प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com

महाराष्ट्रात कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा वगैरे विभागांना एक स्थानिक संस्कृती आहे. इतरांपेक्षा थोडय़ा वेगळ्या चालीरीती, भाषा, सणवार, खाद्यपदार्थ, पीकपाणी वगैरे वगैरेमुळे प्रत्येकाची संस्कृती ही थोडी वेगळी असते. पण या सर्वापेक्षाही मुंबई नावाचं जे काही महानगर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, त्याची एक अतिशय स्वतंत्र अशी संस्कृती आहे. आणि या शहराने ही संस्कृती जपली आहे ती अर्थातच मुंबईकरांमुळे. साहजिकच मुंबईकर आणि त्यांचे जीवन हे अनेक व्यंगचित्रकारांनी आपापल्या व्यंगचित्रांतून पकडण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थातच हे व्यंगचित्रकारसुद्धा वेगवेगळ्या जडणघडणीचे असल्याने त्यांनी आपापल्या दृष्टिकोनातून मुंबईकरांचे हे चित्र रेखाटण्याचा प्रयत्न करणं स्वाभाविकच.

Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
Meera Phadnis and Anirudh Hoshing
लोकजागर: नापास’ स्वयंसेवकांची गोष्ट…
sanjay raut raj thackeray amit shah
“राज ठाकरेंची खंत फक्त मलाच माहिती”, अमित शाहांच्या भेटीवर संजय राऊतांची खोचक टिप्पणी; ‘त्या’ व्हिडीओचा केला उल्लेख

मुंबईकर या नावातच अनेक व्यक्ती, अनेक व्यक्तिमत्त्वं दडलेली आहेत. इथे मार्गशीष महिना आला हे त्याला भिंतीवरच्या कॅलेंडरपेक्षासुद्धा बाजारात पिवळी फुलं मोठय़ा संख्येने दिसली की बरोबर कळतं. कोपऱ्यावर नेपाळी स्वेटरवाले दिसले की- ‘‘अरे बापरे, थंडी आली वाटतं! आणि आपल्याला कळलंच नाही!’’अशी चुटपुट लागून त्याला हुडहुडी भरते. वडापाव हा उभ्याने खाण्याचा पदार्थ आहे याविषयी तो अगदी ठाम असतो. मोबाइल, पास इत्यादींची प्लास्टिक कव्हर्स विकणारी पोरं रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला दिसू लागली की त्याला पावसाळ्याची चाहूल लागते. त्याची मॅनेजमेंट स्किल्स एवढी जबरदस्त असतात, की संध्याकाळी ६:४३ ला चर्चगेटवरून निघणारी विरार फास्ट चारऐवजी तीन नंबरवर आली तर पुढून- म्हणजे विरारकडून पाचव्या डब्यात तिसऱ्या दरवाज्यात गेल्यास बांद्य्राला चौथी शीट नक्की मिळते! मुख्य म्हणजे हे त्याचे आडाखे वेधशाळेपेक्षा जास्त विश्वासार्ह असतात.

भाषेविषयी तो अत्यंत लवचीक असतो. दोन मराठी माणसं एकमेकांशी बोलत असताना मधून मधून मराठीही बोलू शकतात. क्रिकेट हा तर त्याचा आवडता खेळ. त्यामुळे प्रचंड गर्दीतही तो मोबाइलवर हॅरिस शिल्डचा स्कोअर चेक करून नववीमधला कुठला विद्यार्थी इंडियातून खेळणार याचे अंदाज बांधू शकतो. ट्रेनमध्ये रमी खेळताना दोन प्युअर सीक्वेन्स असूनही पॅक करून संपूर्ण ग्रुपसह सचिनची सेन्चुरी रेडिओवर ऐकणारा हा खरा मुंबईकर!!

मुंबईकरांच्या जीवनाला अनेक पैलू आहेत. त्यावर एक मालिका केली होती. त्यातलेच हे काही नमुने..

प्रवास म्हटलं की मुंबईकर कुठेही जायला अक्षरश: एका पायावर तयार असतो. तो इतका धावपळीत असतो, की सिनेमाचं शूटिंग असो किंवा एखाद्या डॉनने दुसऱ्या गॅंगवर केलेलं शूटिंग; तो त्याला फारशी किंमत देत नाही. कारण त्याला ‘८४ लिमिटेड’ बस पकडायची असते. साध्या साध्या सणांतसुद्धा तो एक वेगळीच उंची गाठतो. म्हणूनच इथली दहा थरवाली दहीहंडी लोकप्रिय आहे. ‘३६४ लिमिटेड’मध्ये कंडक्टरने घेतलं नाही यापेक्षाही त्याला भारतीय क्रिकेट संघात आगरकरला घेतलं नाही याचं वैषम्य जास्त वाटतं. (पूर्वी पद्माकर शिवलकर, मग कांबळी, आगरकर वगैरे वगैरे.) मुंबईतली गणेश विसर्जनाची मिरवणूक पाहताना तो महागणपती या सगळ्या गर्दीला चालवतोय, की ती गर्दी या महागणपतीला विसर्जनासाठी घेऊन चालली आहे हे कळत नाही, इतके दोघंही एकमेकांत गुंतलेले विसर्जनाच्या वेळी दिसतात. विशेषत: अशावेळी ही गर्दी म्हणजे मुंबईकरांचं एक अवाढव्य व्यक्तिमत्त्व आहे असं वाटू लागतं.

ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत हळबे हे ‘लोकसत्ता’मध्ये फार पूर्वी दर रविवारी हलकीफुलकी हास्यचित्रं काढायचे. त्या आठवडय़ात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींवर त्यांची मजेशीर चित्रमय टिप्पणी असायची. मुंबईकरांमध्ये वेस्टर्न (रेल्वे) विरुद्ध सेन्ट्रल (रेल्वे) असा एक सुप्त संघर्ष कायम असतो. सेन्ट्रलचा पसारा मोठा. त्यामुळे वेस्टर्नच्या तुलनेत त्यांच्यासमोरच्या अडचणीही अनंत! याचा संदर्भ घेऊन हळबे यांनी हे झकास हास्यचित्र रेखाटलं आहे; जे पाहून (वेस्टर्न, सेन्ट्रल आणि हार्बर) मुंबईकराच्या ‘परेशान’ चेहऱ्यावर स्मितरेषा उमटेल, हे नक्की!

वसंत सरवटे यांचं एक छान चित्र आहे. त्यात मुंबईचा डबेवाला (नेहमीप्रमाणे) धावताना दाखवलाय आणि त्याचा साथीदार त्याला म्हणतोय, ‘‘अरे येडय़ा, असं फास्ट धावून फास्ट फूडवाल्यांशी कांपिटीशन करनार व्हय?’’ एक उदयाला येणारी आणि एक प्रस्थापित अशा दोन भिन्न संस्कृतींवरचं हे भाष्य व्यंगचित्रकाराने मोठय़ा खुबीने चितारलं आहे. (‘सरवोत्तम सरवटे’, संपादक : अवधूत परळकर, प्रकाशक : लोकवाङ्मय गृह)

‘मुंबईकरांचं स्पिरिट’ म्हणून ज्याचा उल्लेख नेहमी काही घटनांच्या वेळी केला जातो, त्यापैकी बॉम्बस्फोट मालिका किंवा २६ जुलैचा महाप्रलय हे दोन मोठे आघात मुंबईकरांनी सोसले. त्यावरचं माझं सोबतचं चित्र. नेहमी अप्रकट असणारी माणुसकी मुंबईकरांनी त्यावेळी उघडपणे दाखवून हे शहर लाखो माणसांनी बनलेलं जिवंत शहर आहे हे दाखवून दिलं!

कामाला प्राधान्य देणं हे मुंबईकरांचं खरंच उत्तम वैशिष्टय़ आहे. म्हणूनच कितीही पाऊस पडला तरी मुंबईकर चिंब भिजलेल्या कपडय़ाने ऑफिसमध्ये पोहोचतातच. सोबतच्या चित्रात प्रचंड पावसातून ऑफिसमध्ये पोहोचलेल्या बॉसनेही आपले ओले कपडे बाजूलाच वाळत घातले आहेत आणि तो सेक्रेटरीला डिक्टेशन देतोय.. अर्थातच मजेशीर अवस्थेमध्ये! (मारिओ मिरांडा, बॉम्बे, प्रकाशक : जराड डाकून्हा आणि आर्किटेक्चर ऑटोनॉमस)

मुंबईकर स्वर्गात जातो अशी एक मालिका मी रेखाटली होती. त्यात मुंबईकराला स्वर्गात अमृत पिण्यापेक्षा वडापाव खाण्याची इच्छा निर्माण होते, किंवा स्वर्गातल्या फूटपाथवर उभ्या राहत असलेल्या झोपडय़ा पाहून एक जण म्हणतोय, ‘‘इथले पालिका अधिकारी, नगरसेवक, पोलीस सगळे मुंबईतून आल्याने हळूहळू नरकातले काही लोक इथे गुपचूप येऊन अनधिकृतपणे स्थायिक होत आहेत!!’’ किंवा देवाकडे पुनर्जन्माची मागणी करताना एक अट्टल मुंबईकर विनंती करतोय की, ‘‘देवा, मला पुनर्जन्म देणार असशील तर बाईचाच दे! कारण संध्याकाळी लेडीज स्पेशलला फोर्थ सीट मिळते!’’ (स्वर्गसुख, स्वर्गसुख म्हणतात ते हेच असावं बहुतेक!! पण यावरून खऱ्या मुंबईकराची मुंबईवरची निष्ठा आणि प्रेम सिद्ध होत नाही काय?)

या सर्वापेक्षासुद्धा मला स्वत:ला आवडलेली, पण करुण वास्तव असणारी एक कल्पना होती. त्यात स्वर्गातील एका मुंबईकराला दुसरा मुंबईकर विचारतो, ‘‘अरे नार्वेकर, तुम्ही इकडे कधी?’’ नार्वेकर म्हणतात, ‘‘तुम्ही त्या दिवशी ८:३८ च्या बदलापूर लोकलमध्ये गुदमरून मेलात, त्यानंतरच्या मंगळवारी गिरगावात आमची चार मजली चाळ कोसळली!!’’

मुंबईकरांचं प्राक्तन यापरतं अजून काय असू शकतं!