तुम बिलकुल हम जैसे निकले..

एक सच्चा हिंदू या नात्याने आपणास एक जाहीर आवाहन करीत आहे. त्याच नात्याने तुम्ही त्यास प्रतिसाद द्याल अशी आशा आहे.

रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

भारतात आज मुस्लीम धर्म, संस्कृती, त्यातून आलेले साहित्य, कला यांबद्दल तीव्र द्वेषभाव बाळगणाऱ्यांची पैदास वाढते आहे. शतकानुशतके इथली माणसं आणि मुस्लीम बांधव एकमेकांच्या धर्माचा आदर करत, परस्परांकडून कला-संस्कृती-साहित्याची देवाणघेवाण करत गुण्यागोविंदाने नांदत आले आहेत. परंतु आज धर्माच्या आधारे राजकारणाचे धुव्रीकरण करणारे उन्मादी लोक त्यांच्यात फूट पाडू पाहताहेत. सामान्यजनांची मने कलुषित करताहेत. मानवतेच्या धर्माला काळीमा फासताहेत. भारत देश असा कधीच नव्हता. हे काय चालले आहे?

प्रति,

आदरणीय मुख्यमंत्री,

महाराष्ट्र राज्य.

एक सच्चा हिंदू या नात्याने आपणास एक जाहीर आवाहन करीत आहे. त्याच नात्याने तुम्ही त्यास प्रतिसाद द्याल अशी आशा आहे. हे हिंदुराष्ट्र आहे (किंबहुना, बनण्याच्या मार्गावर आहे!), हे आर्यसत्य कोणीच नाकारू शकणार नाही. अशा राष्ट्रातील एका महत्त्वाच्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण वारंवार जनतेला संबोधित करता, जाहीर निवेदन करता किंवा अनेकांशी पत्रव्यवहार करता. अशावेळी आपण यावनी शब्द टाळून शुद्ध मराठी भाषेचा उपयोग केला पाहिजे, या मुद्दय़ाशी आपणही सहमत व्हाल. आपल्या तीर्थरूपांच्या नावात यावनी भाषेतील शब्द वापरण्यात आला आहे. म्हणून आपण तो त्वरित काढून टाकावा. निदान दसरा, दिवाळी, शिवजयंती इ. हिंदू भावनांशी संबंधित प्रसंगी तरी आपण ही काळजी घ्यावी. त्यातून जनतेला योग्य संदेश जाऊ शकेल.

कळावे,

आपला एक हिंदू बांधव

ता. क. (नव्हे, पुनश्च) : आम्ही अशाच प्रकारे आदरणीय माजी मुख्यमंत्री व आजी विरोधी पक्षनेते, तसेच केंद्र व राज्यातील नेते यांना आवाहन करून त्यांना आपले यावनी भाषेतून आलेले आडनाव बदलण्यास सांगितले आहे.

प्रति,

महाराष्ट्रातील समस्त मिठाईवाले,

आपण मिष्टान्नाचा व्यवसाय करीत आहात याचा आम्हाला अभिमान वाटतो. मात्र, यापुढे आपणाला ‘आंबा बर्फी’ या मिष्टान्नाचा व्यापार, प्रचार-प्रसार करता येणार नाही. कारण ‘बर्फी’ येथील आद्य संस्कृतीत रुजलेला खाद्यप्रकार नसून यावनी प्रदेशातून भारतात आलेला आहे. त्यामुळे त्याचा प्रसार हिंदुत्वाला घातक आहे असे आम्ही ठरविले आहे. (आंबादेखील ‘आपला’ नाही असेही काही तज्ज्ञांचे मत आहे. पण आम्हीही तारतम्य बाळगतो. कसे?) तरी आपण येत्या हिंदू सणापासून या यावनी पदार्थाची विक्री थांबवावी, नाहीतर तमाम (नव्हे, समस्त) हिंदू बांधवांना आपल्या सर्व उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन आम्ही करू याची आपण नोंद घ्यावी. आपल्या नावातील ‘मिठाई’ हा परकीय शब्दही आपण काढून टाकावा असा इशाराही यासोबत  देत आहोत.  

आपल्या उत्पादनांची ग्राहक,

एक हिंदुहितेच्छू भगिनी

पश्चात लेखन : ‘आम्रमधुवटिका’ नावाने विक्री केल्यास चालेल का, याची चर्चा करण्यासाठी कृपया वाडय़ावर यावे.      

हीर धर्माज्ञा

भरतखंडातील सर्व जनता, लेखक, प्रकाशक, मुद्रक, उत्पादक, व्यापारी, सरकारे व अन्य लोकांस कळविले जात आहे की-

१) खालील यावनी शब्दांचा वापर करणे आपल्या धर्माविरुद्ध असल्यामुळे त्यांच्यावर त्वरित बंदी घालण्यात येत आहे. आपल्या लिहिण्या-बोलण्यात त्यांचा उपयोग करू नये. तसेच त्यांचा समावेश असलेल्या सर्व पुस्तकांवर बहिष्कार टाकावा. यापुढे       त्यांचा वापर करून कोणी कथा, कविता, लेख, पुस्तके लिहिली तर त्यांची त्वरित होळी करण्यात येईल. (त्यामुळे हिंदू बांधवांना हा हिंदू सण वर्षभर साजरा करता येऊ शकेल.)

