अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- मोरोबा कान्होबा!

‘घाशीराम कोतवाल’ नाव घेतले की चटकन् आठवते ते याच नावाचे विजय तेंडुलकरांनी लिहिलेले नाटक. आजही हे नाटक नाटय़जीवींना खुणावत असते. हे नाटक लिहिण्यासाठी ज्या पुस्तकांचा आधार होता, त्यातले एक पुस्तक होते मोरोबा कान्होबांचे. त्याचेही शीर्षक होते- ‘घाशीराम कोतवाल’! या मोरोबांचे आडनाव विजयकर. बाळशास्त्री जांभेकरांचे ते सहाध्यायी. त्यावेळच्या शिक्षित तरुणांप्रमाणे शिक्षण संपवून मोरोबाही सरकारी नोकरीत रुजू झालेले. प्रथम अनुवादक व पुढे न्याय खात्यात विविध पदांवर त्यांनी काम केले. अहमदनगरच्या न्यायालयाचे न्यायाधीश असताना त्यांनी ‘घाशीराम कोतवाल’ हे पुस्तक लिहिले. पुण्याच्या ज्ञानप्रकाश छापखान्याने ते १८६३ साली प्रसिद्ध केले. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच मोरोबांनी घाशीरामविषयी  माहिती पुरवली आहे-

Rana Kapoor gets bail in latest case will be out of jail after four years
राणा कपूर यांना अखेरच्या प्रकरणातही जामीन, चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर पडणार
Kishori Pednekar, pre-arrest bail,
करोना वैद्यकीय साहित्य खरेदीतील गैरव्यवहार प्रकरण : पोलिसांच्या ना हरकतीनंतर किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन
Narayan Rane case, Vinayak Raut, Parab,
२००५ नारायण राणेंच्या सभेतील गोंधळाचे प्रकरण : विनायक राऊत, परब, सावंत, देसाई, रवींद्र वायकर यांची निर्दोष सुटका
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी

‘‘घाशीराम सावळादास या नावाचा कनोज ब्राह्मण, हिंदुस्थानचा राहणारा, पेशवाईंत पुणें शहरांत रोजगाराकरितां येऊन राहिला. तो प्रथम कांहीं दिवस सरकार दरबारांत जाऊन मुत्सद्दी मंडळीचे अर्जवांत असून उमेदवारी करून पोट भरीत होता. पुढें त्याची कन्या सुस्वरूप होती. तिजवर बाळाजी जनार्दन भानू उर्फ नानाफडणवीस यांचा मोठा लोभ झाल्याचे योगानें घाशीराम याजला शहराची कोतवाली प्राप्त झाली. तें काम चौदा-पंधरा वर्षे त्यानें केलें, त्यांत स्तुत्य असें त्याचे हातून कांहींच कृत्य घडलें नाहीं. कोतवालीचे बळानें प्रजेवर होईल तितका जुलूम मात्र त्यानें केला, व लांचलुचपत घेऊन द्रव्य जमविलें. नानाफडणवीस यांची मेहेरनजर त्याजवर नसती तर इतकीं वर्षे कोतवालीसुद्धां त्याजकडेस न राहती. अंतीं फार उन्मत्त होऊन एका दिवशीं तैलंग ब्राह्मणांस एका लहानशा खोलींत दडपून घालून त्यानें कोंडलें, त्यामुळें कांहीं ब्राह्मणांचे जीव गेले. तें वर्तमान मानाजी शिंदे, ज्यांस मानाजी फांकडे ह्मणत, त्यांस कळल्यावरून त्यांनी माधवराव नारायण पंतप्रधान उर्फ सवाई माधवराव यांजला निवेदन केलें. तेसमयीं श्रीमंतांस फार क्रोध येऊन त्यांनीं घाशीराम याचें पारिपत्य होईल तेव्हां अन्नास स्पर्श करीन अशी प्रतिज्ञा करून घाशीराम याजला धरून आणावा म्हणून आज्ञा केली. त्याजवरून घाशीराम हा नाना फडणविसाचे वाडय़ांत लपला व त्याचा जीव वांचविण्याकरितां नानासाहेबांनीं आपली पराकष्टा केली, परंतु श्रीमंतांचे निग्रहापुढें काहीं उपाय न चालतां घाशीराम याचे पाय साकळदंडाने हत्तीचें पायांत बांधून शहरांतून ओढीत न्यावें अशी सरकारची आज्ञा होऊन घाशीराम याजला हत्तीचे पायाशीं दिल्हें; त्यांत डोकें फुटून व शरीर छिन्न भीन्न होऊन त्याचा अंत झाला.’’

