‘‘गेली सुमारे दहा-बारा वर्षे एका छोटय़ाशा खोलीत ते एकटे राहताहेत. एकेकाळी सगळ्या मोठमोठय़ा संगीतकारांच्या ध्वनिमुद्रणांत महत्त्वाचा सहभाग असणारा हा महान वादक! आज आमच्या संस्थेने त्यांना पुन्हा प्रकाशात आणलंय..’’ निवेदकाने कातर आवाजात स्वागत केलं आणि ‘दादा’ स्टेजवर आले. खरं तर आणलं त्यांना कोणीतरी. म्हणजे चालतच आले ते- पण कोणीतरी अज्ञात शक्ती ढकलत होती म्हणून यावं तसं. आणि मग राजकारणी, समाजकारणी, संगीताचे आश्रयदाते, मदतीची थैली देणारे दानशूर उद्योगपती सगळ्यांचे चार- चार शब्द बोलणं सुरू झालं. खरे खरे आतून हलले होते ते आजच्या पिढीतले सुप्रसिद्ध वादक, गायक. त्यांना कदाचित त्यांचा ‘उद्या’ घाबरवत होता. आणि ज्यांच्याभोवती हा सगळा सोहळा गुंफला जात होता ते ‘दादा’ मात्र आढय़ाकडे नजर लावून निर्विकार बसले होते. त्यांचं ते शांत बसणं, कोणी नमस्कार केल्यावर स्वत:शी  हात जोडून काहीतरी पुटपुटणं, हाताच्या बोटांनी खुर्चीच्या हातावर ताल धरणं.. तिथे असूनही तिथे अजिबात नसणं.. सगळं बघताना मला त्यांच्या डोळ्यांत, चेहऱ्यावर दिसत होती ती आमच्या संदीप खरेची माझी अतिशय आवडती कविता..
‘इच्छा मेली..
आता कसले हारतुरे हे तिला घालता
आदर करता.. नमस्कारही करता वाकून
आता बघता निरखून मुद्रा जवळ येऊनी
आणि तरीही सुरक्षितसे अंतर राखून..
इच्छा मेली..’
..उशिरा सुचतं सगळं! का?  योग्य वेळेला, योग्य माणसाला श्रेय का नाही द्यायचं? एकदम जाग का येते.. की या माणसाचं योगदान अमूल्य आहे, सारं आयुष्य यांनी वाहून घेतलं संगीताला, खेळाला, शास्त्र, विज्ञान, शिल्प, चित्र.. कशालाही.. पण हे वेळेवर का नाही समजत?
‘ज्याचे त्याला यथायोग्यसे श्रेय
पुरे मिळणार कधी?
स्वराज्य आले यौवनात,
पण सुराज्य हे होणार कधी?’
१९७२ मध्ये सुधीर मोघेंनी ही कविता लिहिली. प्रत्येक शब्द फार महत्त्वाचा आहे यातला. ‘ज्याचे त्याला’ ‘श्रेय’ ‘पुरे’ कधी मिळणार? एखादा माणूस भरात असताना, उत्तमोत्तम काम करत असतानाच त्याला मोठा पुरस्कार, सन्मान आणि त्यापलीकडे योग्य ते श्रेय, त्याच्या कामाची खरी पावती का नाही दिली जात? तो आज काम करतोय, प्रसिद्ध आहे, पैसा आहे; मग त्यात आणखी आपण ‘कौतुक’पण करायचं म्हणजे फार जास्त अपेक्षा होतात का माणसांकडून? मग तो अजून प्रसिद्ध  होईल, मोठा होईल याची भीती वाटते का इतरांना? मुळात तो मोठा आहेच, श्रेष्ठ आहेच, हे मान्य करायला भीती वाटते. त्यामुळे एकदा तो ‘हीरो’ असणारा ‘दादा’ काम करेनासा झाला की मग त्याचं कौतुक करायचं. कारण आता तो अजून मोठा होण्याची भीती नाही!! इतकी कोती मनोवृत्ती का असावी?
श्रेय देण्यात उशीर करण्यासारखं मोठं पाप नाही. नंतर दोन वाक्यांत माफी मागितली जाते, पण..
‘परवापरवापर्यंत तर तुमच्याच घराचे
सतत वाजवीत होती ना हो ती दरवाजे
रात्री-अपरात्री ती वणवण फिरता फिरता
तुम्ही झोपला होता निवांत रजई घेऊन
आता कसले हारतुरे हे तिला घालता..
इच्छा मेली..’
विश्वास ठेवायलासुद्धा फार वेळ लावतो आपण. तो पोटतिडकीने सांगत होता, की मला एका षड्यंत्रात फार पद्धतशीरपणे अडकवलंय. तुम्हाला थोडय़ा दिवसांनी समजेल की, मी खरं सांगत होतो. पण सतत आपली मतं, तत्त्वं, विचार आणि पुरावे एवढंच बघतो आपण. पण त्याच्या डोळ्यांत त्याहूनही काहीतरी खूप खरं, खूप खोल असतं, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. ऐकून घेतो; बोलणं समजून घेत नाही. तो ओरडत राहतो छाती फोडून. पण सगळे कान बंद ठेवून सहानुभूतीने बघतात फक्त. ‘आग असल्याशिवाय धूर येणार नाही..’ अशी घोषणा चालू ठेवतात. आणि मग पुढे जेव्हा ती आग त्याची नव्हतीच हे कळतं तेव्हा  चाचपडत एक-एकजण त्याला म्हणतो की, ‘‘तू बरोबर होतास.. आम्हाला वाटलंच होतं की तू असंकरणार नाहीस!!’’ तो हसतो फक्त स्वत:शी.. त्या हसण्यातसुद्धा हीच कविता दिसली मला..
