पाऊस, पावसाळा शब्द नव्हते किंवा भाषा नव्हती तेव्हाही तो होताच. ऋतूंची रचना करणार्‍या या थेंबुटांच्या फौजेचा मुहूर्त दिनदर्शिकांच्या उगमानंतर ७ जून वगैरे कित्येक पिढ्यांच्या डोक्यात बसलाय. सध्या अल् निनोच्या खबरबातीत त्यांचं येणं कुठं चुकलेलं दिसेल तर कुठं तो वळवाच्या रूपात प्रगटलेलाही असेल. पुढल्या चार महिन्यांत हवा ते नकोसा वाटेपर्यंतच्या भावनांमध्ये रमविणार्‍या थेंबुट्यांचे चिंतन…

पुराणातल्या एखाद्या कोपिष्ट ऋषीनं सूर्याला हाताशी धरून, ‘पृथ्वीला जाळून भस्म करीन’ असा शाप द्यावा आणि वैशाख सर्वांग पेटतच जावा. दरवर्षी अशीच कथा घडत जाते. एखाद्या शेतकर्‍याच्या डोक्यावरचा सावकारी कर्जाचा आकडा वाढतच जावा तसे तापमान दरसाल वाढतच जाते. मान्य, या सृष्टीला सूर्यप्रकाश हवाय, पण किती? हा वैशाख असाच पेटत राहिला तर पृथ्वीचं भरीतासाठी भाजलेलं वांगं व्हायला फार वेळ लागणार नाही. एखाद्या ‘बर्न वॉर्ड’मधल्या अत्यवस्थ विद्रूप रोग्यासारखं हे रूपडं पाहून मातीला राहवत नाही, उष्माघाती कण्हणं ऐकवत नाही. होरपळलेली माती आर्त होऊन हाका मारते, प्रार्थना करते… जमिनीतून वर येणार्‍या अंकुरासाठी, वाळलेल्या झाडांसाठी, नागमोड्या नदीसाठी, गावाकरिता पाझरणार्‍या तलावासाठी, पाण्याचा पाठलाग करताना खोल गेलेल्या विहिरीसाठी, तहानलेल्या चोचीसाठी, धुर्‍यावर विमनस्क उभ्या शेतकर्‍यासाठी, थकलेल्या टँकरसाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि होरपळलेल्या प्रत्येकासाठी… ही प्रार्थना समष्टीसाठी आहे, सृष्टीसाठी आहे.

दरवर्षी होरपळलेली माती आर्त हाका देते आणि लेकरानं दुडुदुडु चालत यावं तसा थेंबूथेंबू पाऊस येतो. तापट वैशाखाचा अधर्म माजतो तेव्हा सर्जनाचं वरदान घेऊन पर्जन्य अवतरतो. भरून आलेलं गर्भार आभाळ बाळंत होतं. वेदना असणारच. वादळ वारं सुटतं. अंधारलेल्या ढगात विजांचा लखलखाट होतो. माती गुलाल होऊन हवेत मिसळते. ढग ढगांवर आदळतात. गडगडाट होतो. प्रसववेदनाच त्या. एवढ्या उंचीवरून खाली पडताना लेकरांना काय वाटत असेल? साधं शाळेच्या बसपर्यंत लेकराला सोडतानाही माय-बापाची घालमेल होते. या कोवळ्या थेंबुटांना एवढ्या उंचावरून जमिनीवर सोडताना आभाळाचं काळीज काय म्हणत असेल? प्रसववेदनेला सर्जनाचं टपोरं फूल येतं. हुश्श होतं. लडिवाळ थेंबुटे जमिनीवर येतात. खळखळ, झुळझुळ असा पैंजणी आवाज करीत हुंदडायला लागतात. प्रयोगशाळेतल्या परीक्षा नळीत दोन द्रावण एकमेकांत मिसळल्यानंतर तिसराच रंग तयार होतो. तसा करामती पाऊस जादूई मातीत मिसळतो आणि भोवताल हिरवागार होतो. पावसाच्या थेंबासाठी ज्ञानदेवांनी लोभस शब्द वापरला आहे… थेंबुटा!
भरले समुद्र सरिता चहुंकडे। परि ते बापियासि कोरडे। कां जै मेघोनि थेंबुटा पडे। तैं पाणी कीं तया।। भोवताली नद्या-समुद्र पाण्याने तुडुंब भरलेले असतात. तरीही चातक पक्षी कोरडाच राहतो. कारण त्याला थेट समुद्राचं-नदीचं पाणी पिता येत नाही. जेव्हा ढगातून पावसाचा ‘थेंबुटा’ पडेल, तेव्हाच त्याची तहान भागते. चातक पक्ष्यापेक्षा आपलं काही वेगळं आहे का? ढगातून पाऊस खाली आल्याशिवाय आपली तरी तहान कुठं भागते? आणि हो तहान फक्त पाण्याचीच नसते…

