अभिजात :  फ्रेंच इम्प्रेशनिझममधली तेजस्विनी

सोनेरी केसांची रचना त्या काळात असायची तशी. उंच, मानेचा डौलदार बाक सुचवणारी. प्रतिबिंबाची अगदी हलकीशी झलक आरशात.

museum in paris
‘वूमन अ‍ॅट हर टॉयलेट’

अरुंधती देवस्थळे

सेझाँ, मॉने, रेन्वा, देगा, मॅने बंधू, कैबॉट, पिसारोसारख्या ऐपतदार इम्प्रेशनिस्ट बाप्यांच्या कोंडाळ्यात स्वतेजाने लुकलुकणाऱ्या दोन चांदण्याही होत्या. एक म्हणजे ब्यर्थे मॉरिझो आणि दुसरी मूळची अमेरिकन मेरी कसाट.. आई आणि मुलांची सुंदर चित्रं काढणारी. या दोघी पत्रव्यवहारातून मैत्रिणी होत्या, हे विशेष! काळाच्या पुढे असलेली ब्यर्थे मॉरिझो (१८४१- १८९५) फ्रेंच इम्प्रेशनिस्टस्च्या गराडय़ात एकटीच स्त्री असली तरी आत्मविश्वासाने आणि चिकाटीने प्रत्येक प्रदर्शनात भाग घेत असे. सगळ्यांशी चांगली मैत्री. तेही तिला जपायचे. मदत करायचे. कामातलं उत्फुल्ल ब्रशवर्क आणि त्याला साथ देणारं जबरदस्त पॅलेट बघता तीही तेवढीच इम्प्रेशनिस्ट तबियतीची आणि तोलामोलाची असावी हे तिची चित्रं सांगतात. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ‘वूमन अ‍ॅट हर टॉयलेट’ हे तिचं ऑइल ऑन कॅनव्हास (६०.३ ७ ८०.४ सें. मी.)! शेलाटय़ा चणीची फ्रेंच खानदानी नवतरुणी प्रसाधनासाठी आरशासमोर बसली आहे. पोशाखातही सुरुचि झळकते आहे. कानात चमकणारं नाजूकसं कर्णभूषण. चंदेरी पांढरा, किंचित लव्हेंडर, जरासा मंद गुलाबी, एखादी निळी रेष, शुभ्र आणि राखाडी रंगांच्या हलक्या, अपारदर्शक फटकाऱ्यांतून साकार झालेलं रंगशिल्प. आसपास फ्रेंच अत्तराचा मंद मंद दरवळ तरळत असावा तशी अर्धीअधिक जागा मोकळी. फक्त पिसांसारख्या फटकाऱ्यांच्या ब्रशवर्कने भरलेली. चित्राला गहराई देणारी.. तेही किती कौशल्याचं असणार! मॉरिझोने सहीसुद्धा आरशाच्या लाकडी फ्रेमवर दिसून न दिसेल अशी केली आहे! सोनेरी केसांची रचना त्या काळात असायची तशी. उंच, मानेचा डौलदार बाक सुचवणारी. प्रतिबिंबाची अगदी हलकीशी झलक आरशात. पाहताक्षणी देगाच्या निळ्या नृत्यांगना आणि रेन्वाची पुस्तक वाचणारी अधोमुखी स्त्री आठवावी. त्याच धर्तीवर स्त्रीदेहाची कमनीयता ज्या सुकुमारतेने मॉरिझोने चित्रित केली आहे, ते लाजवाब आहे. बाजूला मागे खिडकी. तिच्या तावदानातून पलीकडच्या वेलीचं सुचवलेलं अस्तित्व. हे चित्र केवळ एका स्त्रीने काढलं म्हणून बेतानेच दखल घेतली गेली. पण यानंतर ब्यर्थे मॉरिझो हे नाव आदराने घेतलं जाऊ लागलं, हेही नसे थोडके! हिच्या चित्रांचा शोध घ्यायचा असेल तर पॅरिसच्या म्यूझी मार्मोत्तांमध्ये जावं, असा अनेकांकडून सल्ला मिळतो.

