मदनमोहन साहेबांच्या ‘हकीकत’ या चित्रपटाकरिता केलेल्या ‘कर चले हम फिदा जाने तन साथीयों..’ या गाण्यातला व्हायोलिन समूहाचा प्रयोग आणि याच चित्रपटाकरिता रफी साहेबांनी अद्भुत गायलेल्या ‘मै ये सोच कर उसके घर से चला था’ या गाण्यात (ज्येष्ठ संगीतकार आणि वाद्यवृंद संकल्पक) वादक प्यारेलालजींचं ऑल टाइम बेस्ट एकल व्हायोलिन वादन आणि त्यांच्या साथीला सहा व्हायोलिन वादकांची पियानोसह संवादीची पूरक साथ असा अत्यंत उच्च कोटीतला अनुभव दिलाय तो मदनमोहन साहेबांच्या चालीला अप्रतिम वाद्यमेळाच्या कोंदणात बसवणाऱ्या मास्टरजी सोनिकसाहेब या सर्वश्रेष्ठ वाद्यवृंद संकल्पकानंच! (संपूर्णत: अंध असलेले मास्टरजी स्वत: उत्कृष्ट हार्मोनियम वादक होते, पण गाण्यातलं भावतत्त्व, सौंदर्यतत्त्व मांडताना त्यांनी अभिजाततेबरोबरच कल्पनेपलीकडील अद्भुत वाद्यवृंद रचनांनी चित्रपटगीतांना अर्थपूर्ण असे नवे आयाम दिले..) ओ. पी. नय्यर साहेबांनी ‘मेरे सनम’ या चित्रपटातल्या ‘हमने तो दिलको आपके कदमो में रख दिया’ या रफी साहेबांनी आशाबाईंच्या साथीत अप्रतिम गायलेल्या गाण्यात जेरी फर्नाडिस (ऑस्कर परेरा आणि अलेक्झांडर हेही त्यांच्याच आगे-मागे असलेले महान एकल व्हायोलिन वादक) या ज्येष्ठ व्हायोलिन वादकाकडून इतकं सुंदर वाजवून घेतलं की, या गाण्याच्या स्मृतीबरोबर पहिल्यांदा त्यातलं जेरीजीचं जीवघेणं वादनच आठवतं. संगीतखंडाबरोबरच गाण्याच्या पाश्र्वभागी त्यांनी वाजवलेल्या संवादी स्वरातली केवळ अप्रतिम! ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटातल्या ‘जाने कहाँ गये वो दिन’ या गाण्यातला टेरेन्सजींनी व्हायोलिनवर सद्गदित स्वरात वाजवलेला सा रेग रेसा ग—- रेसा रेप रे हा अतिशय गाजलेला पीस चित्रपटसृष्टीतल्या बहुतेक सर्व संगीतकारांचे वाद्यवृंद संयोजक सबेस्टीयन यांनी फार सुंदर काढला होता.. असाच सुंदर एकल व्हायोलिनचा प्रयोग ज्येष्ठ संगीतकार आणि वाद्यवृंद संकल्पक प्यारेलालजींनी ‘शोर’ या चित्रपटातल्या ‘एक प्यार का नगमा है’ या गाण्याच्या आरंभीच्या ‘पं ग पं ग पं म रे निं–’ या शुद्ध सुरातल्या हृदय हेलावणाऱ्या सुरावटीसह संपूर्ण गाण्यात केलाय.. संगीतकार उत्तमसिंग, वाद्यवृंद संयोजक अमर हळदीपूर व सुरेश लालवाणी हे संगीतसृष्टीतले निष्णात एकल व्हायोलिन वादक तर केवळ गायनाला साथ करणारे आदरणीय सप्रे, नार्वेकर, गजानन कर्नाड आणि संगीतकार प्रभाकर जोग हे सिनेसृष्टीतले बिनीचे साँग व्हायोलिनिस्ट.. यापैकी नार्वेकर साहेब आणि कर्नाड साहेब हे भारतीय शैलीचे संगीतखंड व्हायोलिनवर वाजविण्यात अतिशय पारंगत. त्यातही ‘सैंया झूठो का बडा सरदार निकला’ या संगीतकार वसंत देसाईच्या गाण्यामधला कोका किंवा किंगरी या लोकवाद्याचा रंग कर्नाडांनी आपल्या जादुई व्हायोलिनमधून जबरदस्त पेश केला. पाश्चिमात्य लोकसंगीतात प्रामुख्यानं लोकप्रिय असणारी मेंडोलीन, मेंडोला आणि स्पॅनिश गिटार ही आघातातून वाजणारी तंतुवाद्ये.. या सगळ्याचा अत्यंत यशस्वी प्रयोग केला तो सी. रामचंद्र या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या महान