शालेय अभ्यासक्रमात बाष्पीभवनाचा अभ्यास केलेला असतो. पाण्याची वाफ होते वगैरे माहिती-विश्लेषण असतेच. पण पाऊस आभाळातूनच येतो, थेंबुटे ढगातूनच बरसतात. त्यामुळे आभाळ ही थेंबुटांची माय. पेटत्या वैशाखात झाडांना पानंसुद्धा सोडून जातात. पानगळ होते. अशा वैराण वेळी गुलमोहर मात्र लालबुंद फुललेला असतो. भोवताली मातम सुरू असताना गुलमोहरी उधळण सुरू असते. तसं पेटलेल्या वैशाखाच्या तबाहीत आभाळाला दिवस जातात. सोसलेल्या उन्हाचं सोनं होतं. पावसाचं गाणं होतं. थेंबुटे रिमझिमतात… भुरभुरतात… रपरपतात…

खरं तर कित्येक अनुत्तरित प्रश्नांच्या उत्तरादाखल आपण आभाळाकडे पाहतो. देव आहे का नाही? हा वाद माणूस असेपर्यंत असेल. देवाचं अस्तित्व मानणारे श्रद्धेनं आभाळाकडं पाहतात. क्रिकेटच्या मैदानात धावांचा पाऊस पाडून शतक झळकवणार्‍या फलंदाजाकडे आपण कौतुकानं पाहत असतो. तेव्हा फलंदाज मात्र कृतज्ञतेनं आभाळाकडं पाहात असतो. शेवटच्या घटका मोजणार्‍या रुग्णाबद्दल शेवटी डॉक्टर ‘अब उपरवाले के हात में सब कुछ है’ असं म्हणत आभाळाकडे पाहतात. तेव्हा त्यांच्या गळ्यातला स्टेथोस्कोप तुळशीमाळेसारखा वाटतो. एखादा नट सोबतच्या पात्रांना ओलांडून अंतर्यामी बोलत असतो. ते स्वगत म्हणताना अवकाशाचीच साक्ष असते. नास्तिकांच्या मते अवकाश ही पोकळी आहे. तिथं काहीही नाही. देव ही मानवी कल्पना आहे. खरं तर उत्तर न सापडणारे जटिल प्रश्न निर्माण झाले की, आभाळाकडे बोट दाखवता येतं. लहानपणी पावसाळ्यात छोटी छोटी हरबर्‍याएवढी बेडकाची पिल्लं पायदळी यायची. एवढी पिल्लं अचानक कुठून येतात असं विचारलं तर वडीलधारी मंडळी सांगायची, ही पिल्लं आभाळातून पडतात. एवढंच कशाला, मानवाची निर्मिती ज्या आदिमाया आणि आदिपुरुषापासून झाली ते दोघं आले कुठून? आभाळातून! एखाद्या जटिल प्रश्नाचं तर्कसंगत उत्तर नसेल तर बिनधास्तपणे आभाळाकडे बोट दाखवलं जातं. म्हणून देवाचा पोस्टल पत्ता आभाळाचा आहे. अर्थात यावर वादविवाद झडत असतात. पण थेंबुटांची फौज आभाळातून येते, यावर अद्याप तरी कुणी आक्षेप नोंदवल्याचे ज्ञात नाही.

