जयश्री हरि जोशी
मुकुंद टाकसाळे यांनी मराठीतील दर्जेदार निर्विष विनोदी साहित्याची परंपरा समर्थपणे पुढे चालवली. चीड, संताप, आकस, वैयक्तिक टीका टाळून खेळकरपणे विनोदनिर्मिती करणारं, कधी गमतीशीर, कधी मिश्कील, थोडं वात्रट, क्वचित चावट, खोडकर तरीही निखळ विनोदाने भरलेलं असं टाकसाळे यांचं लेखन आहे. विनोदी साहित्य हे केवळ विनोदी असून चालत नाही, ते खणखणीत साहित्य असावं लागतं! समाजभान, प्रागतिक दृष्टिकोन आणि अन्यायकारक घटितांना परखड विरोध करण्याचा बाणा यामुळे टाकसाळेंच्या लेखनाबद्दल लिहिताना या सर्व घटकांचे योगदान लक्षात घ्यावे लागते. सामाजिक जाणिवेमुळे आणि बांधिलकीमुळे टाकसाळे आपले विचार निर्भीडपणे मांडतात. विनोदाचा प्रसन्न शिडकावा असलेल्या या लेखनाचे बीजावरण विनोदाचे असले तरी मूळ गाभा गंभीर आणि विवेचनात्मक आहे.
अलीकडेच टाकसाळे यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली- ‘हसता हसता’ हा निवडक लेखांचा संच, तर ‘हसरी टाकसाळ’मध्ये निवडक कथांचा समावेश आहे. या दोन्ही संग्रहांत निवड केलेले लेख असोत किंवा कथा… या दोन्हींमध्ये वास्तवाधारित लेखन समोर येते. समाजकारण आणि राजकारणातील त्या त्या कालखंडाचा सूर पकडताना लेखकाची सूक्ष्म निरीक्षणशक्ती प्रत्ययाला येते. या दोन्ही साहित्यप्रकारांत विचाराचा विस्तार अथवा कथासूत्राची दमदार मांडणी करताना एका टवटवीत आणि निकोप विनोदाचा अंत:स्वर उमटत राहतो. मुकुंद टाकसाळेंचा स्पष्ट ठसा असणारा हा खेळीमेळीचा विनोद माणसाच्या स्वभाववैशिष्ट्यांवर, वागणुकीवर, जगण्यातल्या विसंगतीवर, मराठी मध्यमवर्गीय माणसाच्या बोटचेप्या वृत्तीवर नेमके बोट ठेवतो. राजकीय व्यंग्य ही त्यांची खासियत आहे. आशयाच्या अनुषंगाने आलेल्या सहज शाब्दिक कोट्या, असंस्कृत, अनादरकारक नसलेला विनोद इथे वाचायला मिळतो.
टाकसाळे यांच्या ‘हसता हसता’ या पुस्तकात लघु आणि दीर्घ मिळून अठ्ठेचाळीस लेख आहेत. सत्तेतील स्थित्यंतरे आणि त्यातून उद्भवणारी समीकरणे, स्वार्थी, सत्तालोलुप राजकारणी आणि समकालीन सर्वसामान्य समाजाचा कळाहीन आणि कुरूप चेहरा टाकसाळे संयत भाषेत, परिणामकारक पद्धतीने या लेखांतून आपल्यासमोर मांडतात. आपले परखड विचार निर्भीडपणे मांडताना हा साहित्यिक कचरत नाही, त्यामुळेच ‘‘इतिहासाचे अज्ञान ही काही फक्त नरेंद्र मोदींचीच मक्तेदारी नाही, आपलंही अज्ञान अनेकदा उघडं पडत असतं,’’ असं ते सहज लिहून जातात. पण राजकीय मल्लिनाथी करतानाही त्यांच्या विनोदाचा तोल सुटलेला नाही.
दुसरे पुस्तक ‘हसरी टाकसाळ’ हे त्यांच्या निवडक पंधरा कथांचा संग्रह आहे. टाकसाळेंच्या कथा वाचताना त्यांची अकृत्रिम दृष्टी तर जाणवतेच, पण ते त्या कथा ‘सांगतात’ आणि ती माणसांची शब्दचित्रे डोळ्यांसमोर एक पट विणत जातात. त्या कथांत माफक नाट्य आहे, शब्दनिष्ठ विनोद आणि कोट्या ही तर टाकसाळेंची हातोटी. जगण्या-तगण्यातील संगती, विरोधाभास नेमके टिपून आपल्याला अंतर्मुख करत जाणारी ही परिणामकारक लेखणी. खुसखुशीत शैलीत परिस्थितीचे भान ठेवून, पण परिस्थितीचे गांभीर्य जाणून वाचकांच्या निदर्शनास ते आणून देणारा हा लेखक.
