भाग्यश्री कासोटे पाटील
माझा जन्म कुरुकली गावचा. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील उणंपुरं दोन हजार वस्तींचं हे खेडं. आमचं घर शेतकरी कुटुंबाचं. नाव पाटील असलं तरी घरात पाटीलकी नव्हती; पण थाट मात्र पाटीलकीचाच! आई-वडील अल्पशिक्षित. शेतीचं क्षेत्र मर्यादित. वडील शेतीत राबायचे आणि आईही घरातलं करून शेतात राबायची. आईला १९९१ साली दोन जुळ्या मुली झाल्या, त्यातील मी छोटी म्हणून लाडकीदेखील! आमच्या आधी वंशाला दिवा मिळालेला असल्यामुळे, जुळ्या मुली झाल्याचं तसं काही दु:ख नव्हतं.

आम्ही शिकलो तेच मुळी आबांच्यामुळे. आबा म्हणजे माझे आजोबा- वडिलांचे चुलते. ते सरकारी नोकरीत महसूल खात्यात तलाठी होते. त्यामुळे त्यांच्या नोकरीच्या निमित्तानं आपल्या कुटुंबाबरोबर शिक्षणासाठी म्हणून आबांनी आईसह आम्हाला कोल्हापूरला नेलं. वडील तिथं फॅब्रिकेशनच्या कारखान्यात काम करू लागले. आजोबांना आम्ही ‘आबा’ म्हणत असू आणि वडिलांना ‘पप्पा’ हा आमच्यावरचा पहिला शहरी प्रभाव. त्याच कारणामुळे आसपास सर्वत्र पप्पा- मम्मींचा बोलबाला. ५-१० वर्षं अशीच गेली, पण खेड्यातील माणसांचा जीव शहरात थोडाच रमतो, परत आमचे कुटुंब कुरुकलीला यशस्वी माघार घेऊन स्थिरस्थावर झालं. एव्हाना मी पाचवी पास झाले होते. सहावी- सातवीचं माझं शिक्षण जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळा कुरुकलीत झालं. याच दरम्यान गावात सुसज्ज सार्वजनिक ग्रंथालय असल्यामुळे मला वाचनाचा छंद जडला. त्याकाळी ग्रंथालयात जाऊन पुस्तकं आणून वाचणारी मी गावातील एकमेव मुलगी होते, त्याचं गावाला मोठं अप्रूप.

रसायनशास्त्र विषय घेऊन मी बी.एस्सी. झाले. मैत्रिणींची बघाबघी सुरू झाली होती, मी मात्र घरात परिस्थिती नसताना पुढं शिकण्याचा हट्ट धरला. आबा तलाठी असल्यानं त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळत होतं. सगळ्या मैत्रिणी स्पर्धा परीक्षा देत होत्या, पण मी मात्र एम.बी.ए. शिक्षणाची वाट धरली. नोकरी करायची नाही असं जगावेगळं वेड डोक्यात भणभणत होतं. घरासह गावातील लोक वेड्यात काढत होते. मी मात्र माझ्या निर्णयावर ठाम राहत पूर्वपरीक्षा देऊन, शैक्षणिक कर्ज घेऊन एम.बी.ए.चं शिक्षण पूर्ण केलं.

