डॉ. देवानंद सोनटक्के
नारायण कुलकर्णी कवठेकर यांचा ‘मी मराठीत बांग देतो’ हा सुमारे ८० कवितांचा संग्रह काव्याग्रह प्रकाशनाने नुकताच प्रसिद्ध केला आहे. नारायण कुलकर्णी कवठेकर हे उपरोध व उपहासातून समकालीन व्यवस्थेवर परखड भाष्य करत विद्रोह पुकारणारे कवी म्हणून परिचित आहेत. एक ललितसंग्रह वगळता आयुष्यभर कवितेलाच व्रतस्थपणे वाहून घेतलेल्या लिहित्या व जागत्या कवीचा हा संग्रह नव्वदनंतरच्या कालखंडात आला आहे. त्यामुळे जागतिकीकरणाने उद्ध्वस्त झालेले जीवन, शेतकरी-स्त्रिया-नागरिक यांचे शोषण.. सृष्टी, काल, अवकाश व मानवी जीवन यांचे सहसंबंध, मानवतावादी प्रेमजाणीव, कवी व समाज यांचे द्वंद्व तसेच कवीचे बा व आंतरिक द्वंद्व, आत्मशोध व प्राप्त झालेली अस्तित्ववादी जाणीव या कवितेत प्रकटली आहे.
एकेकाळी सामाजिक परिवर्तनाची कविता लिहिणाऱ्या या कवीने मात्र प्रारंभीच, ‘साऱ्या ठायी गुणाने नांदेल’ अशा देवाचे मागणे आदिपुरुष व आदिमातेकडे मागितले आहे. ‘सूर्य आपल्या गर्भात जन्म घेतो, त्याचा अंश आपल्यात असतो’ असे मानत ‘पक्ष्यांच्या जगातून मन काढून पशूंच्या विश्वात रमावं’ – अशी समाजापेक्षा सृष्टी समरसतेची भावना बोलून दाखवली आहे. सामाजिक बदलापेक्षा सृष्टिसातत्याची कवीला ओढ वाटत आहे.
‘जे माझं नाही
ते माझं आहे
असं वाटणं
ही दु:खाची सुरुवात,
तर
मळणार नाही
कधीच जे
त्यासाठी झुरणं
ही व्यथेची रुजुवात’ असे कवीचे तत्त्वज्ञान आहे. कवी दु:खाचे मूळ मानवी ‘तृष्णेत’ मानतो.
‘नाऱ्या म्हणे माझा जीव। दु:ख वेदनेची ठेव’ असे म्हणत, पाच हजार वर्षांचा वारसा सांगत विश्व हिंडून काळ नावाचा ऐवज गमावून सर्वस्व हिरावल्या गेल्याची भावना कवी अनुभवतो. ‘आरशात पाहून
झाले स्वत:वरच एवढी खूश
की काचेवरती नक्षी सजवत गेले
अन् मूळ चेहरा कोराच राहिला’ असे म्हणत स्व:ची अपूर्णता आणि अस्तित्वभान व आत्मभानाची आर्तता व्यक्त करतो. जागतिकीकरणानंतरचे वास्तव आणि आभासी जग व नवतंत्रज्ञानामुळे बदललेली कवीची जाणीव आता ‘सट्वीने प्रयत्नांच्या पुढे निष्फळ व स्वप्नांच्या पुढे लिहिलं वांझोटी’ अशी प्रकटली आहे. ‘पण जीवनाचा विदूषक
करामतच दाखवतो काही अशी
की मृत्यू नामे तत्त्वज्ञ
चेहरा विस्कटून हसतो’
किंवा
सभ्य माणूस
ओठांवर येऊ पाहणारा
दु:खाचा शब्द
गिळून टाकण्याखेरीज
आणखी काही करू शकत नाही, अशी अगतिकता कवी व्यक्त करतो.
‘माणूस म्हणजे
या जंगलातील,
पुस्तक वाचणारं
एक जनावर.