अनेक पर्वत, समुद्र, प्रदेश ओलांडून पाऊस येतो. सृष्टीचा क्रम म्हणून येतो तसा त्याच्यासाठी मारलेल्या आर्त हाका ऐकूनही येतो. कुणी तरी वाट पाहात असेल तर जाण्यातही मजा असते. कुठलंच संवत्सर-हिजरी-इसवीसन नव्हतं त्याच्या कितीतरी आधीपासून तो येतो. पाऊस, पावसाळा असे शब्द नव्हते, भाषा नव्हती तेव्हाही पाऊस होता. ऋतूंची लोभस रचना पावसानेच केली. कदाचित हे पंचांग, भिंतीवरचं कॅलेंडर पावसानेच वाहून आणलंय. नदीला नागमोडी चालणं, जमिनीला उगवून येणं पावसानेच समजून सांगितलंय. कवीला गाणं आणि माशाला पोहणं पावसानेच शिकवलंय. कित्येक दिवस बी जमिनीखाली दबा धरून बसतं ते पावसाच्या भरवशावरच. नाकात वारं शिरलेल्या वासरासारखं पावसाचं पाणी जमिनीवर हुंदडत असतं. माती गंधाळण्यासाठी पावसाची निरंतर वाट पाहते.

एखाद्याचा रक्तदाब वाढावा तसा समुद्राचा खारटपणा वाढतच जातो, असह्य होतो. तेव्हा समुद्र कळवळून नद्यांना हाका मारतो. तेव्हा नदी म्हणते ‘थांब मेल्या माझ्या पात्रात पाऊस भरू दे’. कधी लवकर, कधी उशिरा पाऊस येतो. नदी दुथडी भरून वाहू लागते. तिनं समुद्राला शब्द दिलाय. समुद्रापर्यंत पोहचण्याचा प्रवास सोपा नाही. या नदीच्या समुद्र प्रवासाबद्दल उपनिषदात एक अप्रतिम दृष्टांत आहे. नदी निघते समुद्राला भेटायला. रस्त्यात तिला डोंगर भेटतो. नदीचं नागमोडी चालणं, खळखळ वाहणं डोंगराला मोहीत करतं. डोंगर तिच्या प्रेमात पडतो, ‘‘तू इथंच थांब. पुढं जाऊ नकोस. तुझा खळखळाट मला कायम ऐकायचाय. माझ्याभोवती फिरत राहा.’’ नदी हसली. तिची दिशा ठरलेली होती तशी भूमिकाही. ती म्हणाली, ‘‘अरे, तुझी भावना मी समजू शकते. तुझ्या भावनेचा मी आदर करते, पण स्वीकार नाही करू शकत. मित्रा, मी नदी आहे. वाहणं हे माझं प्राणतत्त्व. मी थांबले तर नदी राहणार नाही. मी वाहती हवी.’’ असं बोलून नदी निघाली. रस्त्यात तिला एक महाकाय वृक्ष भेटला. तोही नदीला सोडेचना, ‘‘वाहून वाहून थकली असशील. घडीभर थांब माझ्या सावलीला. बघ किती तरी मोहक पक्षी माझ्याकडं आसरा घेतात. रसाळ फळं खातात, गोड गोड गाणी गातात. तूही थांब. नको जाऊस. तुझ्या जाण्यानं त्या समुद्राचं खारट पाणी थोडंच गोड होणार आहे. थांबून जा.’’ नदी ढळली नाही, ‘‘मित्रा, मी समुद्राला जाऊन भेटल्यावर समुद्राचे खारेपण संपणार नसेल. पण हजारो वर्षांपासून आम्ही नद्या प्रयत्न करतोच आहोत. आज तर समुद्राने हाक मारलीय. मला गेलं पाहिजे.’’ नदी निघाली. रस्त्यात अजून काहीजण भेटले. प्रत्येकाला समजावत नदी समुद्राजवळ येऊन पोहोचली. नदीला पाहून समुद्र आनंदित झाला. वाटेत सगळ्यांना नकार देत नदी आपल्याकडे आली याचा समुद्राला झालेला गर्व बोलू लागला, ‘‘येऽऽऽ, सगळ्यांना नकार देत, लांबून आलीस. हो आता माझ्यात विसर्जित.’’ नदी जागीच थबकली. नदीला हे ‘विसर्जित हो’ म्हणणं खटकलं. वाहताना काठावरच्या प्रदेशालाही सर्जित करणारी नदी ताडकन बोलली, ‘‘सागरा, तू असशील भयप्रद लाटांमधून गुरगुरणारा. अस्ताव्यस्त हातपाय पसरून महाकाय पहुडलेला. पण तू वाहत नाहीस, साचलेला आहेस. मी नित्य वाहणारी नदी आहे. मी विसर्जित होत नसते सर्जित होत असते. आम्ही नद्या येऊन मिळतो म्हणून तुझं अस्तित्व आहे. तरीही तुला आमच्या पाण्याची गोडी सांभाळता आलेली नाही. त्यामुळे विसर्जित होण्याच्या गोष्टी पुन्हा कधी करू नकोस.’’ हे तडफदार उत्तर ऐकल्यावर समुद्राला ओहोटीच लागली. नदीचा हा सर्जनशील बाणेदारपणा आला कुठून? ही किमया आहे थेंबुटांची! शरीर पेशींपासून बनलेलं असतं. त्या पेशींचे गुणधर्म शरीराचा स्वभाव ठरवतात. तसा मातीच्या हाकेला ‘ओ’ देणार्‍या थेंबुटांचा समुच्चय म्हणजे पाऊस. पावसाचा स्वभाव सर्जनाचा. तेच सर्जन पाण्यात उतरतं. नदीतून वाहतं. म्हणून नदी समुद्राला एवढं सडेतोड उत्तर देऊ शकते. नदीचे ते शब्द नसतात, थेंबुटे असतात.

याचा अर्थ पाऊस म्हणजे फक्त आनंदीआनंदच असतो, असं सांगून पावसावरचा गौरव सोहळा नाही करायचाय. पाऊस कधी वेळेत येतही नाही. दारुडा बाप कुटुंबाला वार्‍यावर सोडून बेपत्ता होतो. कधी तसा वागतो पाऊस. पावसाच्या लहरीपणामुळं कधी पेरण्याच होत नाहीत. लग्नात चक्क मुख्य नवरदेवच गायब व्हावा, तसा कधी ऐन पेरणीत पाऊसच गायब असतो. प्रसंगी मढं झाकून पेरणी करणार्‍या शेतकर्‍यानं अशा वेळी काय करावं? केव्हा आरंभशूरासारखा मृगाच्या पहिल्या दिवशी दाखल होतो, पण नंतर शाळेतून पळालेल्या पोरासारखा फरार होतो. मग दुबार पेरणी, नापिकी, दुष्काळ, कर्जबाजारी असे सगेसोयरे चिकटतात. पंचमीला लेकीसाठी बांधलेल्या झोक्याच्या दोरीलाच बाप लटकवून घेतो किंवा मुक्ती हवी म्हणून गटागटा कीटकनाशक औषध पितो. पाऊस नसला की, शेत-गाव सुतकी होतं. अशा वेळी नागड्या पोरांच्या कमरेला लिंबाची पानं, बेडक्या बांधून ‘धोंडी धोंडी पाणी दे’ म्हणत ग्रामदेवतेला अंघोळ घातली जाते. येणार्‍या पाहुण्याची वाट पाहात एखाद्यानं फाट्यावर इळभर बसून राहावं तशी जागोजागी पावसाची वाट पाहिली जाते. आतासारखी अल् निनोची खबरबात आधी नसे. पूर्वी पावसाचे काही ठोकताळे होते. पक्ष्यांनी झाडाच्या फांदीत खाली घरटं बांधलं की पाऊसकाळ चांगला आहे. तेच घरटं झाडाच्या शेंड्यावर बांधलं तर पाऊसकाळ कमी आहे. पाऊस लवकर आलाच नाही तर पेरलेलं डोळ्यासमोर वाळून जातं. आषाढाचे दिवस. गावोगाव दिंड्या पंढरपुराकडे निघालेल्या. पेरलेल्या बियांतून हिरव्या पानांचे दोन टाळ घेऊन रोपं टकमका बघत राहायची. धुर्‍यावरून पाहिलं तर ‘जन गण मन’ साठी रांगेत उभ्या रोपांचं कौतुक शेतकर्‍यांच्या डोळ्यात दिसायचं. पण ‘हरवला आहे’चं पॅम्पलेट दाही दिशांत वाटूनही पाऊस यायचा नाही. शेवटी दोन पानांवरची ही बाळं जागेवर माना टाकायची. तेव्हा दिंडीतला ग्यानबा-तुकारामचा जयघोष टिपेला गेलेला असे. काळ्या मातीत मरून पडलेला हिरवा पांडुरंग पाहताना पावसाला काही कसं वाटतं नसेल. एवढीही संवेदना नसेल तर हे थेंबुटे एवढ्या दूरवरून येतातच कशाला? मौजमजा करायला? असं उद्विग्न व्हायला होतं.

