अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- विश्वनाथ नारायण मंडलिक!

मोरोबांचे ‘घाशीराम कोतवाल’ १८६३ मध्ये प्रकाशित झाले, हे आपण गेल्या आठवडय़ात पाहिले. त्याच सुमारास मुंबईतील सुशिक्षित तरुणांच्या एका वर्तुळात इंग्रजी भाषेतून पत्र सुरू करण्याचे ठरत होते. त्यात विश्वनाथ नारायण मंडलिक हे पुढाकार घेत होते. त्यांच्या प्रयत्नांतून १८६४ च्या आरंभापासून हे पत्र इंग्रजीतून सुरू झाले. ‘नेटिव्ह ओपिनियन’ हे त्याचे नाव. पुढे दोन वर्षांनी त्यात मराठी लेखांचाही समावेश करण्यात येऊ लागला. थोडय़ाच काळात केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशीही त्याचे अनेक वाचक झाले होते. त्यामुळे या पत्राचे संस्थापक वि. ना. मंडलिक यांची बरीच ख्याती तेव्हा झाली. परंतु मंडलिकांच्या लेखनाची सुरुवात त्याच्याही काही वर्षे आधी झाली होती. १८५७ मध्ये त्यांचे ‘संवयी व अभ्यास यांविषयी ग्रंथ’ हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यातील हा काही भाग पाहा-

Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
accused in child sexual abuse case arrest after three years
बाललैंगिक अत्याचारप्रकरणी तीन वर्षांनंतर आरोपीस अटक
CET Cell, Reschedules Entrance Exams, for Third Time, lok sabha 2024, elections, Releases Revised Schedule, marathi news,
विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात पुन्हा बदल, सीईटी सेलकडून सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध

‘‘आपल्या लोकांस उतरती कळा प्राप्त होण्यास सत्य व उद्योग यांचा अनादर होत गेला हें कारण होय. आहार निद्रा इ. पशुसाधारण क्रियांमध्यें आमच्या लोकांच्या उद्योगाचें पर्यवसान होतें. आणि तो उद्योगही मनस्वी होतो तेणें करून प्रवृत्ति मर्गाची सिद्धि होत नाहीं. मनुष्याच्या उत्पत्तीचा हेतु काय? कर्तव्य अकर्तव्य काय? मनुष्यासारख्या उच्चस्थितीच्या प्राण्यानें ईश्वराच्या अगाध करणीचा शोध लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असंख्य सृष्टय़ांतर्गत व्यापारांच्या नियमांचें उद्घाटन केलें पाहिजे; व त्यापासून लोकोपकार करण्यास प्रवृत्त झालें पाहिजे. असा उद्योग करण्याची प्रवृत्ति होण्यास आमच्या लोकांच्या संवयी बदलल्या पाहिजेत.

कोणत्याही देशाच्या मोठेपणाची इमारत सत्य व उद्योग या दोन मजबूत चिऱ्यांवर उभारावी लागते. या दोहोंसही अभ्यासाची जोड लागते. पोटापुरतें मिळवून स्वस्थ बसूं नये. शाळांतील अभ्यास हा मार्ग दाखविण्याकरतां आहे. पहिली शाळा सोडल्यावरच वास्तविक अभ्यासास दुसरी शाळा जें जग त्यांत सुरवात होते. विद्या ह्मणजे ज्ञान तें मिळविणें, हें काम शेवटपर्यंत चालणारच आहे..

मित्रहो! आपल्यामध्यें स्वस्थ बसून गोष्टी सांगण्याची आणि निर्थक वेळ घालविण्याची दुष्ट संवय पडून गेली आहे. ही जरी व्यभिचारादि दुष्टचालीपेक्षां वरून पाहिलें असतां निरुपद्रवी चाल दिसत्ये तरी ही सर्व दुर्गुणांची माता आहे. हिचा आळसाशीं समागम होऊन जी प्रजा उत्पन्न झाली आहे, तिणें आपला देश उद्ध्वस्त करून टाकिला आहे. आतां उद्योग व अभ्यासरूप खड्ग धरून जर तुम्ही तिचा शिरच्छेद न कराल तर ती तुमचा सर्वस्वापहार करील.’’

