अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे मराठी वळणकसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- हरि नारायण आपटे!

boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
story of farmer s son from sangli who successfully completed the mumbai london mumbai double bike journey
सफरनामा : दुचाकीवरून देशाटन
Malavya Rajyog 2024
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तयार होणार शुभ राजयोग; ‘या’ ४ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

मागील लेखात आपण गोपाळबाबा वलंगकर यांच्या ‘विटाळ विध्वंसन’ या पुस्तकाबद्दल जाणून घेतले. वलंगकरांचे पुस्तक प्रसिद्ध झाले १८८९ साली. त्याच्या पुढच्याच वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये ‘करमणूक’ नावाचे मासिक सुरू झाले. त्याचे कर्तेधर्ते होते कादंबरीकार हरि नारायण आपटे. ‘केसरी’ आणि ‘सुधारक’ यांची खडाजंगी एका बाजूला सुरू असताना आपटे यांनी आपले हे स्वतंत्र नियतकालिक सुरू केले होते. पहिल्या अंकात त्यांनी ‘करमणूक’चा उद्देश सांगितला होता तो असा-

‘‘केसरी, सुधारक एखाद्या कठोर पित्याप्रमाणें कठोर शब्दांने सांगणार व समाजाचें अप्रशस्त वर्तन झाल्यास वेळीं वाक्प्रतोदाचे तडाके लगावणार, तीच गोष्ट हें पत्र प्रेमळ मातेप्रमाणें गोड गोड शब्दांनीं व चांगल्या चांगल्या गोष्टींनीं अप्रशस्त वर्तनाबद्दल मायेचें शासन करणार. येवढें मात्र ध्यानांत ठेवावें, कीं हें पत्र आचरट आईप्रमाणें फाजील लाड करणार नाहीं.. ज्यास पुढल्या माडीपासून चुलीपर्यंत व दिवाणखान्यांतील टेबलापासून फणीकरंडय़ाच्या पेटीपर्यंत कोणाच्या हातीं पडलें तरी हवें त्यानें, हवें त्याच्या देखत नि:शंकपणें वाचण्यास हरकत नाहीं, असें पत्र पाहिजे असेल तर त्यांनीं अवश्य करमणुकीचें वर्गणीदार व्हावें.. शनिवारीं संध्याकाळीं थकून भागून आल्यावर आपल्या कुटुंबांतील लहानमोठय़ा माणसांस जमवून खुशाल हंसत खेळत करमणूक करून ज्ञान मिळविण्याची ज्यांची इच्छा असेल त्यांचे आम्ही नम्र सेवक आहोंत.’’

‘करमणूक’मध्ये दीर्घ गोष्टी, शास्त्रविषयक माहिती देणाऱ्या गोष्टी, वर्तमान घडामोडी, चुटके, थोर पुरुषांची चरित्रे, प्रवासवर्णने ते कविता, नाटके व कादंबरीलेखनही प्रसिद्ध होत असे. ‘करमणूक’च्या पहिल्या अंकापासून हरिभाऊ आपटे यांची ‘पण लक्षात कोण घेतो!’ ही मराठीतील महत्त्वाची कादंबरी क्रमश: प्रसिद्ध होत होती. केशवपनासारख्या भयंकर रूढीचे दुष्परिणाम दाखवून देणारी ही कादंबरी. या कादंबरीतील अगदी सुरुवातीच्या भागातील हा उतारा पाहा-

‘‘आनंद काय किंवा खेद काय, कोणत्याही विकाराचा परिणाम, लहान वयात मनावर फार वेळ कधीच टिकत नाही. या माझ्या म्हणण्याचा अनुभव प्रत्येकास असेलच. तेव्हा त्याच्याविषयी विशेष फोड करून सांगण्यात काही अर्थ नाही. सध्या मला येथे एवढेच सांगावयाचे आहे की, दोन प्रहरी आगगाडीत बसण्याच्या वगैरे गर्दीत पहाटे ऐकलेले सर्व काही मी विसरून गेल्यासारखीच झाले. आगगाडीतून प्रवास करण्याच्या आनंदापुढे सकाळी ऐकलेल्या सर्व गोष्टींचा खेद तो कसचा राहणार? त्या वेळी तरी तो मी पुरता विसरून गेले असे म्हणण्यास हरकत नाही. कोणीही गावास जाऊ लागले की, गाडीत बसण्याच्या हौसेमुळे त्याजबरोबर आपण जावे असे ज्या वयात फार वाटावयाचे त्या वयात आगगाडीतून प्रवास करण्याचा प्रत्यक्ष प्रसंग आल्यावर आणि तोही नेहमी रागवणारे बाबा बरोबर नसता; – (आमचे बाबा आमच्याबरोबर नव्हते हे येथे सांगावयास नकोच. त्यांनी आपल्या कचेरीतला कृष्णाजीपंत नावाचा कारकून आम्हांस पोचविण्यासाठी दिला होता.) मग आनंदाला हो काय विचारता? अशा आनंदापुढे, सहज ऐकलेल्या आणि ज्यांचा अर्थ मुळीच समजला नाही असे म्हटले तरी चालेल, अशा शब्दांपासून उत्पन्न झालेला खेद कितपत टिकणार? तो तेव्हाच नाहीसा झाला. असो.

