scorecardresearch

मालवणी वा कुडाळी

दर बारा मैलांवर भाषा बदलते असं म्हटलं जातं. ही भाषा त्या प्रदेशातली ‘बोली’ असते. ती त्या भागातील भाषिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक वैशिष्टय़ांचा अंश असते. अशा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांत बोलल्या जाणाऱ्या बोलींची ओळख करून देणारं, त्यांचं वेगळेपण व सामथ्र्य सांगणारं सदर..

दर बारा मैलांवर भाषा बदलते असं म्हटलं जातं. ही भाषा त्या प्रदेशातली ‘बोली’ असते. ती त्या भागातील भाषिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक वैशिष्टय़ांचा अंश असते. अशा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांत बोलल्या जाणाऱ्या बोलींची ओळख करून देणारं, त्यांचं वेगळेपण व सामथ्र्य सांगणारं सदर..
कारवारपासून गोमंतकासह रत्नागिरीपर्यंत कोकण प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या बोलीला पूर्वी ‘कोकणी’ असे म्हटले जात असे. मात्र गोवा राज्याच्या निर्मितीनंतर कारवार व गोवा प्रांतात बोलली जाणारी ‘कोकणी’ ही गोवा राज्याची स्वतंत्र भाषा म्हणून मान्यता पावली. दक्षिण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात बोलली जाणारी ‘मालवणी’ ही बोली कोकणीहून बऱ्याच अंशी भिन्न आहे. मालवणीप्रमाणे संपूर्ण कोकणप्रांतात आणखीही अनेक भाषाभेद पाहावयास मिळतात.
ग्रीयर्सन यांच्या भाषिक निरीक्षणानुसार या प्रदेशातील जवळजवळ तिसांहून अधिक बोली कोकणी म्हणाव्या लागतील. त्यात मालवणी ही एक वैशिष्टय़पूर्ण बोली आहे. दक्षिण कोकणातील दोडामार्ग सावंतवाडीपासून मालवण, देवगड, फोंडा, वैभववाडी ते राजापूर अशा अरबी समुद्राच्या किनारपट्टीचा प्रदेश आणि गोमंतकाचा सावंतवाडी तालुक्याच्या सीमेलगतचा प्रदेशात ही बोली बोलली जाते. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्य़ाचा दक्षिण भाग या बोलीच्या प्रभावाखाली येतो. ‘मालवणी’ बोलीला भाषातज्ज्ञांनी ‘कुडाळी’ असे नाव दिले आहे. तथापि मच्छिंद्र कांबळी यांच्या मालवणी नाटकांमुळे या बोलीला ‘मालवणी’ असे म्हटले जाऊ लागले. या प्रदेशातील दैनंदिन जीवनव्यवहाराचे साधन म्हणून या बोलीचा वापर केला जातो. किंबहुना अनेक साहित्यिकांनीही कथा-कादंबरी आणि काव्य-नाटकांसाठीही या बोलीचा वापर केला आहे.
अनुनासिक उच्चार हा मालवणीचा महत्त्वाचा विशेष होय. त्याचबरोबर हेल काढून बोलण्यात या भाषेचा खरा लहेजा असलेला दिसतो. गावरहाटीतील विविध देवतांना घातली जाणारी गाऱ्हाणी, म्हणी, वाक्प्रचार आणि लोकोक्ती यातून या बोलीचे सामथ्र्य प्रत्ययाला येते. अनेक लोककथा, विविध समाजांची लोकगीते आणि लोकनाटय़े मालवणी बोलीत असलेली दिसतात. धाला, मिघा, देसरूढ (अशुभनिवारण विधी) यासारखे लोकविधी या बोलीतील लोकगीतांच्या आधाराने साजरे केले जातात. इथल्या कृषिसंस्कृतीचे दर्शन मालवणी बोलीतील अनेक लोकगीतांमधून प्रकट झालेले दिसते. ‘दशावतार’ या विधीनाटय़ातील संकासूर या पात्राच्या मुखातील संवाद मालवणी बोलीतच असतात. इथल्या माणसांकडे असणारे संवादचातुर्य, कृतिउक्तीमधील तिरकसपणा संकासूराच्या भाषेतून प्रत्ययाला येतो. त्यामुळे कोकण किनारपट्टीच्या प्रदेशातील सामान्य बहुजनांच्या जीवनाचे भाषिक अंगाने प्रतिनिधित्व करणारे हे पुराणातील पात्र इथल्या मानववंशाच्या इतिहासाच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरावे असे आहे. मालवणी बोलीत अधिक शिव्या असतात असे म्हटले जाते. वास्तविक शिवी हा एक सहज भाषिक आविष्कार असल्यामुळे आणि बोलीरूप प्रमाणभाषेपेक्षा अधिक नैसर्गिक, रांगडे असल्यामुळे प्रत्येक बोलीतच शिव्या असतात. मात्र प्रत्येक वेळी शिवी क्रोध वा तिरस्कारापोटी येते असे नाही तर ती प्रेमापोटीही येत असते. मालवणी बोलीही याला अपवाद नाही.
मालवणी बोलीचे भूसांस्कृतिक वैशिष्टय़ असे की, ही बोली समाजाप्रमाणे आणि जातीसमूहांप्रमाणे विभिन्न रूपांत दैनंदिन जीवनात वापरली जाते. मालवणी निस्त्याकाची चव जशी मसाल्यामुळे जातींप्रमाणे वेगळी असते, तशी ह्य़ा भाषेतील अनेक शब्द आणि त्यांचे उच्चार जातिसमूहांप्रमाणे बदलतात. ब्राह्मणसमाज, सारस्वतसमाज, कोळीसमाज, कुळवाडी आणि दलितसमाज यांच्यातील मालवणी उच्चारात काहीशी भिन्नता असलेली जाणवते. जाताऽत, जाताहाऽत, जातासाऽत, जातांत असे एकाच शब्दाचे उच्चार होताना दिसतात. कोकणातील मुस्लीम समाजात तर मालवणी आणि हिंदीचे एक मिश्ररूप पाहावयास मिळते. मालवणी प्रदेशातून गेलेल्या आणि दीर्घकाळ मुंबईत वास्तव्य करून राहिलेल्या मालवणी माणसांची बोली अशीच मिश्ररूपात ऐकावयास मिळते.
मालवणी बोलीत अनेक वैशिष्टय़पूर्ण शब्द आहेत. जसे की, झिल-चेडू (मुलगा-मुलगी), घोव (नवरा), आवाठ (वाडी), सोरगत (लग्नासाठीचे स्थळ), देवचार (गावसीमेवरील अगोचर देवता), टैटा (डोके), असकाट (झाडी), कळयारो (भांडण लावणारा), बोंदार (जुनेर), झगो (झगा), निशान (शिडी), हावको (बागुलबुवा), इरागत (लघवी), वांगड (सोबत), मांगर (शेतघर), कुणगो (शेत) इत्यादी.
संस्कृती संपर्कातून घडणारे आदानप्रदान बोलीलाही लागू होते. खेडोपाडी झालेल्या शिक्षणाच्या प्रसारामुळे मालवणी बोलीतही आज अनेक प्रकारचे शब्द अन्य भाषांमधून आलेले दिसतात. विशेषत: इंग्रजीच्या प्रभावातून काही शब्द मालवणी बोलीत रूढ झालेले दिसतात. त्यांचे उच्चार वैशिष्टय़पूर्ण आहेत. इन्खोरी, भुस्कोट, पंप, मनीआर्डर, माचिस, ब्याग, टेबूल, बटर, बलब /गुलुप, गॅसबत्ती, मॅनवात, हास्पिटल, हास्पेट, इस्कूल, बुका (पुस्तके), इस्टो, डायवर, प्यान (पेन), बलाक (ब्लॉक) असे शब्द या बोलीत रूढ झाले आहेत.
कोणतीही बोली मूळ प्रमाणभाषेलाही समृद्ध करते. प्रमाणभाषेहून बोली या अधिक जिवंत आणि रसरशीत असतात. त्यामुळे अर्थाभिव्यक्तीसाठी प्रमाणभाषेत नसलेल्या अनेक संकेतांसाठी बोलीतून शब्दांचे आदन करावे लागते. असे अनेक शब्द असतात की, त्यांचा अर्थ व्यक्त करण्यासाठी प्रमाणभाषेत पर्यायी चपखल शब्द उपलब्ध नसतात. मालवणी बोलीतील काही शब्द प्रमाण मराठीत रूढ झालेले दिसतात. उदाहरणार्थ रापण, तिकाटणे, वेळेर (समुद्राचा किनारा), पांगुळ, कांडप, मुसळ, ओवरी, मेढी, खुट (खुंट), मळब, आडी/आढी, साकव, पांदण, वेंग (मिठी), गोडदी (गोधडी), सत्यानास, अवदसा, राखण, चकमक (आग पेटवण्यासाठीची वस्तू) इत्यादी. प्रमाण मराठीत या शब्दांना देशीशब्द मानले जातात. महाराष्ट्राच्या साऱ्याच प्रादेशिक बोलीभाषांतून असे अनेक शब्द प्रमाण मराठीत आलेले दिसतात.
