महेश एलकुंचवार

कलाव्यवहार व मराठी अभिरुची हा एक वेगळाच विषय. खरे तर सामान्य माणूस व कलाव्यवहार केवळ एकमेकांपासून दूरच नाही, तर त्यांना एकमेकांशी काही देणेघेणे नाही असेच चित्र दिसते. साहित्याच्या बाबतीत थोडा अपवाद. स्वातंत्र्यपूर्व काळात विविध क्षेत्रांत अनेक उत्तुंग माणसे झालेली दिसतात. मात्र स्वातंत्र्योत्तर भारतात व महाराष्ट्रात असे काय व कशामुळे झाले, की न आमचा समाज अभिरुचीसंपन्न झाला, ना आम्ही उत्तुंग प्रतिभेची माणसे निर्माण झालेली पाहिली. महानतेची आम्ही वाटच पाहत आहोत, हे खरेच आहे.

Till 1st June 2024 Mangal Gochar in Meen rashi Mahavisfot Angarak Yog on Hanuman Jayanti
१ जूनपर्यंत मीन राशीत ‘महाविस्फोट अंगारक’ योग; ‘या’ राशींचा भाग्योदय; प्रचंड धनासह प्रत्येक कामात मिळेल गती
peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
Personality Traits
तुमची जन्मतारीख ३, १२, २१ किंवा ३० आहे का? जाणून घ्या, कसा असतो अशा लोकांचा स्वभाव…
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान

भारतीय स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनिमित्ताने ‘लोकसत्ता’ने महिनाभर प्रसिद्ध केलेल्या लेखमालेमधील विविध कलांसंबंधीचे चारही लेख वाचले. कादंबरी, नाटक, चित्रपट आणि चित्रकला यांचा धावता आढावा घेताना आपापली मते किंवा पूर्वग्रह बाजूला ठेवलेला आढावा असे त्यांचे स्वरूप होते. फक्त यात संगीतावर कोणी कसे लिहिले नाही याचे आश्चर्य वाटले. महाराष्ट्र ही संगीताची देवभूमी असल्याचा लौकिक इतर प्रांतांमध्ये आहे व इथे संगीताची अतिशय प्रभावी व अक्षुण्ण परंपरा आपल्याला जशी दिसते तशी इतर क्षेत्रांमध्ये दिसत नाही.

नाटक हे महाराष्ट्राचे वेड आहे असे म्हणण्याची पद्धत आहे. विचार करतो तेव्हा असे वाटते की हे बरोबर नाही. महाराष्ट्रात अगदी आतापर्यंत नाटक पाहणारे लोक आहेत ते सधन मध्यमवर्गीय, उच्चवर्णीयच आहेत. यांचे प्रमाण फार तर तीन-चार टक्के असेल. हे तीन-चार टक्के सर्व महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात असे का मानायचे? हेच प्रमाण आपण इतर कलांनाही लावले तरी उत्तर जवळजवळ तेच येईल. कलाव्यवहार, विशेषत: गंभीर कलाव्यवहार महाराष्ट्रातल्या सर्व लोकांच्या जीवनावर संस्कार करतो, प्रभाव टाकतो असे वाटत नाही. खरे तर सर्वसामान्य माणूस व कलाव्यवहार केवळ एकमेकांपासून दूरच नाहीत, तर त्यांना एकमेकांशी काही देणेघेणे नाही असेच चित्र दिसते.

हेही वाचा >>> श्रेष्ठतम कादंबरीची प्रतीक्षाच..