ज्याप्रमाणे मोठेपणी कित्येक मंडळीस वनश्रीची शोभा पाहणे वगैरे काही आवडत नसते, त्याप्रमाणे लहानपणी कोणाचीही स्थिति नसते. त्या वयात सर्व काही पाहावेसे वाटते. कोणतीहि गोष्ट, मग त्यात कळो न कळो, आपण पाहिलीच पाहिजे ही मोठी उत्सुकता. या नियमाला अनुसरूनच अर्थात् आगगाडीत खिडकीपासल्या जागेवर कोणी बसावे, याविषयी आम्हा बहीणभावंडाचा वाद सुरू झाला. दादा म्हणे मी मोठा आहे तेव्हा मी खिडकीत बसेन आणि मी म्हणे मी बसेन. शेवटी त्या वादात खिडकीच्या बाहेर डोके काढता काढता दादाची टोपीदेखील पडली. पण नशिबाची गोष्ट एवढीच की, गाडी चालू झाली नव्हती आणि आमचे सामान आणणारा पोर्टर जवळच उभा होता; त्यास सांगून आईने ती टोपी वर आणविली. हे झाल्यावर कोणाच्या धक्क्याने टोपी पडली याबद्दल वाद कमी झाला असे मात्र समजू नका हो!’’

पुढे तब्बल अठ्ठावीस वर्षे सुरू राहिलेल्या ‘करमणूक’मधून हरिभाऊंनी अठरा कादंबऱ्या लिहिल्या. सामाजिक आणि ऐतिहासिक विषयांवर लिहिलेल्या या कादंबऱ्यांनी मराठीत ‘हरिभाऊ युग’च निर्माण झाले होते. त्यांच्या काळाचे प्रतिबिंब त्यांच्या कादंबऱ्यांमधून खरेपणाने उमटले. कादंबऱ्यांव्यतिरिक्त हरिभाऊंनी ‘करमणूक’मध्ये नाटके, भाषांतरे, निबंध असे विविधांगी लेखन केले. १९०२ सालातील ‘करमणूक’च्या एका अंकात आपटे यांनी ‘मी आहें केवढा!’ या शीर्षकाचा एक उपदेशपर चुटका लिहिला आहे. तो असा-

‘‘हा प्रश्न मोठा चमत्कारिक आहे, नाहीं बरें? या संसारांत जेव्हां मोठमोठाल्या गोष्टी आपण सांगतों तेव्हां आपल्याला किती बरें अभिमान वाटतो! आपली उंची मावण्यास सारें जग ठेंगणें वाटतें, नव्हे? त्या वेळीं आपण खरोखर आहोंत केवढे याचा आपण कधीं विचार करतों काय? आपण श्रीमंतीचा अभिमान सांगतों, तेव्हां आपणाजवळ आहे काय तें ध्यानांत घेण्यापेक्षां आपल्याजवळ नाहीं काय, याचा विचार करूं लागलों, तर आपला अभिमान क्षणभर तरी टिकेल काय? ज्ञानाची घमेंड मारतांना आपल्याला येतें काय, याच्यापेक्षा येत नाहीं काय याचा विचार मनांत आणल्यास घमेंडीला तिळभर तरी जागा राहील  काय? सत्तेची शेखी मिरवितांना आपल्या स्वाधीन आहे काय, याचा विचार करूं लागलों तर त्या शेखीची काय अवस्था होईल?