यातच पुढे या पुस्तकाचा उद्देशही ते सांगतात,

‘‘याप्रमाणें कोतवालाचा परिणाम शके १७१४ इसवी सन १७९२ याचे सुमारास झाला. तेसमयीं त्याचें वय अजमासें पंन्नास वर्षांचें होतें. ह्य़ा कोतवालाचे कारकीर्दीचे संबंधानें ह्य़ा ग्रंथात लोकांचे मनोरंजनार्थ व उपदेशार्थ गोष्टी लिहिल्या आहेत, त्या प्रत्येक गोष्टीचें तात्पर्य काय याचा विचार करून ग्रंथ वाचिला असतां ह्य़ा कोतवालाचे वेळेस किती अंदाधुंदी होती व विद्वान ह्मणविणारे लोकांस देहाभिमान व जात्यभिमान मोठा असून त्यांचा नीतिमार्ग किती अशुद्ध व साधारण विषयां विषयीं केवढें अज्ञान होतें हें सहज कळून येईल.’’

घाशीरामचा ज्या विविध व्यक्तींशी संवाद झाला, त्याच्या वर्णनातून अनेक प्रकारची माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे, हीच हे पुस्तक लिहिण्यामागची मोरोबांची भूमिका होती. या पुस्तकात मनोरंजक, काही अति गमतीदार अशा २८ कथा येतात. या सर्व कथा संवादातून आपल्यासमोर उलगडत जातात. पुण्याच्या ब्रिटिश रेसिडेंटबरोबर घाशीरामचा झालेला संवाद पुस्तकातील तिसऱ्या गोष्टीत आला आहे. त्यातील काही भाग असा-

‘‘एका दिवशीं नानाफडणवीस यांनीं घाशीरामास संगमावरील इंग्रजसरकारचे रेसिडेंट साहेबांकडे कांहीं कामा करितां पाठविलें होतें. तेथें कामाचा मजकूर संपल्या नंतर बोलणें चाललें तें येणें प्रमाणें –

कोतवाल – समुद्र ह्मणतात तो आपले पाहण्यांत आहे काय?

रेसिडेंट – होय, पाहण्यांत आहे. आमचा देश समुद्रांतच आहे. आह्मी तेथून जाहजांत बसून या देशांत येतों.

कोतवाल – असें काय! आपला देश येथून किती दूर आहे, तेथून येथें येण्यास किती दिवस लागतात?

रेसिडेंट – चार हजार कोस सुमारें आहे. तेथून येण्यास तीन चार महिने लागतात.

कोतवाल – जाहजाची सडक किती रुंद आहे? वाटेंनें बाप देवाचे घाटा प्रमाणें घाट लागत असतील, व वाटेंनें उतरण्यास धर्मशाळा असतीलच?

रेसिडेंट – समुद्र निराळा व जमीन निराळी. समुद्र हें खार पाणी आहे, व पृथ्वीवर जमीनी पेक्षां समुद्र जास्ती आहे. समुद्रांत सडक नसते. तुह्मी पृथ्वीचा नकाशा कधीं पाहिला नाहीं काय?

कोतवाल – श्रीमंतांचे वाडय़ांत व पुणें शहरांत अनेक ठिकाणीं शिंदे, होळकर यांच्या तसबिरा आहेत. त्या प्रमाणेच पृथ्वीचा नकाशा असेल?

रेसिडेंट – नाहीं नाहीं, तसा नाहीं. तुह्मांस पृथ्वीचा नकाशा दाखवितों. (असें बोलून भिंतीस पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध असे दोन नकाशे लाविले होते, ते दाखविले.)

कोतवाल – आतां समजलों. हीं दोन्हीं चक्रें जाहजाचीं चाके  असतील, आणि त्या खालची काठी हा आंख असेल. त्यावर जहाज बसवून समुद्रांतनं ओढीत नेत असतील.