हे ही वाचा >> अभिजात : रंगांवर विशुद्ध प्रेम करणारे मातीस

तिचं कुटुंब सधन, सुसंस्कृत होतं. मोठी बहीण एडमा आणि ब्यर्थे या दोघींना चित्रकला आणि पियानोवादन शिकवायला शिक्षक येत असत. त्याच दरम्यान कधीतरी ब्यर्थेला आपल्याला हे मनापासून आवडतंय आणि बऱ्यापैकी साधतंय, म्हणून आयुष्यात हेच करावं असं वाटायला लागलं. आईच्या बाजूच्या कुटुंबातून चित्रकलेचा वारसा तिला मिळाला असावा. पण मुलींनी चित्रं फक्त छंद म्हणून काढावीत, त्या व्यवसायात उतरू नये अशी खानदानी पालकांची अपेक्षा असायची. तिने सुरुवात जलरंगांनी केली होती. १८६५ व ६६ या दोन्ही वर्षांत तिची चित्रं पॅरिस सलोंच्या वार्षिक प्रदर्शनांत स्वीकारली गेली म्हणून वडिलांनी दोघी चित्रकार लेकींना घरातल्या बागेत स्टुडिओ बांधून दिला. एडमाने लग्न करून चारचौघींसारखा संसार थाटला. पण तिच्या आयुष्यात आता चित्रकलेला छंद म्हणूनही जागा न राहिल्याची खंत ती पत्रांत व्यक्त करे. दोघींची विश्वं बदलली, पण भावनिक बंध तसेच राहिले. ब्यर्थेला यशाची आणि नाव कमावण्याची दुर्दम्य इच्छा होती. तिला कलेचं चीज होताना बघायला खूप धडपडावं लागलं. कारण आजवर कला हे पुरुषी वर्चस्वाचं क्षेत्र होतं आणि ती प्रवाहाविरुद्ध दिशेत समर्थपणे उडी घेणारी पहिली गुणी चित्रकार होती.

त्याकाळच्या पॅरिसमधल्या स्त्रीजीवनाचं अतिशय बोलकं प्रतििबब तिच्या कलेत सापडतं. तिचं विश्व तेच तर होतं. बायकांनी पुरुषांसारखं कॅफेत किंवा पबमध्ये जायचं नसे. इतर कलाकारांना फक्त औपचारिकरीत्या भेटता येई. इम्प्रेशनिस्ट चित्रकार नदीकाठी किंवा उद्यानात बसून चित्रं काढू शकत, पण स्त्रियांना ती मुभा नव्हती. एकटीने कुठे लोकांसमोर जायचं नाही, ही समाजाची रीत. ब्यर्थे अर्थातच कोणीतरी बरोबर घेऊन (बऱ्याचदा आईलाच) तिच्या पूर्वजांची चित्रं असणाऱ्या लूव्रमध्ये जाऊन बसायची आणि त्यातील कलाकृती पाहून पाहून रेखाटनं करत राहायची. घरात पाहुणे वगैरे येणार असल्यास ब्यर्थेचे रंग आणि चित्राचं सामान गडबडीने लपवून ठेवलं जाई. तिची अनेक चित्रं विकली गेली, स्तुतिपात्र ठरली आणि तरीही तिने एक चित्रकार असणं हे सामाजिक दृष्टीने प्रतिष्ठित नक्कीच नव्हतं. आणि याचा तिला फार त्रास झाला असणार. स्त्रियांनी घरंदाज नाजूकसाजूकपणे घर आणि मातृत्व सांभाळावं हीच रीत होती. कारण कोणत्याही क्षेत्रात प्रतिभा हा निसर्गत: पुरुषी गुण मानला जायचा.

ब्यर्थेला सुरुवातीचे धडे सुप्रसिद्ध लँडस्केप आर्टिस्ट कामिल कोरोकडून मिळाले आणि मग लूव्रमध्ये चित्रांच्या प्रतिकृती बनवण्याचं प्रशिक्षण घेताना तिची भेट विख्यात इम्प्रेशनिस्ट एदुआर्द मॅनेशी झाली. दोघांची चांगली मैत्री झाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढची वाटचालही. कला शिकता शिकता त्यांच्यासाठी तिने मॉडेिलगही केलं. मॉडेल आणि चित्रकलेचं समीकरण दोन्ही बाजूंनी लक्षात आल्याने नंतरच्या तिच्या चित्रांत स्त्रियांचं चित्रण करताना एक नैसर्गिक डौल आला.. मुरब्बी चित्रकारासारखा. मॅनेंच्या ‘दी बाल्कनी’ या सुप्रसिद्ध चित्रातील तिघांपैकी एक व्यक्ती तीही आहे. पण ते स्वत:चं चित्र हे चित्र म्हणून तिला फारसं पसंत नव्हतं. मॅनेंनी तिची १४ चित्रं काढली आहेत. त्यांच्याबद्दल मनात आदर असूनही तिने काढलेल्या आणि सलोंने स्वीकारलेल्या तिच्या बहिणीच्या चित्रांत त्यांनी केलेले जुजबी फेरफार तिला मुळीच पसंत नव्हते.