एके दिवशीं संध्याकाळीं मी आपल्या स्नेह्य़ांबरोबर नानाप्रकारच्या गोष्टी सांगत माझ्या घरीं गच्चीवर बसलों होतों. गोष्टी बोलतां बोलतां अर्थातच त्यांत कांहीं ‘‘मीं असें केलें; मी असें बोललों; मी असें लिहिलें; आह्मी कसले वस्ताद! मी काय त्याला फसतों!’’ अशीं नानातऱ्हेचीं अभिमानदर्शक बोलणीं आमच्या सर्वाच्या बोलण्यांत आलीं. कोणाची निंदा, कोणाची थट्टा, कोणाची टवाळी असें चाललें होतें. होतां होतां सूर्यास्त झाला; सर्व स्नेहीमंडळी एकामागून एक आपापल्या घरीं निघून गेली, आणि मी एकटाच तेथें गच्चीवर बसलेला राहिलों. सूर्यप्रकाश अगदीं नाहींसा झाला. रात्र अंधारी असल्यामुळें जिकडे तिकडे काळोख पसरून आकाशांत मात्र, जणूं काय आह्मां मनुष्यांचें अनुकरणच करणाऱ्या तारका आपापला आत्मप्रकाश पुढें करून चमकूं लागल्या. माझ्या मनांत मात्र त्या वेळीं अहंता अगदीं नाहींशी होऊन फारच चमत्कारिक विचार आले. माझ्या डोक्यावरच आकाशगंगेचा भाग दिसत होता, त्याकडे माझीं दृष्टि जाऊन मीं आपल्याशींच ह्मटलें : ‘‘अरेरे! काय हा आमचा वृथा अभिमान! मी ह्मणजे या अनंत विश्वाचा कितवा अंश बरें? या अनंत आकाशांत अनंत तारे असून एवढे सगळे सूर्य आहेत असें आपलें ज्योति:शास्त्राचें अल्प ज्ञान आपणास सांगतें, व तें आपण खरें मानतों. आपल्या पृथ्वीस प्रकाश, जीवन वगैरे देणारा हा सूर्य या अनंत सूर्यापैकीं एक! आमची पृथ्वी जी आह्मांस एवढी प्रचंड वाटते ती या सूर्याभोवती प्रदक्षणाा घालीत असणाऱ्या अनंत ग्रहोपग्रहांपैकीं एक! त्या या आमच्या पृथ्वीवर सचेतन अचेतन पदार्थ अनंत! त्यांत सचेतनही अनंत! त्यांच्या जाति अनंत! त्यांत मनुष्यजातीचे प्राणी अनंत आणि अस्मादिक त्यांपैकीं एक! असें असतांना आपणांस एवढा अभिमान कशाचा बरें वाटतो? ‘‘कीटश्च कोटायते’’ अशी आपली विश्वाशीं तुलना करतां स्थिति! ती आपणांस स्पष्ट दिसते; मनांत आणली तर अगदीं खरी वाटते; विचार केला तर अहंता गळूनही जाते; पण ती किती वेळ? क्षणमात्रच! एकदां ते विचार निघून गेले, ह्मणजे पुन: मी आपला अरेरावाचा अरेरावच!’’ असे विलक्षण विचार माझ्या मनांत येऊन मी फार उदास झालों! त्या जागेवरून उठूं नये, आकाशांतील ताऱ्यांवरून दृष्टि काढूं नये असें वाटूं लागलें व मी आहें केवढा? हा अहंतानाशक प्रश्न पुन: पुन: मनांत येऊन मी अगदीं गोंधळून गेलों.’’

‘मराठी वाङ्मयाचा अभ्यास’ या शीर्षकाची त्यांच्या व्याख्यानावर आधारित एक पुस्तिका उपलब्ध आहे. हे व्याख्यान हरिभाऊंनी १९०३ साली ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या दहाव्या वार्षिक समारंभात दिले होते. त्यात ग्रंथालयांच्या आवश्यकतेविषयी त्यांनी केलेले विवेचन पाहा-