साहित्याबाबत मात्र थोडाफार फरक पडला आहे असे वाटते. लहान गावागावांमधून शिक्षण पोहोचले व आतापर्यंत उपाशी ठेवला गेलेला तिथला नवशिक्षित अधाशाप्रमाणे वाचू लागला व लिहूही लागला. चांगले लिहू लागला. ही एक प्रकारची क्रांतीच म्हणावी लागेल. नीट विचार केला तर आज उत्तम लिहिणारे सगळे लेखक हे लहान गावात शिक्षण घेतलेले व अजूनही तिथेच राहिलेले असे आहेत. साहित्यनिर्मितीचे केंद्र पुण्या-मुंबईहून हलले आहे व ते अनेक लहान गावांत विखुरले गेले आहे. ‘कोसला’चा नायक व लेखक या दोघांचीही पार्श्वभूमी एकच- लहान गाव हीच आहे. ‘कोसला’ ही त्यासाठीही महत्त्वाची ठरते. आधुनिक मराठी साहित्यात पहिले परिवर्तन मर्ढेकरांनी आणले व त्याचे स्वरूप मूलत: नागर राहिले. गंगाधर गाडगीळ, विंदा करंदीकर हे नागर लेखक त्याचे प्रतिनिधी. दुसरे परिवर्तन आणले नेमाडय़ांनी. ते इतके मूलगामी, की ‘कोसला’पूर्व मराठी कादंबरी व ‘कोसला’नंतरची असे स्पष्ट विभाजन आपल्याला करता येते. त्यात काय, किती महत्त्वाचे, त्यांचे वाङ्मयीन मूल्य काय, हा विचार तात्पुरता बाजूला ठेवला की लक्षात येते की ‘कोसला’, ‘बलुतं’, ‘अक्करमाशा’ हा ऐवज आपल्या हाती लागला तो या नवशिक्षणामुळे.

हेही वाचा >>> भारतीयत्वाचा तरल शोध..

मराठी साहित्यात आणखी एक परिवर्तन- भूकंप झाल्यासारखे आणले ते नामदेव ढसाळांनी. त्यांनी  आत्मतृप्त, बेसावध व्यवस्थेखाली सुरुंगच पेरले व त्या पडझडीतून अनेक नवीन दलित कवी व लेखक जन्माला आले. हीसुद्धा मराठी साहित्याला सापडलेली खाणच आहे. ज्यांना आवाज नव्हता, ज्यांचे अस्तित्वही आमच्या गावी नव्हते, ती माणसे एकमुखाने उंच आवाजात, आत्मविश्वासाने बोलू लागली ही घटना सामान्य नाही. मराठीचा पैस त्याने किती विस्तारला, क्षितीज किती विस्तारले, मरगळलेल्या, उबवलेल्या मराठी साहित्याला त्यामुळे नवचैतन्य कसे प्राप्त झाले, हे समजले की या घटनांची भव्यता व मोठेपण कळून येते. शांताबाई (गोखले) म्हणतात त्याप्रमाणे अलौकिक, कालजयी असे मराठीत काही झाले नाही, हे खरे. पण अलौकिक लेखक झाला नसला तरी मराठी साहित्यात झंझावात आणणाऱ्या या दोन घटना मात्र अलौकिकच आहेत. तसाच विचार केला तर या सर्व फक्त गेल्या पन्नास-साठ वर्षांतल्या घटना. अशा घटना घडून त्याला अलौकिकतेचे फळ यायला काही काळ जावा लागतो. त्यामुळे हे कधीतरी घडेल व याच लेखकांहातून घडेल असे मला वाटते. सदानंद देशमुखांची ‘तहान’ व ‘बारोमास’ वाचल्यानंतर वाटले होते की हा लेखक स्वत:ला वेळ देईल तर आज-उद्या ‘Grapes of Wrath’ सारखी कादंबरी लिहून जाईलही. चाळीशी-पन्नाशीतले खूप चांगले लेखक याच वर्गातले आहेत. पण मला स्वत:ला वाटते (व ते चूकही असेल की), ही मंडळी अति वेगाने लिहितात. एकामागोमाग त्यांच्या कथा-कादंबऱ्या-कविता येत असतात. जरा उसंत घेऊन, दम राखून, चार-पाच वर्षे अज्ञातवासात राहून खूप गंभीरपणाने, अभ्यासपूर्वक त्यांनी लिहिले तर ते कमी लिहितील, पण मोलाचे व कालजयी वाटावे असे लिहितील. तेवढा अनुभव व गुणवत्ता त्यांच्याजवळ नक्कीच आहे. तिची घाईघाईने उधळमाधळ करण्याऐवजी ते काही काळ स्वत:त कोंडून ठेवले तर त्याचा जो स्फोट होईल तो प्रचंड असेल. या लेखनाला तसा वाचकवर्गही आहे व तो बहुश: जिल्हा व तालुकापातळीवरील तरुण मंडळी हा आहे. त्यांचीही अभिरुची आता आता घडू लागली आहे. आपल्या समाजव्यवस्थेने ९५ टक्के लोकांना ही दारेच उघडली नव्हती. हे सगळे घडले ते गेल्या पन्नास-साठ वर्षांत. हा अतिशय अल्प काळ. एखाद्या समाजाची अभिरुची संपन्न व्हायला शेकडो वर्षे त्या समाजाने साधना केलेली असावी लागते.

हेही वाचा >>> गंगाजमनी तहज़ीब

शिवाय कलाव्यवहार व मराठी अभिरुची हा एक वेगळाच विषय. तिकडे नंतर येऊ, किंवा आताच चित्रकलेच्या संदर्भात ते पाहता येईल. महाराष्ट्रात अभिजात चित्रकार झाले नाहीत असे नाही. पळशीकर, हुसैन, अकबर पदमसीपासून ते अगदी कोलते, पटवर्धन व अतुल दोडियापर्यंत. त्यांच्याहून नवीन नावे अभिजित ताम्हणे यांनी दिलीच आहेत. (कमालीचा अभ्यासपूर्ण लेख!) आश्चर्य अशाचे करावयाचे, की यांच्या कोणाच्याच कलेच्या संपर्कात मराठी माणूस कधी आला की नाही! अगदी भल्या भल्या सुशिक्षितांनाही ही नावे पण माहीत नसावीत, हा काय प्रकार? हा काही त्या कलावंतांचा दोष नाही. दोष आपला आहे. आपल्या शिक्षण पद्धतीत, आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत. आपले अग्रक्रम आपण कसे व का ठरवतो, त्यात आहे. ‘आम्ही बाबा साधे, स्पार्टन लोक आहोत!’ असा पोकळ अभिमान ठेवता ठेवता आम्ही अभिजात होते ते तेव्हाही दूर लोटले की काय? वाचावे, ऐकावे, पाहावे ही कोणाला गरजच वाटत नाही. मला शेकडय़ांनी कुटुंबे माहीत आहेत (उच्चशिक्षित, सधन, उच्चवर्णीय), की ज्यांच्याकडे दोन पुस्तके नसतात. एकही चित्रच काय, त्याचा प्रिंटही नसतो. अभिजात संगीत नसते. (एकेकाळी ‘गीत रामायण’असे व तो आमचा सांस्कृतिक मानबिंदू मानला जाई. आता तेही ऐकू येत नाही. आता फार सुंदर आवाज असलेली मुले-मुली गिटार घेऊन गाणी विव्हळत असतात. वाटते, की अरे, केवढा सुंदर आवाज.. पण शिकत का नाहीत ही गुणी मुले शास्त्रीय संगीत? असो. पुन्हा तो दुसरा विषय.)

संगीताच्या बाबतीतही तेच. जुनी गाणी ऑर्केस्ट्रामध्ये गाणाऱ्यांच्या कार्यक्रमाला तुडुंब गर्दी असते. तेच अभिजात शास्त्रीय गायन असेल तर तिथे कमी लोक असतात. तिथे लेकरू घेऊन येणारे, मोबाईलवर बोलणारे, स्वेटर विणणाऱ्या बायका असे लोकही असतात. शास्त्रीय संगीत ऐकणे हा धर्मविधी आहे हे आमच्या गावीही नाही. तो गंभीरपणे व नम्रपणे करायचा असतो याची जाणीव नाही. उशिरा येणे, मधेच उठून जाणे असला उठवळ सगळा व्यवहार. आता गाणारेही त्यामुळे (खूपदा रागरंग पाहूनच) तसेच गातात. एक बडा ख्याल, एक मध्यलयीत वीस मिनिटांचा ख्याल, कबीर-कबीर हल्ली फार मँडेटरी झाला आहे- की मग भैरवी. दीड-दोन तासात आटपली बैठक. अमीरखाँसाहेबांच्या, भीमसेनजींच्या चार-चार.. क्वचित पाच-पाच तासांच्या बैठकी आम्ही ऐकल्या आहेत. वाटले की, असे का करतात हे लोक? मी विचारलेही काहींना. त्यावर उत्तर असे की, ‘अहो, लोकांना हेच हवं असतं हल्ली.’ अरे! तुम्ही कलावंत की रंजनकार? म्हणजे मग कोलत्यांनी आणि पटवर्धनांनी गणपती आणि शारदा, पाण्यात पाय टाकून बसलेली आदिवासिनी- अशी चित्रे काढायची की काय? आणि कवींनी व लेखकांनी? उसासे टाकणारी प्रेमगीते किंवा देशाचा जयजयकार करणारी अशी कविता? कोण कोणाला अभिजाततेपासून दूर नेत आहे हे कळेनासे झाले आहे. मला वाटते, तडजोड न करता अव्यभिचारी साधना करणाऱ्या कलावंतांच्या पिढय़ाच्या पिढय़ाच फक्त समाजाच्या अभिरुचीवर चिरस्थायी प्रभाव टाकू शकतात व ती घडवू शकतात. इथे धन, प्रतिष्ठा, सन्मान या गोष्टी दुय्यमच होतात. चित्रकार गायतोंडे किंवा मोगुबाई कुर्डीकर ही दोन नावे यासंदर्भात एकदम आठवतात.

शिवाय संपूर्ण महाराष्ट्रीय समाजाची काहीएक सामूहिक अभिरुची आहे असे मला वाटत नाही. अभिरुची म्हटले की उच्चवर्णीय, मध्यमवर्गीय लोकांची अभिरुची अशी आपली व्याख्या आहे. कुशल कोष्टी परंपरेने त्याच्याकडे आलेले ज्ञान वापरून रंग, पोत यांचे वस्त्र विणतो तेव्हा त्या बिचाऱ्याला माहीतही नसते, की तो निर्माण करीत आहे ते अभिजात आहे म्हणून. पण एखादी सधन महिला ते विकत घेऊन परिधान करते व आपली अभिरुची किती चांगली आहे ते दाखवते. (एथनिक!) अरे, त्या विणकराचे श्रेय तू का घेतेस बाई!

एकतर आपला समाज जाती, धर्म, वर्ण, सांपत्तिक राहणीमान यामुळे मुळातच विखंडित होता. आता तो शतखंड झाला आहे. एका तुकडय़ाचा दुसऱ्या तुकडय़ाशी संबंध आहे तो राग-द्वेषाचाच. इथे मुळातच सगळे आपापल्या स्वतंत्र बेटांवर राहणार.. तिथे कसली आली आहे सामूहिक अभिरुची? बरे, ‘अभिरुची’ हा शब्द शाळेत मिळालेल्या चांदीच्या बिल्ल्याप्रमाणे मिरवणारा जो वर्ग आहे त्यांच्याही हे लक्षात येत नाही, की त्यांनीसुद्धा ही अभिरुची कोणीतरी त्यांच्या श्रद्धेय व्यक्तिमत्त्वाने सांगितले म्हणून उचललेली आहे. पुलंनी सांगितले तेव्हापासून सगळा महाराष्ट्र फक्त ‘कुमारजी.. कुमारजी’च करतो. कुमार अलौकिक होतेच, हे तर निर्विवादच आहे. पण गाणे म्हणजे फक्त कुमारच? मी भाईंना एकदा म्हटलेही की, हे कसे काय? तुम्ही अमीरखाँसाहेब, मोगुबाई, बडे गुलामअली यांच्याबद्दल अवाक्षराने बोलत नाही. त्यामुळे तुमचे ऐकून जे आपली अभिरुची घडवतात ती एकारलेली नाही का राहत? पण शुद्ध कोमल स्वरांमधला फरक ज्यांना कळत नाही, ती माणसे ‘आपण बुवा कुमारांशिवाय दुसरं काही ऐकत नाही!’ हे इतक्या प्रौढीने सांगतात की आपण थक्क होतो. तेच नेमाडय़ांबाबत झाले आहे. ते माझेही आवडते बुलंद लेखक. पण आपण (फक्त) नेमाडेच वाचतो असे म्हणणाऱ्या भक्तांच्या तीन तरी पिढय़ा इतक्या कडव्या झाल्या की दुसरा कोणी लेखक आवडतो असे म्हणायची कोणाची हिंमतच राहिली नाही. अभिरुची व्यापक, सर्वसमावेशक व त्याचवेळी विचक्षण असते (Catholic and eclectic). ती एकारलेली राहणे नाकारतेच. पण महाराष्ट्राने कोणाच्या तरी धाकाने, कोणाच्या तरी प्रेमाने निवड केली व आपली अभिरुची एकारलेली ठेवली. त्यांनी जी निवड केली ती चूक होती असे नाही, पण त्या निवडीच्या पलीकडे आम्ही गेलो नाही व स्वत:ला मर्यादित करून घेतले.

