मोकळे आकाश.. : पतंग आणि गरुड

पतंग आणि गरुड ही दोन्ही माझ्या मते व्यवस्थापन अर्थात मॅनेजमेंटची प्रतीके आहेत. व्यवस्थापक गरुडासारखा हवा

डॉ. संजय ओक sanjayoak1959@gmail.com

परवा ‘लोकसत्ता’मधल्या संपादकीय शीर्षकाने माझ्या मनाचा ठाव घेतला. अर्थात हे संपादकीय चीनच्या आर्थिक विश्वाला गवसणी घालणारे होते. पण माझ्या मनाचा मात्र आकाशस्थ दोन उडत्या अस्तित्वांनी कब्जा घेतला.. पतंग आणि गरुड!

एक निर्जीव, तर एक सजीव. एक क्षणभंगुर, तर दुसरा साठ-सत्तर वर्षांचे आयुष्य लाभलेला. एक पूर्णपणे परावलंबी, तर एक स्वावलंबनाचे प्रतीक. एकाचं अस्तित्व मांजाला जखडलेले, तर दुसरा कशालाही न बांधलेला. एक कागदाचा चिठोरा, तर दुसरा शक्तिशाली पक्षीराज. एक फाटणारा, तर दुसरा फाडणारा. एक गोते खाणारा, तर दुसरा झेप घेणारा. एकावर फार तर चिकटवलेले किंवा रंगवलेले डोळ्यांचे निर्जीव डिझाइन, तर दुसरा मानवी डोळ्यांच्या आठपट शक्तिशाली दृष्टी लाभलेला अद्भुत शिकारी.

तसं म्हणायला गेलो तर काही साम्यंही या दोन्ही उडणाऱ्या बाबींमध्ये आहेत. दोघांनाही वारा प्रिय. भूमितीच्या Rhomboid अर्थात आयताची तत्त्वे घेऊन, लंबत्रिज्या काटकोनात छेदून पतंग तयार होतो आणि वाऱ्याच्या प्रवाहाने त्याला गती आणि उंची मिळते. त्याचे सारे अस्तित्वच भूमिती आणि विज्ञानाच्या गणिती संकल्पनेशी जखडलेले. गरुडाची सारी मदार त्याच्या पंखांवर, पिसांच्या रचनेवर आणि विराट विस्तारावर. पंखाखाली हवेचा दाब निर्माण करून अवकाशात झेप घेण्याच्या भौतिकशास्त्राच्या सिद्धांताशी नाते जोडणारे त्याचे उड्डाण. ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’ तसा पतंगाचा मांजा त्याच्या अंतास कारण. जो मांजा त्याला वरवर नेतो; तोच कटला की त्याला गोते खायला लावतो. क्षणापूर्वी अवकाशात भिरभिरणारा, मिरवणारा पतंग गोते खात, हेलकावत जमिनीवर येतो आणि त्याला पकडायला, हस्तगत करायला पोराटोरांची धावपळ होते. गरुड जमिनीवर एकतर बसत नाही. बसला तरी उंच झाडाच्या शेंडय़ावर, नाहीतर पर्वताच्या सुळक्यावर. आपले स्थान तो स्वत: ठरवतो.

पतंग आणि गरुड ही दोन्ही माझ्या मते व्यवस्थापन अर्थात मॅनेजमेंटची प्रतीके आहेत. व्यवस्थापक गरुडासारखा हवा; पतंगासारखा नाही. गरुडाकडून व्यवस्थापनाची सहा-सात सूत्रे अनुकरण करण्यासारखी आहेत. अतितीक्ष्ण दूरदृष्टी आणि लांब पल्ल्याचा वेध, वादळ आले तर अधिकाधिक उंचीवर जाण्याची विजिगीषु वृत्ती, पिल्ले झाल्यावर घरटय़ातील मऊ गवत आणि जुनी पिसे फेकून देण्याची सवय.. जेणेकरून मोठे होताना संकटं, अडचणी, काटय़ाकुटय़ातून मार्ग काढण्याचा चिवटपणा अंगी बाणतो, आणि वय वाढू लागल्यावर स्वत:च काही काळापुरती स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून; स्वत:ची चोच खडकांवर आपटून पुन्हा अणुकुचीदार करून, आपलेच पिसन् पिस उपटून पुन्हा नवा पिससंभार निर्माण करण्याची घेतलेली दक्षता.. या साऱ्या गोष्टी गरुडाला पक्षीराज बनवतात आणि उत्तम व्यवस्थापनाच्या नेतृत्वगुणांकडे अंगुलीनिर्देश करतात.

सिंगापूरला गेलात तर आवर्जून जुरॉंग बर्ड पार्कला भेट द्या आणि ‘किंग ऑफ स्काईज’ या गरुडपक्ष्याच्या लाइव्ह शोचा थरार अनुभवा. या राजेशाही भक्षकाच्या जाती-प्रजाती, त्याची झेप, अचूकता, हवेतल्या हवेत भक्ष्य टिपण्याचे कौशल्य, त्याची शक्ती आणि सावज आपल्यापेक्षा मोठे असले तरी त्याला उचलून नेऊन उंचावरून फेकून नामोहरम करण्याची बुद्धिमत्ता.. सारेच अद्भुत!

तस्मात उत्तम नेता व्हायचं असेल तर गरुड व्हा; इतरांच्या मांज्यामुळे उंची गाठणारा पतंग नको!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mokale akash author sanjay oak management leadership qualities zws