‘जग असतं
त्याच्या दिमाखात
आणि आपण असतो
आपल्या तालात’ असे सृष्टी, व्यक्ती व समाज यांतील द्वंद्व तर कवी शोधू पाहतोच; पण
‘झोप आल्याचे सोंग
तेव्हा
आपल्याच आत्म्यातून
उठून चालू लागते
एक प्रेत
स्मशानाच्या दिशेने’ असे म्हणत बा मी व आंतरिक मी यांचेही द्वंद्व व्यक्त करतो. त्यामुळे कवीला उत्तरे शोधण्याचा जाच सोसण्यापेक्षा प्रश्नांना चिरडण्यात समाधान आहे.
‘सारा विवेक
पणाला लावूनही
प्रश्न सुटत नाही
समंजसपणाचा लेप लावला
दुखणे हटत’ असा कवीचा निष्कर्ष आहे.
हा सारा कोलाहल व्यक्त करण्यासाठी कविता आणि कवितेची भाषा यांच्याशीही कवी झगडत राहतो.
‘कविता नाही राहिली आता हातची,
बंडखोर पोरीसारखी ती
आता मोठय़ाने बोलते. असे म्हणत तिला
‘ऊठ, बांध आकाशातली वीज पायात,
मोकळे सोड बाहूंचे झुले,
अन् उन्मुक्त मनमुक्त
आषाढातील ढगांसारखी
गदगदून कोसळ माझ्या अस्तित्वावर’ असे आवाहन करतो. कवी काळाच्या दोन पावले पुढे जाऊ लागतो आणि धैर्य दिल्याबद्दल काळाला धन्यवादही देतो.
सृष्टी, मानवी जीवन, समाज, अस्तित्व आणि काव्य या सर्वाना व्यापून असलेली गोष्ट म्हणजे प्रेम; पण तेही सहज प्राप्त होत नाही. म्हणून- ‘मी
तुझ्या दु:खांना
वळसा घालून आलो,
तू
माझ्या व्यथांना
टाळून मला भेटलीस’, अशी खंत व्यक्त करतो. कवी ‘दुसऱ्याचं दु:ख आपण घ्यायचं आणि आपलंही आपल्याजवळच ठेवावं’ अशी प्रेमाची व्यापकता स्त्रीत्व, प्रेयसी, मातृत्व व पृथ्वीतत्त्व या आदिबंधात शोधत जातो.
अशा प्रकारे कवी मानवी दु:ख, काळ, अवकाश, मानवी अस्तित्व, सृष्टी आणि कविता यांचे आंतरिक नाते- असे अस्तित्वविषयक आशयसूत्रं, बदलते समाजवास्तव, सामान्य माणसाचे शोषण, शेतकऱ्यांच्या समस्या, आधुनिक युगातही टिकून असलेली जातिव्यवस्था, पोलीस, न्याय, प्रसारमाध्यमे यांच्यातील हरवत चाललेली संवेदनशीलता, वासनेच्या आहारी गेलेली व नैतिकता हरवलेली माणसे, त्यांच्यातील बदलते व विपरीत नातेसंबंध अशी सामाजिक आशयसूत्रे व्यक्त करत जातो. एकूणच मानवी जीवनाचा बा व आंतरिक असा समग्र शोध कवीने या कवितासंग्रहात घेताना दिसतात.
‘बांग’ हा सामूहिक नमाजासाठी केलेला पुकारा असतो. त्यात समूहजाणीव व कृपेची आर्तता अशा दोन्ही गोष्टी असतात. ‘भ्रमिष्टाचा जाहीरनामा’ या कवितासंग्रहात संतोष पद्माकर पवार यांनी आधी ‘खुतबा’ हा फॉर्म; तर आता कुलकर्णी-कवठेकरांनी ‘बांग’ हा नवा भाषिक आकृतिबंध वापरला आहे. अकोल्यासारख्या हिंदू-मुस्लीम संवेदनशील शहरात राहणाऱ्या कवीने आर्त हाकाऱ्याचे शीर्षक निवडून बहुसांस्कृतिकता व सामाजिक संवेदनशीलता जपत एका अनोख्या फॉर्मचे सूचन केले आहे, त्याचेही स्वागत.
‘मी मराठीत बांग देतो’,
– नारायण कुलकर्णी कवठेकर,
काव्याग्रह प्रकाशन, वाशीम
पाने- १७५, किंमत- २७० रुपये.
anandsonu23@gmail.com