मित्रा,
पेन्सिलनं आज रेषा काढायची नाही. आज फक्त अगदी छोटासा एक ठिपका काढ. त्यावर गिरवून मोठं करत गेलास तर काय काय होईल? एक तीळ? कलिंगडाची बी? डोळा? चेंडू किंवा चंद्र? तू काढलेला हा एक छोटा ठिपका (बिंदू) हजारो ठिपक्यांसह काय काय घडवू शकतो? असाच विचार दोन हजार वर्षांपूर्वी भारतात कणाद नावाच्या ऋषींनी केला.
‘‘सगळं जग अगदी छोट्या कणांपासून आणि मिळून बनलेलं आहे. (म्हणूनच आपण सर्वात छोट्या वस्तूंना कण म्हणतो) तेव्हा सूक्ष्मदर्शक नव्हता. संगणक नव्हता. हीच कल्पना आपण आजही वापरतो.
आता तुझ्या पालकांचा मोबाइल घे. त्यातल्या कुठलाही एक फोटो किंवा चित्र झूम करत जा. खूप जवळून स्क्रीन बघ. तुला काय दिसतंय? असंख्य चौकोनी रंगाचे तुकडे. ज्याला आपण पिक्सेल म्हणतो. याच पिक्सेलच्या साहाय्यानं आपण डिजिटल इमेज आणि व्हिडिओ पाहतो.
मोबाईल म्हणतो, ‘‘मी लाखो ठिपक्यांना जोडून चित्र काढतो.’’ पिक्सेल येण्याआधी एका फ्रेंच चित्रकारानं तर ठरवलंच की मी पूर्ण चित्र फक्त ठिपक्यांनीच काढणार! तो कॅनव्हासवर अनेक रंगाचे ठिपके ठेवत गेला. एकमेकांवर, एकमेकांच्या आजूबाजूला- आणि तयार झाली चित्रं.
या पद्धतीला ‘पॉइंटिलिजम’ हे नाव पडलं. जवळून पाहिलं तर हजारो ठिपके. पण दोन पावलं मागे गेलं की झाडं, नदी, माणसं, आकाश सगळं जिवंत!
चल, आज आपणही ठिपक्यांची जादू करून पाहू. टेन्शन घेऊ नकोस, कारण आपण ठिपक्यांपासून अमूर्त कल्पना कागदावर उमटवणार आहोत. त्याआधी तुझ्या घरात कुठे कुठे ठिपके आहेत ते मला दाखव. कपड्यावर, कुत्र्यावर, मांजरीवर, भाकरीवर, भिंतीवर, अंड्यावर… गोल ठिपके शोधून बघ. प्रत्येक ठिपका वेगळा. तू रंगाचे ट्युब, रंगीत खडू किंवा रंगीत गोल टिकल्या घे. कागदाच्या मधोमध एक मोठा ठिपका काढ. ब्रशनं, बोटानं किंवा टिकली चिकटव. हा ठिपका म्हणजे आजच्या चित्राचा हिरो! हिरो कसा आहे? रागीट, विनोदी, रुसलेला की घाबरट?
आता त्याच्या भोवती छोटे, मोठे, गोल, टपोरे तर रंगीत ठिपके जमा होऊ दे. काही अगदी खांद्याला खांदा लावून उभं राहू दे. काही लांब पळून जाऊ दे. लाल नारंगी पिवळ्या ठिपक्यांमुळे कागद थोडा नाचू लागतो का? काळे, निळे, जांभळे आजूबाजूला आले की गूढ वाढतं का? काही ठिपक्यांमध्ये रिकामी जागाही ठेव. तुला वाटत असेल तर काही ठिपक्यांत अजिबात जागा ठेवू नकोस. चित्र काढून झालं की कागद टेबलावर ठेव. चारपाच पावलं मागे जा. डोळे थोडे बारीक करून चित्राकडे बघ. आता कागदावरले ठिपके गायब झालेत. ठिपक्यांनी मिळून एकच आकार घेतला आहे- जो तू ठरवून काढला नाहीये. त्याचा त्यानी घेतलाय. काहीच नाही दिसलं तर पुन्हा जवळ ये. पाहणार्यानं कुठं उभं रहावं हे प्रत्येक चित्र त्याच्यापुरतं ठरवत असतं (आणि तरीही नाहीच दिसलं तर दुसरं चित्र काढ.)
रंगीत ठिपक्यांनी मिळून काहीतरी वेगळंच बनवलं ना? ओळखू न येणारे, अर्थ न समजणारे. चित्रात बरोबर की चूक नसतं. ठिपक्यांनी तुला जे दाखवलं तेच फक्त खरं. तीच तुझ्या मनातील भावना. त्यांची भाषा एकच फक्त रंगाची. यापुढे आकार काढतेवेळी रेषेनं काढायचा की एकमेकांजवळ ठिपके ठेवून काढायचा हा पर्याय तुझ्याकडे असेल.
तुझा चित्रमित्र
श्रीबा
शिक्षक आणि पालकांसाठी सूचना…
१. मुलांना विचारू नका की, ‘‘काय काढलंस? काय दिसतंय?’’ त्याऐवजी विचारा, ‘‘कोणता ठिपका सर्वात आनंदी आहे? कोणता एकटा पडला आहे? कोणत्या दोन ठिपक्यांची मैत्री झाली? वगैरे…असे प्रश्न मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख देतात. जर असे प्रश्न सूचत नसतील तर काहीच विचारू नका.
२. मोबाइल, पुस्तकात अडकलेल्या मुलांमध्ये कदाचित ठिपके काढण्याचा संयम नसेल, तर अडीच मिनिटात १०० ठिपके काढण्याचा एक गमतीदार टास्क द्या. किंवा रंगीत खडूनं फळ्यावर दोन जणांना एकत्र ठिपके काढण्याचं सुचवा.
मुलांचा प्रतिसाद…
अनेकदा मुलं जे चित्र काढायला सांगितलं आहे ते बाजूला सारून त्यांच्या मनाला जे वाटतंय ते कागदावर उतरवण्याचा आनंद घेतात… थेट ट्युबचे
रंग वापरून काढलेलं चित्र…

