्यांनी अशींच नांवें साहलीं आहेत.

ख्रिस्ती – बरें पण असलें नांव पडायाजोगी आपण लोकांबरोबर वर्तणूक तर केली नाहीं ना?’’

‘यात्रिकक्रमण’नंतरही हरि केशवजींचे लेखन सुरूच होते. १८४६ साली त्यांनी ‘मॉरल टेल्स’चे भाषांतर केले. ‘शालेपयोगी नीतिग्रंथ’ या नावाने ते प्रसिद्ध होते. त्यातील हा उतारा पहा –

‘‘आपण ज्या देशांत जन्मलों व आपलें पालणपोषण झालें, त्या देशावर प्रीति करणें ही एक आपल्या स्वाभाविक वृत्तींतलीच वृत्ति होय. कोणी कसेही गंव्हार असोत अथवा त्यांचा तो देश इतर लोकांस कितीही तुच्छ वाटो, परंतु ही प्रीति प्राय: सर्व देशीं जन्मलेल्या मनुष्यांच्या मनांत वागती. ही वृत्ति विवेकाचे मर्यादेंत राही असी ठेविली असतां इचा उपयोग आहे. ही प्रत्येक देशीच्या लोकांच्या ठायीं आपआपल्या सर्वसाधारण भूमीविषयीं आस्था उत्पन्न करिती त्यास त्या भूमीवर इतर देश चढ करूं लागले असतां त्याजपासून तिचा बचाव करायास, तिचे साधारण कल्याण वृद्धिंगत करावयास व तेथले जे कोणीं त्या आवघ्याविषयीं आपल्या मनांत प्रीति वागवावयास प्रवृत्त करिती.. परंतु स्वदेशप्रीति परिमितपणें करून अशी उत्तम असतां तिचा अतिशय केला अथवा ती विवेकानें आवरिली नाहीं, तर अनुचित आणि अपकारक होती. देशसंबंधानें जीं आपलीं व्यंगें अथवा सुधारणूक ज्यास पाहिजे अस्या जनव्यवहारांतल्या ज्या आपल्या चुक्या यांविषयीं आपल्यास तीं आंधळें करी असें आपण करून घेऊं नये. आपण आपल्या देशावर प्रीति करितों म्हणून अन्य देशांचा व तेथल्या राहणारांचा द्वेष अथवा धिक्कार करूं नये; हें, माझ्यासमान मान्यता व सद्गुण दुसऱ्या कोण्या मनुष्यास नाहीं असें प्रत्येक मनुष्यानें आपल्यास थोर मानिलें असतां जसें वाईट होतें तसें होईल. गैरवाजवी आगळिकेपासून आपल्या देशाचा बचाव करण्याविषयीं सिद्ध असण्यांतहि आपण सावधगिरी ठेवावी. नाहीं तर शेजारचे देश आपल्यास पुरतेपणीं संतापवीत नसतां त्यांजवर शस्त्रें धरावीं, असा भाव कदाचित् आपल्या ठायीं उत्पन्न होईल, कां तर युद्ध हें एक घोर अनिष्ट होय. त्याचा आश्रय अत्यंत आवश्यकता असली तर करावा, नाहीं तर कदापि करू नये. कसबें व व्यापार होई असें करून आपल्या देशाचें कल्याण वृद्धिंगत करण्याचा आपण यत्न करीत असतां या प्रकरणीं इतर देशास अपाय केल्यानें आपल्या देशाचें हित होईल असें आपण कल्पूं देऊं नये. याविपरीत असें आहे कीं, इतर सर्व देशांची संवृद्धि झाली असतां प्रत्येक देशाचें हित होतें. कां तर एखादा देश संवृद्ध झाला असतां इतरांकडेस जें विकायाचें असतें तें त्या इतरांपासून विकत घ्यावयास समर्थ होतो. सारांश मनुष्यांच्या वर्तनाविषयीं जे नियम ते देशाविषयीं एकसारिखे लागू पडतात. आपल्या स्वार्थाचे सर्व सरळ उपायें करून संवर्धन करायास आपला यत्न चाले तेथपर्यंत आपल्यावर प्रीति केली पाहिजे आणि आपल्याकडून घडायाजोगें असेल तसें त्यांचें सर्व प्रकारें बरें केलें पाहिजे, त्यांचें त्यानें निखालस वाईट करूं नये. असें जें उभयप्रकरणीं समान वर्तन हें उभयपक्षींच्यांस चांगलें आहे; कां तर जसे जसे आपले शेजारी समाधानी, सुखी व चांगले होतात, तसें तसें आपल्यास त्यामध्यें राहणें विशेष आनंदकारक, विशेष हितकारक होतें आणि जसेजसे इतर देश सम्वृद्ध संतुष्ट व क्षोभरहित होतात तसेंतसें आपल्या देशाची संम्वृद्धि व अक्षोभता होण्यास चांगलें होतें.’’