मंडलिक हे मूळचे रत्नागिरीतील मुरुडचे. सुरुवातीचे शिक्षण तिथेच झाले, तर पुढे इंग्रजी शिक्षण मुंबईतील एल्फिन्स्टनमध्ये. त्यामुळे त्यांचा ज्ञानप्रसारक सभेशी संबंध येणे ओघाने आलेच. तिथे त्यांनी ‘हिन्दुलोकांच्या मध्यन्तरीय अवस्थेविषयीं विचार’ हा निबंध वाचला. तोच पुढे १८६२ मध्ये पुस्तकरूपाने प्रकाशित झाला. त्यातील हा भाग-

‘‘तत्त्वविचारशास्त्रप्रकरणांत पाहूं गेलें असतां सर्व उत्तम ग्रंथ (षड्दर्शनादि) प्राचीन आहेत. नामदेव, तुकाराम व रामदास हे प्रेमळभक्त होऊन गेले खरे. परन्तु पुढें पुण्यतिथींची भिक्षा मागून त्यांतून आपल्या संसाराची बेगमी करण्याचे संप्रदाय राहिले आहेत. दुसरी परंपरा राहिली नाहीं. ज्या वस्तूच्या शोधार्थ ते झटत होते तिजविषयीं अनास्थाकरून लोक शब्दच घेऊन कुटीत बसूं लागले. आंतील दूध जाऊन फुटकीश्रीफलमाता हातांत येत चालली आहे असा सुमार दिसतो.. ज्योतिष व भूगोल विद्या या शास्त्रांविषयीं पहातां असाच हर्ताळ माजत चालला आहे. भास्कराचार्याच्या अलिकडे प्रख्यात सिद्धान्तकार कोणी झालेला आढळत नाहीं परंतु जर कोणी गणितानें चुक्या काढून दिल्या आणि त्याच्या पाठपुराव्यास नलिकाबन्ध करून आकाशांतील तारे दाखविले तर ही सुधारणा कुलाब्याच्या केरोपंतांनी किंवा गोवर्धनपंतांनीं इंग्रजी ज्योतिषावरून केली, ह्मणून उपयोगी नाहीं असे उद्गार येतात.. भूगोल वर्णनाविषयीं ह्मणावे तर आमचे लोक मुळीं परदेशांत जाण्याच्याच आड येतात. आह्मीं कूपकर्म झालों!.. कालगणनविद्या व इतिहास हीं तर आह्मीं सोडूनच दिलीं आहेत..

सभेच्या नियमाप्रमाणें धर्माविषयीं कांहीं लिहावयाचें नाहीं तथापि धर्माचें सोंग घेऊन जीं पुष्कळ वंचकें या देशांत पसरलीं आहेत त्याविषयीं लोकांनीं शोध करावा. राज्यरीतीविषयीं ही वाटाघाट करण्यास प्रतिबन्ध आहे तथापि जेथें हिंदूंच्या सर्व स्थितीचा विचार चालला आहे तेथे : सर्वानी कायद्यास मान द्यावा; आपआपली विवक्षित कामें इतरांच्या हक्कांवर पाय न देतां बजावावीं; जेजे अधिकार सरकार आपणास देईल तेते इमानानें व धैर्यानें बजावून त्यांहून अधिकांचा उपभोग घेण्यास योग्य व्हावें या सर्व गोष्टी उचित आहेत. इतकें सांगणें अवश्य दिसतें आणि हें सांगण्यास सभेच्या नियमांस कांहीं बाध आहे असें वाटत नाहीं..