‘‘ही संग्रहालयें करण्याची बुद्धि आपणांस कां होते? थोडासा विचार केला असतां आपल्यास असें दिसून येईल कीं, आपलें स्वत:चें, आपल्या कुटुंबाचें, आपल्या ग्रामाचें, आपल्या प्रांताचें, आपल्या देशाचें, किंबहुना समग्र मनुष्यजातीचें संरक्षण व्हावें ही प्रत्येक मनुष्याची उत्कट इच्छा असते, स्वसंरक्षण करून वंशवृद्धि करावी याबद्दल जशी मनुष्याला उपजतबुद्धि असते, त्याप्रमाणेंच आपल्या पूर्वजांनीं संचित केलेलें ज्ञान जतन करून ठेवून त्यांत भर घालावी हीही पण मनुष्याच्या उपजतबुद्धीपैकींच एक बुद्धि होय. एकदां अनुभवानें किंवा अंत:स्फुर्तीनें प्राप्त झालेलें ज्ञान आपल्यालाच पुन: उपयोगीं पडावें म्हणून किंवा आपल्या जवळ चिरकाल राहून आपल्या पुढच्या पिढय़ानुपिढीच्या लोकांस त्याचा उपयोग व्हावा म्हणून त्याचा संचय करण्याची इच्छा होणें मनुष्यास अगदीं नैसर्गिक आहे. कोणत्याही देशांत पाहिलें तरी पित्यापासून पुत्राला व गुरूपासून शिष्याला याच इच्छेनें ज्ञानोपदेश केला जातो. प्राचीनकाळीं लेखनकला नसल्याकारणानें वाक्परंपरेनेंच अशा ज्ञानास चिरस्थायी केलें जात असे. हा जो ज्ञानसंचय तो अबाधित रहावा व त्याचा उपयोग सर्वास सहज करतां यावा या अत्युत्कट इच्छेचें फल लेखनकला होय. लेखन अस्तित्वांत आल्याबरोबर अर्थातच केवळ वाक्परंपरेनेच गुरूपासून शिष्यास ज्ञान मिळण्याच्या ऐवजीं, केव्हां केव्हां पुस्तकांचा उपयोग होऊं लागला. ज्या ठिकाणीं लेखनोपयोगी द्रव्यें मिळणें कठिण नव्हतें, त्या ठिकाणीं त्या द्रव्यांवर म्हणजे भूर्जपत्र, ताडपत्र, वगैरेंवर ग्रंथ तयार झाले, परंतु ज्या ठिकाणीं ही साधनें नव्हतीं, त्या ठिकाणच्या लोकांनी मातीच्या विटा करून त्यावर आपले ग्रंथ लिहून, त्या विटा पुढें भाजून त्यांचा संग्रह करून ठेविला! आपलेकडे शिलालेख फार; आणि पुढें कागद निघाल्यानंतर त्यांवर ग्रंथ लिहिले जाऊं लागले. एवंच कोणीकडून तरी मनुष्याची बुद्धि ही कीं, आपल्या पूर्वजांचा व आपल्या काळचा ज्ञानसंचय आपण जतन करून पुढील पिढीस मिळेल असें करावें. हे ग्रंथ प्रारंभीं जगन्नियंत्या परमेश्वराच्या स्तुतिपर किंवा प्रार्थनापर असेच असत आणि त्यामुळें त्यांचा संग्रह, देवालयें, धर्मपीठें व मठ यांतच केला जात असे. अत्यंत प्राचीन कालापासून आमच्या देशांत काशीपासून रामेश्वरापर्यंत व द्वारावतीपासून पुरीपर्यंत चारही धामांत, आठही पुऱ्यांत आणि सर्व क्षेत्रांत जीं विद्यापीठें व मठ आहेत तेथें जुन्या ग्रंथांचे फार उत्तम व अवाढव्य ग्रंथसंग्रह असत. परंतु इतर अनेक दिशांनी देशाचा ऱ्हास सुरू झाला त्याप्रमाणें विद्येचाही ऱ्हास होऊन या ग्रंथसंग्रहाचा बहुतेक नाश झाला. दैवाच्या अनुकूलतेनें आज मुद्रणकला इकडे आल्याकारणानें जुन्या ग्रंथांचा उद्धार करणें आम्हांस किती तरी सुसंभाव्य झालें आहे. मुद्रणकला, ही ज्याप्रमाणें अन्य देशांत, त्याचप्रमाणें आमच्याही देशांत प्राचीन विद्येच्या जीर्णोद्धारास कारण झाली.’’

हरिभाऊंचे जवळपास सर्वच लेखन आज उपलब्ध आहे. ते मिळवून आपण अवश्य वाचावे. हरिभाऊंविषयी व त्यांच्या लेखनाबद्दल आणखी जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्यांनी बा. मा. आंबेकर, नी. म. केळकर, वा. ना. देशपांडे, वेणुबाई पानसे यांनी लिहिलेली हरिभाऊंची चरित्रे आवर्जून वाचावीत; शिवाय साहित्य अकादमीने प्रसिद्ध केलेले विद्याधर पुंडलीक संपादित ‘निवडक हरि नारायण आपटे’ हे पुस्तक आहेच!

prasad.havale@expressindia.com