संगीतकारानं. मेंडोलीन या छोटेखानी पण उंच स्वरात वाजणाऱ्या वाद्यानं आमच्या हिंदी चित्रसंगीतात स्वत:चं असं स्थान निर्माण केलं आणि राज कपूरच्या ‘आवारा’ या बोलपटातल्या ‘घर आया मेरा परदेसी’ या स्वप्नगीतातली मेंडोलीनवर डेव्हिडजींनी वाजलेली स्वरावली गाण्याइतकीच लोकप्रिय झाली आणि मग अकॉर्डियनबरोबर मेंडोलीनसुद्धा गाण्यातला आवश्यक घटक होऊन बसले. परशुराम हळदीपूर हेही एक तसेच निष्णात मेंडोलीनवादक. स्नेहल भाटकरांनी संगीत दिलेल्या ‘छबेली’ या चित्रपटातल्या ‘लहेरों पे लहर’ या गाण्यातलं परशुरामजीचं मेंडोलीन कोण विसरू शकेल? परशुरामजी आणि डेव्हिड असे दोन मेंडोलीनवादक समोरासमोर बसून इतकं एकजीव वाजवत की, आपल्याला एकच वाद्य वाजतंय असं वाटत राही.. डेव्हिडच्या निधनानंतर परशुरामजींनी वाद्य खाली ठेवलं ते कायमचंच. ‘..त्याच्याशिवाय वाजवण्याची मी कल्पनाच करू शकत नाही,’ अशी त्यांची भावना होती. पुढे त्यांचा दुसरा मुलगा अरविंद हळदीपूर मेंडोलीन वाजवता वाजवता स्पॅनिश गिटार आणि पुढे इलेक्ट्रिक लीड आणि बेस गिटारसुद्धा वाजवू लागला. स्पॅनिश गिटार सुरुवातीला गाण्यातल्या तालवाद्यवृंदाबरोबर सुरेल आघातातून तालचक्रात सहभागी व्हायला लागली. मग सी. रामचंद्र आणि सचिनदा बर्मनांनी आपल्या गाण्यातून स्पॅनिश गिटारच्या एकल वादनाचा प्रयोग करायला सुरुवात केली. ‘नवरंग’ चित्रपटातल्या ‘तू छुपी है कहां’ या गाण्यातल्या ‘खुद तडपूंगी और तडपाते रहूंगी’ असं प्रतिभेनं कवीला बजावल्यानंतर तालवाद्ये आणि घंटानादांच्या कल्लोळाच्या उत्कर्ष बिंदूनंतर येणाऱ्या नीरवात ‘ये कौन चाँद चमका..’ या ओळीतून त्याला काहीसे सुचू लागते, हे सांगताना चितळकर अण्णांनी फक्त स्पॅनिश गिटारवर छेडलेल्या सुरेल आणि नाजूक तालावर त्या ओळी मन्ना डेसाहेबांच्या मृदू स्वरातून मांडताना जी काय नजाकत आणलीय त्याला तोड नाही. स्पॅनिशचा इतका अर्थपूर्ण तालप्रयोग पुढे राहुलदेव बर्मनजींनी अनेकदा केला. त्यातलं अप्रतिम उदाहरण म्हणजे ‘ज्वेल थीफ’ चित्रपटातलं ‘रात अकेली है’ (होय, चित्रपटाचं संगीत सचिनदाचं असलं तरी वाद्यवंृद संयोजन पंचमदांचं आहे.) धृपदातल्या प्रत्येक ओळीनंतर येणारा अवकाश स्पॅनिश गिटारच्या मृदू आणि कुजबुजत्या सुरेल आघातातून भरत जणू निकट असणाऱ्या प्रिय व्यक्तीच्या श्वासांची चाहूल देत राहतो आणि उत्तेजना वाढवत ‘जो भी चाहे कहिये..’ म्हणताना चरम सीमा गाठत पुन्हा मूळ कुजबुजत्या सुरेल आघातावर स्थिरावतो. हे फार अद्भुत आणि पूर्वी कधी न घडलेलं! याखेरीज पंचमदांनी स्पॅनिश गिटारचा अनेक वेळा एकलवादनाकरिता प्रयोग केला. ‘किनारा’ या चित्रपटातल्या ‘एकही ख्वाब कई बार देखा है मैने’ या भूपिंदरजींनी गायलेल्या अप्रतिम गाण्यात पंचमदांनी भूपिंदरजींच्याच स्पॅनिश गिटार वादनाचा केलेला प्रतिभासंपन्न प्रयोग केवळ लाजवाब! लयीशी क्रीडा करत (सरोद सोलोसारखं) वाजलेलं स्पॅनिश गिटार यापूर्वी कधी असं वाजलं नव्हतं. आणि गुलजार साहेबांच्या मुक्त छंदातल्या कवितेला तालाच्या चौकटीत न जखडता पण समांतर लयीत मोठय़ा चैनीत मांडणारे पंचमदा म्हणूनच- तो राजहंस एक!
