scorecardresearch

संज्ञा आणि संकल्पना : ..जिथून पडल्या गाठी

अर्थशास्त्रात असलेली, पण आर्थिक व्यवहार नसलेली आपली आजची संकल्पना म्हणजे-मॅचिंग मार्केट्स.

संज्ञा आणि संकल्पना : ..जिथून पडल्या गाठी
(संग्रहित छायाचित्र)

पराग कुलकर्णी

बाजारपेठ किंवा मार्केट म्हटले की आपल्या डोळ्यासमोर काय उभे राहते? भाजीपाला, फळे, धान्य, कपडे आणि इतर अनेक वस्तू खरेदी-विक्री करण्याचे एक ठिकाण. पैशांवर चालणारी आणि आर्थिक व्यवहार घडवून आणणारी जागा म्हणजे मार्केट असेही आपण म्हणू शकतो. पण प्रत्येक व्यवहार हा आर्थिकच असतो का? देवाणघेवाण करणारी, पण पशावर बिलकुल अवलंबून नसणारी हजारो मार्केट्स आपल्या अवतीभोवती आहेत असे सांगितले तर विश्वास बसेल? अर्थशास्त्रात असलेली, पण आर्थिक व्यवहार नसलेली आपली आजची संकल्पना म्हणजे-मॅचिंग मार्केट्स.

खरं तर मॅचिंग मार्केट्स आपल्या आयुष्याचाच एक भाग आहे. आपल्याला एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरी करायची असेल तर केवळ आपण त्या कंपनीची निवड करून काही होत नाही, त्या कंपनीनेही आपली निवड केली पाहिजे. यात आपल्याला मिळणारा पगार हा जरी एक घटक असला तरी आपण नोकरीतले वातावरण, पुढे मिळणाऱ्या संधी, आपल्या कौशल्याला मिळणारा वाव.. या गोष्टी बघतो. तर कंपनी आपला अनुभव, कौशल्य आणि कामाप्रतिचा दृष्टिकोन इत्यादी गोष्टींवर आपले मूल्यमापन करते. ‘आपण निवड करणे’ आणि ‘आपली निवड होणे’ या दोन्ही गोष्टी जेव्हा जुळून येतात तेव्हाच असे व्यवहार होतात. हे व्यवहार म्हणजे जोडय़ा जुळवण्यासारखेच (मॅचिंग) असतात आणि म्हणूनच त्यांना मॅचिंग, तर त्या व्यवस्थेला ‘मॅचिंग मार्केट’ असे म्हणतात. शाळा, महाविद्यालयातील प्रवेश, जॉब मार्केट ते लग्नाच्या गाठी अशी अनेक रोजच्या व्यवहारातील मॅचिंग मार्केटची उदाहरणे आहेत. ओला, उबेर, एअरबीनबी (Airbnb) आणि यांसारख्या अनेक नवीन कंपन्या म्हणजे एक प्रकारे मॅचिंग मार्केट्स आहेत. मॅचिंग मार्केट आणि त्या अनुषंगाने आलेला मार्केट डिझाइन हा मागच्या काही दशकात उदयाला आलेला अर्थशास्त्रातला नवा विषय आहे.

स्टॅनफर्ड विद्यापीठात प्राध्यापक असलेल्या अल्विन रॉथ यांचे या विषयात मोलाचे योगदान आहे. देवाणघेवाण यांची जोडी आणि व्यवहाराच्या गाठी मॅचिंग मार्केटमध्ये कशा साधल्या जातात, त्यांच्यात कोणत्या समस्या येऊ शकतात आणि असे मार्केट पूर्ण क्षमतेने आणि योग्य रीतीने चालण्यासाठी काय करावे लागते, हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. पण केवळ पुस्तकी ज्ञान न देता ते खऱ्या आयुष्यात उपयोगी पडते का नाही, हे बघण्यावरही त्यांचा भर आहे. न्यूयॉर्क, बोस्टन आणि अमेरिकेतल्या अनेक शहरातल्या शाळांच्या प्रवेश प्रक्रिया त्यांनी तयार केल्या आहेत. पण त्यांचं सगळ्यात मोठं योगदान ‘किडनी एक्सचेंज प्रोग्रॅम’ (मूत्रिपड प्रत्यारोपण) हे आहे- ज्यात त्यांनी ही व्यवस्था मॅचिंग मार्केटप्रमाणेच डिझाइन केली आणि त्यातून अधिक कार्यक्षम आणि प्रभावी अशी मूत्रिपड देवाणघेवाणीची व्यवस्था निर्माण झाली. अल्विन रॉथ यांच्या मार्केट डिझाइनमधील या योगदानासाठी त्यांना २०१२ चा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार हा लॉयड शाप्ले यांच्यासोबत विभागून देण्यात आला.