उद्योजकतेचं स्वप्नं उराशी असलं तरी आर्थिक वास्तव विपरीत होतं, त्यामुळे नोकरीला पर्याय नव्हता. कारण डोक्यावर कर्जाचं ओझं होतं. २०१४ साली एम.बी.ए. पूर्ण झाल्यानंतर मिळेल ती नोकरी करत गेले. तीन नोकर्‍यांच्या अनुभवामुळे आणि माझ्या शैक्षणिक पात्रतेमुळे रत्नाकर बँक लिमिटेड (RBL) बँकेत अधिकारी म्हणून निवड झाली. पद अधिकार्‍याचे असल्यामुळे बिझनेस टार्गेट होतं. दारोदार भटकंतीनं जीव मेटाकुटीला यायचा. स्त्री असण्याचे अडथळे प्रत्येक वळणावर होतेच होते. त्यातून वाट काढत मी नोकरीत तगून राहिले. असं माझं स्थिरावणं बहुधा काळाला पाहावलं नाही. मराठा आणि शेतकरी कुटुंब असल्यानं शिक्षण पूर्ण झाल्यापासूनच घरात मुलगा बघण्यासाठी लकडा होता. मी वेळ मारून न्यायचे कारण मला करिअर करायचं होतं. स्त्रीला मत नसतं आणि असलं तरी त्याची किंमत नसते, याची कठोर जाणीव लग्न ठरवण्याच्या क्षणी झाली.

बँकेत असताना माझी रोजची तगमग टोकाला गेली अन् बाळ पोटात असतानाच मी नोकरीचा राजीनामा दिला. १ ऑगस्ट, २०१८ रोजी स्वत:चा प्रकाशन व्यवसाय सुरू केला. हा माझा आतला आवाज होता. मला किंवा माझ्या कुटुंबालाही फार माहिती नसलेल्या पुस्तक प्रकाशन व्यवसायात मी जाणीवपूर्वक उतरले. हा निर्णय अचानक घेतला नव्हता, तर विचारपूर्वक स्वीकारलेला. आजच्या काळात अनेक व्यवसाय केवळ आर्थिक फायद्यासाठी निवडले जातात; मात्र मला असा व्यवसाय करायचा होता, ज्यातून समाजाला काहीतरी देण्याचे समाधान मिळेल. पुस्तक हे माणूस घडविणारं, विचारांना दिशा देणारं आणि समाजात प्रबोधन घडविणारं माध्यम आहे, याची जाणीव झाल्यापासूनच मी त्याच्या निर्मितीचा ध्यास घेतला. लहानपणापासून वाचन करीत होते. त्यामुळे पुस्तक प्रकाशन हाच व्यवसाय म्हणून का नको, असा प्रश्न मी स्वत:ला विचारला.

सुरुवातीला हा प्रवास सोपा नव्हता. माझ्याकडे या क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती, आणि महाराष्ट्रात आधीपासूनच अनेक अनुभवी प्रकाशक कार्यरत होते. मुंबई आणि बहुतांश पुण्यामध्ये मराठीतील सर्व प्रकारची ग्रंथनिर्मिती होते. मी कोल्हापूरमध्ये. तर पुस्तकांच्या लेआऊटपासून ते त्याच्या गुणवत्तेपर्यंत बर्‍याच गोष्टी शिकण्याचं मोठं आव्हान होतं. पण या आव्हानालाच मी ‘सुवर्णसंधी’ मानली. आवश्यक त्या कौशल्यांचा अभ्यास केला. निर्मितीमधील सर्व बाबी जाणून घेतल्या. कागदापासून ते छपाईच्या दर्जाबाबत आपोआप अनुभवांतून कळायला लागले. सासरची मंडळी- पती, सासरे शेतकरी कुटुंबातले असले तरी नोकरदार, व्यावसायिक होते.

सासरकडल्या कुटुंबीयांनी माझ्या या निर्णयाला प्रोत्साहन दिलं. पतीनेही सुरुवातीच्या काळात मला खूप पाठिंबा दिला, मदत केली. माझे पहिले लेखक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी आपलं ‘वाचन’ पुस्तक मला विनाअट दिलं. त्या पुस्तकावर कोल्हापूर जिल्ह्यात ‘वाचन प्रेरणा दिना’चं औचित्य साधून सर्व शाळांमध्ये ‘वाचन’ पुस्तकावर स्पर्धा योजली गेली.

