साधना देशमुख
‘नॅशनल बुक ट्रस्ट’ने प्रकाशित केलेलं मीना नाईक यांचं ‘दुसरं घर’ प्रकाशित झालं आहे. पुस्तकाच्या शीर्षकावरून विषयाची नक्की कल्पना येत नाही, पण अर्थातच मुखपृष्ठावरून कुटुंबाची काहीतरी गोष्ट असावी असं वाटतं. मीना नाईक हे लेखिकेचे नाव वाचल्यावर अंधूक कल्पना येते की विषय लहान मुलांच्या भावविश्वाशी संबंधित असावा. आणि ही अंधूक कल्पना पुस्तक वाचताना ठळक होत जाते.
पुस्तक लहान मुलांच्या भावविश्वाशी संबंधित असलं तरी त्याचं कारण, घडामोडी या जागतिक आहेत. ५-६ वर्षांपूर्वी सगळ्या जगाच्या आयुष्यात कोविडचा प्रलय येऊन गेला. या कोविडची पहिली लाट आणि दुसरी लाट, लॉकडाउन, क्वारंटाइन इत्यादी इत्यादी शब्द आपल्या सगळ्यांना म्हणजे मोठ्या माणसांना कळू लागले. मोठी माणसं त्याबद्दल खूप बोलत होती.
त्या काळात आपण वृत्तवाहिन्यांवर बघत होतो की, महानगरांमधून गरीब, श्रमिक, असंघटित कामगारांचे लोंढे आपापल्या गावाकडे पायी निघालेले… त्यांच्या हालअपेष्टा, अनिश्चितता यांनी आपण व्यथित होत होतो. काही मंडळी स्वयंसेवी संस्था त्यांच्या जेवणाची, राहण्याची सोय करीत होते. या सगळ्या गदारोळात त्यांच्या मुलांच्या मनातली घालमेल, स्वप्न याचे रेखाटन लेखिकेने ‘दुसरं घर’ या पुस्तकात नेमकेपणाने मांडले आहे.
आपले ओळखीचे घर, परिसर, मित्रमंडळी सोडून जाताना या लहानग्यांची होणारी घालमेल, उन्हा-तान्हात होणारे कष्ट मात्र मधून मधून दुसर्या घराविषयीची उत्सुकता हे सर्व बालमनाशी एकरूप होऊन पुस्तकात टिपले आहे. मुलांची दुसर्या घराची उत्सुकता त्यांच्या निरागस भावना आणि आलेल्या परिस्थितीतही आपल्याला रमवणार्या गोष्टी शोधण्याची धडपड छोट्या छोट्या प्रसंगांमधून त्यांनी खूप छान पद्धतीने खुलवली आहे.
दुसर्या घराची गोष्ट पालकांनी तर वाचावीच, पण मुलांनीही वाचावी. कोविडचा परिणाम या वर्गातील मुलांवर काय आणि कसा झाला यावर फार कमी लिहिलं गेलंय म्हणून या केवळ २३ पानी छोट्या पुस्तकातून ते यथायोग्य पोहोचतं. पुस्तकातली चित्र अंजन बोस यांची आहेत. ती खूप बोलकी आहेत. मराठीमध्ये या विषयावरचं हे छोटे खानी पुस्तक मोठा आशय सांगून जातं.
‘दुसरं घर’,
मीना नाईक,
नॅशनल बुक ट्रस्ट,
पाने-२३,
किंमत-९० रुपये.