प्रत्येक विषयाचा शोध लावावयाला पाहिजे. या देशाच्या इतिहासास प्रारंभ केव्हां झाला तें माहित नाहीं. ज्या विद्या पहाव्या त्यांतून कांहीं इंद्रानें सांगितल्या; कांहीं सूर्यानें उपदेशिल्या; कांहींची प्रवृत्ति गन्धर्वांपासून झाली. असा बहुतेक या विषयांचा प्रकार आहे. या विषयांत लाक्षणिक भाग किती व वास्तविक किती आहेत याचा विचार प्रतिपदीं झाला पाहिजे. आम्हीं इतके जडबुद्धि झालों आहों कीं आकाशांत ढग पाहिला असतां कोठेंतरी लढाया चालल्या आहेत. पतन तारे दृष्टीस पडले असतां कोणी विख्यात पुरूष जन्मास येत आहे. भाकरीस फुगारा आला असतां व विस्तव फुरफुरला असतां पाहुणा येत आहे. इत्यादि क्षुद्र कल्पनांनीं आम्हीं गुंग होऊन गेलों आहों.. समुद्रास भरती आली, ह्मणजे पाणी भरून पुन: ओहोटतें; परन्तु तें ओहोटत जातां जातां त्याची मागें जाण्याची सीमा होऊन पुन: तें वाढूं लागतें त्याचप्रमाणें कोणत्याहि लोकांचे उत्कर्षांपकर्ष होतात असें दिसतें. अलीकडे दोन हजारवर्षे पर्यन्त या देशाचा सर्वप्रकारें अपकर्ष होतां होतां पाणी संथ होऊन भरती लागण्याचा समय आला आहे. या देशाच्या नशीबाचें तारूं  आजवर इकडून तिकडे अडखळत होतें तें सांप्रत ज्या देशास लागलें आहे तो देश विद्येचें व स्वतन्त्रतेचें आद्यस्थान आहे. ह्मणून आतां तरी भरती येईल; तेव्हां विद्या, कला, कुशलता व शौय्र्य इतक्या जिनसांनीं तें तिकडून भरून येईल अशी आशा आहे. सर्वानी सावध होऊन द्रव्यद्वारा व शरीरद्वारा स्वदेशकल्याणार्थ प्रयत्न करावा.’’

याच सुमारास ते माउंट एल्फिन्स्टनलिखित ‘हिस्टरी ऑफ इंडिया’ या ग्रंथाच्या भाषांतराचे काम करत होते. ‘हिंदुस्थानाचा इतिहास’ या नावाने तो दोन भागांत १८६१-६२ मध्ये प्रकाशित झाला. त्याच्या दुसऱ्या भागातील ‘अकबराची राजनीति’ या प्रकरणातील हा उतारा –

‘‘एशियाखंडांतील नानाप्रकारचा धर्माविषयीं ‘‘दबिस्तान’’ ह्मणून फारसीमध्यें एक मोठा प्रौढ ग्रंथ आहे, त्यांत या मंडळ्यांमध्यें जे वादविवाद होत असत त्यांचे कांहीं नमूने दिले आहेत. ते बहुधा खऱ्या झालेल्या मंडळ्यांमधील वाद नाहींत; काल्पनिकांमधील आहेत असें संभवतें.

एक ब्राह्मण, एक मुसलमान, एक अग्निपूजक, एक यहुदी, एक ख्रिस्ती, आणि एक तत्त्वज्ञानी, या इतक्यांमध्यें जो संवाद झाला तो मात्र यथास्थित वर्णन केला आहे. त्यांत प्रत्येक धर्मवाद्याचा मताचें उपपादन करून, सर्व धर्माचें एकेकामागून खंडन केलें आहे; त्यांतून कांहींचे स्थापक लबाड होते, त्यामुळें त्यांस दोष दिले आहेत; आणि सर्वाचीं मतें बुद्धीस विरुद्ध, आणि त्यांत सांगितलेले जे चमत्कार त्यांस प्रमाण नाहीं; ह्मणून सर्वासच दूषण लाविलें आहे. त्यांत तत्ववेत्त्यानें केवळ विवेक आणि सत्य यांचा मात्र पायावर धर्माची रचना करून तो सर्वानीं स्वीकारावा अशी शिफारस करून तो संवाद पुरा केला आहे; या प्रकारचा एक खरा संवाद ‘‘अकबरनाम्यामध्यें’’ दिला आहे. तो सर्व धर्मामधील विद्वान् लोकांचा समाजासमोर पाद्री रेदिफ्  नामें ख्रिस्ती धर्मोपदेशक व कांहीं मुसलमान मुल्लालोक यांमध्ये झाला. त्यांत त्या ख्रिस्तीने आपला वाद सामोपचारानें व न्यायानें चालविला होता असें स्पष्ट लिहिलें आहे. त्या वादाचा शेवटी अकबरानें मुल्लालोकांची त्यांचा दुराग्रहाविषयीं निर्भर्त्सना केली आणि विवेकास अनुसरून चाललें तरच ईश्वराची बराबर भक्ति होईल, लोकांनी ह्मटलेल्या ईश्वरप्रणीत धर्मावर डोळे बांधून विश्वास ठेविल्यानें होणार नाही, असा माझा अभिप्राय आहे, असें सांगितले.