वाचनकट्टा, शिक्षण संस्था यांच्या पाठबळामुळे आमची ‘वाचन’ची पहिली आवृत्ती लगेचच संपली. प्रसिद्ध ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांनी ‘राजर्षी शाहू एक दृष्टिक्षेप’, ‘मुलांच्यासाठी छत्रपती शाहू महाराज’ आणि ‘कोल्हापूर एक इतिहास दर्शन’ ही पुस्तके स्वत:हून देऊ केली. त्यामुळे माझा उत्साह, उमेद वाढत गेली. आम्ही एका मागून एक पुस्तके काढत होतो. दोन नामवंत लेखक प्रारंभालाच मिळाल्यामुळे माझ्या ‘भाग्यश्री प्रकाशन’चे नाव अल्पावधीत सर्वश्रुत झाले. विक्री तडाखेबंद होत होती. तशात करोना, टाळेबंदीचं संकट उभं ठाकलं. व्यवसाय कमी करून पुन्हा काही काळासाठी नोकरीकडे वळावं लागलं. पण मी ठरवलं होतं, थांबायचं नाही. नोकरी करत मी व्यवसाय सुरूच ठेवला याचं लोकांना आश्चर्य वाटायचं. मुख्याधिकारी म्हणून ‘हेल्पर्स ऑफ दि हॅण्डीकॅप्ड, कोल्हापूर’सारख्या सामाजिक अपंग पुनर्वसन संस्थेत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे माझा जनसंपर्क विस्तारला आणि त्याचा व्यवसायालादेखील फायदा झाला. २०२४ साली प्रकाशनाकडे पूर्ण लक्ष देण्याच्या हेतूने मी नोकरी सोडून दिली आणि पुन्हा पूर्णवेळ प्रकाशनाचाच व्यवसाय करू लागले.

२०१८ ते २०२६ या आठ वर्षांच्या कालावधीत शंभराहून अधिक पुस्तके प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली. माझ्या लेखकांना विविध पुरस्कार मिळाल्याने प्रकाशनाच्या लौकिकात भर पडली. आजवर प्रकाशित केलेल्या विविध ग्रंथांना दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी, अक्षर सागर, गारगोटी, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रसूल सोलापुरे यांच्यातर्फे दिले जाणारे पुरस्कार मिळाले. तसेच आमच्या ‘गुटेनबर्गच्या सावल्या’ या पुस्तकाला लिंगभाव संवेदनशील लेखनासाठीच्या राष्ट्रीय ‘लाडली मीडिया पुरस्कार २०२४’ने गौरवण्यात आले.

पुस्तकनिर्मिती, विक्री, वितरण करताना या क्षेत्रात कोणतीही सवलत न घेता केवळ गुणवत्तेच्या आधारे आमची संस्था उभी आहे. जमतील तितके प्रयोग पुस्तकांवर सुरू आहेत. त्यात मराठीबरोबर हिंदी, इंग्रजी पुस्तके अनुवाद करून घेऊन प्रकाशित केली. श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी यांनी डॉ. मामासाहेब जगदाळे यांचे प्राचार्य वा. न. इंगळे लिखित ‘कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे जीवन चरित्र’ हे पुस्तक मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रकाशित करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवून माझा एकअर्थी सन्मानच केला. या संस्थेच्या भक्कम पाठबळामुळे अल्पावधीत त्या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या आल्या.

या व्यवसायात केवळ रुपये आणि पैसे महत्त्वाचे नसतात तर महत्त्वाचे असते ते तुमचा लेखक कोण याची पारख. नामवंतांबरोबर सामान्य लेखकांनाही नाव, प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी मी झगडते… संहिता हातात आली की तिचे कठोर संपादन करण्याचा शिरस्ता मी पाळला. आधी वाचक असल्याने संहिता वाचताच मला हे पुस्तक कसं बाळसं धरेल हे दिसू लागतं. संपादन, सजावट, निर्मिती, मुखपृष्ठ, मुद्रित शोधन सर्व अग्रगण्य प्रकाशकांच्या तोडीचं असलं पाहिजे, असा आग्रह सुरुवातीपासून धरत आले. त्यामुळे आपोआपच पुस्तकं दर्जेदार होत गेली. ज्यांचं पहिलं पुस्तक वाचकांपर्यंत पोहचलं तसं त्याच लेखकाचं दुसरं, तिसरं पुस्तक मला मिळू लागलं. ही लेखकाकडून प्रकाशकाला मिळालेली शाबासकी होतीच तशी जोखीम आणि जबाबदारीही!