‘इच्छा मेली..
भीक कुठे ती मागत होती तुमच्यापाशी
जरा बोलला असता वाक्ये दोन तिच्याशी
पाय तिला होतेच तिचे की; तुम्ही परंतु-
दिलीत शिक्षा उभे राह्य़ची जमिनीवाचून
आता कसले हारतुरे हे तिला घालता
आदर करता.. नमस्कारही करता वाकून
इच्छा मेली..’
गोष्ट त्या क्षणाची असते.. त्या दिवसाची असते. ते, तेव्हा, तसंच घडलं तरच मजा आहे. म्हणजे किती छोटय़ा छोटय़ा अपेक्षा असतात माणसांच्या, की आपल्या मुलांनी आपल्याशी रोज चार वाक्यं बोलावीत. ‘कसे आहात तुम्ही?’ इतकंच विचारावं. पण नाही जमत बिझी लोकांना तेवढंसुद्धा? मग नंतर त्यांची स्मृती अंधूक झाल्यावर काय उपयोग बोलून? दृष्टी थोडीशीच धूसर झालीये तोवर त्यांना नातवंडांना डोळे भरून पाहायचं असतं, तर त्यांना मिळतो बेचाळीस इंचांचा टेलिव्हिजन सेट. बघा. ज्यांनी आयुष्यभर मुलांच्या हसण्यामध्ये सगळा आनंद मानला, त्यांना वेळ न देऊ शकल्यामुळे ‘मोठ्ठा टीव्ही’ ही नुकसानभरपाई होऊ शकते का?
गोंधळ होतोय.. त्या इच्छेला तेच उत्तर हवं ना? लहान मुलांना झोपताना गोष्ट नाही सांगितली तर नंतर तुम्ही अचानक एक दिवस मायाळू आई-बाप नाही होऊ शकणार. त्यांच्याही डोळ्यांत ‘इच्छा मेली’ ही कविता दिसली तर मग त्याची नुकसानभरपाई कशानेही होऊ शकणार नाही. मुलांना जन्म  द्यायचा म्हणजे फक्त गोड गोड बाळ, छान छान कपडे आणि समाजासाठी ‘पालकपण’ मिरवणं नाही; जबाबदारी आहे ती. जोपर्यंत तुमच्या लहानग्यांचं अडतंय तुमच्यावाचून- तोपर्यंत आणि तेव्हाच वेळ द्यायला हवा.. नाहीतर नंतर कितीही वाटलं तरी त्यांचं अडत नाही आणि तुमच्या असण्या-नसण्याचा त्यांना फरकही पडत नाही.
वेळ टळून गेल्यावर कौतुकाचे शब्द इतके जुनाट आणि कृत्रिम वाटायला लागतात, की त्यापेक्षा योग्य माणसाने केलेली ‘टीका’ बरी!!
उच्चशिक्षित असलेल्या स्वत:च्या बायकोला घरी बसवणारे अहंकारी  पुरुष जेव्हा पन्नासाव्या वाढदिवसाला म्हणतात की, ‘हिच्यामुळे मी घडलो’- तेव्हासुद्धा ‘ती’च्या डोळ्यांत मी ही कविता पाहिली आहे. ज्याच्या हातात कला होती, गळ्यात जादू होती असे कित्येक गुणी कलाकार मन मारून व्यवहाराची जुळणी करण्यासाठी वेगळा मार्ग पत्करून कलेपासून दूर राहतात. अशा एखाद्याला ‘तुम्ही गा ना, किती छान आवाज आहे तुमचा!’ असं कोणी म्हणतं- तेसुद्धा एकसष्ठीला- तेव्हा त्याच्या डोळ्यांतही हीच कविता दिसते. मग.. त्यांच्या उसाशात ऐकू येतं.. की-
‘इच्छा मेली..
बरेच झाले.. सुटली तीही अन् आपणही
खत्रुड होती तिची कुंडली पहिल्यापासून
सदा मिळाले धक्के, खस्ता आणिक नफरत
असायची पण उद्याकडे ती डोळे लावून’
उद्याकडे डोळे लावून बघता बघता दृष्टी धूसर होते आणि मग कोणीतरी मानपत्र वाचूनच दाखवतं, कौतुकाची भाषणं होतात; पण अर्धे शब्द ऐकूच येत नाहीत अशा वयात. आणि थैली मिळते ती धरणारे हात थरथरत असताना.
जल्लोष होतो, मान मिळतो, उशिराने विश्वास ठेवतात सगळे, पदव्या देतात, पुतळे बांधतात, पण..
‘आता कसले हारतुरे हे तिला घालता
आदर करता, नमस्कारही करता वाकून
इच्छा मेली!!’
सलील कुलकर्णी – saleel_kulkarni@yahoo.co.in

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
knight frank wealth report 2024
अग्रलेख : अधिक की व्यापक?
Maharashtra State Electricity Board, Contract Workers, Strike, Supported, Permanent Employees organization
राज्यात वीज चिंता! कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ७ कायम संघटनांची उडी
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश