scorecardresearch

आदले । आत्ताचे: मोटार लाइनवाली ‘एकोणिसावी जात!’

साठोत्तरीमध्ये ‘सत्यकथा’त लिहिणाऱ्या लेखकांनी साहित्यविश्वात खळबळ केली. दुसऱ्या बाजूला उद्धव शेळके, अण्णा भाऊ साठे आणि अर्नाळकरोत्तर काळातील रहस्यकथांचं जग फोफावलं.

Menka magazine Novel Nineteenth Caste Writer Mahadev More lokrang article
आदले । आत्ताचे: मोटार लाइनवाली ‘एकोणिसावी जात!’

प्रतिक पुरी

साठोत्तरीमध्ये ‘सत्यकथा’त लिहिणाऱ्या लेखकांनी साहित्यविश्वात खळबळ केली. दुसऱ्या बाजूला उद्धव शेळके, अण्णा भाऊ साठे आणि अर्नाळकरोत्तर काळातील रहस्यकथांचं जग फोफावलं. याच काळात महाराष्ट्राबाहेरील बेळगावातील निपाणी भागात राहणारे महादेव मोरे अत्यंत कसदार लेखन करीत पुढे येत होते. ते कालपरवापर्यंत पिठाची गिरणी चालवून आपलं जगणं जगत होते यावर विश्वास ठेवणं कठीण जातं..

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Anil Parab Supreme Court Rahul Narwekar
“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त

पु. वि. बेहरे यांनी १९६७ मध्ये त्यांच्या ‘मेनका’ या मासिकातून एक कादंबरी क्रमश: प्रसिद्ध केली. पुढच्याच वर्षी त्यांनी ती पुस्तकरूपानं प्रकाशित केली. वाचकांनी तिचं मनभरून स्वागत केलं. त्यानंतर दोन दशकांनी १९८८ साली वाचकांच्या आग्रहास्तव बेहरेंनी हीच कादंबरी ‘साप्ताहिक जत्रा’मध्ये पुन्हा छापली. ही कादंबरी होती ‘एकोणिसावी जात’ आणि लेखक होते महादेव मोरे! एकीकडे तत्कालीन प्रसिद्ध लेखकांनी या कादंबरीचं कोडकौतुक केलं, तर दुसरीकडे मात्र त्यांची तंबाखू-वखारीचे लेखक, गॅरेजवाले लेखक म्हणून चेष्टाही केली गेली. मोरेंच्या लिखाणातून गॅरेजवाले, तिथले हरकामी पोरं, ट्रक-टॅक्सी ड्रायव्हर, क्लीनर, पोलीस, आरटीओवाले, तंबाखूच्या वखारीतल्या स्त्रिया, वेश्या, दलाल, नायकिणी व त्यांचे पंटर, गुंड, देवदासी, मेस्त्री, हॉटेलमालक, टेबले पुसणारी पोरे, मांग, गारुडी, शेतमजूर, कामगार, आंदोलनकर्ते असे अनेक लोक मराठी साहित्यात प्रथमच आपल्या खऱ्या वास्तवासहित आले. मोरे हे बेळगाव येथील निपाणीचे रहिवासी. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांना कॉलेज शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. त्यानंतर त्यांनी घर चालवण्यासाठी मिळतील ती कामं केली, दुसरीकडे त्यांचं लेखनही सुरूच होतं. त्यांची पहिली कथा १९५९ साली प्रसिद्ध झाली तर पहिली कादंबरी ‘पाव्हणा’ १९६६ साली. संपूर्ण ग्रामीण निवेदनशैली असलेली मराठीतली ही पहिलीच कादंबरी आहे असं मोरे म्हणतात.

त्यांच्या विपुल लेखनातील ‘झोंबडं’ ‘मत्तीर’ ‘चिताक’ ‘चेहऱ्यामागचे चेहरे’ ‘एकोणिसावी जात’ इत्यादी पुस्तकं विशेष प्रसिद्ध. अत्यंत कसदार लेखन करणारा हा लेखक कालपरवापर्यंत पिठाची गिरणी चालवून आपलं जगणं जगत होता यावर विश्वास ठेवणं कठीण जातं, पण ते खरं आहे. ‘एकोणिसावी जात’ या कादंबरीनं मोरेंना लेखक म्हणून ओळख मिळवून दिली. लिखाणाविषयी ते सांगतात, ‘‘मी कधीही कुणाचं मार्गदर्शन घेतलं नाही, की लिहिलेलं कुणाला वाचायला देऊन सल्ला वगैरे घेत बसलो नाही. पाहिलेलं, अनुभवलेलं शब्दबद्ध करतानाच हे कुणीही प्रसिद्ध करील, असा आत्मविश्वास मनात येत गेला.’’

‘एकोणिसावी जात’ १९६८ साली प्रसिद्ध झाली तेव्हा इंदिरा गांधी नुकत्याच पंतप्रधान झाल्या होत्या. मुंबईत बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा वाघ डरकाळय़ा फोडण्यासाठी सज्ज होत होता. तिकडे अमेरिकेत वर्णविद्वेषाविरोधात लढणाऱ्या मार्टीन ल्युथर किंग यांची हत्या झाली असली तरी अपोलो यानाच्या चांद्रमोहिमा स्थगित झाल्या नव्हत्या. प्रत्यक्ष चंद्रावर मानवी पाऊल पडण्यास वर्षभराचा अवधी होता. भारतात दूरदर्शनची सुरावट घुमायला अजून चारेक वर्षे बाकी होती. नवा पैसा नुकताच चलनात रुजू झाला होता आणि कूळ कायद्यातून उद्भवलेल्या न्यायालयीन मारामाऱ्या अद्याप संपल्या नव्हत्या. साहित्याच्या प्रांतात नेमाडेंची ‘कोसला’ येऊन पाच वर्ष उलटली होती. उद्धव शेळके (धग), अण्णा भाऊ साठे (माकडीचा माळ, वारणेचा वाघ), शंकर पाटील (टारफुला), हमीद दलवाई (इंधन), चि. त्र्यं. खानोलकर (रात्र काळी घागर काळी), रा. रं. बोराडे (पाचोळा) यांच्याही कादंबऱ्या याच कालखंडातल्या. आधीच्या पिढीतले दिग्गज लेखक, जे बहुतांशी पांढरपेशे, प्रमाण मराठी वळणाचे होते, त्यांची साहित्यात मक्तेदारी सुरू होती. अशात मराठीच, पण महाराष्ट्राबाहेरील बेळगावातील निपाणी भागातील महादेव मोरे यांची वर्णी लागणं तसं कठीणच. पण या काळात आलेल्या ‘एकोणिसावी जात’ची तत्कालीन समीक्षकांनी हवी तशी दखल घेतल्याचं मात्र दिसत नाही. आज तब्बल पन्नासेक वर्षांनंतरही ती वाचताना तिचा ताजेपणा, विषयाचं नावीन्य, त्यांतील व्यक्तिरेखा, प्रसंगांची मांडणी, त्यातली भाषा, विचार याची अपूर्वाई माझ्यासारख्या लेखकाला जाणवते. नारायण ही या कादंबरीची प्रमुख व्यक्तिरेखा. त्याचं वय अठराच्या आतलं. वयाच्या नवव्या-दहाव्या वर्षीच तो बेघर झालाय आणि जगण्यासाठी गॅरेजची कामं करता करता टॅक्सीही चालवू लागला आहे. ट्रक ड्रायव्हरचं लायसन्स घेऊन स्थिरस्थावर होण्याची त्याची मनीषा आहे. घरच्यांनी त्याला सोडलं असलं तरी मदत करणारी माणसं त्याला भेटत राहतात. ही जशी चारचाकांवरची बेभरवशाची, फिरस्तीची जिंदगानी आहे; तशीच ती एक तरल प्रेमकथाही आहे. यात नारायण आणि यास्मिन यांचं मस्तीखोर अनगढ प्रेमळ नातं आहे, पण शेवटी तिच्याच खुनाचा आळ त्याच्यावर येतो. मात्र आपल्या सोबत्यांच्या मदतीनं या संकटातून तो सुटतो. हिरी नावाची आणखी एक मुलगी या दरम्यान त्याच्यावर मूकपणे एकतर्फी प्रेम करतेय. तिच्या सोबतीनं संसार करण्याचं स्वप्न बघत असताना नारायणची गोष्ट पुढे सरकते. नारायणच्या शब्दांत कादंबरीविषयी सांगायचं तर, ‘‘.. भकीस्तावानी आमची ही नोकरी. कुठं लागंल तिकडं जायचं, मिळंल ते जेवायचं, गावंल त्या जागेवर झोपायचं. अठरापगड जाती हैत, खरं आम्हा ड्रायव्हर-किलनर लोकांची एकोणिसावी जात असती-ही अशा तऱ्हंची.’’

साधारण दीडशे पानांच्या या कादंबरीचा वेग जराही कमी होत नाही. पुणे-बेंगळुरू महामार्गालगतच्या एका गावातील परिसर यात मोरेंनी उभा केलाय, ज्यावर निपाणीची छाया आहे. मोरे स्वत: कित्येक वर्ष आधी गॅरेजमध्ये आणि नंतर टॅक्सी ड्रायव्हर म्हणून या परिसरात राबलेले. त्यांच्या तरुणपणातल्या राबणुकीचा हा काळ त्यांच्या या लिखाणात अलगद उतरलाय. ही कादंबरी खऱ्या अर्थानं ‘किमग अव्ह एज’ या प्रकारातली, मात्र ‘कोसला’वर जसा ‘कॅचर इन द राय’चा आरोप झाला तसा कोणताही आरोप या कादंबरीवर होऊ शकत नाही. नारायण आणि पांडुरंग सांगवीकर यांची तुलना करतानाही जाणवतं की नारायणची व्यक्तिरेखा तुलनेनं खूप प्रगल्भ आणि शक्तिशाली आहे, कारण नारायणच्या जगण्याला वास्तव जगण्याचा जिवंत स्पर्श झालेला आहे. पांडुरंगसारखा तो श्रीमंत घरदार असलेला नाही, पोटापाण्याची चिंता त्याला रोजचीच आहे, शिक्षणाचा पत्ता नाही, मात्र त्याच्या जगण्यात शरणागत निराशा नाही- जी पांडुरंगच्या जगण्यात आहे, ज्याचा शेवट खुंटीला टांगून घेण्यात होतो. नारायण लढवय्या आहे, त्याला ही निराशा परवडणारी नाही. कारण त्याचं जगणं त्याच्यावरच अवलंबून आहे. कोणतेही तात्त्विक चोचले करण्याची त्याला मुभा नाही. नारायणचं जगणं संघर्षांचं, पण रखरखीत नाही. त्यात ताणतणाव आहेत, पण तो ईर्षेनं, जिद्दीनं आपल्या समस्यांना भिडतो आणि मुख्य म्हणजे यातही आपलं वेगळं सत्त्व कायम ठेवतो. त्याला एक चारित्र्य आहे, मूल्यभान आहे- ज्यात चुकीच्या तडजोडींना स्थान नाही. त्यामुळे पांडुरंगच्या तुलनेत तो खूप उजवा ठरतो. ही तुलना काहींना अनाठायी वाटू शकेल, पण मोरेंचा नारायण मराठी साहित्यात कुठे आहे हे दाखवण्यासाठी त्याचा उल्लेख केला. नारायणची व्यक्तिरेखा यासाठीही लक्षात राहते की अशा फिरस्तीच्या व्यवसायात ड्रायव्हर आणि वेश्या यांचं जे अटळ नातं तयार होतं त्यापासून तो दूर आहे. आपल्या कामाची त्याला लाज वाटत नाही. यास्मिनला तो म्हणतो, ‘‘कोई भी काम हल्का नही होता, छोटा नही होता यास्मिन! तो देखनेवालोंकी नजर हल्की होती है, छोटी होती है. कोई काम करके पेट भरना तो बुरी बात नही?’’ किंवा ‘ज्याचं खावं मीठ त्याचं काम करावं नीट’, असा स्वभाव असल्यामुळे नारायणची इतर ड्रायव्हर लोक थट्टा करतात. ड्रायव्हरकीचे जे व्यावसायिक रोग असतात त्यांच्यापासून नारायण कटाक्षानं स्वत:ला वाचवत राहतो. ज्या खानावळीत तो जेवतो तिथला मालक मेल्यानंतर त्याच्या कुटुंबाची काळजी घेणं त्याला माणुसकीची गरज वाटते. मोरेंनी या कादंबरीच्या रूपानं ड्रायव्हर, गराज लाइनची भाषा मराठी साहित्यात प्रथमच आणली. उदा. ‘‘यास्मिन खळखळून हसली नि तिचे शुभ्र दात चालू मॉडेल शेव्हरलेटच्या, इम्पालाच्या जाळीच्या दातावरील निकेलसारखे चमकले.’’ किंवा ‘‘डिफरन्सल म्हणजे नितंब, बॉनेट-शो म्हणजे वक्षस्थळं, चेहरा वगैरे आणि चेस म्हणजे देहयष्टी..’’ त्यांच्या भाषेत एक गोडवाही दिसतो- ‘‘उघडय़ावर जगाच्या नजरेसमोरच, पण नजरेच्या टप्प्यात नव्हे, असं वागताना एक हुरहुरतं, चोरटं अन् मधाच्या पोळय़ातून ठिबकणाऱ्या गोड गोड थेंबासारखं असं सुख वाटत होतं.’’ हल्ली मुलं जी मिंग्लिश शब्द वापरतात त्याचा उपयोगही मोरेंनी त्या काळी केलेला आहे. उदा. ‘‘सायंकालीन धूसर प्रकाशात त्यांची शोभा नारायणला ‘देखनेबल’ वाटली.’’ मोरेंनी हिरीचं केलेलं वर्णन आवर्जून द्यावंसं वाटतंय. ते लिहितात- ‘‘आवाजाच्या दिशेनं पाहिलं तर हिरी उभी असलेली.. वडाच्या विस्तीर्ण बुंध्याआड उभी राहिलेली.. जमिनीतून उगवलेल्या कर्दळीसारखी- तशीच मोकार, फुललेली, ताजी टवटवीतशी.. हिरव्याजर्द पातळानं कर्दळीचा गाभा वेढलेला, चेहऱ्यावरची गोंदवणाची नक्षी त्यात खुलून दिसणारी.. पव्याच्या धारंगत मोगणं नाक.. त्यावर चमकी, चमामा चमकणारी.. सकाळच्या उनात.. रात्रभर पाऊस पडलेला.. न्हालेली धरित्री.. अन् आता तीवर पडलेलं सकाळचं कोवळं ऊन.. दहाचा सुमार होत आलेला.. तरीही त्याचं कोवळंपण न गेलेलं.. जागजागी पाण्याची थळी साचलेली.. उनाच्या तिरपीनं चमकणारी-हिरीच्या नाकातील चमकीगत!’’

सध्याच्या काळाच्या संदर्भाने मोरेंच्या या कादंबरीविषयी काही सांगणं गरजेचं आहे. यात अकबऱ्या नावाच्या पात्राला कोणालाही मॅड म्हणण्याची व त्याचा हिंदूस्थानशी संबंध जोडण्याची खोड आहे. मोरे लिहितात, ‘‘कुठल्याही गोष्टीचा असा हिंदूस्थानशी संबंध जोडून, एकदम वरच्या पातळीवर उडी मारायची खोडच अकबऱ्याला पडली होती. देशात महागाई का? तर लोक मॅड हैत, आनि लोक मॅड हैत म्हणून तर काँग्रेस अजूनपतोर टिकलीया. आनि हिंदूस्थान मागं पडलाय त्यो हेनंच.’’ या मॅड लोकांवरून सध्याच्या वातावरणात आपणच श्रेष्ठ असल्याची दर्पोक्ती करणाऱ्या ‘अंधभक्तां’ची जाणीव होते- ज्यांना कोणत्याही गोष्टीत धर्माचा संबंध दिसतो. हे अशासाठी लिहिलंय की या कादंबरीत ग्रामीण भागातील हिंदू-मुसलमानांच्या सहजीवनाचा जो जिवंत ताणाबाणा मोरेंनी अचूकपणे दाखवला आहे. अकबऱ्या, यास्मिन, म्हैब्या, आस्त्रफखान, अम्मीजान यांच्या रूपानं सामान्य मुसलमानांचं जगणं यातून त्यांनी सजगपणे चितारलं आहे. जगण्यासाठी पिठाची गिरणी चालवणारे मोरे त्यांना भेटणाऱ्या तळागाळातील माणसांच्या सुख-दु:खाशी एकरूप होऊन, गिरणीतच वेळ मिळेल तेव्हा लिखाण करून कित्येक वर्ष जगत आले आहेत. हा एक कसत्या राबत्या हातांचा लेखक. एक लेखक म्हणून मोरेंची ताकद या कादंबरीत दिसून येतेच, तसाच त्यांचा स्वाभिमानी पीळही दिसून येतो- जो नारायणमध्ये पुरेपूर उतरला आहे. ‘र्फी’ या कथासंग्रहातील मनोगतात ते म्हणतात, ‘‘मी माझ्यापुरती सीमा आखून घेतलीय. ती म्हणजे, ह्य दारिद्रय़ रेषेखालील लोकांचं जीवन चित्रित करणं. मला पांढरपेशी समाजाशी काही कर्तव्य नाही. माझा वाचकवर्ग कुठला? तर शिक्षणाच्या प्रसारामुळे खेडय़ापाडय़ांतील शाळा-कॉलेजातून शिकलेला, तळागाळातून उठून दारिद्रय़ रेषेवरती झेप घेण्याची धडपड करणारा, असा हा हजारोंच्या संख्येचा, नव्या अभिरुचीचा वाचक आहे- तो माझा, मी त्यांचा. माझे अनुभव, माझे लिखाण त्यांना भिडते. अरे, हे माझे, माझ्या समाजातले, मी अनुभवलेले, पाहिलेले, मला ओळखीचे वाटणारे असे त्याला वाटते. तो मग पत्रं पाठवितो. माझ्यासारख्या राबणाऱ्याच्या रखरखीत आयुष्यात थंडगार झुळूक आल्यासारखे वाटते. ही कमाई काय थोडी आहे? त्याच्यासाठी तरी यापुढेही मी लिहिणारच आहे. मग तथाकथित उच्चभ्रू लोक कितीही नाके मुरडोत, मला त्याची पर्वा नाही!’’ समीक्षकांनी नाही, पण जाणत्या वाचकांनी त्यांच्या पुस्तकांना न्याय दिला आहे. हेही नसे थोडके.

साहित्यावर आस्था असलेला तरुण लेखक. लैंगिकतेबाबत तरुणांनी संवादी असायला हवे हे सांगणारी ‘वाफाळलेले दिवस’ आणि फुटबॉल या खेळाद्वारे अभावग्रस्त मुलांच्या घडण्याची कहाणी सांगणारी ‘चॅलेंज’ या दोन युवा कादंबऱ्या. ‘मोघपुरुष’ आणि ‘वैनतेय : एक गरुड योद्धा’ ही पुस्तके लोकप्रिय.
शशी थरूर यांच्या ‘द पॅराडॉक्सिकल प्राइम मिनिस्टर’ यासह इंग्रजी बेस्टसेलर्स ग्रंथांचे अनुवाद.
Pratikpuri22 @gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Menka magazine novel nineteenth caste writer mahadev more lokrang article amy

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×