मी प्रकाशक म्हणून लेखक आणि वाचक यांना बाप मानत निर्मिती साधनेकडे लक्ष पुरवते. पहिल्यापेक्षा दुसर्‍या पुस्तकाची निर्मिती ही अधिक कलात्मक आणि श्रेष्ठ असलीच पाहिजे असा अट्टहास ठेवते. हे आपोआप घडून आलं नाही. पुस्तक कोणतंही असो, ते ॲमेझॉन, अक्षरधारा, साधना, बुकगंगा, मेहता या प्रमुख ग्रंथदालनांत तसेच मराठवाडा, विदर्भ, प. महाराष्ट्र भागांत सर्वत्र कसं उपलब्ध होईल, याची काळजी घेणारं विक्रीचं जाळं मी विणलं आहे.

प्रकाशन व्यवसायात निर्मितीला मोठं भांडवल लागतं, वसुलीत संयम लागतो, वितरणात दृष्टी लागते. प्रकाशिका म्हणून पुस्तक प्रकाशन समारंभ, फेसबुक लाइव्ह, इंस्टाग्राम, फेसबुक पोस्ट अशा सोशल मीडियाच्या सर्व स्तरावर प्रत्येक पुस्तकाची यथायोग्य प्रसिद्धी केली. ग्रंथालय खरेदीचे पर्यायी नेटवर्क (शाळा, कॉलेज, सार्वजनिक ग्रंथालय) यातून तयार केल्यामुळे, विक्री आपसूक होत राहिली. पुस्तक संहितेनुसार आवृत्ती ठरवत गेल्यामुळे स्टॉक डोक्यावर राहिला नाही, शिवाय कसलंही कर्ज माथी आलं नाही. आता तर लेखक त्यांच्या नव्या पुस्तकाच्या प्रतीक्षेत असतात, पुस्तक रांगेमध्ये असल्याचं त्यांना सांगावं लागतं. माझा भूतकाळ आठवला की मी इथपर्यंत कसे पोहोचले यावर काही वेळा माझाच विश्वास बसत नाही.

या प्रवासात मला एक महत्त्वाची जाणीव झाली. प्रकाशन व्यवसाय हा केवळ पुस्तक छापण्याचा नाही, तर विचारांची देवाणघेवाण करण्याचा आहे. लेखक, वाचक आणि प्रकाशक यांच्यातील नातं हे अत्यंत सर्जनशील आणि समाजाभिमुख असतं. महत्त्वाचं म्हणजे या क्षेत्रात काम करताना मला सद्विचारी, संवेदनशील आणि सर्जनशील माणसांची साथ लाभली. त्यांच्या सहवासातून माझा दृष्टिकोन अधिक व्यापक झाला.

आजच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचं आव्हान असलं तरी वाचनसंस्कृती अजूनही टिकून आहे. लिहिणारा आणि वाचणारा मोठा वर्ग समाजात आहेच, शिवाय पुस्तक खरेदी करून ते इतरांना भेट देण्याची परंपराही वाढताना दिसते. विविध कार्यक्रमांमध्ये, अगदी लग्नसमारंभांमध्येही पुस्तकांचं वाटप होताना पाहून आनंद होतो. यामुळे छापील पुस्तकांना पुढल्या काळातही मरण नाही.

bhagyashreeprakashan@gmail.com