मोकळे आकाश.. : बोलक्या भिंती

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी अंदमानच्या निर्जीव, निष्ठूर भिंतीवर स्वातंत्र्यदेवतेचे महाकाव्य रचले.

डॉ. संजय ओक sanjayoak1959@gmail.com

हल्ली कोणत्याही शहरात गेलो की मार्केटमध्ये किंवा शहरात शिरल्या शिरल्या ‘I Love ..’ असे सांगणारा एक झगमगता निऑन साईन बोर्ड.. त्याच्या आजूबाजूला हिरवळीचे बेट आणि पाठीमागे विविध दिलखेचक रंगांत नटलेली भिंत असे दृश्य हमखास पाहायला मिळते. अगदी ‘आय लव्ह ठाणे’ असं म्हणणारा ईस्टर्न एक्स्प्रेसवरचा प्रवासी थांबा असो वा ‘सांगली माझी चांगली’ अशी उद्घोषणा करणारी आमची कर्मभूमी असो; कल्पना अतिशय सुंदर आणि तिचे प्रकटीकरण तर त्याहूनही आकर्षक. स्टेशनपासून स्मशानभूमीपर्यंत सर्व भिंती अचानक रंगीन झाल्या आहेत. पश्चिम उपनगरांत तर या भिंतींचा आधार घेत उभी असलेली वठलेली झाडेही निळ्या-पिवळ्या-तांबडय़ा पेहेरावात नटली आहेत. भिंतींना या रंगांमुळे जान आली आहे, हेच खरे!

आजवर भिंतींचा उपयोग पानाची पिचकारी आणि निलाजरेपणे लघुशंका यासाठी केला जात असे. त्यातून स्टेशने आणि स्टेडियमच्याच काय, पण मंदिरांच्या भिंतीही सुटत नसत. डाग आणि दर्प यांनी आसमंत नकोसा होई आणि भिंतींलगतच्या फूटपाथवर चालणे म्हणजे जणू नरक असाच प्रत्यय येई. सार्वजनिक शौचालये आणि आधुनिक प्रसाधनगृहांच्या निर्मितीमुळे आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या शैक्षणिक कार्यक्रमाच्या राबत्यामुळे फरक पडू लागला. पोलिसांचा दंडुका आणि दंडनीय अपराधाची टांगती तलवार लटकू लागली आणि निर्लज्ज देहक्रियांना कायद्याचे बंधन आले. ‘येथे लघवी करू नये’ या विनंतीवजा संदेशाची ‘येथे लघवी करून ये’ अशी सोयीस्कर फोड करणाऱ्या महाभागांना चपराक बसली. भिंतींवर वेगवेगळ्या धर्माचे देव, बोधपर वाक्ये, देवाज्ञा यांचे रेखाटन होऊ लागले. हेतू हा, की निदान देवाधिदेवांना तरी या अश्लाघ्य, असमर्थनीय वर्तणुकीला पायबंद घालण्यात यश यावे. काही प्रमाणात हा प्रयोग यशस्वी झालाही; पण मानवी वर्तणुकीला नियंत्रणात ठेवण्यासाठी झालेला हा देवधर्माचा वापर मला नेहमीच अस्वस्थ करीत असे. ज्याची जागा देवालयात, गाभाऱ्यात आहे त्याला किंवा त्याच्या प्रातिनिधिक पूज्य वस्तू, वाक्यांचा बाजार आपण भिंतींवर मांडतो आहोत हे मला पटत नसे.