आपण आपल्यापुरता विचार करणारी पोटभरू माणसं आहोत. सगळ्या भोवतालाचे अर्थ आपल्याला हवे तसे लावतो. अतिवृष्टी होऊ दे नाही तर दुष्काळ पडू दे. कुणाचं जगणं उद्ध्वस्त करण्यासाठी हे होत नसतं. पण पाप फार वाढल्यामुळे निसर्ग बेताल झालाय असा एक युक्तिवाद असतोच. पण पाप-पुण्याच्या संकल्पना नव्हत्या तेव्हाही निसर्गाचं स्वत:चं एक संतुलन होतंच. निसर्गाचं एक चक्र असतं. एक स्वभाव असतो आणि हो, या जगात पाप कधी नव्हतं? फक्त पाप आधी झाकून होतं, आता उजागर झालंय. माणूस कितीही प्रगत झाला तरी एक प्राणीच आहे. त्याचा विवेक ढळतोच. मग माणूस निसर्गाबद्दलही संवेदना हरवून बसतो. निसर्गावर म्हणजेच आभाळ-माती, झाड-वेली, नदी-नाले, शेत-शिवार, डोंगर-दर्‍या, पशू-पक्षी, पाऊस-पाणी हे आपले आस्थेचे प्रश्न आहेत. त्यांच्याबद्दलची कृतज्ञ जाणीव ही आपली संस्कृती आहे. म्हणूनच पर्जन्यसूक्त मार्गे ‘ये रे, ये रे पावसा’ ते ‘कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही’ अशी पावसाची रूपं चित्रित झाली.

दरवर्षी मामाच्या गावाला भाचरांची फौज यावी तसे दुडुदुडु धावत थेंबुटे येतात. त्यामुळं आपलं जगणं गोकुळ होतं. लवकर-उशिरा, कमी-जास्त, पण येतोच. आपण रोज साधं कार्यालयातून घरी वेळेवर पोहचू शकत नाही. पाऊस तर किती लांबून येतो. होय, आपल्यासाठीच येतो. झाला उशीर तर होऊ दे. आल्याबरोबर त्याला पर्जन्यमानाच्या प्रमाणाचे आकडे दाखवू नका. अल् निनोचा अनुभव विचारू नका. शहरात पावसामुळं कपडे वाळवायचा जटिल प्रश्न असतो, अशी तक्रार लगेच पुढं करू नका. एवढ्या लांबून धडपडत आपल्यासाठी ओलाचिंब आलाय नं. मग त्याला आधी डोकं पुसायला टॉवेल द्या. गरमागरम वाफाळलेल्या कॉफीचा कप तयार ठेवा. तो लगेच संध्याकाळच्या गाडीनं जाणार नाहीए. थांबणार आहे. निवांत गप्पा होतीलच…

dasoovaidya@gmail.com