गेले काही दिवस आम्ही पाहतोय- कृष्णदर्शनासाठी व्याकूळ झालेल्या स्वयंवरातल्या बावऱ्या रुक्मिणीप्रमाणे अवघा महाराष्ट्रदेश मोसमी पाऊसदर्शनासाठी आतूरला असून ज्याच्या- त्याच्या ओठांतून एकच एक आर्त सवाल येतो आहे..
lok01‘दादा, तो आला ना?’
वावरातला कास्तकार आपल्याच नशिबाला विचारीत आहे, लोकलमधल्या पंख्याकडे पाहत चाकरमानी बाजूवाल्याशी बोलत आहे, टायची गाठ सैल करीत एसीतला साहेब सेक्रेटरीला पुसत आहे, महसूल सचिव अर्थ सचिवांकडे पाहून भुवयांनीच सवाल करीत आहेत-
‘तो आला ना?’
तशी ही काही विचारायची गोष्ट नाही. तो आला की कळतो. म्हणजे समजा, आपण असे चाललो आहोत आणि अचानक वरून पाणी पडायला लागले, तर पहिल्यांदा आपल्याला काय वाटते? टाकी ओव्हरफ्लो झाली! आणि दुसऱ्यांदा? पाऊस आला! बरोबरच समजते ते!
आता काही गोष्टी अशा असतात, की आपल्याला त्यातले अजिबात कळत नाही. उदाहरणार्थ, रिझव्र्ह बँकेचा रेपोरेट, फंजिबल एफएसआय, झालेच तर मंत्रालयातली सुप्रमा.. दहादा वाचा. अभ्यासा. त्यातून फार फार तर नव्वद टक्के गुण पडतील. पण कळाले किती, विचाराल तर.. शून्यावर पूज्य!
पण पावसाचे तसे नाही. तो आला की कशी सोसायटीतील सगळी धुळकट झाडे धुऊन निघतात. ग्यालरीतल्या पत्र्यांवर शिवमणीचे ताशे वाजू लागतात. चाळीतल्या दारांवर प्लास्टिकचे निळे टाईट पडदे लागतात. पेपरात सुतळीने बांधून ठेवलेल्या पावसाळी चपला अन् छत्र्यांचे श्वास मोकळे होतात. तिकडे रेल्वेच्या ओव्हरहेड वायरी त्याच्या नुसत्या स्पर्शाने आता तुटू की मग तुटू, अशा थरथरू लागतात.. की आपल्याला बरोबर उमजते की- तो आला!
पण आपल्याला हे अजून समजलेले नसते, की तो नेमका आहे तरी कोण? सरसर येणारा अवकाळी की सरासरीने येणारा मोसमी?
खरेच, मोसमी पावसाच्या काय बरे असतात खाणाखुणा? त्याची कशी बरे लागते बायोमेट्रिक हजेरी? वेधशाळावाले हुशारच म्हणायचे, की ते नेमका ताडतात पावसा-पावसातला फरक!
मान्सून आला, विसावला, बरसला, थबकला, खोळंबला, गेला.. त्यांना व्यवस्थित समजते. पण कसे? काय असतात त्याची एकवीस अपेक्षित उत्तरे आणि आडाखे?
आमचे परमशेजारी रा. रा. लेले यांना बीएला भूगोल होता. तेव्हा या विषयावर त्यांनाच बोलते करू या, असे टीव्हीतल्या अँकरासारखे म्हणत आम्ही त्यांना विचारले की, ‘‘लेलेसाहेब, मला सांगा- काय असतो मान्सूनच्या या गौडबंगालाचा उपसागर?’’
तर ते म्हणाले, ‘‘असे बघा- पावसाचे एक शास्त्र असते.. त्याची मॉडेल्स असतात.’’
आम्हांस पावसातल्या रेखा, रवीना आदी भिजनटय़ा तेवढय़ा माहीत. हे ज्ञान नवेच होते.
आम्ही न राहवून विचारले, ‘‘कशा असतात या मॉडेल्स?’’
‘‘कशा नव्हे, कशी! त्या मॉडेल्सवरून मान्सूनचा अंदाज बांधतात.’’
‘‘पण बुवा, हाच मान्सून- हे कसे काय समजते?’’ आमचा मूळ प्रश्न अजूनही अनुत्तरितच होता.
लेले म्हणाले, ‘‘त्याचे काही हवामानशास्त्रीय निकष असतात. म्हणजे पावसाचे प्रमाण, पश्चिमी वातक्षेत्र, बहिर्गामी दीर्घतरंग प्रारण..’’
‘म्हणजे?’’
‘‘गुह्यज्ञान आहे ते! तुमच्यासारख्यांना समजायला कठीण! पण त्यावरून केरळात मान्सून आल्याचे समजते.’’