हे ही वाचा >> अभिजात: व्हर्साय : राजवैभवाचा हिरवा शिरपेच

तिशीत तिने मॅनेंच्या सुस्वभावी धाकटय़ा भावाशी- यूजेनशी लग्न केलं. तो स्वत: चित्रकार असून भाऊ किंवा बायकोएवढा यशस्वी नाही होऊ शकला; पण कायम तिला प्रोत्साहित करत राहिला. तिच्या यशाचं त्याला कधी वैषम्य वाटलं नाही. दोघांना ज्युली नावाची गोड मुलगी झाली. त्याकाळी आई आणि मुलांची चित्रं काढली जात, पण तिने यूजेन आणि ज्युलीचं छानसं चित्र- अर्थातच इम्प्रेशनिस्टिक शैलीत काढलं आहे. ‘यूजेन मॅने अँड हिज डॉटर इन द गार्डन’ (६०   ७ ७३ से. मी. ऑइल ऑन कॅनव्हास)! हे तिने आयुष्यभर स्वत:च्या खाजगी संग्रहात ठेवलं होतं. तिच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी ते जगासमोर आलं. मॅनेंसारखा तिचाही कल इतर इम्प्रेशनिस्टप्रमाणे रंगाशी दृक्भानावर आधारित प्रयोगांऐवजी पूर्वीच्या चित्रकारांनी वापरली तशीच नैसर्गिक रंगसंगती वापरण्याकडे होता. मॉरिझो, मॅनेंनी समकालीन इम्प्रेशनिस्ट चित्रकारांसारखं गडद रंगांचं पॅलेट वापरावं,  काळा रंग कमीत कमी वापरावा असं सुचवत असे. तिची स्वत:ची चित्रं काळजीपूर्वक कम्पोझिशनचं उत्कृष्ट भान ठेवून केलेली असत. प्रसन्न, मंद रंगांचं पॅलेट वापरून काढलेली, बहुतेक स्त्रियांची, घरगुती, आसपासच्या विश्वातली. पण तिच्या जमान्यातल्या बडय़ा नावांपेक्षा ती गुणवत्तेत कुठल्याही तऱ्हेने कमी नव्हती हे प्रकर्षांनं जाणवतं. तिच्या चित्रसंपदेत पांढरा रंग आणि त्याच्या विविध छटांचा अतिशय उदार आणि प्रभावी वापर दिसतो. नंतरच्या तिच्या चित्रांत रंगयोजना अधिक गडद आणि उठावदार होत गेली. लांब आणि भराभर मारलेल्या फटकाऱ्यांमुळे निसर्गचित्रांत जिवंतपणा आणणारी उत्फुल्लता फार सहजपणे घडून येत असावी. ती चित्र रंगवताना कॅनव्हासवर फारसं रेखाटन करत नसे. रंग आणि प्रकाशाचा ताळमेळ उतरवत जाणं असाच प्रकार होता. तिने सुरुवात जलरंगांनी केली होती. हळूहळू तंत्रावर हात बसल्यावर जलरंग, तैलरंग आणि पेस्टल्स या तिघांचा योग्य असा वापर तिने केला.

तिचं पहिलंच प्रदर्शन प्रतिष्ठित सलों दि पॅरीसमध्ये भरलं होतं. कला-इतिहासतज्ज्ञ व्ही. बूरे उबेरटॉट यांच्या शब्दांत तिचं वर्णन : उंच, शेलाटी. अतिशय बुद्धिमान असूनही वागण्यात खानदानी शालिनता आणि संयम. गव्हाळ कांती. मोठय़ा डोळ्यांची. मनाचा ठाव न लागू देणाऱ्या बुदलेअरच्या एखाद्या नायिकेसारखी. विनम्र वृत्तीची, पण पितृसत्ताक समाजात स्वत:चं व्यक्तिस्वातंत्र्य राखून असलेली. चित्रांच्या एका लिलावात तिचं नाव पुकारण्यात आलं तेव्हा प्रेक्षकांतून एकानं तिला मोठय़ाने शिवी हासडली. ती ऐकताच ज्येष्ठ चित्रकार पिसारो इतके भडकले की त्यांनी त्याला मुस्काटात मारून तिथून बाहेर काढलं होतं. योगायोग असा की, त्या लिलावात सगळ्यात जास्त- म्हणजे ४८० फ्रँक्सना विकलं गेलेलं चित्र मॉरिझोचं ‘दि इंटेरीअर्स’ हे होतं.. ज्याला रेन्वाच्या चित्रापेक्षा जास्त किंमत आली होती.

तिची सर्वतोपरी काळजी घेणाऱ्या युजेनच्या १८९२ मधल्या मृत्यूनंतर तिची तब्येत ढासळत गेली. तीनच वर्षांनी तिनेही जगाचा निरोप घेतला. निर्विवादपणे सुंदर ८५० हून अधिक चित्रं मागे ठेवूनही डेथ सर्टिफिकेटमध्ये तिचा व्यवसाय ‘ल्लल्ली’ असा नोंदला होता!! तिच्या मृत्यूनंतर तिच्या समव्यवसायी मित्रमंडळींनी- मॉने, देगा आणि रेन्वा वगैरेंनी मिळून- तिच्या चित्रांचं एक प्रदर्शन पॅरिसच्या नामी आर्ट गॅलरीत आयोजित केलं होतं. मॉरिझोमुळे उशिरा का होईना, एक मोठ्ठा झालेला बदल म्हणजे १८९७ पासून ‘एकोले दी बूझां’ या पॅरिसच्या कलाशिक्षण देणाऱ्या बडय़ा संस्थेत स्त्रियांना प्रवेश मिळू लागला, हा कलेच्या इतिहासातला मैलाचा दगड.. आपल्याकडच्या सावित्रीबाई फुलेंची आठवण करून देणारा!!

arundhati.deosthale@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Museum in paris monet museum muse marmottan monet zws

Next Story
पडसाद : ही प्रगती नसून अधोगती!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी