कोणत्याही मोठातल्या मोठय़ा संख्येची शीघ्र गणिती आकडेमोड करणाऱ्या आणि ‘मानवी संगणक’ म्हणून जगभरात सर्वपरिचित असणाऱ्या शकुंतलादेवी यांचे नुकतेच निधन झाले. दैवी देणगी लाभलेल्या अलौकिक गणिती प्रतिभेच्या शकुंतलादेवींविषयी..

‘बालपणीच सर्वज्ञता वरी तयांते’ या वर्णनाची आठवण व्हावी अशी गणिती प्रतिभा आकडय़ांशी लीलया खेळणाऱ्या शकुंतलादेवींकडे होती. ‘मानवी संगणक’ असे त्यांना म्हटले जाई, एवढे त्यांचे आकडेमोडीवर प्रभुत्व होते. मोठमोठय़ा संख्यांचे गुणाकार, भागाकार आदी गणिती क्रिया त्या चटकन् करत. पण अचंबित करणारी गोष्ट म्हणजे त्यांचे शालेय शिक्षणही झालेले नव्हते.

बेंगळुरू येथील सेंट टेरेसा कॉन्व्हेंटमध्ये पहिलीसाठी त्यांचे नाव नोंदवण्यात आले होते. पण गरिबीमुळे मासिक दोन रुपये फीसुद्धा भरता न आल्यामुळे त्यांना शाळा सोडावी लागली होती. शालेय शिक्षण नसतानाही कुटुंबाच्या भरणपोषणाची जबाबदारी त्यांना उचलावी लागली. परमेश्वरी कृपेमुळे लाभलेल्या गणिती प्रतिभेमुळे गणिती कार्यक्रम त्यांना मिळत गेले आणि गेली जवळजवळ ८० वष्रे त्यांनी गणिताचा हा आनंद घेतला आणि प्रेक्षकांनाही तो दिला.

एका कानडी गरीब, ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२९ या दिवशी झाला. मंदिरातील पुजारी न बनता त्यांच्या वडिलांनी सर्कसमधील कलावंत म्हणून जगण्याचे ठरवले होते. उंच झुल्यांवरील कसरतींबरोबरच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पत्त्यांचे जादूचे प्रयोगही ते करत असत. आपल्या मुलीची स्मरणशक्ती चांगली आहे हे त्यांनी ओळखले होते. हातचलाखीने ते जादू करत, पण त्यांची मुलगी शकुंतला केवळ स्मरणाने सर्व पत्ते बरोबर सांगत असे. त्यामुळे वयाच्या तिसऱ्या वर्षीच त्यांनी तिला मदतीला घेणे सुरू केले. गणनक्रियेतील तिची सहजता आणि अचूकता प्रेक्षकांना अचंबित करीत असे. थोडय़ाच अवधीत तिच्या गणिती कौशल्याची प्रसिद्धी सर्वत्र होऊ लागली आणि वयाच्या केवळ सहाव्या वर्षी म्हैसूर विश्वविद्यालयात त्यांचा पहिला गणिती कार्यक्रम झाला.

आपल्याला बुद्धिदात्या गणेशाच्या कृपेने ही ‘दैवी देणगी’ प्राप्त झाली असे त्या सांगत. सततच्या कार्यक्रमांनी त्यात अधिकाधिक सफाई येत गेली आणि अनेक विक्रम नोंदवले गेले. १८ जून १९८० रोजी लंडन येथील इम्पीरियल कॉलेजमध्ये त्यांचा एक कार्यक्रम झाला होता. त्यावेळी त्या कॉलेजमधील संगणक विभागातील प्राध्यापकांनी दोन तेरा अंकी संख्यांचा गुणाकार त्यांना करण्यास सांगितले. त्या संख्या अशा :

७,६८६,३६९,७७४,८७०

5 २,४६५,०९९,७४५,७७९

या गुणाकाराचे अचूक उत्तर त्यांनी केवळ २८ सेकंदांत दिले होते. १९९५ च्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये त्याची नोंद झाली आहे. सर्वसामान्यांना सहज समजेल आणि गणिताची गोडी वाढेल असे कार्यक्रम त्या करीत असत. कोणत्याही तारखेचा वार क्षणार्धात सांगण्यात त्यांचा हातखंडा होता. कित्येक विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, गृहिणी त्यांना आपल्या जन्मतारखेचा वार सांगण्याची विनंती करत आणि त्या त्याचे अचूक उत्तर ताबडतोब देत असत. हे कार्यक्रम बघायला मोठमोठय़ा व्यक्ती येत. त्यांच्या घरातील फोटो अल्बममध्ये अशा मोठय़ा व्यक्तींबरोबर त्यांचे काढलेले अनेक फोटो आहेत. त्यात माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासारखे शास्त्रज्ञ, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, हिलरी िक्लटन, सचिन तेंडुलकर, कपिलदेव अशा अनेक मान्यवर व्यक्ती आहेत.