पुणे आणि महाराष्ट्राचा शहरी परिसर कसा झपाट्याने बदलत चालला आहे याचे चित्रण, अलीकडच्या काळात मराठी मध्यमवर्गीय लोकांचे अमेरिकेत जाण्याचे वाढते प्रमाण आणि त्याबरोबरच प्रवासी भारतीयांशी त्यांचा वाढत जाणारा संपर्क या पार्श्वभूमीवर कोपरखळ्या मारत दोन हलक्याफुलक्या मजेशीर गोष्टी लिहिलेल्या आहेत. उदाहरणार्थ, ‘कूक कूक कूक कूक’ या कथेत कथानायक मानसोपचारतज्ज्ञ म्हणून एका जुन्या मैत्रिणीकडे जातो. परंतु अमेरिकेतील मैत्रिणीचे कुटुंब अल्पशा वेतनावर त्याचा एखाद्या स्वयंपाक्यासारखा उपयोग करून घेते.
‘बाळंत पर्यटन’ ही गोष्टही आपल्या मुलांच्या बाळंतपणाच्या काळात मदत करायला पालक कसे उत्साहाने जातात आणि कामाचा धबडगा सांभाळून काहीशा निराशेने परततात यावर आहे. ‘सखूची डायरी’ या कथेत सखू या मोलकरणीला मालकिणीने शिक्षित केल्यावर ती स्वत:ची डायरी लिहू लागते. मालकिणीचा नवरा सखूशी कसे प्रेमाचे चाळे करायचा प्रयत्न करतो, हे सखू मालकिणीच्या परोक्षही तिच्या मैत्रिणींच्या उपस्थितीत, आपल्या डायरीतून वाचून दाखवते, हे अकृत्रिम विनोदाचे उत्तम उदाहरण आहे.
तुटपुंज्या भांडवलावर दूर मजल मारणार्या माणसावरची ‘बहिणाबाईंचा नातू’ असो किंवा आपली खोटी जन्मतारीख दिलेले उघडकीला आल्यावर ‘राधेने ओढला पाय’ या कथेतील बक्षीस गमावणारा नायक असो, तसेच ‘मी आचार्य अत्रे कसा झालो नाही’ या कथेत नायकाचे भाषण हुबेहूब चोरून बक्षीस मिळविणारी त्याची चलाख सहपाठी विद्यार्थिनी अगदी डोळ्यांसमोर उभी राहते.
टाकसाळेंनी त्यांच्या लेखात लिहिल्याप्रमाणे, विनोद मोकळ्या वातावरणात फुलतो, लोक निर्भय असतील, विचारस्वातंत्र्य असेल तर खुलतो, विनोद लोकशाहीत फुलतो. अहंकाराचा फुगा फोडणे विनोदाचे काम आहे. स्वत:कडे, स्वत:च्या दोषांकडे पाहून हसणं हे निरोगी समाजाचं महत्त्वाचं लक्षण आहे.
विनोदनिर्मितीसाठी आशय तर लागतोच, पण अशा अभिव्यक्तीसाठी एक यशस्वी तंत्र आत्मसात करावे लागते. कोल्हटकर, गडकरी, अत्रे, पु. ल. देशपांडे, चिं. वि.जोशी यांची परंपरा मुकुंद टाकसाळे सक्षमपणे पुढे नेत आहेत.
‘रंजन ते अंजन’ अशा अस्सल वाणाच्या या लेखनपरंपरेचे केवळ ‘विनोदी’ असे ढोबळ वर्गीकरण करून मूल्यमापन करण्याऐवजी साहित्य समीक्षाक्षेत्रातील जाणकारांनी एक वेगळे, विशिष्ट अभिधान सुनिश्चित करायला हवे, तरच या लेखनशैलीचा योग्य आढावा घेता येईल. परंपरागत समीक्षेच्या मोजमापाच्या पट्ट्या न लावता अशा विनोदमूलक गंभीर साहित्याच्या भाषाघटकांची शैलीवैज्ञानिक चिकित्सा करणे ही मराठी साहित्य समीक्षेतील पुढची अवघड पायरी आहे. तरच अशा लेखनाला वाङ्मयाच्या मुख्य प्रवाहात न्याय्य ओळख मिळेल.
‘हसरी टाकसाळ’
- मुकुंद टाकसाळे, रोहन प्रकाशन
पाने – २४४, किंमत – ५०० रुपये
‘हसता हसता’
- मुकुंद टाकसाळे, रोहन प्रकाशन
पाने – २४४ किंमत – ५०० रुपये
u jayliterature@gmail.com