– वकील, तारीख, कैफियत, दाखल, गुन्हा, गुन्हेगार, हकीगत, कारभार, खुलासा

– नफा, वजा, तराजू, बाजार, सावकार, खाता, दुकान, कारखाना

– रस्ता, शहर, तालुका, जिल्हा

– पेशवा, सरकार, फौज, खानेसुमारी, गरीब, अर्ज, नक्कल, हवालदार, कारकून

– चेहरा, थाटमाट, मजा, शाबास, खबरदार, आवाज, तमाशा, हुशार, मस्ती

२) खालील वस्तू यावनी परंपरेतून आलेल्या असल्यामुळे त्यांचे उत्पादन, विक्री, वापर यांवर बंदी घालण्यात येत आहे :

– गादी, मच्छरदाणी, कागद, लिफाफा, शाई, वही

– सदरा, विजार, कुडता, पायजमा, मोजा

खालील वस्तूही यावनी परंपरेतून आल्या असल्या तरी त्या आता आपल्या जगण्याचा भाग झाल्या असल्याने त्यांना पर्याय उपलब्ध होईपर्यंत त्यांचा वापर चालू ठेवावा; पण शक्यतो कमी वापर करावा.

– समई, सनई, अत्तर, पानदान, अगरबत्ती

– बदाम, पिस्ता, किसमिस, जिलबी, समोसा  

(महत्त्वाची सूचना- शब्द, वस्तू यांची ही सूची केवळ नमुनादाखल असून तिच्यात वेळोवेळी भर घातली जाईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.)

०    

हे सर्व ‘काहीच्या काही’ आहे, अतिशयोक्ती, विपर्यास वगैरे आहे असे अनेकांना वाटू शकते. आम्हालाही आतापर्यंत असेच वाटत होते. ‘टिकली’एवढी अक्कल असणाऱ्या माणसांच्या उक्ती-कृतीची चर्चा करून त्यांचे महत्त्व आपण का वाढवावे असा विचार आम्ही आतापर्यंत करीत होतो. परंतु आता रोज नव्याने घडणाऱ्या घटना, कोणीही उठून केलेली फतवेनुमा आवाहने व त्यांना बिनडोक पाठिंबा देणारा किंवा गप्पगार राहणारा सुशिक्षितवर्ग यामुळे आम्हाला आम्ही आजवर नाकारीत असलेल्या एका सत्याचा साक्षात्कार झाला आहे..  

आपला सर्व समाज भयंकराच्या दारात उभा नसून त्याने त्यातून प्रवेश करून ऱ्हास व सर्वनाश यांच्या दिशेने बरीच वाटचालही केली आहे.

कोणी काय खावे, ल्यावे, लिहावे, बोलावे, वाचावे यावर भलतीच माणसे उठून बंधने आणत आहेत आणि सरकार नावाची यंत्रणा निमूट आहे किंवा त्यांना सामील आहे. भगतसिंगांचे साहित्य घरात सापडले या कारणावरून कोणाला दहशतवादी ठरवून अटक केली जाते. ‘गोमूत्राने करोना बरा होतो’ असे सांगणे अवैज्ञानिक आहे असे सामाजिक माध्यमावर लिहिणाऱ्याला तुरुंगात डांबण्यात येते. हजारो वर्षे जो धर्म अनेक परकीय आक्रमणांना तोंड देत टिकून राहिला, तो अचानक एकदम धोक्यात येतो व त्याच्या रक्षणासाठी आपण आक्रमक व्हायला हवे असे हाकारे दिले जातात. व्यंग, उपरोध, उपहास ही समाज निर्विष करण्याची साधने आज निष्प्रभ झाली आहेत. कारण वास्तव व विपर्यास, सुसंगती आणि विसंगती यांच्यातील सीमारेषा पुसट झाली आहे. आज आर. के. लक्ष्मण असते तर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली असती. अशी निवृत्ती न घेता लिहीत राहणाऱ्या लेखक-कलावंतांचे जगणे कठीण झाले आहे. कोणाच्या भावना कशाने दुखावतील याचा कोणालाच अदमास येत नाही.  पु. ल., तेंडुलकर, ढसाळ जर आज आपल्यामध्ये असते तर त्यांना उन्मादी टोळ्यांनी जगणे नकोसे केले असते. या नवहिंदूंना शक्य असते तर त्यांनी ‘अल्ला देवे अल्ला दिलावे। अल्ला दारू अल्ला खिलावे। अल्ला बिगर नहीं कोय। अल्ला करे सोहि होय।’ असे म्हणण्यास तुकारामांना आणि ‘ब्राह्मण म्हणे अहोजी स्वामी। वस्तुता एक आम्ही तुम्हीं। विवाद वाढला न्याति धर्मी। जातां परब्रह्मीं असेना।।’ असे मुसलमानांना (तुरुक) उद्देशून लिहिण्यास एकनाथांना मनाई केली असती. 

हे असेच चालत राहिले तर भविष्यात गणगौळणीच्या माध्यमातून श्रीकृष्णाचा अपमान करतात म्हणून तमाशावर बंदी येईल. गजललेखन व सादरीकरण हा गुन्हा मानला जाईल. ‘हिंदू’ कार्यक्रमात मुस्लीम गीतकार, संगीतकार, गायक यांच्या रचनांना (‘अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम’ इ.) मज्जाव केला  जाईल.

भीषण भविष्य

प्रश्न केवळ लेखक-कलाकारांचा नाही. या दिवाळीला आपण ‘आपल्याच’ लोकांकडून खरेदी करावी व अन्यधर्मीय विक्रेत्यांवर बहिष्कार टाकावा असे आवाहन यावेळी सामाजिक माध्यमांतून केले गेले. काही मंडळी तर हा अजेंडा पूर्वीपासून राबवीत आहेत. त्यांची भीड चेपली तर ‘म्लेंच्छाकडची पावबिस्किटे खाऊ नका’वर न थांबता उत्पादक ते विक्रेता ‘आपलीच’ माणसे असणाऱ्या साखळीकडूनच सारी उत्पादने घ्या असा ‘प्रेमाचा आग्रह’ केला जाऊ लागेल. पानिपतचे युद्ध मराठे का हरले याची कारणमीमांसा करणाऱ्या शिक्षकाला ‘मराठे युद्ध हरलेच नव्हते, तू हिंदूविरोधी इतिहास सांगतोस,’ असे म्हणून तुडवले जाईल.

धार्मिक उन्मादाच्या वाघावर स्वार झाल्यानंतर त्याच्यावरून उतरता येत नाही व तो तुम्हाला सुखाने स्वारही होऊ देत नाही. त्याची वाढती भूक शमविण्यासाठी त्याला सतत भक्ष्य पुरवावे लागते. ‘आपला धर्म संकटात आहे’ अशी लोकांची खात्री पटली, किंवा ते घाबरून गप्प बसले की धार्मिक उन्मादाची, अधिक जहाल वागण्या-बोलण्याची  स्पर्धा लागते. जो अधिक जहाल बोलतो, तोच नेता बनतो आणि पुढे पुढे त्याच्याही हातात नियंत्रण राहत नाही. सर्वनाशाकडे वाटचाल सुरू होते. काल खलिस्तानच्या रूपाने हे घडून गेले. आज पाकिस्तान व बांगलादेशात हे पुन्हा घडत आहे. तेथील हिंदूंसोबत निधर्मी लोक, मुसलमानांमधील ‘बाहेरचे’ लोक टार्गेट केले जात आहेत. आपल्या देशात तर आधीच जात, पोटजात, प्रांत, भाषा, खानपान, भूमिपुत्र-उपरे अशा अगणिक विभाजनरेषा अस्तित्वात आहेत. येथे धार्मिक आधारावर सुरू झालेला संघर्ष कधी जातीय किंवा अन्य वळण घेईल, कळणारही नाही.  

पाकिस्तान, बांगलादेश येथील शहाणी माणसे या कट्टरतेशी लढताहेत. बांगलादेशात दुर्गापूजेच्या मांडवावर हल्ला झाला तेव्हा तेथील सरकार, माध्यमे, दूरदेशी खेळत असलेला क्रिकेट टीमचा  कप्तान त्याविरोधात उभे राहिले. आपल्याकडे मात्र अशा घटना घडल्यास सर्वत्र स्मशानशांतता नांदत असते.            

मोकळाढाकळा हिंदू धर्म संकुचित, कट्टरपंथी होणार नाही असे आपण गृहीत धरले ही आपली चूक झाली. तालिबान व आयसिस हे आपले आदर्श होऊ नयेत, हे भान आपल्यापूर्वी आपल्या शेजाऱ्यांना आले. म्हणूनच पाकिस्तानी कवयित्री फहमिदा रियाझ म्हणत.. 

‘बहुत मलाल है हमको,

लेकिन हा हा हा हा हो हो ही ही,

कल दुख से सोचा करती थी,

सोच के बहुत हँसी आज आयी

तुम बिल्कुल हम जैसे निकले,

हम दो कौम नहीं थे भाई;

मश्क करो तुम, आ जाएगा,

उल्टे पांवों चलते जाना,

हम तो हैं पहले से वहां पर,

तुम भी समय निकालते रहना,

अब जिस नरक में जाओ,

वहां से चिट्ठीविट्ठी डालते रहना!’ आता ही वाट चालायची की उदारमतवादी हिंदू धर्म व सर्वधर्मसमभावाची, हे आपण सर्वानी ठरवायचे आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Muslim religion culture in india muslim literature art zws

Next Story
भ्रष्ट व्यवस्था बदलणे गरजेचे!
ताज्या बातम्या