मोकळे आकाश.. : बॅग भरायला हवी..

बॅग भरण्याचा विषयच नका; बॅगेशिवाय प्रस्थान ठेवण्याची तयारी करू या.

डॉ. संजय ओक sanjayoak1959@gmail.com

कोल्हापूरला वैद्यकीय व्यवसाय करणारा डॉ. निरंजन शहा माझा चाळीस वर्षांचा स्नेही. धडाडीचे काम, सामाजिक जाणिवा जागृत आणि स्त्रीरोगशास्त्रात प्रावीण्य असलेला निरंजन, मी.. आम्ही सारेजण वैद्यकीय महाविद्यालयाच्या कारकीर्दीत ‘वांढार’ या खास कोल्हापुरी सदरात मोडणारे. सांगलीला बालशल्यचिकित्सा करणारा डॉ. सुधाकर जाधवही असाच. सारेच उत्साहाने सळसळणारे, अडचणींना भिडणारे आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची क्षमता असलेले. या पार्श्वभूमीवर हल्ली दोन्ही मित्रांचे लिखाण, फॉरवर्ड होणारे विचार काहीसे सौम्य आणि आजवरच्या वाटचालीला छेद देणारे. ही वेगळी पायवाट का, हा विचार मनात घोळत असतानाच निरंजनचे फॉरवर्ड आले- ‘‘बॅग भरायला हवी..’’ मी अंतर्मुख झालो.

..साठी उलटून गेल्यावर थोडासा वेग आणि आवेग मंदावतोच. गाडी किती काळ क्रूझ कंट्रोलवर चालणार? Lower gears become a reality.. आणि इथे एक वैचारिक द्वंद्व उभे राहते. वास्तविक पाहता गेल्या तीन-साडेतीन दशकांत जे परलेले असते त्याला छान बहर आलेला असतो. नाव, यश, कीर्ती, लोकप्रेम सारं काही न मागता मिळत असतं.. सुखावत असतं. नेमक्या अशाच वेळेला बॅग भरण्याचा विचार? आपण आयुष्यात इतक्या गोष्टी संग्रही करत जातो की या सवयीचे व्यसनात कधी पर्यवसान होते ते समजत नाही. ‘हवेहवेसे वाटणे ते हव्यास’ हा प्रवास तिकीट न काढता होतो. कधी कॉन्फरन्सला गेलो- आण स्मृतिचिन्ह. एखाद्या प्रेक्षणीय स्थळाला भेट दिली, विकत घे बाहेरच्या टपरीवजा दुकानातून souveneir. कधी चमचे, तर कधी घंटा. कधी मूर्ती, तर कधी शिल्प. घरी आल्यावर या वस्तू एकदा का काचेआड झाल्या, की वर्षांनुवर्षे धुळीच्या धनी होतात.

प्रवासाला जाताना भरावयाची बॅग वयपरत्वे बदलते. आता ट्रॅकसुट, स्पोर्ट्स शूजची जागा औषधे घेतात. फोन चार्जर्स आणि लॅपटॉपचा जामानिमा एक खण व्यापता होतो. मागच्या एका लेखात मी संग्रातेच्या सवयीवर बोट ठेवलेच होते; पण आज निरंजनला अभिप्रेत असलेली बॅग न परतीच्या प्रवासाची आहे.

हा मुद्दा खूप खोलवर विचार करण्याचा आहे. वयाची त्रेसष्ठी आली म्हणून मी ‘डेव्हलपमेंट’ थांबवू इच्छित नाही. बालचिकित्सक असल्यामुळे मला ‘ग्रोथ’ आणि ‘डेव्हलपमेंट’ या संज्ञांमधला फरक चांगलाच कळतो. ‘ग्रोथ’ म्हणजे फुगवटा. ‘डेव्हलपमेंट’ म्हणजे विकास. ‘ग्रोथ’ दिसते, ‘डेव्हलपमेंट’ असते. साठीनंतरही ‘ग्रो’ जरुर व्हावं; पण खरी गरज तुम्ही ज्या क्षेत्रात, संस्थेत आणि समाजात वावरत आहात, त्याचा विकास होण्यासाठी कार्य करण्याची आहे. माझ्या आजवरच्या वैद्यकीय आणि व्यवस्थापनाच्या कारकीर्दीतली सर्वात महत्त्वाची इनिंग दोन रुग्णालयांच्या निर्मितीचा रचनाकार (डायरेक्टर, प्रोजेक्ट मॅनेजमेंट) या रूपाने मी सध्या पूर्ण करतो आहे. शून्यातून प्रकल्प आकाराला येताना पदोपदी ही जाणीव आहे की पुढच्या पंधरा-वीस वर्षांत ही रुग्णालये भरभराटीला येतील तेव्हा आपण नसू; पण ज्यांची फळे चाखायला आपण नसू अशा बिया रुजवणे हेच प्रत्येकाचं साठीनंतरचं उद्दिष्ट असावं असं मला वाटतं.

आज बॅगेत काय काय भरावयाचे याचा विचार करताना मला एका राजाची गोष्ट आठवली. ज्याने सांगितले की, ‘माझ्या मृत्युपश्चात माझे सोने, संपत्ती अंत्ययात्रेच्या रस्त्याच्या दोन्ही तीरांवर विखरून टाका. आणि बंदिस्त शवपेटीतून माझे दोन्ही हात बाहेर लटकू द्यात.. अगदी रिकामे, खुले, मोकळे.’

कै. डॉ. राकेश सिन्हा माझा जवळचा मित्र. अरमानी, रेमंडस्, रीड अँड टेलर अशा वेगवेगळ्या सूट्स आणि त्यांच्या स्टाईल्सवर गप्पा मारताना राकेश हसत हसत म्हणाला होता-

‘‘Sanjay, on my last day when I depart; I want to wear a jacket without pockets; as I don’t want to carry anything with me..’’  मॅरेथॉनची प्रॅक्टिस करताना राकेशला मृत्यूने गाठले तेव्हा त्याच्या अंगावर सूट तर सोडाच; फक्त खिसा नसलेला टीशर्ट आणि हाफ पँट होती. ..बॅग भरण्याचा विषयच नका; बॅगेशिवाय प्रस्थान ठेवण्याची तयारी करू या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mokale akash dr sanjay oak articles about close friend dr niranjan shah zws

Next Story
अनामिक बहर हा… :कधीं कधीं न बोलणार…
ताज्या बातम्या