हा ‘नीतिग्रंथ’ त्या वेळी अनेक वर्षे शालेय अभ्यासक्रमात होता. पुढे १८५४ मध्ये त्यांचे ‘देशव्यवहारव्यवस्था’ हे  पुस्तक प्रकाशित झाले. ते मिसेस मार्सेटच्या ‘कॉन्व्हर्सेशन्स ऑन पॉलिटिकल इकॉनॉमी’ व जॉन स्टुअर्ट मिलकृत ‘प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी’ या दोन ग्रंथांवर आधारलेले आहे. गोपाळ नामक स्वदेशाचे हित चाहणारा गृहस्थ आणि त्याचा गुरू यांच्यातील प्रश्नोत्तररूपी संवाद असे त्याचे स्वरूप आहे. अनेक श्रीमंत देशांप्रमाणे आपलाही देश सुखाने नांदावा यासाठी काय उपाय करावा, या प्रश्नावर गुरू असे उत्तर देतात की, ‘‘देश सुखानें नांदूं लागणें यास संपत्ति कारण होय; ह्मणून संपत्तिविषयक जें शास्त्र, त्यास देशव्यवहारव्यवस्था म्हणतात, तें पढावें ह्मणजे देश संपत्तिमान् होण्याचें साधन काय तें समजूं लागेल.’’ त्यातील हा काही भाग –

‘‘गोपाळ – महाराज, अमुक अमक्याचा स्थावर माल, असें ठरविण्याच्या कायद्यावरून अनहित होईल ह्मणून माझ्या ज्या शंका होत्या, त्या अवघ्यांचें आपण पुरतेपणीं समाधान केलें. आतां संपत्ति व सुधारणूक यांविषयीं जें आपलें बोलणें तें चालवावें.

गुरु – आपण हळूहळू चालावें, कां तर सुधारणुकीचीं एकामागें एक पाउलें फार हळूहळू पडत गेलीं आहेत. मनुष्यांचे बुद्धीचा उदय होतो, उद्योग चालूं लागतो, परंतु हे प्रकार तरीं एकामागें एक असे क्रमेंकरून होतात; आणि कोणाच्या लक्षांत येऊं नये इतकी त्या उदय होण्याची व उद्योगाची गति हळू असती.

गोपाळ – एका राजाच्या समयीं लोकांत एकी, स्नेहभाव, स्वदेशाभिमान, कला, विद्या, व्यापार, असीं प्रवृत्त होत असतील, आणि एकाच्यासमयीं सद्गुणांचा ऱ्हास होऊन विद्यादिकांची अनास्था, विषयभोग, असत्य, ज्ञातिवैषम्य, परस्परद्रोह हीं सर्वत्र प्रगट होत असतील. बरें, त्या दोन्हीं राजांचें समान बल असतां, तशांत या भरतखंडासारिखा देश जेथें भूम्यादिक, नदीस मुद्रादिक हीं कृषिशिल्पव्यापारादिकांस केवळ अनुकूल, व सांप्रतकाळींचे राज्यकत्त्रे तर सुधारणुकीचे मोठे साह्य़कत्त्रे असें असतां दरिद्रास राज्य करावयास कसें साधलें.

गुरु  – ज्ञान, व्यवस्था, सत्य असे जे ऐश्वर्याचे प्रधान त्यांनीं एकनिष्ठेनें आपल्या स्वामीची सेवा करणें सोडून दिलें, अशा संधीस अज्ञानादि जे दरिद्राचे प्रधान त्यांचें साधलें; अर्थात ऐश्वर्याचा पराभव झाल्यासारिखें झालें. असो, पण जरी ऐश्वर्य पराजित राजासारिखें दोन दिवस लपून राहिलें होते, तरी त्यानें आतां स्वराज्य घेण्याविषयीं कंबर बांधिली आहे. आणि जे जे प्रधान व जे जे शिल्पादि सरदार फितले होते तेही अनुकूल होऊं लागले आहेत, याच संधीस देशव्यवहारव्यवस्थासूचक असा त्वां प्रश्न केला. त्यास कृषि, शिल्प, व्यापार इत्यादिकांचा आश्रय करून देशव्यवहारव्यवस्थाशास्त्रांतील युक्ति घेऊन दरिद्राचा उच्छेद करावा, म्हणजे ऐश्वर्य संपत्तिसहित या देशीं चिरकाळ नांदूं लागेल.’’

संकलन – प्रसाद हावळे

प्रसाद हावळे prasad.havale@expressindia.com