अमचं घर तेव्हा शहरातल्या टेकडीसदृश भागात होतं. त्यातही चौथा मजला. एका बाजूच्या खिडकीतून उतारावरची एक सरकारी इमारत आणि तिचं प्रशस्त आवार दिसायचं. त्यात झाडं चिकार. जांभळाची, आंब्याची, वडाची, शिरीषाची जुनी-मोठाली-गर्द झाडं. तिथून पोपटांचे थवे उडताना दिसायचे. पूर्वेकडच्या खिडकीतून डोंगर. सूर्योदय तर दिसायचाच, पण त्याहून जास्त अप्रूप वाटायचं ते त्या दिशेनं अपरात्रीच्या वा पहाटेच्या शांततेत ऐकू येणाऱ्या ट्रेनच्या भोंग्याचं. गच्चीवरून सगळं शहर दिसायचं. मामा-भाच्याच्या डोंगरापासून ते तेव्हा नव्यानं बांधल्या जाणाऱ्या महापालिकेच्या इमारतीपर्यंत आणि त्यालगतच्या शेताडीपर्यंत. वीसहून जास्त मजले असणाऱ्या इमारती मोजक्याच. बाकी सगळं शहर आपल्याहून बुटकं. नजरेच्या एका फेरीत न्याहाळता येणारं. उन्हाळ्यातल्या बहुतेकशा रात्री चटया नेऊन गच्चीत पसरायच्या आणि गप्पा ठोकत लोळायचं. हळूहळू उगवत जाणाऱ्या चांदण्या. एखादाच मागे राहिलेला चुकार बगळा. मधूनच येणारी वाऱ्याची झुळूक. पौर्णिमेला आख्खाच्या आख्खा गरगरीत चंद्र. कोजागरीला सोसायटीतले लोक जमून भेळ करायचे, मसाला दूध प्यायचे आणि गाण्यांच्या भेंड्या खेळायचे. शहरात तेव्हा आकाश विझवून टाकणाऱ्या प्रकाशाच्या ओकाऱ्या टाकलेल्या नसत. उजेड आणि आवाज असायचा, पण सोबत करणारा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा