डॉ. संजय ओक sanjayoak1959@gmail.com

सायन रुग्णालयातील रात्रीचे इमर्जन्सी ऑपरेशन संपवून सकाळची लोकल पकडून मी घरी परतत होतो. मुलुंडला उतरल्यावर स्टेशनवरचा ओव्हरब्रिज क्रॉस करताना हमखास तो मला भेटतो. अंदाजे पाच फूट उंची. मध्यम बांधा. डोळ्यांच्या पांढऱ्या खाचा. हातात तांबडी- पांढरी काठी. हिण्डालियमची वाटी. आणि एकाच सुरात पुन:पुन्हा आळवले जाणारे त्याचे वाक्य- ‘मदद करो भाई’.. ‘मदद करो भाई..’ बाकी काही नाही. ‘भगवान आपको खुश रखेगा. अल्लाताला बरकत देगा..’ वगैरे वगैरे No additional Incentives, No false promises. त्याच्या तीन शब्दांमधील आर्तता काळीज कापत जाते. माझा हात कळत- नकळत खिशात जातो आणि रिक्षाच्या बावीस रुपयांच्या भाडेपूर्तीसाठी आठवणीने काढलेले दोन रुपयांचे नाणे मी वाटीत टाकून मोकळा होतो. परवा माझ्याच पुढे चालणाऱ्या एका भगिनीने Nutri-Bar  त्याच्या वाटीत टाकला आणि मला तिच्या कल्पकतेचे, सहृदयतेचे कौतुक करावेसे वाटले. मदत टाकून मी पुढे चालता होतो आणि ‘मदद करो भाई’ हे पालुपद पाठीमागे अस्पष्ट होत जाते.

मी स्टेशन सोडतो. माझ्या रोजच्या कामाला लागतो, पण त्याचा स्वर आणि सूर मला छळत राहतो. अंधत्वाचे भांडवल नाही म्हटले तरी मला छळत राहते. अंधत्वाची काठी आधारभूत न करता वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारे अर्जुन मला आठवतात आणि स्टेशनवरच्या त्या भिक्षेकऱ्याची धृतराष्ट्री वृत्ती अस्वस्थ करते.

मध्यंतरी एकदा रस्त्यावर भीक मागणाऱ्या एका भिकाऱ्याचे निधन झाल्यावर त्याच्या उशाशी असलेल्या पिशवीतून नाणी-नोटांचा डोंगर सापडला होता. पोलिसांनी ही रक्कम मोजली असता ती अंदाजे नऊ लाख रुपये भरली होती. नवलखा भिकाऱ्याची ही गोष्ट मला स्तंभित करून गेली होती. त्याला कल्पना तरी होती का- त्याच्याकडे किती धनराशी होती याची? ही रक्कम फिक्सला टाकून त्याच्या व्याजावरही त्याची गुजराण झाली असती. पण भीक मागणे ही त्याची दैनंदिनी होती. काय म्हणावे या प्रकाराला? ही त्याची सवय होती की मजबुरी? व्यसन होते की व्यवसाय? लक्षाधीश भिकारी! असलेल्या धनाचा वापर न करण्याच्या कर्मदरिद्री वृत्तीचा, की कष्ट न करता हात पसरून समाजाच्या भावनिक देयतेला स्पर्श करून ‘ईझी मनी’ मिळवण्याच्या वृत्तीचा तो परिपाक होता?

मला तीस वर्षांपूर्वीची आठवण झाली. १९९१ साली लिव्हरपूलमध्ये काम करत असताना सिटी सेंटरमध्ये ‘I am Hungry and Homeless’ अशी पाटी गळ्यात अडकवून बसलेल्या गोऱ्या धडधाकट इंग्रजाला मी दहा पेनीज् दिले होते. एका कृष्णवर्णीय एतद्देशीयाने जणू दीडशे वर्षांच्या गुलामगिरीचे उट्टे काढले होते. आणि याउलट, ‘सरदार जात गड्डी चलाएगी या बनाएगी, पर कभी हात नहीं फैलाएगी!’ या न्यूयॉर्कमध्ये येलो कॅब चालवणाऱ्या अवतारसिंगचा अभिमान अनुभवला होता.

भीक ही मानवी अस्तित्वातील लांच्छनास्पद बाब आहे याबाबत माझ्या मनात दुमत नव्हते. इथे देणारा आणि घेणारा हा वर्गविग्रह आणि रुंदावणारी दरी. दया, कृपा, अनुकंपा या मानवी मनाच्या हळव्या भावनांना घातलेले एक अप्रस्तुत, असमर्थनीय खतपाणी म्हणजे भीक. ईश्वराने दोन हात काम करण्यासाठी दिले आहेत; पसरण्यासाठी नाही. केवळ कायदे करून मानसिकता बदलता येत नाही; तर त्या व्यक्तीच्या मनात आणि विचारशैलीत फरक घडवून आणणे गरजेचे. ‘I can’t do it’चे पर्यवसान ‘I can do it’ मध्ये करताना केवळ एका  ‘t’ लाच नव्हे, तर आळस, औदासीन्य आणि क्रियाशून्यतेला ‘टाटा’ करावा लागतो, हे लक्षात घेणे गरजेचे. भिकाऱ्यांची धरपकड करून त्यांचे स्थानिक उच्चाटन करणे कुचकामी ठरते.

महाबळेश्वरच्या भावेश भाटियाने अंधत्वाचे भांडवल केले नाही म्हणूनच ‘sunrise Candle Works’ ची स्थापना झाली. आज घराघरांत, देव्हाऱ्यांत, पंचतारांकित स्पामधून सुगंधी, रंगीत मेणबत्त्या आपल्या रंग-रूप-गंधांची उधळण करतात तेव्हा अंधत्वाचा काळा रंग औषधालाही मागे उरत नाही. तेव्हा हात पसरण्यासाठी नाही, तर राबण्यासाठी, रांधण्यासाठी, रापण्यासाठीच असतात, हेच खरे!

..माझ्या लाडक्या के. ई. एम. रुग्णालयाचा प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह विभाग मला नेहमीच अभिमानास्पद वाटत आला आहे. विभागप्रमुख आणि उत्तम सर्जन असलेल्या डॉ. विनीता पुरीने हात तुटलेल्या एका रुग्णाला मरणोत्तर दान झालेल्या एका रुग्णाचा हात रोपित केला आणि शल्यशास्त्राच्या प्रगतीमुळे माझा ऊर अभिमानाने भरून आला.

कृती बदलते आहे.. बदलायची आवश्यकता आहे!