लेले आमच्या तल्लख बुद्धीची शाळा करीत होते. परंतु मनी अँकरगुण धारण करून आम्ही विचारले, ‘‘आणि मुंबईत मान्सून आल्याचे कसे समजते? त्याची काही मॉडेल्स आहेत का?’’
यावर लेलेंनी जे उत्तर दिले ते वाचले तर वाचकहो, तुम्हीसुद्धा हवामानतज्ज्ञ होऊन मान्सूनचा अंदाज सांगू शकाल. तेव्हा समस्तांच्या ज्ञानवृद्धीसाठी मुंबईतील मान्सूनचे ते निकष येथे देत आहोत..
१. अल् नाला इफेक्ट- यात प्रथम शहरातील नालेसफाईच्या डेडलाइनच्या बातम्यांची हवा वाहू लागते. मग ‘अमुक इतक्या टक्के नालेसफाई झाली..’ असे प्रशासकीय दावे येऊ  लागतात. त्यातून टक्केवारीचे वादळ उभे राहिले की समजावे- मान्सूनयोग्य वातावरण तयार झाले. परंतु अजून मुंबईत कमी दाबाचे पट्टे तयार झालेले नसतात. त्यासाठी महापौर, आयुक्त, नगरसेवक आदींचे नालेपर्यटन सुरू व्हावे लागते. मात्र, गेल्या अनेक वर्षांच्या अभ्यासातून एक बाब सिद्ध झाली आहे, की जोवर मा. श्री. उद्धवसो ठाकरे हे नाल्याच्या सुरम्य काठी उभे आहेत व हाताच्या तर्जनीने नाल्याकडे निर्देश करीत आहेत, असे किमान तीन कॉलम छायाचित्र (आणि/ किंवा सेल्फी) किमान दोन वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होत नाही, तोवर मुंबईत मान्सून आला असे मानले जात नाही.
२. पेपर रडार- वृत्तपत्रे नेहमीच हवा निर्माण करतात. मुंबईत ती पावसाळी हवाही तयार करतात. समुद्रातील पाण्यात धावणारे घोडे, गेटवेजवळ पाण्यात सूर मारणारी मुले, नरिमन पॉइंटचा खवळलेला दर्या, पाण्यात बुडालेली हिंदमाता अशी पाणचित्रे आणि कोणा कविकोमल मनाच्या जुनाट उपसंपादकाने त्याखाली फोटोओळ म्हणून उधळलेली काव्यफुले असा ऐवज पेपरांतून दृष्टीस पडू लागला की पडतोय तो मान्सूनच- असे हवामानतज्ज्ञ सांगतात.
३. टेंडर मॉडेल- हे अत्यंत मऊसूत असे मॉडेल असते. ते पाहण्यासाठी सुमारे ३३ टक्के वेगळी दृष्टी लागते. यात पालिकेच्या नालेसफाईपासून औषध खरेदीपर्यंतच्या विविध निविदांचा समावेश असतो. यंदा औषध खरेदीची निविदा उशिरा निघाली. त्यावरून जाणकारांनी काही टक्के अंदाज बांधलेच. पण या वर्षी मान्सून उशिराने येणार, हा अंदाजही बांधला.
४. दुरुस्ती मॉडेल- मान्सून सरासरीच्या चांगला की वाईट, हे ओळखण्यासाठी हे मॉडेल तयार केले आहे. रस्तेदुरुस्तीपासून चपला, छत्र्यांची दुरुस्ती ते छतावरील पत्र्यांना डांबर लावणे ते प्लास्टिक कागदांचा भाव वधारणे अशा विविध निकषांतून अभ्यासक मान्सूनच्या प्रमाणाचा अंदाज लावतात.
५. शरोबा वादळ- साधारणत: मे महिन्यानंतर मा. श्री. शरदराव पवार यांनी दुष्काळाच्या संबंधाने किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संबंधाने काही वादळी वक्तव्य केले, किंवा केंद्र सरकारवर टीका करण्याच्या संबंधाने काही वादळी निकाल घेतला तर त्यावरून मान्सून सरासरीहून कमी पडणार, असे ताडले जाते. दुबार पेरणी, खतांची सबसिडी या संबंधाने बोलण्याचा वादळी निकाल घेतला तर मात्र मान्सून सरासरीइतका पडणार, असे मानले जाते. हे मॉडेल महाराष्ट्रातच नव्हे, तर मुंबईतही काही प्रमाणात लागू होते, असे अभ्यासकांचे मत आहे.
तर वाचकांतील सभ्य व जाणकार स्त्री, पुरुष व अन्य हो, चला- हे पाच निकष घ्या आणि तुम्हीच बना तुमच्या पावसाळी अंदाजाचे शिल्पकार!
lok02 balwantappa@gmail,com