वरील इतिहासावरून अकबराचा धर्म काय होता याचें अनुमान करितां येईल. अकबर शुद्ध एकेश्वरवादी होता; परंतु मनुष्याचा बुद्धीची दुर्बलता मनांत आणून कांहीं संस्कार करावे असें त्याचें मत असे. जें ईश्वराचें ज्ञान आपल्या विवेकबुद्धीनें आपणास प्राप्त होतें, त्यावरून त्याचें एकत्व व उदारत्व हीं चांगल्या रीतीनें सिद्ध होतात; यास्तव त्या ज्ञानाप्रमाणें आपण त्याची भक्ति करावी..’’

या काळात त्यांनी सरकारच्या विविध खात्यांमध्ये नोकरी केली. पण पुढे १८६३ मध्ये वकिलीची सनद मिळवून स्वतंत्रपणे व्यवसाय सुरू केला. वर सांगितल्याप्रमाणे १८६४ मध्ये ‘नेटिव्ह ओपिनियन’ प्रसिद्ध होऊ लागले होतेच. यातही मंडलिक वेळोवेळी लिहीत असत. त्यांच्या लेखनातील उपरोधिक शैलीचे उदाहरण ठरेल असा एक उतारा-

‘‘जिंकणाऱ्यास कोण जिंकतो? जिंकलेला! आम्हांला जिंकणारास आह्मीं जिंकलें असा गर्व कधीं कधीं निरुपद्रवी जिंकलेल्यांस करतां येतो. रोमन लोकांनी ग्रीकांचा पाडाव शारिरीक बळानें केला पण ग्रीकांनीं बुद्धिबळानें त्यांवर सूड काढला. तसाच प्रकार थोडा आतां घडून आला आहे. संस्कृत भाषेचा अभ्यास करून येथून गेलेले जर्मन, संस्कृत भाषेचा अभ्यास तेथील विद्वानांकडून करवूं लागले आहेत व आतां त्यांचा मोर्चा इंग्लंदकडे वळला आहे. व लवकर प्लासिच्या लढाईचा सूड क्लाईव्हच्या देशावर काढणार असा रंग दिसत आहे. हिंदूच्या पवित्र भाषेंतील पाणिनीच्या व्याकरणाच्या पद्धतीनें भाषाविज्ञान व व्युप्तत्तिशास्त्र यांस चालन मिळालें आहे..’’

पुढे १८६५ मध्ये त्यांचा ‘हिंदुधर्मशास्त्र’ हा ग्रंथ प्रकाशित झाला. या ग्रंथातील हा उतारा –

‘‘प्राचीन कालीं असवर्ण स्त्रीशीं विवाह होत असे; तो अनुलोभ मात्र वर्ण असला पाहिजे; ह्मणजे उंच वर्णाच्या पुरुषाचें नीच वर्णाच्या स्त्रीशीं लग्न होत असे. या नियमामुळें ब्राह्मणास चारहि वर्णाच्या कन्यांशीं विवाह करण्यास अनुकूल होतें.

क्षत्रियांस, ब्राह्मण वर्ज करून बाकी तिन्ही वर्णाच्या मुली करितां येत असत. वैश्यांस, स्ववर्णाची व शूद्राची कन्या करितां येत होती. शूद्रास मात्र आपल्या वर्णाबाहेर लग्न करण्याची परवानगी नव्हती. सांप्रत तर सवर्णाचें मात्र लग्न होते. असवर्णाचा विवाह झाला असतां त्यापासून सशास्त्र संबंध होत नाहीं.