आज प्रमाणभाषेबरोबर बोलीवरही संकटे येऊ घातलेली दिसतात. काळाच्या ओघात नव्या जीवनशैलीच्या प्रभावामुळे बोलीतील अनेक शब्द नाहीसे होण्याच्या मार्गावर असलेले दिसतात. कृषिव्यवस्थेमधील परिवर्तन, यंत्राधिष्ठितता, नव्या पिढीची आधुनिक मानसिकता, परंपरांची मोडतोड, बोलीकडे पाहण्याचा अनुदार दृष्टिकोन यामुळे अनेक शब्द उच्चारले जाण्याची क्रियाच बंद होत असलेली दिसते. शासनासहित सर्व समाजाची बोलीकडे पाहण्याची दृष्टी पारंपरिक आहे. आजवर शालेय स्तरावर बोली अभ्यासाला कोणत्याही प्रकारचे महत्त्व दिले जात नसल्याने शालेय स्तरापासूनच बोलीकडे उपहासाच्या जाणीवेतून पाहिले जाते. बोलीतील उच्चार अशुद्ध, गावंढळ मानणाऱ्यांचे तसेच आपल्या शहरी, स्वत:ला शिष्ट समजणाऱ्या समाजाचे भाषिक अज्ञान बोलीच्या मुळावर आलेले दिसते. त्यामुळे ग्रामीण जीवनातील विविध क्षेत्रातील अनेक शब्द लुप्त होऊ लागले आहेत.
कृषिजीवनात वस्तुविनिमयाची पद्धती रूढ होती. त्यामुळे धान्य मोजण्यासाठी कुडव, पायली, शेर, पावशेर, नवटाक इत्यादी धान्य मोजण्याची परिमाणे वापरली जात. आज वस्तुविनिमयाची पद्धत संपुष्टात आल्यामुळे धान्याच्या संदर्भात येणारे खंडी, भरो हे शब्द त्या त्या वस्तूंसह नाहीसे होऊ लागले आहेत. शेतीच्या यंत्राधिष्ठिततेमुळे अनेक अवजारे आज कालबाह्य़ होऊ लागली आहेत. उथव (भिजलेली कांबळी वाळत घालण्यासाठी चुलीच्या धगीवर बांधण्यात येणारी ताटी), इरले हा शब्द अंकलिपीतूनही गायब झाला. व्हायन (धान्य सडण्यासाठी करण्यासाठी दगडात कोरलेला खोलगट भाग), जाते, झारंग्या, कुडती (हातोडी), डीपळो (शेतातील ढेकळे फोडण्यासाठी केलेले अवजार) तसेच भात भरडण्यासाठी घीरट होती. या वस्तू काळाच्या ओघात संपत चालल्या आहेत. गाई-म्हैशी अर्दलीवर सांभाळण्यासाठी दिल्या जात. मात्र आता या पद्धतीही बंद पडत चाललेल्या दिसतात.
आधुनिक काळात मालवणी मुलखातील स्वयंपाकघराचे स्वरूपही अमूलाग्र बदलले. पूर्वी मातीची भांडी आणि लाकडाच्या वस्तू स्वयंपाकासाठी वापरल्या जात. मात्र आज या वस्तू व भांडी स्वयंपाकघरातून हद्दपार झाल्या. डवली (शिजवलेले पदार्थ वाढण्यासाठी नारळाच्या करवंटीपासून तयार केलेले डाऊल), दोनो (शिजवलेला भात गाळण्यासाठीचे लाकडी कोरीव भांडे), शिब्या, वाळन, रवळी, गोली, (मातीची घागर), कुण्डले (मातीचे भगुने), वरवंटो, पाटो या वस्तुंबरोबर त्यांची नावे लुप्त होत असलेली दिसतात. पूर्वी विडीऐवजी गुडगुडी ओढली जात असे. चुलीला वायल होते. अशा अनेक गोष्टी काळाच्या ओघात संपत चालल्या आहेत. त्यासह त्यांचे शब्दही नष्ट होत आहेत.
नवी जीवनशैली बोलीवर आघात करते. मात्र त्या त्या प्रदेशातील माणसांच्या जीवनव्यवहाराचे साधन आणि क्रीडा करमणुकीचे माध्यम असलेल्या बोली काळाच्या ओघात नष्ट होऊ लागल्या तर प्रमाणभाषेतील शब्दांची मूळ भूमी निश्चित करणे हे कठीण कर्म होऊन बसेल. म्हणून या बोली जतन करणे हे भाषिक आणि सांस्कृतिकदृष्टय़ा जबाबदारीचे कार्य आहे.

मराठीतील सर्व मायबोली बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-01-2013 at 01:01 IST

संबंधित बातम्या