अल्विन रॉथ यांच्या मते, मॅचिंग मार्केटचे चालणे, न चालणे (market failure) हे तीन मुख्य गोष्टींवर अवलंबून असते. घनता (thickness) – किती लोक तो व्यवहार करण्यासाठी तयार आहेत, कोंडी (congestion)- व्यवहार करताना येणाऱ्या अडचणी, ज्यामुळे तो व्यवहार सहजतेने पूर्ण होऊ शकत नाही किंवा त्याला वेळ लागतो. आणि सुरक्षितता (Safety). जेव्हा एखादं मार्केट अपेक्षेनुसार काम करत नाही, तेव्हा या तीन मुद्दय़ांच्या आधारे त्याचे विश्लेषण करता येते, आणि मूळ समस्या शोधता आणि सोडवता येते. पण हे नेमके होते कसे? भल्या पहाटेची बस किंवा ट्रेन पकडण्यासाठी म्हणून आपण घरातून निघतो आणि बाहेर एकही रिक्षा नसते; तेव्हा मार्केटची घनता विरळ असते, तर बस स्टॅन्ड किंवा स्टेशनच्या बाहेर जास्त प्रवासी आणि जास्त रिक्षा यामुळे तिथे घनता नेहमीच जास्त असते. अर्थातच कोणतेही मार्केट यशस्वीरीत्या आणि कार्यक्षमतेने चालण्यासाठी त्यात विक्री करणारे आणि विकत घेणारे यांची संख्या जास्त असलीच पाहिजे. ओला, उबेर यांसारख्या सेवा- प्रवासी आणि कॅबचालक यांना तंत्रज्ञानाच्या साह्य़ाने जोडून त्यांचं एक ‘थिक’ मार्केट निर्माण करण्याचंच काम करतात. एखादं मार्केट असं ‘थिक’ होणे आणि असणे ही त्या व्यवसायासाठी खूपच आवश्यक गोष्ट असते. पण एकदा का हे झालं, की पुढची समस्या येते ती म्हणजे कोंडी (congestion).

आता आपण स्टेशनच्या बाहेर उभे आहोत असे समजू आणि आपल्याला घरी जाण्यासाठी रिक्षा पाहिजे. आजूबाजूला खूप रिक्षा आहेत, पण त्यांना आपल्याला जायचे आहे त्या भागात यायचे नसते. त्यांनी सांगितलेली किंमत आपल्याला पटत नाही (सामानाचे जादा पैसे, हाफ रिटर्न इत्यादी). थोडक्यात, एवढय़ा रिक्षा असूनही (मार्केट थिक असूनही) आपल्याला तसेच ताटकळत उभे राहावे लागते आणि तो व्यवहार होऊ शकत नाही. निर्णय घेण्यास लागणारा वेळ आणि व्यवहार पूर्ण करण्यात येणाऱ्या अडचणी म्हणजेच कोंडी (कंजेशन). नोकरीच्या एका जागेसाठी हजारो अर्ज येणे आणि त्यांची छाननी करण्यात वेळ लागून ती प्रक्रिया लांबणे, हेदेखील कोंडीचे उदाहरण आहे. एकदा का समस्या लक्षात आली की, त्यानुसार अशा मार्केटमध्ये सुधारणाही करता येते. चालकांना सेवा पुरवण्याची सक्ती, नकारासाठी भरावा लागणारा दंड, किमतीमधील पारदर्शकता याद्वारे ओला, उबेर यांसारख्या सेवा या समस्या सोडवतात. ऑनलाइन अर्ज घेतल्याने त्यांची कॉम्प्युटरद्वारे छाननी करणे सहज शक्य होते असे उपायही अशी कोंडी दूर करण्यास मदत करतात.

मार्केटवर परिणाम करणारा तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुरक्षा. आपल्या कॅबच्या उदाहरणात सुरक्षेचे काय महत्त्व असते हे वेगळे सांगायला नको. आणि तंत्रज्ञानाचा वापर करूनही अजून त्यात परिपूर्णता आली आहे असे आपण म्हणू शकत नाही. ऑनलाइन खरेदी-विक्रीतही आपल्या आर्थिक आणि खासगी माहितीची सुरक्षा अशीच खूप महत्त्वाची असते. कोणत्याही व्यवहारात सुरक्षितता असल्याशिवाय त्या व्यवस्थेबद्दल विश्वास निर्माण होत नाही- ज्याचा परिणाम त्या मार्केटच्या यशस्वितेवर होतो.

आपल्या आजूबाजूला जर आपण लक्षपूर्वक पाहिले तर अशी हजारो मार्केट्स आपल्याला दिसतील. यात काही असेही व्यवहार असतात, ज्याला सामाजिक आणि कायदेशीर मान्यता नसते आणि तरीही लोक त्या व्यवहारात सहभागी होतात- पैसे घेऊन विकलेले अवयव, वेश्याव्यवसाय, ड्रग्स ही याची काही उदाहरणे. अल्विन रॉथ अशा मार्केटला लोकांच्या दृष्टीने आक्षेपार्ह किंवा तिरस्करणीय (repugnant) मार्केट असे म्हणतात. मान्यता नसतानाही हे असे व्यवहार काळ्या बाजारात असुरक्षितपणे चालूच राहतात, ही जाणीव ठेवून या मार्केटचा अभ्यास आणि त्यातील काही प्रश्नांची सोडवणूक हाही मार्केट डिझाइनचाच भाग आहे असे त्यांचे मत आहे.

मानवी व्यवहार हे कोणी जाणीवपूर्वक ठरवलेल्या किंवा बऱ्याचदा न ठरवलेल्या नियमांनुसार चालत असतात. नियम म्हणजे बंधन नसून, व्यवहार सहजतेने व्हावे आणि ती व्यवस्था कार्यक्षमतेने चालावी हाच त्या मागचा उद्देश असतो. आपल्या आजूबाजूच्या व्यवस्था आणि व्यवहार समजावून घेण्यासाठी, गरज पडेल तिथे बदलण्यासाठी आणि जगाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्यासाठीही मॅचिंग मार्केट आणि मार्केट डिझाइन या संकल्पनांचा निश्चितच उपयोग होऊ शकतो.

parag2211@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Matching market sadnya ani sankalpana article parag kulkarni abn

ताज्या बातम्या