आज मात्र या रंगीबेरंगी भिंती पाहिल्या की समाधान लाभते. त्या मला दादरच्या प्लॅटफार्म नंबर ५-६ वर भेटतात, मुंबईतल्या रेल्वेच्या पादचारी ओव्हरब्रिजवर सुखावतात, तर कधी अगदी चंदनवाडीच्या कुंपणावरही अंतिम सत्याचा परिचय करून देतात. २००५ साली नायर रुग्णालयाचा डीन असताना दोन इमारतींना जोडणाऱ्या अशाच एका पदपथाच्या भिंतीवर आम्ही आरोग्याचे २०-२५ संदेश चित्रबद्ध केले होते. आजही ती वाट ‘आरोग्य पथ’ म्हणून नायरमध्ये प्रचलित आहे. मात्र आजची २०२१ मधली विविध रेखाटने अतिशय आकर्षक आणि नजर खेचून घेणारी आहेत. रंगांचा दर्जा सुधारलाय आणि आशयघन चित्रे, काटरून्स, स्केचेस यामुळे मनोरंजन, विरंगुळा, लोकशिक्षण या सगळ्या उद्देशांची पूर्ती होत आहे.

भिंती कधीच निर्जीव नसतात. त्यांना स्वर नसतो, पण आवाज असतो. त्यांना पाय नसतात, पण दूरवर पोहोचण्याची त्यांची क्षमता अद्भुत असते. ज्ञानदेवांनी प्रत्यक्ष भिंत चालवली होती चांगदेवाच्या गर्वहरणासाठी. त्यांना वेगळ्या वाहनाची गरज पडली नाही, तर विवेक, विज्ञान, विश्वास आणि विनयशीलता खडय़ा भिंतीलाही मार्गस्थ करू शकतात याचा तो संदेश होता.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी अंदमानच्या निर्जीव, निष्ठूर भिंतीवर स्वातंत्र्यदेवतेचे महाकाव्य रचले. अंदमानच्या काळ्या पाण्याला आणि कारागृहाच्या उंच भिंतींना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्याच्या महाकाव्याचे पहिले साक्षीदार बनवले.

मंडालेच्या भिंतींवर लोकमान्यांनी त्यांचा आवडता विषय गणित.. त्याची सूत्रे सोडवली होती. गीतारहस्याचे बीज रोवले होते. मथुरेच्या कारागृहातल्या भिंतींनी कृष्णाच्या पहिल्यावहिल्या लीला पाहिल्या. थोडक्यात काय, आपल्या या गौरवशाली देशात दगडी भिंतींनाही कधी पान्हा, तर कधी पाझर फुटला होता. त्या बोलत्या, चालत्या, लिहित्या झाल्या होत्या. आणि त्याचीच पुनरावृत्ती होत आज रंगरूपाने सजलेल्या स्वरूपात त्या समाजाला सामोरे जात आहेत. मला हा बदल स्वागतार्ह आणि सुंदर वाटला.

गेल्या एका लेखमालेत लिहिलेला प्रसंग पुन्हा सांगण्याचा मोह टाळता येत नाही. चहा-कॉफीच्या चायोस किंवा स्टारबक्समध्ये जायचे; एका कपाची ऑर्डर द्यायची; पण पेमेंट मात्र दोन कपांचे! आणि वेटरला सांगायचे, one for the wall.l.’ वेटरही पडत्या फळाची आज्ञा स्वीकारून एक छोटेसे चिठोरे भिंतीवर चिकटवता होत असे. थोडय़ा वेळाने स्टारबक्समध्ये शिरण्याची  ऐपत नसलेला तळागाळातला नागरिक आत्मविश्वासाने हॉटेलात स्थानापन्न होऊन ऑर्डर देत असे- ‘One cappuccino… from the wall.’ समाजातल्या ‘आहे रे’ वर्गाने ‘नाही रे’साठी एक शब्दही न उच्चारता केलेली ही समाजसेवा स्टारबक्समधल्या भिंतीमुळे शक्य होत असे. मागणाऱ्याला संकोच नको आणि देणाऱ्याला देताना गर्वही नको. हा लेख लिहिल्यावर खूप पत्रे आली. आणि मुलुंडमधल्या स्टेशनजवळच्या आमच्या हक्काच्या चहाच्या दुकान मालकांनी हा प्रयोग प्रत्यक्षात आणला.

भिंती निर्जीव नव्हत्याच; त्यांना बोलकं करण्याचं काम मी केलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mokale aakash author sanjay oak speaking walls colourful wall painting zws