दुबईहून विमान उडाले आणि मनात एक हुरहुर दाटून आली. थोडी भीती, थोडे कुतूहल! खरं तर भीतीच जास्त! इराणमध्ये १९७९ साली इस्लामिक क्रांती झाली तेव्हा वर्तमानपत्रांत आलेला खोमेनींचा उग्र चेहरा आठवत होता. नंतरही इराणबद्दलच्या बातम्या यायच्या. पण बहुतेक नकारात्मक! सलमान रश्दींच्या पुस्तकामुळे त्यांच्याविरुद्ध काढलेला फतवा.. अमेरिकन वकिलातीवरचा हल्ला.. मनातील इराणची प्रतिमा अधिकच काळवंडत गेली. कालांतराने ‘गाथा इराणी’ हे मीना प्रभूंचे पुस्तक हाती आले. इराणी सभ्यता, इराणमधील सुंदर शहरे आदींचा एक वेगळाच चेहरा या पुस्तकातून सामोरा आला. त्यामुळे तेहरानला जाताना अशा संमिश्र भावना मनात होत्या.
तेहरानच्या विमानात बसताना आजूबाजूच्या माणसांकडे पाहिले तर सगळी युरोपियनच वाटत होती. गोरे, उंच, नाकेले पुरुष. आणि बायका तर खूपच सुंदर! काळेभोर केस, डोळे आणि गोरापान रंग. पेहेरावही पाश्चात्य होता. कोणीही डोक्याला ‘हिजाब’- म्हणजे रुमाल बांधलेला नव्हता. अर्थात् काही बुरखाधारीही होत्या.
विमान तेहरानला उतरले आणि बायकांनी पटापट डोक्याला हिजाब बांधले. विमानतळ नवे असूनही त्यात नवेपणा, आधुनिकता नव्हती. हवेत चांगलाच गारठा होता. टॅक्सीत बसलो आणि शहराच्या दिशेने निघालो. तेहरान आपल्या मुंबई वा दिल्लीसारखंच महानगर आहे. प्रचंड मोठं!
सकाळी उठून खिडकीचा पडदा उघडला तो समोर बर्फाच्छादित अल् बोर्ज पर्वत! हा पर्वत तेहरानच्या उत्तरेला आहे. तो पाहताना इतका जवळ वाटतो, की सरळ चालत गेल्यास आपण त्याच्या पायथ्याशीच पोचू असे वाटत राहते. हवा छान होती म्हणून फिरायला बाहेर पडलो तर सकाळीही रस्ते रिकामेच होते. एवढे मोठे शहर.. पण त्यात जिवंतपणा नव्हता. मग उलगडा झाला की, इथे नोरुझ सणाला संपूर्ण इराण सुटी साजरी करीत असतो.
आम्ही टॅक्सीने दरबांद (Durband) या ठिकाणी गेलो. तिथे प्रचंड गर्दी होती. इथे सर्वजण फार्सी भाषा बोलतात. इंग्रजी थोडय़ाच लोकांना येते. दरबांद अल् बोर्ज पर्वताच्या पायथ्याशी आहे. तिथून वर जायला रोप-वे आहे. हा रोप-वे म्हणजे बंद केबिन नसून एक बाक होता. रोप-वेचा वेग थोडा हळू झाला की त्यात जवळजवळ उडी मारूनच बसायचं. या दिव्यातून जाताना भलतीच गाळण उडाली. थंडी आणि भीतीने पार गारठून गेलो. रोप-वेने वर पोचलो. वरून खाली जाणारा रस्ता दिसत होता. हॉटेल्स, गाडय़ा दिसत होत्या. जत्राच भरल्यासारखी वाटत होती. आम्ही चालतच खाली यायला निघालो. पुन्हा रोप-वेत बसणं अशक्यच होतं. पर्वतावरची माती भुसभुशीत होती. बूट असूनही सारखं घसरायला होत होतं.
खाली उतरल्यावर एका हॉटेलात गेलो. इथे साधारण प्रत्येक हॉटेलात हुक्का असतोच. त्याला ‘गायल्यून’ असे म्हणतात. बसायला मोठय़ा डबल बेडसारखे बेड होते. त्यावर तक्के-लोड. चपला-बूट काढून त्यावर आरामात पाय पसरून बसायचं आणि जेवणाखाण्याची ऑर्डर द्यायची. जेवणात मुख्यत्वे भात आणि कबाब असतात. शाकाहारी माणसाची इथे निव्वळ उपासमारच होते.
नोरुझचे पाच दिवस संपूर्ण इराणला सुट्टी असल्याने म्युझियम्स, पॅलेस, बाजार बंद होते. त्यामुळे आम्ही आमचा मोर्चा तेहरानच्या बागांकडे वळवला. इथे मेल्लाद पार्क, अब-ओ-अताश, जमशिदिये अशी अनेक सुंदर उद्याने आहेत.
इथे जवळजवळ प्रत्येकाकडे गाडी असते. इराणमध्ये  पेट्रोल अतिशय स्वस्त आहे. शिवाय प्रत्येकाला दर महिन्याला विशिष्ट लिटर पेट्रोल सरकारकडून अधिक सवलतीच्या दराने मिळते. गाडय़ा मुख्यत्वेकरून ‘सायपा’ आणि ‘पायकन’ या इराणी मेकच्या. परदेशी गाडय़ांचे प्रमाण अत्यल्प. इथे रस्तेही मोठे आहेत. स्वत:च्या मालकीच्या गाडय़ा मोठय़ा प्रमाणावर असल्याने सरकारी बससेवा समाधानकारक नाही. बससेवा चांगली नसली तरी जी आहे ती अतिशय स्वस्त आहे. तेहरानभर मेट्रो सेवा आहे. इथे सर्वत्र पाटय़ा- मग त्या रस्त्याच्या असोत वा दुकानांच्या- फार्सी भाषेतच आहेत. मात्र, मेट्रो स्टेशनवरच्या पाटय़ा फार्सी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत आहेत. त्यामुळे मेट्रोतून फिरणं सोपं वाटतं. अनेकांना इंग्रजी येत नसलं तरी तोडक्यामोडक्या इंग्रजीत ते बोलण्याचा प्रयत्न करतात. आम्ही भारतीय आहोत हे कळल्यावर अनेकांनी राज कपूर, सलमान, शाहरुख अशी नावे घेतली. अजूनही राज कपूर, दिलीपकुमार यांचे चित्रपट, त्या काळातील गाणी इराणी लोकांच्या स्मरणात आहेत. इस्लामिक क्रांतीमुळे हिंदी सिनेमांवर बंदी आली. त्यामुळे मधल्या वर्षांतले हीरो, सिनेमे त्यांना माहीतच नव्हते.  
आम्ही तेहरानच्या फिल्मसिटीतही गेलो. तिथे एक सुंदर रस्ता उभारण्याला आहे. त्याचप्रमाणे जेरुसलेममधील एक चौकही उभारला आहे. शिया मुस्लिमांचे पूजनीय इमाम अली यांच्यावर एक सिनेमा काढण्यात आला होता. त्याच्या चित्रीकरणासाठी एक प्राचीन खेडे उभारण्यात आले होते. तेहरानमधील एक-दोन प्रसिद्ध इमारतींच्या प्रतिकृतीही उभारण्यात आल्या आहेत. आम्हाला हे ठिकाण आवडले. इराणी चित्रपट न पाहिल्यामुळे त्याच्याशी तितकीशी नाळ मात्र जुळली नाही. इराणी माणूस संगीतप्रेमी आहे. टॅक्सीत वा इतरही ठिकाणी संगीत, गाणी ऐकू येतात. पण सगळी गाणी पुरुषांच्याच आवाजातली.
‘नोरुझ’चे चार-पाच दिवस सरल्यावर गुलेस्तान राजवाडा पाहायला गेलो. हा राजवाडा तेहरानच्या दक्षिणेला अगदी गजबजलेल्या भागात आहे. ‘तेहरान बाजार’ हा प्रसिद्ध बाजार या राजवाडय़ाजवळच आहे. राजवाडा पाहायला खूप गर्दी होती. तब्रिझ, इस्फाहान, शिराझ या इराणच्या अन्य शहरांतून अनेकजण तेहरान पाहायला आले होते. गेल्या वर्षांत इराणच्या रियाल या चलनाची मोठय़ा प्रमाणात घसरण झाल्याने इराणी लोक देशातच सुटी घालवताना दिसत होते. अन्यथा ते सुटीसाठी मोठय़ा प्रमाणावर युरोपमध्ये जात असत, असे काहीजणांशी बोलताना कळले.
‘गुलेस्तान’ राजवाडा क्वाजौर घराणे सत्तेत होते तेव्हा त्यांनी बांधला. इथे राजवाडा म्हणजे भलीमोठी वास्तू नव्हे, तर अनेक इमारतींचे संकुल असते. इथे शस्त्रांचे म्युझियम, कलादालने, आरसेमहाल अशा अनेक इमारती आहेत. या इमारती आकाराने लहान, पण सजावटीचे उत्तम नमुने आहेत. आरसेमहाल पाहताना डोळे दिपतात.
इराणच्या शहाचा सादाबाद राजवाडा अल् बोर्झ पर्वताच्या उतारावर आहे. याही संकुलात अनेक म्युझियम्स आहेत. इथला ‘ग्रीन पॅलेस’ पाहण्यासारखा आहे. येथील खोल्यांची सजावट, रंगसंगती, गालिचे, फर्निचर, अन्य वस्तू या अत्यंत कलात्मकतेने सजवल्या आहेत. इराणचे वैभव या राजवाडय़ांतून प्रत्ययाला येते. नियाव्हेरोन पॅलेस हाही पाहण्यासारखा आहे. इथे शहा स्वत: राहत होता. या राजवाडय़ात शहाला अनेकांनी दिलेल्या भेटवस्तू, मोठमोठे चित्रांसारखे गालिचे, रशिया, चीन, भारतीय, फ्रेंच व ब्रिटिश बनावटीचे फर्निचर, फुलदाण्या, काचेच्या वस्तू अशा असंख्य गोष्टींचा समावेश आहे. शहा, त्याची मुले, त्याची राणी यांची चित्रे, पोर्ट्रेट्स, त्यांचे पोशाख सर्व काही जतन करून ठेवले आहे.
तेहरानमधील आणखी एक खास म्युझियम म्हणजे ‘मोसे जवाहिरात’! हे ‘ज्वेलरी म्युझियम ‘बँक मेल्ली, इराण’ या बँकेच्या तळघरात आहे. कडेकोट बंदोबस्तात असलेल्या या म्युझियममध्ये गेल्यावर समोरच सोन्याचे मोठे सिंहासन दिसते. कलाकुसर केलेले हिरे, माणके, मोती जडवलेले हे सिंहासन पाहून अवाक्  व्हायला होते. वेगवेगळय़ा राजवटींतले रत्नजडित दागिने पाहून अक्षरश: डोळय़ांचे पारणे फिटते. रत्नजडित हत्यारे, माणकांचा कप, हिरे, पाचू, माणके आणि मोत्यांच्या लडी जडवलेले कॅण्डल स्टॅन्ड! हिरेजडीत पृथ्वीचा गोल, असंख्य ब्रूचेस, फतेह अली शाह या क्वाजौर घराण्यातील राजाचा रत्न-मोतीजडित मुकुट, सोन्याच्या व चांदीच्या तारांनी मढवलेली राजवस्त्रे इ. पाहण्यासारखे आहे. याच ठिकाणी नादिरशहाने भारतातून लुटलेला ‘दर्या-ए-नूर’ हा गुलाबी रंगाची झाक असलेला हिरा आहे. त्याने लुटलेले ‘मयूर सिंहासन’ मात्र इराणपर्यंत पोचलेच नाही. म्युझियममध्ये गेल्यावर समोर दिसते ते मयूर सिंहासनासारखे बनवलेले दुसरे सिंहासन. सिंहासन कसले, राजाची मुले-मुली, अगदी सगळे कुटुंब आरामात बसू शकेल असा मोठा पलंग वा दिवाणच होता तो! त्यावर सोन्याचे पत्रे लावलेले आणि रत्ने मढवलेली! ‘मोसे जवाहिरात’मध्ये जी दौलत आपण पाहतो, ती पाहून आपले डोळे दिपून जातात.
तेहरानमध्ये प्रत्येक रस्त्यावर सतत दिसणारी गोष्ट म्हणजे बँक! दुसरी म्हणजे नाकाला बॅन्डेज केलेली माणसे- मुख्यत्वे मुलं-मुली दिसतात. इराणमध्ये नाकावर प्लास्टिक सर्जरी करणे सर्वसामान्य आहे असं वाचलं होतं, त्याचा प्रत्यय आला. मुळात सुंदर असलेल्या नाकांवर ही मुलं सर्जरी का करतात, असा प्रश्न पडला.
स्त्रियांवर धार्मिक बंधने असली तरी इराणमध्ये सर्वत्र महिला काम करताना दिसतात. पुरुषांच्या बरोबरीने सर्व कार्यालये, बँका, एअरलाइन्स, ट्रॅव्हल एजन्सीची कार्यालये, हॉटेल्स असा सर्व ठिकाणी स्त्रियांची लक्षणीय संख्या आढळते. इथे स्त्रिया टॅक्सी चालवतानाही दिसतात. अर्थात, असे असले तरीही कायद्याच्या दृष्टीने त्यांना समान अधिकार नाहीत, हेही तितकेच खरे! त्यांच्या डोक्यावरचे हिजाब हे त्याचेच द्योतक आहे.