शंभर वर्षांपूर्वी महाराष्ट्राची अभिरुची कशी होती कोणास ठाऊक. पण चांगली असावी. तेव्हाचे स्थापत्य, घरे, वस्त्रे, रोजच्या वापरातल्या वस्तू कलात्मक असत. स्वातंत्र्य आले आणि सगळे हळूहळू बदलू लागले. आता प्लास्टिक, सिंथेटिक, दिखाऊ, सवंग असे बरेच काही आपल्या जीवनात शिरले. स्वातंत्र्योत्तर भारतात व महाराष्ट्रात असे काय व कशामुळे झाले, की न आमचा समाज अभिरुचीसंपन्न झाला, राहिला, की ना आम्ही उत्तुंग प्रतिभेची माणसे- अगदी कुठल्याही क्षेत्रात- निर्माण झालेली पाहिली. महानतेची आम्ही वाटच पाहत आहोत असे शांताबाई म्हणतात ते खरेच आहे. आणि ज्या वेगाने आपले सार्वत्रिक स्खलन होते आहे ते पाहता ती शक्यताही मला दिसत नाही.

पण स्वातंत्र्यपूर्व काळातली माणसे पाहा. जोतिबा फुले, डॉ. आंबेडकर, पंडिता रमाबाई, महर्षी कर्वे, ज्ञानकोशकार केतकर, आगरकर, टिळक, शाहू महाराज, महामहोपाध्याय काणे (यांचा धर्मशास्त्रावरचा सहा हजार पानांचा इंग्र्जी ग्रंथ पाहूनही आपल्या राज्यकर्त्यांना भोवळ येईल.)! आंबेडकरांसारखा प्रतिभावान, मेधावी पुरुष.. पण गेली का आपली जातीयता? आगरकरांचे तर अस्तित्वच आम्ही विसरलो. अजून विधवा बायकांनी कुंकू लावावे की नाही यावरून वर्तमानपत्रांत चर्चा झडतात. पंडिता रमाबाई ख्रिश्चन झाल्या एवढय़ावरून महाराष्ट्राने त्या अलौकिक स्त्रीचे नाव टाळले. आपली अभिरुचीहीन असंस्कृतीकडे एवढय़ा वेगाने का वाटचाल सुरू आहे? याला कोण जबाबदार? कोठली धार्मिक, राजकीय, सामाजिक कारणे? मला कळत नाही. पण सर्व विचार करणारी माणसे उदास व उद्विग्न आहेत. हा काळोख लवकर दूर होईलसे वाटत नाही. कारण आपण अभिरुचीहीन आहोत असे कोणालाच वाटत नाही. कोणाला वाटले, तरी ती सुधारण्यासाठी काही हालचाल करावी एवढा उत्साह कोणाजवळ नाही. अगदी शालेय शिक्षण सुरू होते तेव्हापासून- म्हणजे अगदी पहिलीपासून ते पदवीपर्यंत अभ्यासक्रम असा असावा की मुलांना चित्र, संगीत, साहित्य यांची हळूहळू ओळख व्हावी व विसाव्या वर्षांपर्यंत त्यांची अभिरुची संस्कारसंपन्न व्हावी. माधुरी पुरंदरे यांनी ‘वाचू आनंदे’सारखी अभिजात पुस्तके काढली. पण ती व तशी पुस्तके अभ्यासक्रमात ठेवावी असे आमच्या कोठल्याही सरकारला कधी वाटले नाही. असंख्य चुका (मुद्रणाच्या, ज्ञानाच्या) असलेली पाठय़पुस्तके मुलांच्या डोक्यावर आपटली जातात. आणि ‘वाचू आनंदे’सारखी पुस्तके शिकवणारा शिक्षकवर्गही तेवढाच प्रगल्भ, संपन्न व्यक्तिमत्त्वाचा लागेल. तोसुद्धा तयार करावा लागतो. पहिली ते निदान आठवीपर्यंत शिकवणारा शिक्षक हा स्वत:च अभिजात माणूस असला पाहिजे. सुरुवात मुळातून करावी लागेल. विदग्ध साहित्य व कला जाणणारा वर्ग लहानच असतो. पण जे हे जाणत नाहीत त्यांना या व्यवहाराबद्दल निदान आदर तरी वाटला पाहिजे. पण ‘आम्ही आपले सामान्य! आम्हाला नाही कळत बाबा तुमचं ते!’ हे एवढय़ा आढय़तेने आम्ही म्हणतो!

सामान्यपणाचा एवढा अहंकार कशाला?

maheshelkunchwar@gmail.com