त्यांना काही जलद गणिताच्या रीती माहीत असाव्यात आणि त्याच्या जोरावर सवयीने चटकन् उत्तर देणे त्यांना जमत असावे अशी माझी समजूत होती. माझ्या एका विद्यार्थ्यांने त्यांचा एक कार्यक्रम दूरदर्शनवर पाहून दहा अंकी संख्येचे पाचवे मूळ कसे काढतात, असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्याची रीत मी त्याला सांगितली. पण तो जेव्हा म्हणाला की, शकुंतलादेवींनी २०१ अंकी संख्येचे २३ वे मूळ केवळ ५० सेकंदांत सांगितले, तेव्हा मी अवाक् झालो. ही दैवी देणगीच असली पाहिजे हे मला पटले. त्या काळात वठकश्अउ 1108 या संगणकालाही ते उत्तर काढायला ६० सेकंद लागले होते. तेव्हा संगणकावरही मात करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाला मी आदराने मनोमन नमस्कार केला.

 त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे ‘फिगिरग द जॉय ऑफ नंबर्स’ हे माझे आवडते पुस्तक. त्यात त्यांनी साध्या पाढय़ांपासून सुरुवात करून अनेक गणिती क्रियांमागची गूढे मनोरंजक पद्धतींनी उलगडून दाखविली आहेत. ‘पझल्स टू पझल यू’, ‘फन विथ नंबर्स’, ‘इन् द वंडरलॅण्ड ऑफ नंबर्स’ ही त्यांची आणखी काही उत्तम पुस्तके. कोडी सोडविण्याच्या छंदातून गणिताची गोडी लागते आणि गणिती कौशल्यही विकसित होत जाते असे त्या सांगत. सर्वाना, विशेषत: मुलांना गणिताची गोडी लागावी आणि त्यांना गणिताचा आनंद उपभोगता यावा यासाठी त्या प्रयत्न करीत. गणिती विश्वविद्यालय काढण्याचे त्यांचे स्वप्न होते. ‘अवेकन द जीनियस इन युवर चाइल्ड’  हे त्यांचे अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे.

गेली काही वष्रे आपल्या शीघ्र गणिताधारे कुंडली मांडून लोकांना भविष्याविषयी त्या मार्गदर्शन करत असत. अनेकांनी त्याचा लाभ घेतला आहे. ज्योतिष जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ‘अ‍ॅस्ट्रॉलॉजी फार यू’ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे.

 

२०१ अंकी संख्येचे २३ वे मूळ!

२ 5 २ 5 २ 5 २ 5 २ .. अशा प्रकारे २ ही संख्या २३ वेळा घेऊन गुणाकार केला तर उत्तर ‘८३८८६०८’ येते. ही ७ अंकी संख्या आहे. हे गणिती भाषेत ‘२ चा २३ वा घात ८३८८६०८’ असे सांगितले जाते, किंवा ‘८३८८६०८ या ७ अंकी संख्येचे २३ वे मूळ २ आहे,’ असे म्हटले जाते. शकुंतलादेवींना एका कार्यक्रमात पुढील प्रदीर्घ संख्या देण्यात आली होती. तीत एकूण २०१ अंक आहेत. या संख्येचे २३ वे मूळ काढण्यास त्यांना सांगितले गेले. या प्रश्नाचे उत्तर त्यांनी केवळ ५० सेकंदांत दिले. त्यांच्या या विक्रमाची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये नोंद झाली आहे. ती संख्या अशी :

९१६७४८६७६९२००३९१५८०९८६६०९२७५८५३८०१६२४८३१०६६८०१४४३०८६२२४०७१२६५१६४२७९३४६५७०४०८६७०९६५९३२७९२०५७६७४८०८०६७९००२२७८३०१६३५४९२४८५२३८०३३५७४५३१६९३५१११९०३५९६५७७५४७३४००७५६८१६८८३०५६२०८२१०१६१२९१३२८४५५६४८०५७८०१५८८०६७७१