कन्येचा विवाहकाल आठांपासून दहा वर्षेपर्यंत मानिला आहे. पुढें अविवाहित ठेविल्यास कांहीं अदृष्ट दोष मानितात. परंतु सांप्रत दहा वर्षांनंतरहि मुलीचा विवाह होतो; व पूर्वी प्राप्तयौवन स्त्रियांनीं तीन वर्षे वाट पाहून पित्यानें लग्न न केल्यास, स्वयंवर करावा, असें म्हटलें आहे. यावरून सर्वत्रच सारखा पाठ होता असें दिसत नाहीं; तसेंच जे प्राप्तयौवन कन्येचा विवाहास दोष सांगितले ते अदृष्ट आहेत; ह्मणून जेथें तशी रूढी असेल, अथवा शिष्टसम्मतें नवी पडेल, तेथें व्यवहाररीत्या तो विवाह रद्द होईल असें वाटत नाहीं.’’

मंडलिकांना रोजनिशी लिहिण्याचीही सवय होती. त्यातील ‘बुद्धिबळ’ या खेळाविषयी त्यांनी लिहिलेले हे टिपण पाहा –

‘‘देहधारी या नामें राजा, मन हें प्रधान, इतर मोहरीं तीं इंद्रियें, तीं राजास रक्षक याप्रमाणें येका शरीरावर प्रकार दोन. शरीर म्हणजें पट, तेथें कल्पना राजाची आणि प्रधानाची, म्हणजे मनाची परस्परें जिंकणें विषयींची इच्छा यांत विशेष बुद्धि प्रखर ज्याची तो राजास शह देतो. आणि शेवट प्याद्याचा शह देऊन कील केला म्हणजे अखेरी. अशा प्रकारें इंद्रियें मनाचें स्वाधीन होऊन सात्विक वृत्तीनें राजास जिंकावा. खेळते समई आपल्या व दुसरे याच्या सर्व मोहऱ्यांवर नजर नेऊन डाव खेळावा.’’

रोजनिशीत त्यांनी अनेक आठवणीही लिहून ठेवल्या आहेत. १० जून १८६३ मध्ये लिहिलेली ही एक आठवण –

‘‘केरोपंत यांजवळ मेसमेरिझम्, मनोधर्म, आत्मस्वरूप, सृष्टि व तिचा कर्ता, जीवित कर्तव्य, मरणानंतरची स्थिती इत्यादि विषयांवर भाषण झालें. उलट सुलट कारणांचे विवेचन झालें. बटलरचें (सादृश्य संबंध) व बक्र्ले यांचा (बाह्य़ शून्यवाद) या ग्रंथांतील तत्त्व; मनुष्याच्या विचारशक्तीची मर्यादा; अध्यात्मशास्त्रासंबंधें फार व्यापक स्वरूपाचीं विधानें ठोकून देण्यांत असलेली भीति; यां विषयींही संभाषण झालें. मग बाळशास्त्री जांभेकर यांचें चरित्र; हिंदी लोकांचें शारीरसामथ्र्य व त्याच्या वृध्यर्थ योजलेले हानिकारक उपाय; या विषयांकडेही वळलों होतों. अगदीं पहिल्या विषयांवर बोलतांना केरोपंतांनी एक गोष्ट सांगितली ती अशी : जेव्हां जेव्हां ते स्वतां अथवा त्यांचे बन्धू यांस कांहीं दुखणें येत असे त्याच्या अगोदर त्यांच्या मातोश्रीच्या तळव्याला कंड सुटत असे. चमत्कारिक पण अचिन्त्य!’’

मुंबईतील संस्थात्मक जीवनात मंडलिक पूर्णपणे समरसून गेले होते. अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांचा पुस्तक संग्रहही प्रचंड होता. त्यांच्या मृत्यूनंतर ही ग्रंथसंपदा पुण्याच्या फग्र्युसन महाविद्यालयाला देण्यात आली. एकोणिसाव्या शतकातील या विद्वानाचे दोन खंडीय चरित्र ग. रा. हवलदार यांनी लिहिले आहे. ते आवर्जून वाचावे.

संकलन प्रसाद हावळे – prasad.havale@expressindia.com