या स्पॅनिश गिटारला सहाऐवजी १२ तारा वापरून बनवलेल्या सुधारित ट्वेल्व्ह स्ट्रिंग गिटारनं ध्वनीचं अधिक नाजूक आणि विस्तृत परिमाण दिलं. ज्याचा प्रयोग १९७३ पासून ‘चुरा लिया है तुमने जो दिल को’ (‘यादों की बारात’- संगीतकार राहुलदेव बर्मन) ‘तुम जो मिल गये हो’ (‘हसते जख्म’ – संगीतकार मदनमोहन) ‘मेरा जीवन कोरा कागज’ (‘कोरा कागज’- संगीतकार कल्याणजी आनंदजी) होत राहिला..
हवायन गिटार ही आपल्याकडे आधी आली, ती वाजवणारे निष्णात वादक एस. हजारासिंग, चरणजीतसिंग आणि सुनील गांगुली हे बिनीचे वादक होते आणि मग बहुतेक सर्व संगीतकार तिचा वापर करू लागले. स्पॅनिश गिटारच्या फ्रेट बोर्डवर एका हातातल्या बोटांवर चढवलेल्या नख्यांच्या मदतीने गिटारच्या तारा छेडताना दुसऱ्या हातातल्या रॉडच्या साहाय्यानं फ्रेटस्वरल्या वेगवेगळ्या स्थानांवर स्थिरावून घासत स्वर वाजवताना मिंडयुक्त स्वरावली सारंगीसारखा प्रवाही परिणाम देई. ‘तेरा तीर ओ बे पीर’ (‘शरारत’ – शंकर-जयकिशन), ‘मौसम हे आशिकाना’ (‘पाकिजा’- गुलाम मोहम्मद), ‘तुमको पिया दिल दिया’ (जी. एस. कोहली- शिकारी) इत्यादी.
इलेक्ट्रिक गिटार (वादक- रमेश अय्यर, सुनील गांगुली, भूपिंदर) च्या आगमनाबरोबर बेस गिटारही (वादक- चरणजीतसिंग, गगन चव्हाण, टोनी वाझ) आली आणि डबल बासचं ऱ्हिदम सेक्शनमधलं अस्तित्व जवळजवळ संपलंच. इलेक्ट्रिक गिटार प्रवेशलं मात्र, प्रथम शंकर जयकिशन तर पाठोपाठ आर. डी. बर्मन यांनी मग इलेक्ट्रिक गिटारचा त्यांच्या गाण्यात भरपूर वापर करायला सुरुवात केली. ‘तिसरी मंझील’ पासून पंचमदांनी ब्रास (म्हणजे पितळ धातूपासून बनवलेली फुन्कवाद्ये) सेक्शन आणि इलेक्ट्रिक गिटारसह की-बोर्डचा क्रांतिकारी प्रयोग करत झिंग आणणारे उसळत्या रक्ताचं संगीत निर्माण करून अवघ्या तरुणाईला वेड लावलं आणि ‘हरे राम हरे कृष्ण’ या चित्रपटातल्या ‘दम मारो दम’ या गाण्यानं कळस चढवला. त्यातला त्यांनी केलेला बेस गिटार, इलेक्ट्रिक गिटार आणि की-बोर्डचा अद्भुत प्रयोग हा मादक द्रव्याच्या नशा सांगीतिक परिभाषेतून रसिकांच्या प्रत्ययास आणताना नव्या इलेक्ट्रॉनिक युगाची मुहूर्तमेढच ठरला..
(पूर्वार्ध)