कोकणातल्या एका खेडय़ातून मुंबईत येऊन कॉर्पोरेट क्षेत्रात मनमुक्त मुशाफिरी करणाऱ्या माधव जोशी यांनी या अनुभवांवर आधारित ‘माझी कॉर्पोरेट दिंडी’ हे पुस्तक लिहिले आहे. ग्रंथाली प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकातील एक संपादित प्रकरण..

याआधी आपण पाहिले की यूएस एक्सिम बँक जवळजवळ पाच हजार कोटींचे कर्ज आमच्या कंपनीला देणार होती. पण भारताने ११ मे १९९८ रोजी केलेल्या अणुबॉम्ब चाचणी स्फोटामुळे अमेरिका, युरोप आणि जपानने भारतावर आर्थिक निर्बंध लादले व आम्हाला मिळणारे कर्ज रद्द झाले. आम्ही आता भारतीय बँकांकडून हे कर्ज उभे करायचे प्रयत्न करत होतो.

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

आमची ह्युजेसची टीम खरोखर दृष्ट लागण्यासारखी होती. माझे निरीक्षण आहे की, आर्थिक क्षेत्रातील अनेक यशस्वी व्यक्ती या सारस्वत आहेत. आमचा फायनान्स प्रमुख दीपक दत्त हा अमेरिकन सारस्वत होता. नेहमी पॅन्टच्या खिशात दोन्ही हात, चापूनचोपून पाडलेला भांग, नेहमी हाफ शर्ट, टिपिकल अमेरिकन इंग्रजी.. पण माझ्याशी बोलताना कधी कधी मराठी!

बँकांशी आणि फायनान्शियल इन्स्टिटय़ूटबरोबर वाटाघाटी करण्याचे काम दीपकच्या टीममधील किशोर सालेटोर करायचा. त्यामुळे तो नेहमी टाय लावायचा. आमच्या कंपनीतील टाय लावणारा तो एकमेव माणूस होता! तोही सारस्वत! किशोर बँकांचे डायरेक्टर किंवा आयसीआयसीआय (ICICI) मधील टॉपचे लोक यांच्यात लीलया वावरायचा. अतिशय खेळकर, लाघवी आणि समोरच्याशी पटकन् मत्री करणारा होता.

भारतात त्यावेळी आयसीआयसीआय ही एकच वित्तसंस्था होती, की जी आमचा प्रोजेक्ट समजून घेऊन अतिशय कमी वेळात कर्ज मंजूर करू शकत होती. के. व्ही. कामथ या सारस्वताच्या नेतृत्वाखाली आयसीआयसीआय ही अतिशय डायनॅमिक वित्तसंस्था होती. आयसीआयसीआयने त्यावेळी आम्हाला खूप मदत केली. त्यावेळी चंदा कोचर प्रोजेक्ट फायनान्स हेड होत्या. आयसीआयसीआयने बांद्रा-कुर्ला (BKC) परिसरामध्ये नवीन इमारत बांधली होती. हा भाग संध्याकाळनंतर निर्मनुष्य असायचा. चंदा कोचर यांची टीम व बऱ्याचदा त्यासुद्धा मध्यरात्रीनंतर घरी जायच्या. त्यानंतर काही वर्षांनी त्या आयसीआयसीआयच्या सीईओ झाल्या. त्यांच्या कारकीर्दीत आयसीआयसीआयने खूप प्रगती केली. मी मोबाईल ऑपरेटर्स संघटनेचा दोनदा अध्यक्ष असताना आमच्या क्षेत्रातील समस्यांवर त्यांच्या बँकेने सरकारला अहवाल सादर करून आम्हाला मदत केली होती. अगदी आता आतापर्यंत आम्ही प्रौढीने सांगायचो की, चंदाला आम्ही अनेक वर्षे ओळखतो. सध्या व्हिडिओकॉनला दिलेल्या कर्जाच्या प्रकरणात ईडीने त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे. हे सर्व ऐकले व पेपरात वाचले तेव्हा आम्हाला धक्काच बसला. अजूनही विश्वास बसत नाही!

कामथ साहेबांच्या कारकीर्दीत त्यावेळी आयसीआयसीआयमध्ये अनेक स्त्रिया जबाबदारीच्या जागांवर काम करत होत्या. कल्पना मोरपारिया लीगल हेड होत्या. त्यांना मी १९८४ पासून- म्हणजे विंडसरच्या वेळेपासून ओळखायचो. आयसीआयसीआयमध्ये तीस वर्षे काम करून नंतर जेपी मॉर्गन या गुंतवणूक क्षेत्रातील अमेरिकन कंपनीच्या भारतासह अनेक देशांच्या जवळजवळ तेरा वर्षे त्या सीईओ होत्या.

त्याकाळी आयसीआयसीआय स्त्रीसत्ताक होती असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. किशोर आणि आम्ही अतिशय परिश्रम करून आयसीआयसीआयकडून जवळजवळ दोन हजार कोटींचे कर्ज मिळविले. अनेकदा मध्यरात्रीपर्यंत आम्ही त्या बीकेसीमधील नवीन बििल्डगमध्ये असायचो. कॅन्टीन सातला बंद व्हायचे. आजूबाजूला खाण्याची कुठे सोय नव्हती. तिथे असलेल्या वेिन्डग मशीनमधील बिस्किटे, भुजिया किंवा वेफर्स आणि चहा- कॉफीवर वेळ भागवायला लागायची. किशोरची खासियत म्हणजे तो मोठमोठय़ा लोकांशीसुद्धा ते आपले मित्र असल्यासारखा बोलायचा, वागायचा. ज्या चिकाटीने त्याने हे आणि इतर कर्जे मिळवली ते खरोखरच वाखाणण्यासारखे होते. किशोर आजही माझा जवळचा मित्र आहे. आमच्या कंपनीतून तो नंतर टाटा रिअ‍ॅल्टीमध्ये सीएफओ म्हणून गेला आणि तिथून गेली पाच-सात वर्षे तो पुण्याला भारत फोर्जमध्ये फायनान्स डायरेक्टर आहे. नवनवीन कंपन्या खरेदी करणे हे त्याचे काम आहे व त्यासाठी तो परदेशात खूप फिरत असतो.

आयसीआयसीआय आणि बँका याचप्रमाणे आम्ही प्रोजेक्टसाठी पैसे उभे करण्याचे इतरही मार्ग शोधत होतो. असाच एक पर्याय आमच्याच एका कंपनीमुळे पुढे आला. ह्युजेस अमेरिकेची दिल्लीत ह्युजेस सॉफ्टवेअर ही यशस्वी कंपनी होती. आमचे व्हाईस चेअरमन प्रदमन कौल हे त्या कंपनीचे चेअरमन होते. विस्तारासाठी ती कंपनी शेअर इश्यू करणार होती. १९९९ मध्ये शेअरची किंमत आधी ठरवून इश्यू व्हायचा. आता शेअर इश्यू करताना किमतीचा एक बॅंड असतो व गुंतवणूकदार त्या बँडमध्ये बिडिंग करून ज्या किमतीवर जास्तीत जास्त शेअर घेण्यास गुंतवणूकदार तयारी दाखवतात ती शेअरची किंमत ठरते. भारतातील असा पहिला इश्यू ह्युजेस सॉफ्टवेअरने नोव्हेंबर १९९९ मध्ये केला. कोटक ग्रुपने हा इश्यू मॅनेज केला. तेव्हा कोटक मिहद्र बँक सुरू झाली नव्हती. उदय कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली शांती एकांबरम आणि रमेश यांनी हा इश्यू यशस्वी केला. स्टॉक मार्केटमध्ये त्या शेअरची किंमत झपाटय़ाने वाढली.

उदय कोटक यांनी सूचना केली की, ह्युजेस इस्पात कंपनीचाही शेअर इश्यू करा. मोठा फरक हा होता की, दिल्लीची कंपनी छान प्रॉफिट करत होती, तर आम्ही प्रोजेक्ट स्टेजमध्ये होतो व त्यामुळे तोटय़ात होतो. आमच्या कंपनीचे शेअर बाजारात विकले जातील का, हा मोठा प्रश्न आमच्यापुढे होता. लोकांना आकर्षति करण्यासाठी फार कष्ट करावे लागणार होते व मार्केटिंग करावे लागणार होते!

त्याच सुमारास काही कारणामुळे आमचा सीईओ राजू पटेल (जो अमेरिकन नागरिक होता.) आणि ह्युजेस अमेरिका यांच्यात मतभेद झाले. त्यांनी राजू पटेल यांना जायला सांगितले. राजूने अमेरिकेत ह्युजेसविरुद्ध नुकसानभरपाईचा खटला दाखल केला. मला भारतातून असंख्य कागदपत्रे त्यासाठी पाठवावी लागली. फार विचित्र अवस्था होती ती. स्वत:च्या एकेकाळी वरिष्ठ असलेल्या माणसाविरुद्ध खटला लढवण्यास मदत करायची. इतर कुणामार्फत भारतातील कागदपत्रे अनधिकृतपणे विरुद्ध पक्षाला मिळणार नाहीत याची काळजीही घ्यायची.

राजूच्या जागी प्रकाश बाजपेई हे सीईओ म्हणून आले. प्रकाश अतिशय पॉलिश्ड व ज्ञानी माणूस होता. आयबीएम या कॉम्प्युटर कंपनीत व नंतर लुसेंट या टेलिकॉमची यंत्रसामग्री बनवणाऱ्या अमेरिकन कंपनीत मार्केटिंगमध्ये प्रकाश काम करायचा. त्याच्याइतका पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तज्ज्ञ दुसरा माणूस मी अजून पाहिलेला नाही. प्रकाश हा शेअर इश्यू करण्यासाठी एकदम योग्य सीईओ होता.

१९९५ ते २००१ ही सहा वर्षे ‘डॉट कॉम वर्षे’ म्हणून ओळखली जातात. इंटरनेटचा वापर करणाऱ्या टेक्निकल कंपन्यांच्या शेअर भावाचा इंडेक्स अमेरिकन नॅसडॅकवर १००० पासून ५००० पर्यंत वर गेला. भारतातही हीच परिस्थिती होती. Y2K च्या भीतीमुळे भारतीय आणि जगातील इतर सॉफ्टवेअर कंपन्यांना चार-पाच वर्षे आधीपासूनच खूप काम मिळू लागले होते.

Y2K  म्हणजे इंग्रजी वर्ष २००० सुरू झाले की त्या आकडय़ात तीन शून्य असतील. आतापर्यंतच्या वर्षांच्या संख्येत कधीही तीन शून्ये आली नव्हती. त्यामुळे सॉफ्टवेअर प्रोग्राममध्ये तशी सोय नव्हती. १ जानेवारी उजाडताच अनेक कॉम्प्युटर प्रोग्रॅम चालेनासे होतील व हाहाकार उडेल, ही जबरदस्त भीती जगभरात पसरली होती. समजा, एखादे विमान अमेरिकेतून भारतात किंवा इंग्लंडला जात असेल व हवेत असताना १ जानेवारी २००० उजाडली व विमानातील कॉम्प्युटर प्रोग्रॅम बंद पडले तर विमान कदाचित उतरू शकणार नाही. बँकिंग आणि इन्व्हेस्टमेंट क्षेत्रात तीन शून्यामुळे कोणते वर्ष हे लक्षात न आल्याने प्रोग्रॅम चालेनासे होतील व जागतिक अर्थव्यवस्था कोसळेल. हे होऊ नये यासाठी अनेक सॉफ्टवेअर कंपन्या त्यावर उपाय (सॉप्टवेअर पॅच) शोधत होत्या. भारतीय सॉफ्टवेअर कंपन्यांना जास्तीत जास्त धंदा त्यामुळे मिळाला. त्यामुळे कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे अनेक नव्या कंपन्या स्थापन होत होत्या. तर अस्तित्वात असलेल्या, पण आतापर्यंत शेअर बाजारात न चालणाऱ्या सॉफ्टवेअर कंपन्यांच्या शेअरच्या किमती आभाळात पोचल्या होत्या. ३१ डिसेंबरच्या रात्री विमानसेवा बंद ठेवण्यात आली. २००० हे वर्ष उजाडले आणि काहीच गोंधळ झाला नाही! त्यावेळी शेअर बाजारात डॉट कॉम आणि डॉट नेट हे परवलीचे शब्द बनले होते. प्रकाश बाजपेई हे सीईओ म्हणून आल्यावर त्यावेळच्या परिस्थितीला अनुसरून काही महिन्यांतच आमच्या कंपनीचे नाव Hughes Ispat वरून Hughes Tele.com झाले. नावातून इस्पातला फाटा मिळाला व नावात डॉट कॉम आले. पुढे येणाऱ्या शेअर इश्यू मार्केटिंगची ती तयारी होती.