रेसिडेंट – आपले सारखे जलद समजणारे लोक श्रीमंतांचे पदरीं आहेत हें पाहून आह्मांस मोठें आश्चर्य वाटतें. नानासाहेबांची भेट होईल तेव्हां आपले विषयींचा मजकूर सांगूं.’’

बाहेरच्या जगाची फारशी माहिती नसलेली देशी राजवट संपून नवा राज्यकर्ता वर्ग येथे येतो. हे राज्यकर्ते नव्या विद्याशाखांशी परिचित असलेले; त्यामुळे त्यांची अनुभवदृष्टीही व्यापक. ती आपल्या लोकांस कळावी, या उद्देशाने मोरोबांनी हे पुस्तक रचले आहे. पण हे करताना त्यांनी अतिरंजित वर्णनेही केलीत. परंतु तरीही पुस्तक तेव्हा बरेच लोकप्रिय झाल्याचे आढळते. घाशीरामच्या स्वभावदोषांवर बोट ठेवणारा पुस्तकातील अकराव्या गोष्टीतील हा भाग पाहा-

‘‘एक बोहरी मण्यारी जिनसा व कांहीं ग्रंथ वगैरे विकण्या करता पाटींत भरून फिरत होता. तों कोतवाल चावडीवरून जात असतां, त्याला घाशीराम यानें बोलाविलें आणि तो त्याचें सामान पाहूं लागला. त्यावेळीं बोहरी एक ग्रंथ ऊचलून कोतवालास ह्मणाला.

बोहरी – कोतवाल साहेब, हा ग्रंथ आपले संग्रहांत ठेवण्यास लायक आहे.

घाशीराम – कसला ग्रंथ आहे व त्याची किंमत काय?

बोहरी – इंग्रजी भाषेतला ग्रंथ आहे. यांत पृथ्वीवरील सर्व चमत्कार लिहिले आहेत; त्याचे शंभर शिक्का रुपये पडतील.

घाशीराम – (चप्राशास हाक मारून) अहो नाईक, आपला फिरंगी लिहिणार सोजा किरस्ताव याला हांक मारा. (सोजासिनोर आल्यावर त्यांस) अहो ह्य़ा ग्रंथांत काय आहे तें पहा.

सोजासिनोर – (ग्रंथांची पानें उलट पालट करून) ह्य़ांत फारच चमत्कारीक प्रकरणें लिहिलीं आहेत. त्यां पैकीं पहिल्या प्रकरणांत झोंपेंत उठून फिरण्याची खोड कांहीं मनुष्यास असते ती विषयीं गोष्टी लिहिल्या आहेत. एक गोष्ट अशी आहे कीं कोणी मनुष्य झोंपेंत असतां आपले पाठीस पोळ लागला आहे असें त्यास स्वप्नांत दिसून एकाएकीं त्यानें आपले बिच्छान्यांवरून उडी मारून घडवंचीवर चढावें; अथवा पळत सुटावें. एक दासी असे, तिनें झोंपेंत हत्रुणावरून उठून घरा बाहेर जावें. त्या प्रसंगीं तिला कोणीं कांहीं विचारलें असतां तिनें सावध असल्याप्रमाणें त्या प्रश्नाचें उत्तर द्यावें. तिचे आंगास टांचण्या अथवा दुसरें कांहीं बोंचलें तरी तिला तें समजत नसे.. निद्रेंतले निद्रेंत उठून जागृता प्रमाणें वर्तणूक करणारे लोक पुष्कळ असतात.

कोतवाल – बोहराजी शेट, हा ग्रंथ आह्मी ठेवतों. उदईक तुह्मांस पाहिजे तेथील हुंडी देऊं, नाहींतर रोख रुपये चुकवून देऊं.

त्यावरून बोहरी बरें आहे ह्मणून त्या दिवशीं निघून गेला, आणि दुसरे दिवशीं कोतवालाचे घरीं पैका मागण्यास आला तेव्हां चौकीदारानें सांगितले कीं आज कोणास वाडय़ांत जाण्याची परवानगी नाहीं; उद्यां या. त्यावरून बोहऱ्याने पांच पन्नास खेपा घातल्या, तरी कोतवालाचे दर्शन होईना. नंतर इलाज नाहींसा झाला असें पाहून कोतवाल याला रस्त्यानें जातांना गाठून आमचे ग्रंथाची किंमत अद्यापि हातीं आली नाहीं ह्मणून तो बोलिला. त्या गोष्टीचा कोतवालास राग येऊन त्यानें उत्तर केलें कीं तूर्त पन्नास रुपये द्यावे ह्मणून आमचे कारभारी चिंतोपंत दादा यांला सांगतिलें आहे, त्याकडेस जाऊन रुपये घ्यावे; पुढें बाकीचे रुपयां विषयीं सांगू. नंतर बोहरी चिंतोपंता कडेस गेला, त्याची ही गांठ पडेना. तेव्हां त्याचे हाताखालील कारकून गोपाळपंत ह्मणून होता, त्याला व छडीदारदार राघोजी चव्हाण होता, याला दाहा रुपये देऊं करून कारभाऱ्याची त्यानें भेट घेतली. तेव्हां दोन महिन्याचे वायद्यानें तुह्मास चाळीस छापी रुपये देण्यास कोतवाल साहेब यांनीं सांगितलें आहे. जर तुह्मास घाई असेल तर आठ रुपये व्याजाबद्दल कापून देऊन बाकीचे रुपये ३२ घेऊनजा, असें त्यानें सांगितलें. बोहोऱ्यानें निरुपाय होऊन छापी रुपये ३२ घेण्याचें कबूल केल्यावरून चिंतोपंतांनी छापी रुपये ३२ देऊन रुपये ४० ची पावती मागितली; पण अशी पावती कशी देऊं ह्मणून बोहरी ह्मणूं लागला असतां जितके रुपये द्यावे त्यांचे सवाईचा लेख करून देण्याची सर्व सावकारींत चालच आहे; हें तुह्मांस खरें वाटत नसल्यास जाऊन शोध करून या; आणि मग सावकास रुपये न्या; असें चिंतोपंत ह्मणाला. ते समयीं एक गाठ पडण्यास इतके आयास, तेव्हां पुन्हा भेटण्याची गोष्ट कशाला पाहिजे? असा बोहऱ्यानें मनांत विचार करून रुपये च्याळिसांची पावती निमूट लिहून दिली. इतक्यांत त्या बत्तीस रुपयांचे रकमे पैकीं दहा रुपये गोपाळपंत व राघोजी चव्हाण यांनीं हिसकून घेतल्यावरून शंभर शिक्का रुपयाचे ऐवजीं बेवीस रुपये छापी हातीं आले व ते ही येण्यास महत प्रयास करावे लागले, हें पाहून बोहऱ्याचा जीव फारच संतापला आणि मी इंग्रज सरकारचे लष्करांतील राहाणारा आहें. माझी अशी अवस्था झाली हा मजकूर संगमावर जाऊन रेसिडेंट साहेब यांला कळवितों व तुमची सर्वाची खबर घेववितों, अशी मोठय़ाने आरोळी मारून ‘‘इंग्रज सरकरचे रयतेस लुटलेंरे लुटलें,’’ ह्य़ा प्रमाणें ओरडतच तो तेथून निघाला..’’

तर असे हे पुस्तक. त्यावेळच्या वातावरणात या पुस्तकाने धमाल उडवून दिली होती. परंतु आजही या पुस्तकाचे वाचन आनंददायकच ठरेल.

‘घाशीराम’ लिहिणाऱ्या मोरोबांची आणखीही एक बाजू होती. ती म्हणजे कर्त्यां सुधारकाची. मुंबईत १८६५ मध्ये स्थापन झालेल्या ‘पुनर्विवाहोत्तेजक मंडळी’च्या पहिल्या ७४ सभासदांपैकी मोरोबा हे एक होते. विधवाविवाहावर त्यांनी दिलेले एक व्याख्यान १८७० मध्ये पुस्तकरूपाने प्रकाशित झाले होते. त्याच वर्षी मोरोबांनी एका विधवेशी पुनर्विवाह केला. या लग्नानंतर काहीच दिवसांत मोरोबा आणि त्यांची पत्नी यांची प्रेते एका विहिरीत आढळली. या दोघांच्या मृत्यूचे गूढ मात्र उकलू शकले नाही.

संकलन -प्रसाद हावळे prasad.havale@expressindia.com